Sunday, March 9, 2014

बाई गं बाई गं!

२०१३ च्या एप्रिलपासून पुढचे बरेच महिने मी काहीनाकाही कारणाने फिरतीवर होते.  एकदा तर साधारण पावणेदोन महिन्यांनी घरात पाऊल टाकलं. ते पण ८-१० दिवसांकरताच.
एप्रिलच्या आधीही लेक्चर्स वगैरेमुळे महिन्यातले ७-८ दिवस बाहेरगावी असणं हे होतंच.
तर या सगळ्यासंदर्भाने आलेले दोन गमतीशीर अनुभव.
१. फेसबुकावर जुजबी ओळख झालेले सदगृहस्थ (फेजुओझास). त्यांच्या कॉलेजच्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी सामील होणे त्यांना अपेक्षित होते त्याप्रित्यर्थ फोन नंबराची देवाणघेवाण केली गेली होती.
फेजुओझास - पुढच्या महिन्यात अमुक तारखेला वेळ देऊ शकाल का आमच्या कॉलेजसाठी.
मी - नाही. तेव्हा माझी तमुकची लेक्चर्स ठरलेली आहेत. ढमुक तारखांना मी तुमच्या शहरात असेन. तेव्हा चालेल का?
फेजुओझास - बघतो. एक प्रश्न विचारू का तुम्हाला?
मी - विचारा
फेजुओझास - तुमच्या घरी बाळ आहे का?
मी - हॉ?
फेजुओझास - नाही म्हणजे तुम्ही एवढं फिरत असता. घरातल्या जबाबदार्‍या सांभाळून हे जमणं शक्यच नाही म्हणजे बाळ नसेलच.
मी - ह्म्म्म. नाहीये पण बाळ असलेल्या अनेक जणी माझ्यापेक्षाही जास्त फिराफिरी करत असू शकतात.
फेजुओझास - त्याला काय अर्थ नाही!
मी - असो. मला मिटींग आहे. मी फोन ठेवते.

२. २०१३ च्या ऑगस्टात आम्ही शूटींगच्या तयारीसाठी सावंतवाडीमधे होतो. खूप घाईघाईत, शूटची काही खरेदी करण्यापुरती पुणे आणि मुंबई चक्कर मारली. पुण्यात २४ तास तर मुंबईत संध्याकाळपासून सकाळपर्यंत अक्षरशः १२-१५ तासच होते. हे सगळे ज्या गाडीने केले त्या गाडीचा ड्रायव्हर (गा ड्रा). पुणे ते मुंबई प्रवासात. (या सगळ्या दरम्यान माझा नवरा याच प्रोजेक्टच्या निमित्ताने सावंतवाडीतच होता)
गा ड्रा - तुम्हाला मुंबईला सोडून मी लगेच निघू ना वाडीला?
मी - नाही. मी पण सकाळी निघणार वाडीला.
गा ड्रा - परत?
मी - हो.
गा ड्रा - मॅडम मग तुम्ही एवढे दिवस घराबाहेर असता तर घराचं काय मग?
मी - कुलूप लावायचं.
गा ड्रा - हा पण बाकी घरातली कामं वगैरे?
मी - काहीच नसतात.
गा ड्रा - असं चालतं?
मी - हो
गा ड्रा - सर काही म्हणत नाहीत?
मी - कशाबद्दल?
गा ड्रा - म्हणजे एवढे दिवस तुम्ही घरात नाही तर..
मी - पण सरांबरोबरच तर काम करतेय की मी. ते कशाला काय म्हणतील?
गा ड्रा - नाही तसं नाही... (जौद्या या अर्थाने खांदे उडवतो)

मी पण विषय वाढवत नाही मग...

दोन्ही उदाहरणांच्यात मला या दोन्हीही माणसांच्या बुद्धीची निव्वळ गंमतच वाटलेली आहे.

बाईची पहिली जबाबदारी घराचीच. घरचं सगळं सांभाळूनच बाकी उद्योग करायचे. हे ज्या त्या बाईने आपलं आपण ठरवायचं नाही. तिला कुणाची तरी परवानगी हवी. हे आपल्या मानसिकतेत अजूनही घट्ट बसलंय.

