#माझं_काम_माझा_अभिमान अश्या हॅशटॅगने आपल्या कामाबद्दल, आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल लिहायचे असे फेसबुकवर सुरू होते.
त्यात माझ्या not so प्रेरणादायी वगैरे प्रवासाबद्दल.. प्रवास कसला.. इकडून तिकडे उडयांच्याबद्दल लिहून काढले. ती ही पोस्ट.
सुरुवात करण्यापूर्वी हा वैधानिक इशारा.
हा माझा प्रवास असल्याने त्यात मी मी मी मी खूप आहेच. त्याला पर्याय नाही. दुसरं म्हणजे ही काही परिस्थितीशी दोन हात प्रकारच्या संघर्षाची गोष्ट नाही. जो काय थोडाफार संघर्ष असेल तो 'आपुला आपणासी' प्रकारचाच आहे. स्टोरी बडी और बडी बोरिंग है.
----------------
'मोठेपणी कोण होणार?' याची उत्तरं लहानपणी सतत बदलत असतात. माझीही होती. फरक इतकाच की वयाने वाढल्यावरही ती बदलतीच राह्यली.
मेडिकल वा इंजिनिअरिंगच्या वाटेला जाणार नाही हे शाळेतच पक्के करून टाकल्यावर मग दहावीनंतर 'कोठे जावे, काय करावे, काही कळेना' अशी अवस्था होती. मग बरे मार्क होते म्हणून सायन्सची वाट धरली.
कॉलेजात असताना नाटकाचा किडा चावला. काही वर्कशॉप्स केली. तिथून काही चांगले ग्रुप्स मिळाले. चांगली माणसे भेटली. हे आवडतंय असं झालं. पण माझ्याकडे कॉन्फिडन्सची बोंब. कोण काम देणार होतं मला? मला थोडीच जमणार होतं? इथेच माझी गाडी अडकलेली. अपवाद वगळता बहुतेक मित्रमंडळी अवसानघातकीच होती. त्यामुळे आपण काहीतरी करायचं ठरवायचं आणि मित्रमंडळींनी आपल्याला हसायचं हे ठरलेलंच.
याच दरम्यान विक्रम गायकवाडकडे मेकप शिकले. मग हे बरंय असं वाटलं. हाताने काहीतरी रंगवणे, घडवणे हे आयुष्यात असायलाच हवे. नाही जमणार त्याशिवाय हे यावेळेला थोडंसं स्पष्ट व्हायला लागलं.
बीएस्सी उरकल्यावर आता सायन्स पुरे हे पक्के ठरवले. एम ए नाटक शिकायला पुणे विद्यापीठात गेले. मित्रमंडळी हसायचीच. मला सवय झाली होती त्याची. त्यामुळे दुनिया फाट्यावर वगैरे मी आपोआप शिकले. विद्यापिठात शिकत असताना इतिहास पहिल्यांदा मनापासून आवडायला लागला. एम ए करत असतानाच ग्रीप्सची काही नाटके, वामन केंद्रे यांनी डिरेक्ट केलेलं एक नाटक वगैरे केले.
याच काळात कॉश्च्युमच्या जगाशी तोंडओळख झाली. आणि मी हेच करायचं ठरवलं. करायचं तर शिकायला हवे. ते कुठे शिकावं हे शोधू गेले तर देशात कॉश्च्युम डिझायनिंगचा कोर्सच नाही हे लक्षात आले. त्याच वेळेला युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाचे तेव्हाचे नाट्यविभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंड आमच्या ललित कला केंद्रात(पुणे विद्यापीठ) आले होते ते जॉsज्याला कॉश्च्युम शिकायला चल म्हणाले. मग मी गेलेच तिकडे कॉश्च्युम मध्ये (नाटकाच्याच विभागात) तीन वर्षांचे एमएफए करायला. मित्रमंडळी खदखदून हसली.
