लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता.
'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला शिकणं, नेसणं, नेसवणं हे ओघानेच आलं. मग कधी जाणता राजामधे लावण्या नाचता नाचता दोन एन्ट्र्यांच्यामधे घड्याळ लावून पाच मिनिटात घुंगरू, नव्वारी शालू उतरवून परत दुसरा शालू नेसून घुंगरू बांधून परत नाचायला तयार इत्यादीची प्रॅक्टीसही गरजेप्रमाणे करून झाली. नव्वारीमधला अवघड आणि गूढ पणा संपला. पण खानदानी पणा रूजून राह्यला.
पुढे नाटकसिनेमातलं कापडचोपड हाताळायच्या धंद्यात उतरायचं ठरवलं तेव्हा सगळ्याच वस्त्राभूषणांचा अभ्यास डोळसपणे सुरू केला. आणि आपल्या म्हणजे भारताच्या वेशभूषेच्या प्रवासाने मोहवून टाकलं.
लांबलचक कापड अंगावर वेगळ्या वेगळ्या जागी गुंडाळायच्या, लपेटायच्या केवढ्या त्या तर्हा, त्यातली कला, त्यातलं सौंदर्य, त्यातली उपयुक्तता सगळंच अचंबित करणारं होतं.
तिथे कुठेतरी हे ही ठळकपणे जाणवलं की अरे नव्वार हे काही साडीचे, नेसायच्या पद्धतीचे नाव नाहीच्चेय. ते साडीचे माप आहे केवळ. आणि मग आपसूक नव्वारीचा बोली भाषेतला संधी फोडून नउवारी असं म्हणायला सुरूवात झाली.
पुढे अभ्यासत जाताना जगभरातल्या इतर प्राचीन संस्कृतींमधील वेशभूषा आणि भारतीय वेशभूषा यांची नकळत तुलना होत असायची. प्राचीन ग्रीक, रोमन, असिरीयन, इजिप्शियन, बॅबिलोनियन इत्यादी सगळ्याच वेशभूषा आणि भारतीय वेशभूषेत साम्यस्थळं पण अनेक आढळली. प्राचीन रोमन वेशभूषेमधे तरूण स्त्रियांच्या डोक्यावर ओढणीसारखं काही असे डोकं झाकण्यासाठी त्याला 'पल्ला' म्हणतात ज्याचा आपल्याकडे अर्थ पदर असा होतो अश्या काही गमती सापडल्या.
सगळ्या प्राचीन युरोपियन व पर्शियन वेशभूषांच्यात मात्र सापडली नाही ती एक गोष्ट म्हणजे 'कासोटा' किंवा कपड्याचे 'दुटांगीकरण'.
प्राचीन भारताच्या बाकी भागात हे 'दुटांगीकरण' प्रकर्षाने दिसून येतेच. पण प्राचीन भारताचा विस्तार आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे तेव्हाच्या गांधार देशापर्यंत मानला जातो. या गांधार देशात सुद्धा कपड्याचे 'दुटांगीकरण' अस्तित्वात असल्याचे भरपूर पुरावे मिळतात. हे 'दुटांगीकरण' बहुतांशी धोतर नेसल्यासारखे, एक पदर मागे कासोटा म्हणून नेणे आणि दुसर्या पदराचा पुढे पंखा करणे किंवा खरंच पदर म्हणून वापरणे असं दिसतं. किंवा धोतरासारखे दुटांगीकरण आणि दुसरे वेगळे वस्त्र वरचे शरीर झाकायला असं दिसून येतं. स्त्रिया व पुरूष दोघांच्याही अंगावर याच प्रकारचे 'दुटांगीकरण' दिसून येते.
गुप्त काळात मात्र (early 4th cent to mid 8th cent AD) आपल्याला आपल्या ओळखीची दुटांगी साडी दिसून येते. हिचे दुटांगीकरण हे धोतरापेक्षा वेगळे आहे आणि तेच कापड सलगपणे पदरापर्यंत गेलेले आहे. तेही अजंठाच्या लेण्यात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात. आता ही साडी खरोखरच नऊवारी होती की नाही ते मात्र सांगणं कठीण आहे. पण त्या गूढ, अवघड आणि खानदानी प्रकाराचा पहिला बिंदू हा धरायला हरकत नाही.
ही पद्धत नक्की कशी आहे याचं गूढ अनेकांना असेलच त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात म्हणजे आपल्या नेहमीच्या साडीसारखीच सुरूवात करायची. पण साडीची लांबी मोठी असल्याने ज्या भरपूर निर्या येतात त्यांचा मध्य काढून तो दोन पायांच्या मधून मागे नेऊन कमरेपाशी खोचायचा. झाली बेसिक पद्धत. कमरेशी खोचताना निर्यांची दिशा मात्र आपल्या नेहमीच्या साडीपेक्षा उलटी ठेवायची, पदराची एक कड उजव्या खांद्याच्याखालून तर दुसरी कड गुढघ्याच्या खालून डाव्या खांद्याकडे यायला हवी, पदर खूप मोठा काढायचा नाही, पदर मागे एका रेषेत असता कामा नये तर तो दोन खांद्यावर/ डोक्यावर घेतल्यावर मागे एक समान पातळीवर यायला हवा अशी काही महत्वाची पथ्य पाळायला शिकलं की बास.
याच साडीचा उजव्या पायावरचा घोळ उचलून डाव्या बाजूला कमरेपाशी खोचून पंखा तयार केला आणि पदर केवळ दोन्ही खांद्यावरूनच घेतला की झाली ब्राह्मणी नऊवारी.
