Friday, September 25, 2009

माझा 'श्वास' - ३

आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती.

आम्ही शोधत होतो. चारी दिशांना दूत पाठवले होते म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मुलगा ६-७ वर्षांचच हवाय हे स्पष्ट कळवूनही चित्रपटाच्या मोहाने आपल्या १०-१२ वर्षाच्या बाब्यालाही "लहानच दिसतो हो तो" म्हणत आम्हाला भेटायला येणार्‍या आया पाहिल्यावर त्या मुलाची दयाच येत असे.

अश्यात एकदा माझ्या आईने एक फोटो दिला आम्हाला बघायला. ती एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गेली होती तिथे एका चुणचुणीत छोट्याने एक नाट्यछटा केली होती. त्याचा फोटो आईने मागून घेतला होता. तो हा फोटो होता. फोटोतल्या cartoon चे गमतीशीर डोळे, त्याचा सावळा रंग आणि कपाळावरचे केसांचे मजेशीर छप्पर हे पाहून आम्ही दोघेही खुश झालो.



त्याच्या घरी पोचलो. लाल शर्ट आणि काळी चड्डी अश्याच वेषात साहेब आमच्यासमोर हजर झाले. समोरच्या दिवाणावर तो आणि त्याची आई बसली होती. इकडे खुर्च्यांवर आम्ही दोघं. संदीपने त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. संदीपच्या हातात व्हिडीओ कॅमेरा होता. तो हळूच त्याने चालूही केला. ज्यूनियर चितळे आपल्याला भेटायला कुणीतरी आलंय म्हणून जाम खुश होते आणि किंचित लाजतही होते. संदीपच्या हातातल्या कॅमेर्‍याकडे त्याचं वारंवार लक्ष जात होतं. संदीप त्याला, "इकडे ये!" म्हणाला, समोरचा दिवाण ते संदीप बसला होता ती खुर्ची यातलं अंतर ५ - ६ पावलं असेल नसेल पण जवळजवळ मॅरेथॉन मधे धावावं एवढ्या वेगात त्याने धाव घेतली आणि पटकन संदीपच्या जवळ आला. आजही माझ्या डोळ्यासमोरून त्याची ती धाव हटत नाही. संदीपला आणि मला जाम हसायला आलं. साधारण दीड मिनिटात त्याचा बुजरेपणा संपला होता आणि तो आमच्याशी गप्पा मारायला लागला होता. नंतर त्याला त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल २ ओळी बोलायला सांगितल्या कॅमेर्‍यात बघून. "माझे नाव अश्विन मिलिंद चितळे आहे. माझे वय ६ वर्ष आहे. नुकतीच माझी मुंज झाली. तेव्हा मला खूप मजा आली." अशी वाक्य म्हणताना हळूच एकीकडे हसू न आवरणं, हसण्याच्या नादात शब्दांची गडबड करणं, त्यावरून जीभ बाहेर काढून किंवा मानेनेच 'नाही' म्हणून वाक्याची परत सुरूवात करणं, आणि यामुळे त्याला अजूनच हसायला येणं असं त्याचं चालू होतं. 'तू टीव्ही बघतोस का? काय आवडतं? मारामारी करायला आवडते का?' असं काय काय संदीपने त्याला विचारलं. मारामारीचं नाव काढल्यावर स्वारी खूशच. संदीपने त्याला माझ्याशी मारामारी करायला सांगितली. हे सगळं संदीपच्याकडे टेप होत होतं आणि हे त्या पिल्लाला विसरायला झालं होतं एव्हाना. मी तर तेव्हाच खुश झाले होते. हाच 'तो' अशी माझी खात्री पटली होती. आणि संदीप अर्थातच इतक्या पटकन खुश होणार्‍यातला नसल्याने "चांगला आहे. शक्यता आहे हाच ठरण्याची. पण अजून screentests कराव्या लागतील" असं म्हणून आम्ही चितळ्यांच्या घरून बाहेर पडलो.

यानंतर संदीपने अश्विनशी छान मैत्री वाढवली. त्याला घरी जाऊन भेटणे, त्याला बाहेर खेळायला घेऊन जाणे इत्यादी सुरू झाले. त्याच्याशी संदीपने खूप गप्पा मारल्या. अगदी आज शाळेत काय झालं पासून काल आईने फटका दिला होता इथपर्यंत सगळं तो संदीपला सांगू लागला. अश्विन संदीपच्याबरोबर खूपच रूळला, comfortable झाला. हळू हळू संदीपलाही १००% खात्री पटली की हाच 'परश्या' आणि मग त्याचे ट्रेनिंग चालू झाले. साधारण चारपाच महिने हे ट्रेनिंग चालू होते.

ह्यातच मग हळूहळू 'परश्या' साकारण्यासाठी म्हणून विशिष्ठ inputs द्यायला संदीपने सुरूवात केली. 'तुला काय वाटतं काय करायला हवं आता परश्यानं? किंवा असं झालं तर तुला कसं वाटेल?' अश्या साध्या साध्या संवादांच्यातून संपूर्ण पटकथा गप्पा मारत मारत, चर्चा करत, हळू हळू संदीपने अश्विनपर्यंत पोचवली.

