Friday, October 26, 2007

ठकू आणि लच्छी

एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.

ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत. कांदबरीच्या सुरूवातीलाच ही गोष्ट येते आणि मग पुर्ण कांदंबरीतली सगळी पत्रे म्हणजे लच्छीचा मोर नाचताना पडलेली मोरपिसं व्हायला लागतात.

"... माझ्या नाचण्याचा ताल आता बरा जमायला लागलाय...."

गोष्टीत आहे एक म्हातारी आणि तिची नात लच्छी. त्यांच्या झोपडीशी एकदा मोर येतो. त्याला बघून लच्छी नाचायला लागते मग मोरही नाचायला लागतो. लच्छी हट्ट धरते की ह्याला इथंच बांधून ठेवावं. पण घरात मोराला घालायला काही दाणापाणी नसतो म्हणून म्हातारी नको म्हणते. शेवटी मोरच म्हणतो मी इथंच राहीन, मला दाणापाणी काही नको पण एक अट आहे. मी येईन तेव्हा लच्छीनं नाचलं पाहिजे. ती नाचायची थांबेल तेव्हापासून मी येणार नाही. लच्छी कबूल होते. पण असं हुकुमी नाचायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. मनही तसंच आनंदी हवं तेव्हापासून लच्छी आनंदीच राहू लागली. मोर कधी केव्हा येईल याचा नेम नसे. पुढे पुढे मोर येऊन गेला की काय याचं तिला भान रहात नसे.

पूर्ण कादंबरी पत्ररूपात आहे. कुण्या एका सावूने कुण्या एका सुहृदाला लिहिलेली पत्रे. यामधे तो सुहृद काहीच बोलत नाही. बोलताना, व्यक्त होताना दिसते ती सावित्रीच. त्यामुळे कादंबरीच्या सुरूवातीलाच आलेल्या या गोष्टीचं प्रयोजन उमजूनच जातं.

".... कसं करतेस तू लच्छी? आधी डावा की आधी उजवा?.. "

लच्छी मोरासाठी नाचत रहाते. मोर येतो आणि जातोही पण ती नाचतच रहाते. हे नाचणंच महत्वाचं होऊन जातं मोर येण्यापेक्षा. मोर यायलाच हवा याची गरज वाटेनाशी होते कारण नाचता नाचता ती स्वत:च मोर होते. हेच तर सावू सांगते कादंबरीत.. 'मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.

".. छे मला जमतच नाहीये हा तुझा पदन्यास.."
" माझ्या हातात हात दे.. जमेल.."

ही लच्छी आनंदभाविनी (रेग्यांचाच शब्द पण किती चपखल). मोरासाठी का होईना पण कायम आनंदात असणं हेच तिचं प्राक्तन. आणि मोर हवासा झाला की त्या आनंदातच आपणच नाचून आपल्यातल्या मोराचा पिसारा फुलवणं हे ही. हे तिचं आनंदभाविनीपण खूप काही सांगून जातं. सुंदर आयुष्याच्या सुंदर तालावर डौलात पावलं टाकत जगणं हे खरं जगणं. असं जगता यायला हवं. असं सगळ्यांनीच जगायला हवं हेच तर लच्छी सांगत रहाते. अर्थात यासाठी खूप मोठं बळ लागतं. लच्छी हे बळ मिळवते मोराच्या आशेमधे. पण नंतर या बळाला, आशेला कसलाच अर्थ उरत नाही. एकदा नाचायची, तालाची सवय होण्यापुरतं हे बळ. मग नाचण्याची नशाच तुम्हाला पुढे घेऊन जाते. यामधे नशा आहे पण ती उन्मत्त नाही. काहीही जिंकण्याची ओढ, मिळवण्याची लसलस नाही. जी काय आशा आहे ती आपल्या मोराची जी पुढे गळून जाते. असं जगणं जमलं पाहिजे.

".. अशी सुंदर लवलवते लच्छी. मला कधी जमेल?.."
"थांबू नकोस! पावलं टाकत रहा... "

"आयुष्याला सुंदर नाच म्हणणं सोपं आहे गं बये पण ताल बिघडायला काय वेळ?"
"तुमचा ताल तुम्हीच ठरवायचा, मग इतर कोण कशाला बिघडवेल तो?"

आपलं जगणं हे काही सतत सुंदर कुठे असतं? ते तसं करणं हे आपल्या हातात असतं. या जगण्याला कसं सामोरं जायचं हे महत्वाचं. शेवटी ताल कधीच सुटता कामा नये.

"... पावलामागून पावलं.. कित्ती मज्जा!!.."

