Wednesday, September 21, 2011

मंदिर!!

पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.
रोज रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट दुसर्‍या दिवशी फिरायची, बघायची, फोटु मारायचे. असं करता करता एक दिवशी संध्याकाळच्या सुमारास नानेली गावात पोचलो. हि वाडी, ती वाडी असं करत करत एका ठिकाणी एक गंजकी पाटी पाह्यली गणपतिमंदिराची. पाटी बाण दाखवत होती त्या दिशेला एक पायवाटेसारखी वाट. निघालो. बरीच वळणं घेत शेवटी येऊन पोचलो ते एका अप्रतिम शांत, सुंदर अश्या जुन्या मंदीरापाशी
देवाकडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूने मंदिराकडे वाट येते. तिथून येऊन देवळाला सामोरे गेलो. हे असे



देऊळ नक्कीच बरंच जुनं होतं. सुंदर तर होतंच. देवळात कोणी चिटपाखरूही नाही. गाभार्‍यात एक छोटासा बल्ब लटकत होता. लोड शेडींगची वेळ संपली होती त्यामुळे तो उजळून निघाला.अंधार पडायला लागला होता. हे देऊळ पाह्यला परत यायचं असं ठरवून आम्ही निघालो.
दुसर्‍या दिवशी सकाळचेच आलो देवळात. आत्ताही देवळात कोणीही नव्हतं.
हा देवळाचा मंडप.


हा त्याचा डावा खण


हा उजवा खण


एकेक खांब जांभ्याच्या सुबक गोल चिर्‍याचा. आत्ता उखडलेली दिसत असली तरी शेणाने सारवली जात असलेली जमीन. उजव्या खणाच्या पलिकडे चिर्‍यांनी बांधून काढलेली छोटीशी विहीर.
एका बाजूने या देवळाचा पूर्ण फोटो काढायला पॅनोरमा प्रकरण वापरावे लागले.


देवळाचे सगळ्या बाजूंनी निरीक्षण करत, फोटो काढत फिरता फिरता काही गावकरी मंडळी देवळात येऊन गेली. गुरवाने येऊन पूजा केली बाप्पाची. सुंदर काळ्या कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती. देवळाच्या बांधकामातला साधेपणा मूर्तीत अजिब्बात नव्हता. दोन वेगळ्या काळात किंवा वेगळ्या शैलीत केले गेले असण्याची शक्यता नक्कीच वाटत होती. देवाच्या डोक्यातच प्रकाश पडावा अशी इच्छा असल्यासारखा बल्ब बरोबर देवाच्या डोक्याशी टांगत होता त्यामुळे आमच्या फोटुमधे जरा जास्तच उजेड पडला. :) 


देऊळ कधीचं, किती वर्षं जुनं असं एकदोघांना विचारलं तर त्यांनी केवळ स्मितहास्यानेच उत्तर दिलं. गुरवनानांना विचारलं तर 'जुना आसां.' असं उत्तर मिळालं. मग दोन बाइकवीर आले. गावातलेच असावेत असं वाटत होतं. थाटमाटावरून गावच्या राजकारणात प्रवेश करत होत्साते वाटत होते. त्यांना देऊळ किती जुनं असं विचारलं असतं तर नक्की 'पांडवकालीन' असं उत्तर मिळालं असतं.
त्यांना आम्ही काही विचारायला गेलो नाही तरी तेच आले आम्हाला विचारायला.
'काल संध्याकाळी पण गाडी पाह्यली. काय विशेष? कुठून आलात? मुंबईला कुठे असता? काय करता?'
शूटींगच्या तयारीसाठी आलोय कळल्यावर प्रश्नांचा टोन बदलला. संशय कमी झाला.
'हे जुनं झालंय देऊळ. पार मोडायला आलंय. आता जीर्णोद्धार समिती झालीये स्थापन. लवकरच जीर्णोद्धार होणार देवळाचा! मग तेव्हा शूटींग घ्या तुम्ही. एकदम सुंदर असेल देऊळ.'
असा मोलाचा सल्ला देऊन ते बाइकवीर निघून गेले.
जीर्णोद्धार हा शब्द ऐकून जरा काळजाचा ठोका चुकल्यासारखंच झालं. चिर्‍याचे खांब दिसेनासे होऊन सिमेंटचे खांब येणार. त्याला ठराविक निळे, पिस्ता, गुलाबी, पिवळे ऑइलपेंट फासले जाणार. शेणाच्या जमिनीऐवजी घसरवणार्‍या चकचकीत फरश्या येणार. सिमेंटची स्लॅब येणार. देऊळ वाटावं म्हणून त्याला उगाच बिर्ला टाइपच्या महिरपी येणार आणि कोकणातल्या मंदीर वास्तुकलेचा अजून एक नमुना धारातीर्थी पडणार.
त्यात समितीतल्या कोणीतरी पैसे खाल्ले तर हे सगळंच काम तकलादू होणार आणि २-४ वर्षातच देवळाला पूर्ण अवकळा येणार. वाईट वाटलं खूप.
परत ३-४ महिन्यांनी कामासाठी त्या भागात जाणं झालं तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला नसल्याचं कळलं आणि आम्ही थोडं हुश्श केलं. देवळाकडे चक्कर मारली. आज देवळातली वर्दळ वाढलेली होती. पताका होत्या देवळात लावलेल्या.


