Monday, August 14, 2017

नदी वाह्ते


’मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ ’चालेल. करूया!’ असा एक संवाद आमच्यात घडला तो दिवस.
एका वर्षी गणपतीच्या आदल्या दिवशी आकेरीला देवधरांच्या घरी जाऊन पोचलो तो दिवस.
प्रत्येक दौर्‍यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास.  त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड आणि माणसांच्या रग्गड कहाण्या.
एक मुलगी आहे, तिचं नदीशी नातं आहे..  पटकथेने आकार घ्यायला केलेली सुरूवात.
मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर नद्या फिरायला सुरूवात केली तेव्हा त्या निसर्गाला भिडताना आलेलं दडपण. त्या दडपणाचं हळूहळू मैत्रीत झालेलं रूपांतर.
कृष्णापूरला जाताना कडवळजवळ नदीतल्या कातळावर लायकेन्स सदृश काही दिसले. इसवीसनापूर्वी शिकलेल्या बॉटनीला स्मरून कातळावर हात फिरवून ’हे लायकेन्स असतील तर हे असंच राहूदेत, अजून वाढूदेत !’ अशी प्रार्थना केली होती तो दिवस.
खळाळतं पाणी, वाहतं पाणी नजरेला, पायाला भिडल्यावर आपोआपच माझी तंद्री लागणं.
राजेंद्र केरकरांच्या घरून डबा घेऊन नद्या फिरायला निघणारी आम्ही माणसं. वरती कृष्णापूरला एका वहिनींच्या अंगणात जेवणे, हात धुवायला प्रत्येक घराच्या बाजूला झरा. झर्‍यात पाय बुडवून बसायचं, पाण्याशी खेळायचं. कंटाळा येईलच कसा?
पौर्णिमा केरकरांचा ओव्यांचा संग्रह.
ऑडिशन आणि वर्कशॉपला आलेले असंख्य जण. त्यात सापडत गेलेली आमची माणसं. एका ऑडिशनला समोर आलेली पूनम. हिचंच नदीशी नातं असणार.
डॉ. हर्षदा देवधरची वीस रूपयाच्या नोटेची कविता. डॉ. प्रसाद देवधरबरोबर फिरताना उमजत गेलेलं कोकण, कोकणातलं गाव, कोकणी माणूस आणि राजकारण. पाण्याचं, जमिनीचं, निसर्गाचं राजकारण.
गोव्याचा श्रीकांत जोशी, त्याचं फार्म आणि तिथे येणारे मोर. आमचं गोव्यातलं घरच असल्यासारखं. असं निघून नसतं जायचं रे श्रीकांत! आता  माझ्या आणि संदीपच्या डोक्यावर हात ठेवून ’सूरज कही भी जाये, तुमपर ना धूप आये!’ कोण म्हणणार?
नदीचे रंग, झाडांचे पोत, ऋतूंची रूपे.. ’एकेक शीर जाणतेय मी!’ याची अनुभूती. माझे पहिलेच कलादिग्दर्शन. आणि बरोबर कितव्यांदातरी केलेले वेशसंकल्पनही.
पैश्याची वाट बघणे आणि थांबून राहणे.
शूटींग. पहाटे पहाटे वाडीत तलावाच्या बाजूला कार्स, व्हॅन्स, ट्रक्स मिळून १५ -१६ गाड्यांचा जथ्था.  सगळ्या गाड्या रांगेने लोकेशनवर पोचणार.
आकेरी तिठ्याचे दोन बंगले. आमचे हेडक्वार्टर्स.
तिथे दोन शेड्युल्सच्या दरम्यान कलाकारांच्या तालमी आणि वर्कशॉप्स.
सिंधुदुर्गात जाऊन राह्यलेले आम्ही सगळे.
पोस्ट प्रॉडक्शनच्या काळात निर्माती म्हणून अनेक गोष्टी शिकत जाणे.
कष्ट आणि भरपूर ताण.
अजून असंख्य बारीक सारीक गोष्टी.
या प्रवासाचे साथीदार  आणि साक्षीदार असलेले असंख्य मित्र व सहकारी.