ती तीन वर्षे माझ्या आयुष्यातली सगळ्यात भन्नाट वर्षे होती. शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य, क्षणाक्षणाला येणारे नवीन अनुभव, समोर येत जाणाऱ्या नवीन संकल्पना, हळूहळू तुटून गेलेली झापडं हे सगळं होतं. तेव्हा नाटक शिकणे यावर हसायची मराठी किंवा थोडीफार भारतीय परंपरा असल्याने आमच्या डिपार्टमेंटला मी सोडून एकही भारतीय व्यक्ती नव्हती. त्यामुळे देशी कोंडाळ्यापासून वाचले. जगभरातले लोक मिळाले. सगळे नाटकवाले त्यामुळे देशी लोकांपेक्षा 'माझिया जातीचे'. तिथे असताना तीन उन्हाळी सेमिस्टर्समध्ये सॅण्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये काम केले. पहिल्या वर्षी शिवणविभागात तर पुढची दोन वर्षे कॉश्च्युम क्राफ्ट विभागात. कॉश्च्युम क्राफ्ट मध्ये चपलाबूट, बेल्टस, दागिने, मुखवटे वगैरे सर्व गोष्टी येतात. त्या त्या सीझनमधल्या ऑपेरांच्यासाठी डिझाईनबरहुकूम या सर्व वस्तू बनवणे हे या विभागाचे काम. इथे तारकाम व इतर दागिने बनवणे, लेदरचे बेसिक काम, विविध प्रकारची रंगवारंगवी, विविध प्रकारचे मटेरियल हाताळणे हे शिकले. शिकले असं वाटलंच नाही इतकी मजा यायची हे करताना. सॅण्टा फे हे गावही जादुई आहे. नेटिव्ह अमेरिकन आणि हिस्पॅनिक संस्कृतीच्या खुणा जागोजागी आहेत. तिथली चित्रसंस्कृती, डिझाईन-संस्कृती आपल्याला माहिती असणाऱ्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे आणि तितकीच सुंदरही. माझ्या डोक्यातल्या चौकटी मोडायला इथे सुरुवात झाली.
मग परत आल्यावर कॉश्च्युममधे काम सुरू केले आणि पुण्याला विद्यापिठात, ललित कला केंद्रात नाटकाच्या एम ए च्या मुलांना कॉश्च्युम आणि मेकप शिकवायला सुरूवात केली. मला शिकवायला आवडतंय हे लक्षात यायला लागले.
मुंबईत कामाची सुरूवात केली तेव्हाच तीनचार वर्ष ठरवून ठेवलेल्या नवऱ्याशी लग्नही करून टाकले. एकत्र काम करत होतो. ती मजा होतीच. आमची दोघांची एकत्र म्हणजे तो दिग्दर्शक आणि मी कॉश्च्युम डिझायनर म्हणून केलेली पहिली फिल्म झाली. तिला प्रचंड यश मिळाले. हे काम करायची संधी मला माझ्या डिग्रीच्या बळावरच मिळाली होती पण माझ्या कामाला दिग्दर्शकाची बायको असे लेबल लागले. एकदा बायकोपणामुळे सगळं मिळतंय असं जगाने ठरवलं तुमच्याबद्दल की मग तुमचे शिक्षण, तुमचे काम, तुमची गुणवत्ता हे भारतीय डोळ्यांना चुकूनही दिसत नाही. ती मजा माझ्याबाबतीतही झाली. अजूनही होते.
२००५ मधे दिल्लीच्या रिता कपूर यांनी त्यांच्या मोठ्या प्रकल्पातल्या एका भागाबद्दल मदत करण्यासाठी विचारले. तेव्हा मला रिता कपूर कोण ते काहीही माहिती नव्हते पण नऊवारी साडीचा विषय होता. नाही म्हणणे शक्यच नव्हते. नऊवारी साड्यांची नेसण या संदर्भाने त्यांना माहिती द्यायची होती. एकेकाळी जाणता राजामधे काम केलेले असल्याने नऊवारी नेसण्याचे काही बेसिक प्रकार येत होतेच. ते सांगितले आणि त्यांच्या फोटोग्राफरबरोबर वाड्यावस्त्यांवर जाऊन कातकरी, ठाकरी, कोळी, आग्री वगैरे साड्यांची नेसणही शिकून घेतली. नंतर वर्षभरात दिल्लीवारी झाली तेव्हा रिता कपूर यांच्या स्टुडिओ/ ऑफिसमधले दृश्य बघितले तेव्हा त्यांचा हा प्रकल्प किती मोठा आणि किती महत्वाचा आहे हे