गावकर्‍यांशी थोडी प्रश्नोत्तरे झाली. 'मायनिंगवाले नाही. शूटींगवाले आसंत' कळल्यावर लोकांना हुश्श झालं. जीर्णोद्धाराचा विषय निघाला. देवळाच्या सद्य वास्तूकलेचे सौंदर्य आम्ही नावाजत होतो. हे सौंदर्य असंच जपून जीर्णोद्धार केला जाऊ शकतो. असे आर्किटेक्ट लोक आहेत असं काय काय आम्ही आपल्या परीने सांगितलं. हसर्‍या आणि कीवयुक्त चेहर्‍यांनी त्यांनी ते ऐकून घेतलं. याहून आम्ही काय करणार होतो कुणास ठाऊक.
पर्वाच मैत्रिणीचा झारापहून फोन आला. नानेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होतोय लवकरच. येत्या महिन्याभरात आलात तर बघायला मिळेल पूर्वीचं मंदीर. मग नाही. अशी बातमी तिने दिली. नाणेली गावाशी माझा तसा काहीच संबंध नसतानाही किंचित अस्वस्थ व्हायला झालंच.
जीर्णोद्धार आणि सौंदर्यदृष्टी यांचा एकमेकांशी संबंध का नसतो? चकचकीत ऑइलपेंटस, गुळगुळीत टाइल्स जमिनीला याच गोष्टीत सौंदर्य भरून राह्यलंय हे कुठे शिकवलं जातं? जुन्या प्रकारचं बांधकाम, जुन्या प्रकारचं अमुक तमुक हे काळाबरोबर लयाला जाणार हे मान्यच पण म्हणून कोणी ताजमहाल नव्याने बांधत नाही ना सिमेंट, ऑइलपेंट, टाइल्स लावून जीर्णोद्धाराच्या नावाखाली की कोणी रेम्ब्राँच्या पेंटींगवर परत नवीन पद्धतीने रंग मारत नाही लेटेस्ट स्टाइल म्हणून. आपली देवळं ही जरी जगातली आश्चर्यं किंवा मास्टरपीसेस नसली तरी त्या त्या वास्तूकलेचा नमुना आहेतच ना. त्या सगळ्या खुणा पारच पुसल्या जाऊन हे असं का आणि कसं होतं?
नानेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होणार आहे याबद्दल मला अजूनतरी कल्पना नाही. तोपर्यंत 'सुखद धक्काच द्या हो बाप्पा!' अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे नाही का? :) 
- नीरजा पटवर्धन

9 comments:

साधक said...

अशी कितिक देवळे जीर्णोद्धाराने बदलली असतील. माझ्याच पाहण्यातील कितिक मंदिरांचे जुने रूप आठवले. जीर्णोद्धार म्हणजे जुन्या स्वरुपाला वास्तुकलेच्या नमुन्याला तिलांजली हा विचार मनात आलाच नव्हता. विषय छान मांडला आहे पण आपले हात गावोगावी होणा-या जीर्णोद्धारांना अडवू शकत नाहीत हा विचार येवून वाईट वाटते. असे लेख वृत्तपत्रात छापले गेल्यास काही प्रमाणात लोकांच्या दृष्टीत फरक पडावा.

साधक said...

मंदिर या शब्दात दि -हस्व असतो असे मला वाटते. तो पासून तुम्ही दुरुस्त करुन घ्याल अशी अपेक्षा करतो.

Anagha said...

किती सुंदर आहे ते देऊळ ! वाट लावून टाकतील आता त्याची ! वैताग आहे नुसता ! जुनं सिद्धिविनायक मंदिर बघितलं होतंस का कधी ? अतिशय सुंदर होतं...आता कसलं बाजारू आणि बेडौल झालंय ते ! :(

प्रशांत दा.रेडकर said...

छान लिहिले आहे. :-)
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

नीरजा पटवर्धन said...

सर्वांचे आभार.
साधक, बदल केला आहे.
अनघा, मी ९ वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाले पण अजून एकदाही सिद्धीविनायकाला गेले नाहीये. बहुतेक मी विचित्र जमातीतली असावी. :)

koustubh kulkarni said...

sundar lekh ... mala vatate devalache deul-pan he tyachya june-panamadhe, ekaki pana, shantate madhe aste ... nantar jirnoddhar-samitya, trust etc. tyala chikatate ani tethil shantata, pavitrya nighun jate .. ani devalache dukan hote !!!!

VS29480 said...

Deul kuthe aahe aamhi pan jau jirnoddhar vhayachya aadh

नीरजा पटवर्धन said...

Taluka - Kudal
Naneli gaav nadikathi aahe.
Mangaon tithyavarun rasta pudhe jato.

Unknown said...

माझं गाव नानेली (ज्याला तुम्ही नाणेली म्हणता आहात) :p
सुंदर लेख

Search This Blog