Thursday, November 22, 2007

बोट सुटलं...त्या दिवशी तुला शांत निजलेलं पाह्यलं
तुझा वेदनारहित चेहरा
इतकं शांत कधीच नसायचीस तू
तुझ्याकडे बघत बसले होते मी
वाटलं म्हणशील
"नुसती बसू नको,
उठ, काही काम कर!"
खूप वाट पाह्यली तू म्हणशील म्हणून..

आत कुणीतरी चहा केला,
कप वेगळे काढले
"ह्यातले कप नकोत,
गेल्यावर्षीचे नवीन आहेत त्यातले वापरा."
असं काहीच तू म्हणाली नाहीस

कोणी म्हणालं १५ वा अध्याय म्हणूया
म्हणला!
तुला रामरक्षा आवडायची
ती पण म्हणालो आम्ही!

अवघड उच्चार मुद्दाम चुकवले.
"असं नाही गं सोने!
त्याचा संधी असा असा होतो..
त्यामुळे उच्चार असा असायला हवा"
असं नाही म्हणालीस तू!
तू तशीच शांत निजून होतीस.

तेव्हा कळलं..
नव्हे अंगावरच आलं..
बाळपणी कधीतरी धरलेलं तुझं बोट
आज सुटलंय
कायमचं

--- नीरजा पटवर्धन

13 comments:

जयश्री said...

आई गं..... पाणीच आलं गं डोळ्यात....!
लिहिती रहा नी....... अशीच मोकळी हो !!

हिन्दुस्तानी!! said...

काय गं रडवलस सकाळी सकाळी!!

काय लिहू कळतच नाहिये. सुन्न झालेय एकदम्!!!

स्नेहल said...

...............

dhoosar disatey skreen!!

Vaishali Hinge said...

kharach radavalas.. touching.. !! ashich lihun dukh halake kar..

प्रशांत said...

Sorry to know.
सांत्वन करावं असं तुमचं दुःख नाहीये हे कळतंय. पण आयुष्यातल्या या गोष्टी कोणाला चुकणार?
शरीररूपी बोट सुटलं तरी मनांची बोटं अशी सुटत नसतात. ती एकमेकांना धरून असतात. अखंडपणे! त्यांच्या आधारे तुम्ही लिहिताय हे पाहून दिलासा मिळाला. असंच लिहीत रहा. दुःख लोकांत वाटल्याने थोडं हलकं वाटेल.

Kamini Phadnis Kembhavi said...

लिहून,बोलून, अगदी आकांतानी रडूनसुद्धा हलकं व्हाव असं हे दु:ख नाहिच..... कायमची निर्मांण झालेली पोकळी, कधिही न भरून येणारी...... :

zakasrao said...

हम्म.
शरिर नाही पण
त्यानी दिलेल्या संस्कारांची शिदोरी आहेच तुझ्या सोबत.
त्यांच्या शुभेच्छा आहेत.
जास्त तरी काय सांगणार
शब्द बापुडे केविलवाणे ..........

Lens_Collector said...

नी
सांत्वन करण्यासाठी स्वतः त्या अनुभवातून जावं लागतं असं म्हणतात पण हे वाचून त्या दुःखाची पुरेपूर कल्पना आली. धीराचे शब्द अशावेळी आपल्याला अचानक कुठे सोडून जातात कुणास ठाउक.... पण तरीही, स्वतःला सावरण्याची आणि ’तिने’ तुझ्याबद्दल पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांना मूर्त रुप देण्याची तुला शक्ती मिळॊ हीच ईशचरणी प्रार्थना !

Dr.Ulka Joshi Nagarkar said...

shabd apure ahet
kay bolu?

Sneha said...

दुःखाला अप्रतिम नाही म्हणता येत गं... पण मी समजु शकते करण तु जे हरवल आहेस तेच मी सुध्धा आठ महिन्यांपुर्वी हरवल......

Akira said...

Very touching!

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

aajach tujha blog pahilay. adhashasaarkhi waachtey. pan ha ghas matr ghashat adkala g! aawnadha suddha gilata yet nahiye. thet hriday kapat gel tujh likhan. kaay bolu?

ravindra lakhe said...

एकदम सरळ मनातलं असं आलं की ते थेट भिडतच.
ज्यांनी कुणी हे एकदा तरी अनुभवलं असेल त्यांना रडू येईलच. फारच छान.

Search This Blog