लक्षात आले. माझे त्या प्रकल्पातले काम झाले होते पण माझ्या डोक्यात किडा पडला होता. पुढे नदी वाहतेच्या रिसर्चसाठी फिरताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातल्या वेगवेगळ्या जातींजमातींच्या साडी नेसण्याच्या पद्धती गोळा करायला, फोटो/ व्हिडिओ काढून ठेवायला सुरूवात केली होती. त्या त्या लोकांचे जगणे आणि त्यांच्या साड्या नेसण्याच्या पद्धती यांची सांगड घालणे, या सगळ्यात एक सूत्र काही मिळतेय का ते बघणे हे माझ्याही नकळत माझ्या डोक्यात चालू झालेले होते. एकही पुस्तक मात्र मला नेसण्याच्या पद्धतींविषयी, त्या इतिहासाविषयी फार काही सांगत नव्हते. अखेर २०१०-२०११ दरम्यान कधीतरी रिता कपूरचा 'Sarees: Tradition and Beyond' नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. भारतभरातील साड्यांचा इतका मोठा पसारा आणि तरीही योग्य माहिती असलेला हा एकमेव ग्रंथ आहे. या विषयात अभ्यास असलेल्यांना या ग्रंथाचे महत्व नक्कीच कळेल. मराठी साड्यांच्या नेसण पद्धतींबद्दल रिता कपूरने त्या ग्रंथात मला क्रेडिट दिलेले आहे. हे काहीतरी भन्नाट होते. कामापुरता रिसर्च पासून रिसर्च हेच काम हा एक मार्ग मला खुणावू लागला. त्या मार्गावरच्या एका प्रकल्पाला हात घालण्याचा प्रयत्न आता चालू आहे.
नाटकाचा किडा स्वस्थ बसवेना म्हणून एक कवितांचा रंगमंचीय आविष्कार धर्तीवरचं प्रकरण उभं केलं. संकल्पना, कवितांची निवड, त्यातून संहिता तयार करणे, दिग्दर्शन वगैरे माझे. खूप शिकले मी हे करताना. अकरा प्रयोग झाले आणि एवढ्या लोकांची मोट बांधत सगळी मॅनेजमेंट खेचणे मला झेपेनासे झाले. मग बंद केले ते.
एक दिवस सतीश मनवरने त्याच्या नाटकासाठी विचारले. मनस्विनीने लिहिलेले नाटक सतीश दिग्दर्शित करत होता. खूप वर्षांनी रंगमंचावर उभे राहायचे हे फार मस्त वाटले. मजा आली होती. अभिनय ही बाब आपल्याला कधीही जमणारी नाही असे जे मी ठरवले होते कधीच्याकाळी त्याला सुरुंग लागला. बरं जमलं होतं तेही. अर्थात त्यात यापुढे जाऊन काही प्रयत्न करावे इतपत बळ माझ्याच्याने एकवटले नाही. जे शिकलेय त्यातच काम करायला हवे हा विचार सगळीकडून पक्का घट्ट बसवलेला होता. तो खिळखिळा व्हायला अजून वेळ होता.
याच दरम्यान लिहायची ऊर्जा छळू लागली. पेनाने कागदावर लिहायची गरज आता उरलेली नव्हती. युनिकोड देवनागरी जगात आलेले होते. वाईट अक्षरापायी आता काही अडणार नव्हते. मग ब्लॉगिंग सुरू केले. मी लिहिलेलं आवडतंय लोकांना असे वाटल्याने नियमित ब्लॉगिंग करत राह्यले. कथा लिहिणे सुरू केले. काही कथांना साप्ताहिक सकाळ, मिळून साऱ्याजणी वगैरेंची बक्षिसे मिळाली. मी लिहायला सुरू केले हे बघून सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला झाला. पहिल्या कथेला बक्षीस मिळाल्याचे बघितले तिने आणि महिन्याभरात ती गेली. माझं सगळं बळ संपलं. पण मी लिहीत राह्यले. कथा, कविता आणि ब्लॉग्ज वगैरे.
मग पेणमधल्या एका एनजीओसाठी एक डॉक्युही करून दिली. तेही आवडले काम.
दरम्यानच्या काळात कॉश्च्युम्सचे काम करत होतेच छोटेमोठे. करत राह्यले पण हळूहळू त्यात मजा यायची बंद झाली. या इंडस्ट्रीची मागणी आणि मी जे शिकून आले होते ते याचा मेळ बसेना.