त्यामुळे बाई कितीका काम करेना, कुठल्याका पोझिशनला असेना तिला घराबद्दल कोणीही टोकू शकतो. मग ती जुजबी ओळख असूदेत नाहीतर बाई जिथे कंपनी डिरेक्टर आहे/ प्रोड्यूसर आहे अश्या युनिटचा एक ड्रायव्हर असूदेत हे एक भारतीय सत्य मला परत एकदा उमगलं.

- नी

Thursday, March 14, 2013

आतली गोष्ट!

हा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च २०११ च्या महिला दिन विशेषांकामधे पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.
----------------------------------------------------------------------------------------
मैत्रिणीची मुलगी, वय वर्ष चौदा. अचानक पोक काढायला लागली. थोडी दडपणात वागायला लागली. विचारल्यावर समजलं तिच्या आजूबाजूच्या मुली तिला हसतात तिच्या गोलाकारांवरून. तू फारच मोठी दिसतेस म्हणतात. हसणार्‍या सगळ्या अगदी बारीक चणीच्या. तेराचौदा वयाला मुलगा म्हणून खपून जातील अश्या. मैत्रिणीने मुलीला समजावलं की या मुलींकडे जे नाहीये ते तुझ्याकडे आहे. पुढे जाऊन याच मुली खटपट करतील आपले आकार योग्य बनवण्यासाठी. वय वर्ष चौदा खुश झालं. समजूत पटली पण बाईपणाच्या एका विचित्र चढाओढीत मुलगी कायमची अडकली.

मला आठवले माझे ज्युनियर कॉलेजचे दिवस. एनसीसीचा ड्रेस फक्त मलाच चांगला बसतो असं म्हणणारी अशीच उफाड्याची असलेली मैत्रिण. तो ड्रेस घालून आपलं रूप आरशात बघत ‘आपण पुरेशी मुलगी वाटत नाही’ असं सत्रांदा मनात येऊन खट्टू होणार्‍या आम्ही. ‘आम्ही आपापल्या वडिलांच्या वळणावर गेलोय’ असे केविलवाणे विनोद करणार्‍या आम्ही.

हे कसंतरी मागे टाकून आपलं आयुष्य घडवायला घेतलं. बरंच पुढे आल्यावरही या मापांच्या चढाओढीने या ना त्या पद्धतीने पाठपुरावा केलाच. कापडचोपड आणि त्याच्या इतिहासाबद्दल शिकताना बरीच अंजनं डोळ्यात घातली गेली.

नुकतीच इकडच्या तिकडच्या संस्थळावर ‘ब्राज्वलन’ हा शब्द व त्याविषयी ‘उद्बोधक’ चर्चा वाचली. चर्चेचा एकंदर सूर स्त्रियांची आणि स्त्रीवादाची हेटाळणी, स्त्रीमुक्ती या संकल्पनेची उडवलेली खिल्ली असा होता. मुद्दा अंतर्वस्त्राचा आणि त्यातही स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचा त्यामुळे चर्चेमधे जोडीला स्त्रीशरीराची एक वस्तू या पातळीवर केलेली आचरट आणि आंबटशौकीन वर्णनेही होती. हे नवीन नाही. कधीही कुठेही ‘ब्राज्वलन’(ब्रा-बर्निंग बाय फेमिनिस्टस) या घटनेसंदर्भाने वेगळे काही ऐकू येत नाही.

एखादी वस्तू अंगावर असणे वा नसणे यामुळे चळवळ होत नाही असे म्हणणारे एखादी वस्तू अंगावर असण्यानेच स्त्रीच्या चारित्र्याची ग्वाही मिळते हे मात्र छातीठोकपणे म्हणतात. हे गमतीशीर जरूर आहे पण यात नवल वाटण्यासारखं काही नाही. लाज, इभ्रत, प्रतिष्ठा या केवळ बाईनेच जपायच्या गोष्टी असताना ते सगळं वेशीवर टांगून आपलं एक अंतर्वस्त्र या बाया जाळतात म्हणजे त्यांची डोकीच फिरली असली पाहिजेत असं सहजपणे समजणारा समाज अजून जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहे.