माझा माझा मीच ठरवलेला ताल तो जपत मापत नाचत रहायचं. सतत तालाकडे लक्ष. काळाचा एक ठराविक तुकडा संपला की मगच पाय पडला पाहिजे. आधी नाही आणि नंतरही नाही. किती लक्षपूर्वक केलं तरी चुकतोच, सटकतोच ताल, तुटतेच लय. मग लयीचे तुटलेले छोटे छोटे तुकडेच आयुष्यात उरतात.

"..पावलांच्या या उचलण्याला नी परत टाकण्याला पदन्यास म्हणतात का?.."
"जास्त विचार करू नकोस मार एक गिरकी. नको करू काळाच्या तुकड्यांची काळजी!.."

जगण्याची लय शोधायची नाही, आपणच बनवायची आणि मग सोडून द्यायचं स्वत:ला त्या लयीबरोबर. लयीचं ओझं नाही होऊ द्यायचं. ते भान सुटलं पाहिजे. भान विसरता आलं पाहिजे तरंच लय सुटणार नाही. आयुष्याचा ताल चुकणार नाही. म्हणजे भान सुटलं तरी नाचत रहायचं..

".. जमायला लागलंय का गं मला?.."
"विचारतेस म्हणजे नसावंच जमत अजून!"
"..मग कसं करू आता?.."
"मी कसं सांगणार? तुला लच्छी व्हावं लागेल त्यासाठी."
"............."
"अगं नाचाकडे का लक्ष तुझं?"
"..मग?.."
"कुठे आलीस बघ तरी तू! कसं वाटतंय आता?"
"... अरे हो!.."
"आनंदभाविनी हा तुलाच आवडणारा शब्द ना?"

तसं पाह्यलं तर खुद्द मोराला तरी नाचता कुठे येतं. एक पाय उचलला की तोल जातो. तो सावरायला म्हणून तो लगेच पाय खाली टेकतो आणि दुसरा पाय उचलतो. पुन्हा तीच तर्‍हा... असं add infinitum. बघणारे त्यालाच नाच म्हणतात...

12 comments:

Dr.Ulka Joshi Nagarkar said...

chan lihile ahes Neeraja
me te pustak vachle nahiye
pan ata tu je lihile ahes na te vachun ata pustak vachaychi ischa zali ahe

हिन्दुस्तानी!! said...

bahut sunder...hya palikade shabd naahi.
asheech mast nachat raha.. tujha naach pahoon kadhi tari aamhi hi paul takaayla shiku.

Yogesh Damle said...

छान लिहिलं आहेस गं ठकू! :)
एक तरी पुस्तक अनुभवावं असं म्हणतात. आवडला तुझा अनुभव... not exactly a book review, not exactly your take on the book... a very friendly introduction though... "Meet my new friend" सारखं.

सुरुवात तर जमलीय. आता अजून लिहीत रहा. नीरजा ह्या पानांमध्ये फडफडतांना दिसू दे. Looking forward to it.

Unknown said...

सुरेख!!!!!!!

अजुन काय म्हणु?
मला तर खरंच काही बोलता येत नाहीये

अशीच लिहीत रहा.

Tulip said...

अरे वा! नीरजा.. बरं झालं आलीस इथे. वेलकम! आणि झकास लिहिलयस गं. सावित्री सारख्या प्रसन्न पुस्तकावर लिहिलसं ते तर फ़ारच आवडलं. नुकताच संवेदने्ही त्याच्यातला भाग टाकलाय त्याच्या ब्लॊगवर तेव्हाच आठवण आली होती सावित्रीची.
लिहित रहा.

परागकण said...

wah ... kyaa baat hai!

हिन्दुस्तानी!! said...

poodhcha paool taak ga thake...kiti vaat pahayla laavtes?

Anonymous said...

sakhu... oh sorry thaku... mast suruvat aahe.

Anonymous said...

आनंदभाविनी... अगदी सही आहे नाव..

HAREKRISHNAJI said...

Perfect start.

Unknown said...

एक होती ठकू, शकू, बकू आणि मकू chyaa goshTi aavaDalyaa baRyaa kaa.. ठकू aaNi लच्छी pharach chhaan.. :)

--deep(stambh)

Asaami-Asaami said...

सुन्दर लिहिला आहेस. वाचताना लक्षच कुठ दुसरीकडे जाताच नाही इतका सुन्दर. पुस्तक मी वाचल नाहीये पण वाचीन हे नक्की. अडकून गेलो वाचता वाचता लच्छी मधे. काही तरी आपल राहून गेल्या सारख वाटल.

Search This Blog