एकदा तुम्ही एखाद्या विषयात स्पेशलाईज्ड शिक्षण घेतलेत की त्या तेवढ्याच गोष्टीपलिकडच्या इतर कशातलेही तुमचे काम, मत, विचार हे पूर्ण इनव्हॅलीड होतात. 'कॉश्च्युम करताय ना तर तेवढे नीट पुरवा, उगाच सीनच्या व्हिज्युअल ट्रीटमेंटमध्ये आणि बाकी फ्रेमच्या रंगसंगतीमध्ये नाक खुपसू नका.' असा साधारण खाक्या असतो. आणि मला या गोष्टी समजून न घेता कॉश्च्युम्स करणे मेंदूला थकवणारे व्हायला लागले होते. व्यक्तिरेखा कपड्यातून घडवताना जी क्रिएटिव्ह गंमत असते ती मिळेना. कपडे पुरवठादार म्हणून काम करताना कंटाळा येऊ लागला. त्यातच नाटक, लिखाण, डॉक्युमेकिंग वगैरे करताना जी तरतरी यायची मेंदूला ती सोसाने शिक्षण घेतलेल्या या विषयात काम करताना मिळत नव्हती. मग चालढकलही व्हायचीच अर्थात.
यातच नदी वाहते स्वतः प्रोड्युस करायचा निर्णय आम्ही घेतला. त्याचे सर्व ताण, वेळेची मागणी, हजारो नव्या गोष्टी शिकणे हे सगळे संदीपपेक्षा कणभर कमी पण माझ्याही वाट्याला होतेच. अशी मी अनेक गोष्टीत विखुरलेली होते.
'आपण या गोष्टीत स्पेशलाईज्ड शिक्षण घेतलंय. त्यामुळे यातच काम करणे, यातच पुढे जाणे, यातच एक्सेल करणे हे आणि हेच अनिवार्य आहे. मुख्य आहे. बाकी सगळे दुय्यम.' हे भूत मानेवर घट्ट जखडून बसले होते. आणि कॉश्च्युमच्या पलिकडच्या शक्यता माझ्या मलाच दिसत होत्या. या दोन्हीत झगडा चालू होता माझ्या आत. परिणामी बाहेरच्या बाजूला मी अजूनच डल पडत चालले होते. असे व्हायला लागले की तुमच्यावर फुल्या मारणाऱ्यांची कमतरता नसतेच.
हा झगडा निपटण्यासाठी म्हणा किंवा हात शिवशिवत होते म्हणून म्हणा किंवा अजून काही कारणाने म्हणा, मी काहीतरी कलाकुसर सुरू करायला हवी हे ठरवले. सॅण्टा फे ऑपेरामध्ये काम करताना तारेच्या कामाची अगदी तोंडओळख झाली होती. आता तार आणि कापड असे काहीतरी सुचत होते. ज्याची सुरुवात कमी जागेत, थोडक्या खर्चात करणे शक्य होते. मग एक दिवस सम्राट (तुळशीबाग) मधून तारेचे एक पाकीट आणले. ती भयानक तार आणि कापडांचे मणी बनवून त्यातून एक नेकलेस सारखे करून पाह्यले. मजा आली. जे झाले होते ते काही खास नव्हते पण. ती तार अगदीच टुकार होती. ही 2011 मधली गोष्ट. फेसबुकवर वायर रॅप ज्वेलरी नेटवर्क नावाच्या ग्रुपमध्ये बरंच शिकायला मिळत होतं. तार कामातल्या कलाकुसरीबद्दलही आणि तारकलाकार म्हणून एथिक्सबद्दलही. ते सगळे पल्याडच्या देशांच्यातले लोक. एकही वस्तू कुठे मिळेल कुणीच सांगू शकत नव्हते. मग एक दिवस भुलेश्वर गाठले. या दुकानातून त्या दुकानात शोधत शोधत तांब्याच्या तारांची दोन भेंडोळी आणि अगदी बेसिक हत्यारे घेऊन आले. आणि सुरू केले तारा वळणे. चुकत,माकत, शिकत प्रवास सुरु झाला. २०१३ मधे मी पहिला संपूर्ण नेकलेस बनवला एका मैत्रिणीला गिफ्ट द्यायला. पण अजून तरी माझी स्टाइल किंवा असे काहीच सापडलेले नव्हते.