१९६८ च्या मे महिन्यात अटलांटिक सिटी मधे होत असलेल्या मिस अमेरिका पॅजन्टच्या वेळेस अमेरिकेतील काही बायांनी एकत्र येऊन आपल्या ब्रेसियर्स जाळल्या ही ती घटना. ही घटना मोठ्या प्रमाणात वगैरे काही घडली नाही. ब्यूटी पॅजन्ट म्हणजे बाईला एक सुंदर वस्तू म्हणून पुरूषांच्या मान्यतेसाठी प्रदर्शनाला उभी करणे असा विचार धरून या स्पर्धेला विरोध म्हणून निदर्शने केली गेली. या निदर्शनांचा एक भाग म्हणून ‘फ्रीडम ट्रॅश कॅन’ असं नाव दिलेल्या एका कचर्‍याच्या डब्यामधे ब्रेसियर्स, गर्डल्स, खोट्या पापण्या, प्लेबॉयची मासिके, उंच टांचाची पादत्राणे असं सगळं जाळलं जाणार होतं. बायांनी खरोखर ब्रेसियर्स जाळल्या का आणि किती बायका यात सामील झाल्या याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. या निदर्शनांचं नेतृत्व जिच्याकडे होतं त्या रॉबिन मॉर्गनच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्षात काहीच जाळलं गेलं नाही. घोषणा, फलक आणि मोर्चा यांच्यातूनच केवळ विरोध जाहीर केला गेला. त्यामुळे मॉर्गन बाईंच्या म्हणण्याप्रमाणे जाळण्याची घटना ही संपूर्णपणे प्रतिकात्मक होती. परंतु काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे या दरम्यान बंद केले हे मात्र निश्चित. अर्थात ब्रेसियर्स जाळणे या कृतीमधे नाट्यमयता जास्त असल्याने स्त्रीवादविरोधी लोकांनी ह्या कृतीचं भरपूर भांडवल केलं स्त्रीवादाची चेष्टा करण्यासाठी. माध्यमांनी यातून ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट (ब्रेसियर जाळणारे स्त्रीवादी) असा एक वाक्प्रचार कुत्सितपणाच्या फोडणीसकट रूढ केला. गैरसोयीच्या स्त्रीवादाला टोकाचा, अतिरेकी स्त्रीवाद म्हणण्यासाठी हा शब्द वापरला गेला, रूळला. स्त्रीवादी बायका म्हणजे ब्रेसियर्स न घालणार्‍या, हातापायावरचे केस न काढलेल्या आणि लेस्बियन अशी एक व्याख्या प्रचलित केली गेली. या व्याख्येचे पडसाद म्हणून अजून अजून सौंदर्यप्रसाधने वापरत आणि सौंदर्याच्या ठराविक संकल्पनांनाच जोपासत अनेक बायकांनी अर्थातच आम्ही ‘त्यातल्या’ नाही हे सांगण्याची पराकाष्ठा केली.

मात्र प्रतिकात्मक का होईना पण या घटनेने काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे बंद केले आणि त्यातून कुठेतरी सौंदर्य म्हणजे ठराविक आकार, ठराविकच उभार अश्या कल्पना मोडायला सुरूवात झाली. अंतर्वस्त्रांच्या खपावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागताच अंतर्वस्त्रे डिझाइन करणार्‍यांनी सर्वसामान्य बायांना उपयोगी होतील अश्या ब्रेसियर्स डिझाइन करायला सुरूवात केली. इथून अंतर्वस्त्रातून शरीराचा अनैसर्गिक आकार घडवणे या पद्धतीला मोठ्या प्रमाणात खीळ नक्कीच बसली. यातूनच जास्तीत जास्त नैसर्गिक आकार आणि आधार देणार्‍या ब्रेसियर्सचा जन्म झाला. अंतर्वस्त्रांमुळे होणारा शरीराचा छळ या घटनेनंतर काही प्रमाणात कमी होत गेला. हा या घटनेनंतर आत्तापर्यंतचा म्हणजे गेल्या तीस-चाळीस वर्षांचा इतिहास.

पण असं आव्हान का केलं गेलं असेल? काही बायांनी ब्रेसियर्स घालणं बंदच का केलं असेल?

