"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.
इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता.
"अति झालंय हं तुझं आता!"
"बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू."
"शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!"
असे आणि या अर्थाचे संवाद अधून मधून आईबाबांच्याकडून येत होते. छोटुकल्याला काय करावं सुचत नव्हतं. आईच्या हाताला धरून चालत जाणं एवढंच तो करत होता. मधेच दादाकडे नजर टाकत होता. छोटुकल्याचा दादा मात्र कळवळून रडत ओरडत होता.
'सगळे नियम गेले खड्ड्यात, इतका कळवळतोय तो 'शू लागली' म्हणून. मुलगाच आहे. लहानही आहे. जाउदेत त्याला त्या बाजूच्या कचरापेटीच्या इथे.' असं भोचकपणे सांगायची जाम इच्छा झाली होती मला.
तेवढ्यात गल्ली वळली आणि मी वळताना मला त्या आईचा चेहराही दिसला. असेल माझ्याच आसपासच्या वयाची. जे काय चाललंय त्याची प्रचंड शरम, दु:ख, राग सगळंच होतं तिच्या चेहर्यावर. बाबाच्या चेहर्यावर पण वेगळं काही नव्हतंच.
मग लक्षात आलं मुलाला चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी 'शू लागली' यासंदर्भाने हे सगळं घडत नव्हतंच. जे काय होतं ते बरंच काही आत खोलवर होतं. मुलाला कदाचित खरंच शू लागलेलीही नव्हती. काहीतरी झालं होतं आणि 'शू होतीये' असं रडून ओरडून मुलगा आपला संताप, हतबल होणं सगळंच व्यक्त करत होता. बोर्डींगचा धाक, थोडंफार दुर्लक्ष अशी कुठलीतरी हत्यारं वापरून आईबाबाही तेच सगळं व्यक्त करत होते. कुठेतरी कुणीतरी चुकलं होतं नक्कीच. आईबापांना दोष द्यावा असं वाटलं नाही कारण मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते. आणि नक्कीच मुलाचा छळ करण्याइतके निर्दय वाटत नव्हते. मुलगा रस्त्यात लाज काढतोय या रागापेक्षा आपण कमी पडतोय याची शरम त्यांच्या चेहर्यावर सहज दिसत होती.
पुढे मी रिक्शा पकडली आणि जिथे पोचायचं होतं तिकडे निघाले. पुढे काय झालं माहित नाही. मी मदत काही केली नाही/ करू शकले नाही. मदत काय करणार होते म्हणा. त्यांच्या कुटुंबात जो काय प्रश्न असेल तो मी तिथे मधे पडून सोडवू शकणार नाहीये हे मला पक्कं उमजलं होतं. आणि बाहेरच्या माणसाने असे नाक खुपसून त्यांना अजून लाजिरवाणं वाटायला लावणं हे काही माणुसकीला धरून वाटत नव्हतं.
मी जरी तिथे काहीच केलं नाही तरी गेला आठवडाभर या एका प्रसंगाला धरून कहाण्याच्या कहाण्या माझ्या मेंदूने विणल्या. अजूनही तो प्रसंग डोक्यातून जात नाही. फुगा घ्यायला नाही म्हणाल्यावर रस्ताभर जोरात भोकाड पसरून आईबाबांना कानकोंडं केल्याच्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी असतीलच. त्याने आपल्या आयुष्यावर परिणाम नाही झाला काही. तशीच ही घटना ठरो अशी आशा करणंच उरतं आपल्याकडे.
पण तरी ही गल्ली चांगलीच लक्षात राहील माझ्या आणि हे कुटुंबही.
- नी

2 comments:
आईबापांना दोष द्यावा असं वाटलं नाही कारण मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते - Good one
असं होतं कधी कदी खूप काहीं करावंसं वाटतं पण काय अन् कसं तेच समजत नाही. छान लिहितेस.
Post a Comment