एक दिवस असेच सराव म्हणून घरात असलेला एक दगड तारेने बांधून बघितला. पॉलिश न केलेली तार आणि दगडाचे रांगडेपण या दोघांची एकमेकांशी कुंडली चांगलीच जुळली आणि मला माझी शैली मिळाली. तेव्हा आमचे नदी वाहतेचे शूटींग सुरू व्हायच्या बेतात होते. प्रॉडक्शन डिझायनर म्हणून माझे काम सुरू झालेले होते. एका सीनमधे नदीतल्या साती आसरांशी नाते सांगणाऱ्या सात मुली असणार होत्या. नदी, माती, दगड, झाडे, पाने, आकाश, निसर्ग या सगळ्याचा भाग असल्याप्रमाणे त्या दिसणे अपेक्षित होते. त्या सातही जणींना काही थोडके असे दगडाचे तारेत बांधलेले दागिने घालायचे ठरवले. त्याप्रमाणे प्रत्येकीला एकेक नेकलेस आणि एकेक केसात माळायचा दागिना बनवला. नदी, निसर्ग आणि रस्टिक असे काहीतरी अस्तित्व या गोष्टींनी डिफाइन केले.
नदी वाहतेच्या भरपूर जबाबदाऱ्यांच्यात मला ठिकाणावर राहायला तारांनी मदत केली हे नक्की. त्यात माझे काहीतरी सापडत होते. नदी वाहतेचे शूटिंग संपेस्तोवर माझा आतला झगडा संपत आला होता. माझी कॉश्च्युम डिझायनर म्हणून ओळख रेटत राहायचे भूत फेकून द्यायचे मी ठरवले होते. तारकामाचे रूपांतर व्यवसायात करता येईल कदाचित ह्या विचाराने उचल खाल्ली होती. तारकामात हळूहळू प्रगती होत होती. एका मैत्रिणीने माझ्याकडून दगडाचे तारेत बांधलेले पेंडंट आणि तारेची चेन असे नेकलेस करून घेतले. ती माझी या कामातली बोहनी. तिला द्यायचे म्हणून मग माझ्या ब्रॅण्डचे नाव नी नक्की केले. पण प्रत्यक्ष दागिन्यांचे कलेक्शन वगैरे असे काही तेव्हा करण्याइतकी माझी तयारी झालेली नव्हती.
याच दरम्यान एका नाटकाच्या कॉश्च्युम डिझायनिंगचे काम आले. बाई(विजया मेहता) डिरेक्ट करत होत्या. काम करायला मजा आलीच पण बाकी त्यांच्या हातात नसलेले अनेक फॅक्टर्स होते. काम चांगले झाले तरी इथे मी स्वतःला लांबून तपासत राह्यले आणि अखेर माझ्या आवडत्या कामापासून तात्पुरती किंवा कायमची फारकत घेण्याचे ठरवले. स्वत:शीच ठरवले पण ती हिंमत गोळा करायला बरंच बळ लागलं होतं. हे नाटकाचे प्रोजेक्ट मधेच थांबले एकदोन महिन्यांसाठी. आणि मी ठरवले आता खेळ फार झाले. आता निर्णय झालाय तर पुढच्या वाटेची काहीतरी ठोस सुरूवात व्हायला हवी. आणि नाव ठरल्यावर तब्बल 6-7 महिन्यांनी 10 एप्रिल 2015 ला माझे पहिले कलेक्शन मी फेसबुक पेजवर लॉन्च केले. छान रिस्पॊन्स होता लोकांचा. मी ही शिकत होते. तेव्हापासून आतापर्यंत 5 छोटी छोटी कलेक्शन्स, कलेक्शन शिवायच असेच एकेकटे दागिने, अगणित कस्टम डिझाइण्ड दागिने बनवले आहेत. माझे तारेतले क्राफ्ट, मटेरियलची समज यांचा आलेख चढता ठेवायचा प्रयत्न आहे. काही गोष्टी मी पहिल्यापासून ठरवल्या होत्या त्या आजही पाळतेय. एक म्हणजे बाजारात ज्या प्रकारचे, ज्या पोताचे दागिने मिळत होते ते बघून मला कंटाळा आला होता म्हणून मला काहीतरी वेगळे हवे होते. ही दिशा, हा हेतू सोडायचा नाही. आणि दुसरे म्हणजे कुठलेही ठराविक ट्युटोरियल बघून त्याबरहुकूम वस्तू बनवणार नाही. ट्युटोरियल हे टेक्निक शिकण्यापुरतेच असेल, तयार झालेली वस्तू पूर्णपणे माझ्या शैलीची, माझ्या डोक्यातून आलेली असेल.