जेव्हापासून माणूस कपडे घालू लागला त्यानंतर लवकरच अंतर्वस्त्रे जन्माला आली. मुळात शरीराच्या नाजूक भागांचं रक्षण, हवामानापासून बचाव अश्या महत्वाच्या उद्देशांपोटी अंतर्वस्त्रे निर्माण झाली. त्यांचे आकार, स्वरूप अर्थातच आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. हल्लीची ब्रेसियर हे मुळातलं पाश्चात्य जगातून भारतात आलेलं प्रकरण आहे. त्यामुळे अर्थातच पाश्चात्य जगातल्या अंतर्वस्त्राच्या प्रवासाविषयी आपण आधी समजून घेतलं पाहिजे.

काळाच्या ओघात अंतर्वस्त्रांच्या मूळ उद्देशांपेक्षाही शरीराला विशिष्ठ आकार देणे, बसण्याउठण्यात विशिष्ठ ढब निर्माण करणे, घाम व इतर स्त्रावांपासून बाहेरच्या कपड्यांचा बचाव करणे यासाठी या काही अंतर्वस्त्राचा वापर होऊ लागला. शरीराच्या छाती, कंबर, पोट या भागांना योग्य त्या आकारउकारातच ठेवणारे जे वस्त्र होते त्याला कॉर्सेट असे म्हणले जाई.

हे कॉर्सेट म्हणजे मुळात कंबर आवळून ती कमी करणारे आणि छाती पूर्ण सपाट करण्यासाठी किंवा छातीला जास्त उभार देण्यासाठी वापरले जाणारे वस्त्र. विविध प्राचीन संस्कृतींमधे अश्या प्रकारचे वस्त्र वापरले गेल्याचे संदर्भ मिळालेले आहेत. परंतु इ.स. १३०० -१४०० दरम्यान कॉर्सेट किंवा कॉर्प्स सर्रास वापरायला सुरूवात झालेली दिसते. कॉर्सेट हा शब्द अठराव्या शतकानंतर अस्तित्वात आला. तोवर कॉर्प्स, स्टे, बॉडिस असे शब्दच वापरले जात. हा कपडा कापडांचे अनेक थर एकमेकाला जोडून आणि जिथे गरज आहे तिथे कडकपणासाठी इतर वस्तूंचा वापर करून विशिष्ठ आकारात बनवलेला असतो. हे प्रकरण समजून घ्यायचं तर एका ठराविक आकारात बनवललेला पिंजरा आणि पिंजर्‍याच्या पट्ट्या खुपू नयेत म्हणून त्यावरून चढवलेले कापडाचे अनेक थर अशी कल्पना करावी लागेल.



पुनरूत्थानाच्या (रेनेसान्स) सुरवातीच्या काळामधे कंबर अगदी बारीक, छाती पुढून पूर्णपणे सपाट, शरीराचा वरचा भाग इंग्रजी व्हि आकाराचा दिसेल असा निमुळता आणि उंच असा आकार शरीराला असणे हे योग्य, सुंदर, सभ्य इत्यादी मानले जायचे त्यामुळे अर्थातच कॉर्सेटरूपी पिंजरा त्या आकाराचा असायचा. मग पुढे पुढे पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात तर कंबर अजूनच निमुळती होत गेली आणि धडाची उंची वाढत गेली. याच काळात संपूर्णपणे लोखंडी पट्ट्या असलेल्या आणि बिजागर्‍यांवरील स्क्रू फिरवून घट्ट करायच्या कॉर्सेट ही होत्या. पहिल्या एलिझाबेथ राणीने या कॉर्सेटबद्दल ‘मला पिंजर्‍यात ठेवल्यासारखे वाटतेय’ असे उदगार काढले आहेत. 