दोन्ही पायांवर साडी चापूनचोपून घट्ट बसवली आणि मागच्या काष्ट्याला दोन्ही काठ एकाला एक लावून बसवले की झाली नाचकामाची साडी.
दोन्ही पायांवरून घोळ उचलून त्या त्या बाजूला कमरेपाशी खोचले आणि पदर डाव्या खांद्यावरून मग डोक्यावरून आणि मग उजव्या खांद्याच्या खालून नेऊन कमरेशी टोक खोचलं की झाली कामकरी, शेतकरी बाई.
एक मोठा वेढा साडीच्या आत घडी घालून घेऊन मग निर्या आणि काष्टा घालायचा, दोन्ही पायावरचा घोळ किंचितसा उचलून कमरेशी खोचायचा. क्युलॉटस सारखी पोटर्यांपर्यंत साडी नेसायची. ही झाली सिंधुदुर्गातल्या ख्रिश्चन बायांची साडी.
वेगवेगळ्या पद्धतीने पायावरचा घोळ आटवून त्याचे मोठ्ठे खिसे करायचे, साडी अगदीच शॉर्टस च्या उंचीची होते. ही झाली गोवा आणि सिंधुदुर्गातल्या भागातली कामकरी लोकांची भातलावणीच्या वेळी, डोंगरात काम करतेवेळी नेसायची साडी.
या सगळ्या नेसण्यांमधे समान आहे ते म्हणजे साडीच्या एका टोकापासून सुरूवात करणे, कमरेभोवती गाठ मारून त्यावर साडी तोलणे आणि निर्या दुंभगून दुटांगीकरण करणे.
पण याबरोबरच नऊवारच साडी पण निर्या, गाठी असं काही न करता एकावर एक बरेच वेढे घेऊन नेसायच्याही काही पद्धती आहेत. सुरूवातीलाच काष्ट्यासाठी चांगला लांबलचक भाग ठेऊन द्यायचा आणि खूप सारे वेढे घ्यायचे. सगळे वेढे घेऊन संपल्यावर आतमधे काष्ट्यासाठीचा भाग दोन पायांतून मागे नेऊन सगळ्या वेढ्यांच्या वरून मागे कमरेशी खोचायचा अशी साधारण पद्धत. पदरासकटचे आणि पदराशिवायचे असे दोन्ही प्रकार यात दिसतात. ठाणे जिल्ह्यातले वारली आदीवासी, रायगडातले कातकरी आणि ठाकर आदीवासी, मुंबईच्या कोळणी, मुंबईतलाच आगरी समाज, रत्नागिरीतला कुणबी समाज, सिंधुदुर्गातला आणि गोव्यातला धनगर समाज अश्यांच्या साडी नेसायच्या पद्धती या दुसर्या पद्धतीत येतात.
भारतातलं विशेषतः मध्यभारतापासून दक्षिणेकडे हवामान उष्ण त्यामुळे अंगावरचं कापड चोपड हे हवा खेळती राहील असं हवं. आणि एकावर एक थर नसलेलं हवं यातूनच मोठ्या कापडाची एकच साडी दुटांगी करून नेसायच्या पद्धतीने जन्म घेतला असणार. एका नऊवार कापडामधे संपूर्ण शरीर झाकलं जातं तरीही दुटांगीकरण केल्यामुळे कसंही वावरायला, बसाउठायला काहीच प्रॉब्लेम नाही, काष्टा हा सगळ्या वेढ्यांच्या/ थराच्या वर असतो त्यामुळे नैसर्गिक विधींच्यासाठीही संपूर्ण साडी सोडायची गरज नाही. आणि शरीर झाकलं तरी शरीराची सगळी वळणं बरोब्बर अधोरेखित केली जातात. त्यामुळे स्त्री शरीराची कमनीयता, सौंदर्यही दिसून येते.
तसंच त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, कामधंदे इत्यादीचा विचारही त्या त्या नेसणीमधे दिसतो. कोकणामधे चिखल, पाणी जास्त त्यामुळे तिथल्या सगळ्याच पद्धतींमधे साड्या ह्या पायघोळ नाहीत. घोट्याच्या वरती किंवा क्वचित गुडघ्याच्या वरतीही जाणार्य पद्धती दिसतात. तसंच डोंगरदर्यांमधल्या बिकट वाटांशी दोन हात करत रोजचं जगणं जगायचं असल्याने कातकरी, धनगरी पद्धतींमधे कमरेभोवती बरेच वेढे घेऊन पाठीला आधार दिलेला दिसतो.
हे असं सगळं अभ्यासायला लागलं की पूर्वजांच्या बुद्धीबद्दलचा आदर वाढतो. त्यांचं निसर्गाशी समजून उमजून जगणं उलगडायला लागतं समोर. साड्या, त्यांचे तपशील हा एक भाग झाला पण निसर्गाशी पूर्वजांनी टिकवून ठेवलेलं नातं आपण जपायला पाहीजे असं कुठंतरी जाणवायला लागतं. काय म्हणता?
-नी

3 comments:
सुंदर विष्लेषण, भारतात किती तरी प्राचीन गोष्टीं अभ्यास करण्या सारख्या आहेत. संगीत आहे, नृत्य आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे वेषभूषा आहे. तुमच्या ब्लॉग्सना एखाद दुसा-या स्केच ची जोड द्याल तर अप्रतीम दिसेल.
wawa sahiiiiii lihilys tu nee :D :D
BTW ek karsheel ka he ji kaahi spell test ghetesy na ti jara kaadh na :)
भारी लिहिलंयस. साड्यांचा असा विचार कधीच केला नव्हता.
Post a Comment