Monday, January 25, 2010

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.
शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...
गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.
त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.
याच आसपास दुसर्‍या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...
अश्या तर्‍हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.
अजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्‍यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?
या लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर? आणि का?
बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू? ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण?मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.
प्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.
प्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्‍या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.
यानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट न लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्‍याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.
अनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.
आता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.
नाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम परफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.
दुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्‍यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है. --------- अ‍ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- अ‍ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्‍हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू न देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.
सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...
- नी

5 comments:

प्रकाश बा. पिंपळे said...

हे हे ! खूप छान अनुभव!
या मायाजालाने हवी ती लोक ही जवळ आणली आणि नकोय ती सुद्धा!
[एक फुकटचा सल्ला] एक छान आणि चांगली संधी आहे ताई तुमच्यापाशी.
इथून पुढे काय करा, अश्या सगळ्यां साठी एक पोस्ट लिहा आणि त्यात १० ते १२ डायालोग हाना चांगले आणि सांगा की मित्र हो सगळ्यात आधी आपले हे डायालोग (;-)) म्हणत असताना चित्रीकरण करा आणि ते पाठवा. सगळेच व्हीडीओ इथे पोस्ट करा! चांगले असतील तर खरच चांगला कलाकार मिळेल आणि मनोरंजन होईल! आणि असाच एखादा महाभाग असेल तर अधिकच (:-)) मनोरंजन होईल !
अहो कमीत कमी फनी व्हीडीओ संच तर तयार होईल एखादा!
बरा, आता माझा व्हीडीओ कधी पाठवू ! मी ही कालेजात काही नाटक केलीत! (मस्करी करतोय, आपल्याला नही जमायचं ते!)
जय महाराष्ट्र !
बरं,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

साधक said...

छान लिहिलंय. उगाच खलपण येतं त्याचा केल्ष होत असणारच. एखादी कला अत्मसात करायला व त्या पातळीला पोचायला ५ -१० वर्षांची मेहनत लागतेच हे लोक विसरतात. Hobby व Passion यातला फरक त्यांना ठाऊक नसतो. गायकांच्या बाबतीतही तेच होत असतं.एखाद दोन कार्यशाळेत भाग घेतला आणि कॉलेज्च्या स्नेहसम्मेलनात गाणं म्हणून "पयला" नंबर आलेला प्रत्येक जण स्वत:ला आशा/लता किंवा भीमसेन समजत असतो.

shri8131 said...

नीरजा,
तुझातील सडेतोड वृत्ती या लेखात छान उतरली आहे.
फारच छान.
खालील निकाल आजच पाहिला.
अभिनंदन.
इतर ब्लोग मी वाचलेले नाही.

RESULT OF BLOG MAJHA 2009 COMPETITION
प्रथम तीन
Aniket Samudra http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde http://bhunga.blogspot.com
उत्तेजनार्थ........
Hariprasad Bhalerao www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary www.netbhet.com
Pramod Dev http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam http://policenama.blogspot.com
deepak kulkarni http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare http://anandghan.blogspot.com

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

तुझा त्रागा समजू शकते. हे फार होतं हल्ली. माझ्या ऑर्कुट प्रोफाईलवर व्हॉईस ओव्हरसाठी काय करावं लागेल, याची माहिती देऊनही काहीजण सल्ल्यांसाठी पुन्हा स्क्रॅप टाकतातच. त्यातील बरेच जण, स्ट्रगल न करता ओळखीतून जॅकपॉट लागला तर लागला असा विचार करूनच स्क्रॅप टाकतात. काही जणांना तर आपला आवाज ’बेस’चा आहे म्हणजे आपला १०० टक्के चान्स लागणारच याची खात्री असते. अशा लोकांना समजावून सांगून काही होत नाही. उलट आपणच वाईट होतो. खूप मन:स्ताप होतो अशा वेळी.

Alhad Mahabal said...

mi hi jevha lokanna photographer ahe asa kalta tevha majha pratyek shoot hai agdi kami kapdyatalya kinva hot kinva agdi nude models chach asa ka vatta lokanna he kalat nahi
ya babat samadukhkhii!


baki to dubeyjincha paragraph matr nakki taka ithe!

Alhad
alhadmahabal.wordpress.com

Search This Blog