नंतरच्या काळात धडाची उंची कमी झाली, छातीची गोलाई सूचक पातळीवर दिसणं गरजेचं ठरू लागलं आणि कॉर्सेटचे आकार तसे तसे बदलत गेले. लोखंडी पट्ट्यांच्याऐवजी प्राण्यांची हाडे, लाकडाच्या पट्ट्या, स्टीलच्या पट्ट्या, बांबूच्या पट्ट्या अश्या गोष्टींचा वापर होऊ लागला. चित्र क्रमांक २ मधील तिन्ही कॉर्सेटमधे आकार साधारण सारखा दिसत असला तरी वापरल्या जाणार्‍या वस्तू, त्यांची बेतण्या-शिवण्याची पद्धत, कॉर्सेटशिवाय शरीराला आकार देणारी इतर अंतर्वस्त्रे यांच्यामधेही या काळामधे बदल होत गेला. ‘गॉन विथ द विंड’ या चित्रपटाची नायिका पूर्वी अठरा इंच असलेली कंबर आता बाळंतपणानंतर कॉर्सेट घट्ट आवळूनही वीस इंच झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करते हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच. ही गोष्ट रोमॅन्टीक काळातीलच.



नंतर बेल इपॉक(१८९५-१९१४) काळामधील कॉर्सेटमधे अति आवळून लहान, म्हणजे सोळा ते अठरा इंच केलेली कंबर नक्कीच होती. परत पुढच्या बाजूला छातीचा खालचा भाग आणि पोट अतिशय सपाट करण्याची योजना होतीच. तसेच ही कॉर्सेट नितंबांच्यावरूनही येत असे. स्त्रियांना केवळ श्वास नीट घेता यावा म्हणून स्तनांचा भाग हा फक्त बाहेरच्या दोन्ही बाजूंनी आधार दिलेला असे. यामुळे दोन स्तनांचा आकार वेगळा न दिसता एकत्रच दिसे. म्हणून या कॉर्सेटला मोनोबुझम असे नाव आहे. बाजूने बघितल्यास शरीराचा आकार इंग्रजी एस या अक्षराच्या आकाराचा किंवा कबुतरासारखाही दिसे. यामुळे या प्रकारच्या आकाराला पिजनबुझम असेही म्हणले जाई. कॉर्सेट नितंबांच्यावरून असल्याने साधे भराभरा चालणेही शक्य नसे. 



 आकारामधे बदल घडलेले असले तरी एक गोष्ट अगदी कायम होती की तथाकथित योग्य आकारामधे शरीर येण्यासाठी लहानपणापासूनच मुलींचे शरीर या कॉर्सेट/ स्टे/ कॉर्प्स प्रकारात बांधले जाई. हे नुसतं वाचत जाताना कदाचित यातलं क्रौर्य जाणवणार नाही. पण मुलीच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून किंवा अगदी जन्मल्यापासूनही एका ठराविक आकाराच्या पिंजर्‍यामधे / पट्ट्यामधे शरीर घट्ट आवळून बांधून ठेवलं जात असे ज्यायोगे शरीर त्याच आकारात वाढत असे. या अश्या पिंजर्‍यामुळे पाठीचा कणा काही प्रमाणात कमकुवत होत असे. बरगड्यांची वाढ खुरटत असे किंवा खालच्या बरगड्या आतल्या बाजूला वळत असत. शरीराच्या आतले इतर अवयव वाढीसाठी योग्य जागा न मिळाल्याने इकडे तिकडे सरकून अयोग्य पद्धतीने वाढत. त्यामुळे जेवण खूपच कमी असे. पचनाच्याही समस्या निर्माण होत. त्यामुळे अर्थातच शरीराला योग्य पोषण मिळत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था व प्रजननसंस्था मुळातूनच कमकुवत रहात आणि सर्वांगीण आरोग्यही धोक्यात येत असे. परत शरीरावर हा असा पिंजरा बांधून फिरणे काही कमी कटकटीचे नव्हते. जरासुद्धा वाकणे, बसणे या पिंजर्‍यामुळे शक्य नसे. 

 












केवळ कॉर्सेट हा एकच पिंजरा नव्हे तर त्याबरोबर मोठ्या धातूच्या रिंगा लावलेला स्कर्ट घातला जाई. याचे नाव फार्दिंगेल. हा पण अजून एक वेगळा पिंजरा जो कमरेवर बांधलेला असे ज्यामुळे स्कर्ट हा कायमच फुललेला दिसत असे. फार्दिंगेलची फॅशन लयाला गेली तेव्हा पॅनिए नावाचा छोटा पिंजरा नितंबांचा आकार वाढवण्यासाठी कमरेवर बांधणे सुरू झाले. मग बसल नावाचा प्रकार आला. या स्कर्टशी संबंधित वस्तूंनी शरीरावर हानीकारक परिणाम केले नाहीत तरी साध्या साध्या हालचालीही आखडून ठेवल्या. सगळी वेशभूषा पूर्ण झाल्यावर बसणे सुद्धा शक्य नसे.