या सगळ्या सगळ्यातून आता फिल्म रिलीज होतेय. पुढच्या महिन्यात, सप्टेंबरमधे.
तुमच्या शुभेच्छा गृहित धरते आहे.

- नी

5 comments:

sonali said...

shubhechchhaa aahetach!!

प्रसाद साळवी said...

Naav Kaay cinemacha?

NeeDhaPa said...

नदी वाहते हे सिनेमाचं नाव आहे. उद्या प्रदर्शित होतो आहे.

Madhu Nirmala Bhaskar said...

नदी वाहते

हि गोष्ट नदीची आहे. तीच या चित्रपटाची नायिका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली उणीपुरी ४५ ते ५० किलोमीटर वाहणारी नदी. तिचं नाव आहे 'अंती'. अंतिकाठी वसलेली कोकणातली निसर्गरम्य खेडी. त्या खेड्यातून राहणारी माणसं. शेती सोडून इतर कामाकडे वळलेली. शेतीला उत्पन्न नाही, शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही.

त्यातूनही काही माणसं नदीशी आणि गावाशी जोडलेली असतात. गावी राहून छोटे मोठे उद्योग करत असतात. भाजी, दूध, पोल्ट्री इत्यादी. अशीच आहे एक मुलगी अनघा. नदीकाठीच तिचा जन्म झालाय. तिला हवंतर आपण नदीचं मानवी रूप म्हणू.

गावातली नेते मंडळी नदीकाठच्या जमिनी विकून, गावात नदीवर मोठं धरण बांधून होणाऱ्या पंचतारांकित पर्यटन प्रकल्पात पैसे कमवू पाहतात. इतर काही लोकांना त्यात सामावून घेऊ पाहतात.

अनघा आणि तिच्या समविचारी मंडळींचा याला विरोध आहे. धरण बांधल्याने नदी मरेल. नदीकाठचे जीवन मरेल. त्याऐवजी नदीवर छोटे छोटे बंधारे, शेतीवर आधारित उद्योग आणि त्याला पूरक पर्यटन असा त्यांचा विचार.

चित्रपटात हाच संघर्ष दाखवलाय.

चित्रपट सुरु होतो तो अंति खळाळून वाहत असते. चित्रपट संपतो तो तिचं खळाळण सतत राहावं म्हणून कटिबद्ध सैनिकांची फौज उभी करून.

अनघा, तिची आई, मास्तर, इतर कार्यकर्ते यांच्या व्यक्तिरेखा रंगवल्यात. नदीचे मोनोलॉग्स अनघाच्या तोंडी येतात कधीमधी. तरीसुद्धा कधीतरी चित्रपट, त्यातली पात्र, त्यांचे संवाद, मला गूढ-असंबद्ध-विस्कळीत वाटले. त्यांना जोडण्याची गरज होती कदाचित किंवा मला चित्रपट पुन्हा पहायला लागेल. सिनेमाची लांबी थोडी कमी करून विस्कळीतपणा सावरता आला असता.

चित्रपटातील सुरवातीचा एक प्रसंग. गावात सभा चालू असते. वक्ता गावातील स्त्रियांना अडाणी म्हणतो. मला तो शब्द खटकतो तोवर एक बाई उभी राहते. आम्ही अडाणी नाही आणि शहाण्या कश्या आहोत सांगू पाहते. असे अनेक प्रसंग चित्रपटात आहेत. व्यक्तिरेखांच्या मनातील द्वंद्व प्रेक्षकांच्या मनात चालू होतं. कोकणातील भूदृश्य, व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, कूपमंडूक वृत्ती, हेवेदावे यांचे बारकावे व्यवस्तिथ टिपलेत.

प्रयोगशील आणि चोखंदळ प्रेक्षकांनी चुकवू नये असा हा चित्रपट.

नदी वाहते, दिग्दर्शक संदीप सावंतचा हा नवीन चित्रपट. संदीपच्या श्वास चित्रपटाने मराठी सिनेमाची वाट बदलली. या चित्रपटाने काही नद्या जिवंत होतील अशी आशा करायला हरकत नाही.

-मधुकर धुरी

Unknown said...

Splendid

Search This Blog