पटकथेच्या अनुषंगाने येणार्‍या ठिकाणी विशेषतः हॉस्पिटलमधे, डॉक्टरांच्या क्लिनिकमधे त्याला फिरवूनही आणले होते. अगदी मेल सर्जिकल वॉर्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंत. हेतू हा की त्याला या सगळ्या वातावरणाची सवय व्हावी. पहिल्यांदा त्याला तिथे घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हालाच तो घाबरेल का? रडेल का अशी थोडी भिती होती. पण एव्हाना आमच्या दोघांची विशेषतः संदीपकाकाची त्याला इतकी सवय झाली होती की तो कणभरही घाबरला नाही. मजेत होता. अगदी हॉस्पिटलमधे स्ट्रेचर वर झोपवून त्याला OT मधे नेऊन आणले तेव्हाही. वर स्पिरिटचा वास मला खूप आवडतो असंही सांगितलं त्याने.

अस सर्वच दृष्टीने त्याला 'परश्या' करण्यासाठी तयार करणं चालू होतं. पण सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे अश्विनला या सगळ्याचा त्रास न होणं. वय लहान आणि कर्करोग, आंधळं होणं या गोष्टी नट म्हणून अंगावर घेताना त्याच्या मनावर आयुष्यभरासाठी 'स्कार' होणं ही शक्यता खूपच होती. आणि त्याचा परिणाम film मधल्या performance वर होण्याची शक्यताही होती. त्यामुळे पहिल्यापासून त्याला हे सगळं खोटं आहे. ही एक गोष्ट आहे आणि ती एकदम खरी वाटेल अशी आपल्याला दाखवायचीये हे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संदीपने समजावून दिलं. म्हणजे कसं की..

"आजारी कोण आहे?"
"परश्या"
"लोकांना कळलं पाहीजे तो आजारी आहे. परश्या कोण करतंय?"
"अश्विन"
"मग अश्विन बरं नाहीये असा दिसला तर लोकांना कळेल ना परश्या आजारी आहे ते.."

अश्या गप्पांच्यातून परश्या आणि अश्विन हि सीमारेखा संदीपने कायम ठेवली. त्यामुळे पुढे शूटींगच्यावेळेला अत्यंत intense scenes च्या वेळेलासुद्धा अश्विन एकदम relax असायचा.

नेहमी भेट झाल्यावर काय काय झालं, संदीपकाका काय काय बोलला असं सगळं त्याला लिहून ठेवायला संदीपने सांगितलं होतं. कधी कधी संदीप त्याला प्रश्नही द्यायचा ज्याच्याबद्दल पुढच्या वेळेपर्यंत त्याने लिहून आणणं अपेक्षित असायचं. हे प्रश्न म्हणजे 'मग आता परश्यचं काय झालं? आजचा गोष्टीतला जो भाग होता त्याबद्दल तुला काय वाटतं? आज आपण अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे तुला कसं वाटलं?' विविध स्वरूपाचे असायचे. वय वर्ष सहा, इयत्ता दुसरी या वयाला साजेसं, जमेलसं तो त्यात लिहायचा. अर्थात तो काही अभ्यासू विद्यार्थी नव्हता ( thank god! ). कधी कधी कंटाळाही करायचा. कधी कधी वात्रटासारखं "मला झोप आली म्हणून आईला लिहायला सांगितलं." असं उत्तरही यायचं त्याच्याकडून किंवा एकदा वहीची दोन पानं मोठ्ठ्या अक्षरात 'काही नाही' असं लिहिलं होतं त्याने. मग संदीपकडून एखादी खरीखुरी किंवा शाब्दिक चापटही खायचा तो तेव्हा पण एकुणात त्याने पटकथा, परश्या हे सगळं पचवायला सुरूवात केली होती हे नक्की.

1 comments:

HAREKRISHNAJI said...

एखाद्या चित्रपटाबद्दल आपल्याला जिव्हाळा निर्माण होते, आपुलकी वाटु लागते, त्यातील पात्रांशी आपण नकळतपणे एकरुप होतो, ती चित्रपटातील पात्र म्हणुनच नव्हे तर एक त्याच्या बाहेरील व्यक्ती म्हणुन आपल्याला त्या भावायला लागतात. पण या आपलेपणाच्या भावना फार क्वचित चित्रपटा बाबतीत निर्माण होतात. फारच कमी चित्रपट हे तुमच्या मनात कुठेतरी खोल वर आघात करत असतात, कुठे तरी रेंगाळत रहात असतात, "श्वास" हा त्यातला एक.

या मागे किती मेहनत असते, किती तयारी केली जाते, किती सखोल विचार केला जातो, हे आता उलगडु लागले आहे. आणि हो, अप्रतीम नितांत सुंदर लोकेशनमागचे कोडेही सुटत चाललय. हा चित्रपट पहातांना या सृष्टीसौन्दर्याने मी नादावलो होतो.

Search This Blog