आता कुठे तारेची नस समजायला लागलीय. आता तारांच्यातून ब्रह्मांड उभं होताना दिसतंय डोक्यात. व्यवसाय म्हणूनही या मार्गावरचे दिवे हळूहळू उजळतायत अशी शक्यता वाटायला लागलीये.
नी च्या पहिल्या पाच वर्षात माझ्या बाकी आयुष्यातही प्रचंड उलथापालथ झाली. त्यातून आम्ही तावून सुलाखून जातो आहोत अजूनही. अनेक पातळ्यांवरची ओढाताण चाालोो आहे. यात टिकून राहायला मला माझ्या तारकामाचा सर्वच पातळ्यांवर खूप उपयोग झाला हे नक्की. पार्ल्यातून वसईला राहायला जाणे हे ही घडले या काळात. वसईने शांतता आणि होप्स दिल्या आहेत.
याच पाच वर्षात अजून एक महत्वाची गोष्ट घडली. एम ए करत असताना इतिहास आवडू लागला हे मी आधी सांगितले आहेच. एम एफ ए करत असताना वेशभूषेचा इतिहास असा विषय होता. इतिहास ही कशी आपल्या सगळ्या सगळ्याला कारणीभूत गोष्ट असते याचा प्रत्यय ठायी ठायी येऊ लागला. त्याबद्दल थोडे थोडे लिहायला सुरू केले होते. 2018 मधे कपड्याच्या इतिहासातल्या गमतीजमतींबद्दल, प्रवाहांबद्दल, समजुतींबद्दल मी एक सदर लिहिले. तसे त्रोटक स्वरुपाचेच होते पण ते लिहिले जाणे मला गरजेचे वाटत होते. त्यावर पुढे करायचे काम माझी वाट बघते आहे.
कोविडने जग थांबले तेव्हा ड्रामा स्कूल, मुंबई या संस्थेत कॉश्च्युम आणि सेट डिझाइन शिकवत होते तसेच तिथल्या डिझाइन विभागाची प्रमुख म्हणूनही काम बघत होते. अर्थात व्हिजिटिंग. हे वर्ष शिकवण्याचे काम सगळे थांबलेच आहे. पण जग जाग्यावर येईल, संस्था, विद्यापिठेही जाग्यावर येतील आणि नाट्यविभाग सुरू होतीलच. तेव्हा मी शिकवत असेनच.
याच काळात कधीतरी मी माझे असे कैक गोष्टीत विखुरलेले असणे स्वत:शीच स्वीकारले. करीअर उपदेश वगैरे असतात त्यात सांगितले जाते की तुम्हाला अखेरीस एक काहीतरी काम करायला हवे. एक काहीतरी तुमचे शीर्षक असायला हवे अन्यथा तुम्हाला व्यावसायिक म्हणून पुरेश्या गांभिर्याने स्वीकारले जाणार नाही. हे सूत्रही तसे ओव्हररेटेड आहे. मुळात फ्रीलान्सर असायचे तेच एका खुंटाला बांधले न जाण्यासाठी तर मग तुम्हाला दहा गोष्टी खुणावत असतील आणि त्यातल्या चार गोष्टी तुम्ही उत्तम करू शकत असाल तर एकच एक ओळख हवी याचा सोस फार छळतो तुम्हाला. त्यापेक्षा असू द्यावी विखुरलेली ओळख.
अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जग वयाचा फार मोठा बागुलबुवा करून बसतं. अमुक एका वयानंतर नवी सुरूवात असूच शकत नाही अशी समजूत करून ठेवलेली असते जगाची. त्या अमुक वयाच्या टप्प्यानंतरही माणूस म्हणून मनात, शरीरात आख्खा डाव परत नव्याने खेळता येण्याची ताकद असते. हे मी मानते, अनुभवते आहे त्यामुळे दहा वर्षांनी कदाचित या माझ्या उड्यांमधे काहीतरी वेगळ्यात गोष्टीची भर पडलेली असूच शकते कुणी सांगावं!
हा माझा प्रवास कुणाला फार प्रेरणादायी वगैरे असणार नाहीये पण कुणा माझ्याइतकेच विखुरले असलेलीला किंवा चाळीशीनंतर नवीन नवीन स्वप्ने पडत असलेल्या कुणाला 'आहे कुणीतरी सोबतीला!' इतके वाटले तरी पुरे आहे.
सध्यासाठी समाप्त!
-नी
0 comments:
Post a Comment