कपड्यांच्या आतून हे असे विविध प्रकारचे पिंजरे अंगावर वागवण्याला आळा बसला पहिल्या महायुद्धाच्या चाहुलीने. बेल इपॉकच्या शेवटच्या काळातच युरोप अमेरिकेतील स्त्रियांनी काही प्रमाणात कचेर्‍यांमधे नोकर्‍या करायला सुरूवात केली होती. माणसे कमी पडायला लागल्यावर युद्धकाळात स्त्रियांनाही सैन्यात भरती करून घेतले जाऊ लागले होते. कचेर्या, युद्धक्षेत्र किंवा सैन्याच्या कचेर्‍या या ठिकाणी काम करताना घोळदार कपडे आणि आतून पिंजरा याची अर्थातच अडचण होऊ लागली आणि कॉर्सेट इतिहासजमा झाली. त्याऐवजी बस्ट (छातीवर बांधायचा टक्स घातलेला पट्टा) आणि गर्डल(कंबर बांधून ठेवणारे वस्त्र) अशी दोन वेगळी वस्त्रे निर्माण झाली. बस्ट या वस्त्रातूनच छातीला आधार देणारे एक वस्त्र जन्माला आले. १९०७ मधील व्होग मासिकामधे या वस्त्राची पहिली नोंद आढळते. या वस्त्राचे नाव ब्रेसियर. ज्याचा मूळ फ्रेंच भाषेतील अर्थ आधार असा होतो.


त्यानंतर १९६० पर्यंत या अंतर्वस्त्रांमधे अपेक्षित आकार, वापरले जाणारे कापड, बेतण्या-शिवण्याचे प्रकार यामधे अनेक बदल होत गेले. यातले बरेचसे बदल हे सौंदर्याच्या ठराविक कल्पनांपायी होते. शरीराचा छळ कमी झाला असला तरी ठराविक माप-आकार-उभार यांचा आग्रह या काळापर्यंतही संपला नव्हता.

पण पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंततरी इतके भयंकर परिणाम होत असताना बायका कॉर्सेट आणि इतर सगळा साज का वागवत असत अंगावर? अगदी साधी सोपी कारणं आहेत याची. वरती जे काळानुरूप बदल आपण बघितले ते बदल घडण्यामागे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे सौंदर्याच्या व सभ्यतेच्या बदलत्या कल्पना. पण मुळात स्त्रीने सुंदरच दिसले पाहिजे ह्याबद्दल असणारा पुरूषी आग्रह आणि स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात आणि उभारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. अमुक मापाची-आकाराची व उभाराची स्त्री ही सभ्य, सुशील आणि आदरणीय बाकीच्या वाईट चालीच्या किंवा कमी प्रतीच्या किंवा निम्नस्तरीय इत्यादी असं वर्गीकरण केलं गेलं. मग ते ते माप-आकार-उभार मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले. अगदी शरीराचे हाल सोसूनही केले गेले. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच.

चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं, अजून कुठेतरी मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं हे ही सौंदर्याच्या कल्पनांपायी स्त्रीच्या शरीराचे हाल या प्रकारात मोडणारं. त्याचं अवास्तव महत्व आणि उदात्तीकरण यात जगभरात कुठेही कणभरही फरक नाहीच.

१९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्‍यांनी विशिष्ठ माप-आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य, आदरणीय स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्य आणि सभ्यतेच्या मापांपेक्षा निसर्गाने घडवलेले आकार तसेच राहू देणं आणि अंगावरच्या कपड्यामधे आराम वाटणं, सर्व हालचाली व्यवस्थित करता येणं महत्वाचं आहे अश्या भावनेतून अनेकींनी ब्रेसियर्सचा वापर बंद केला.
हे समजून घेतल्यावर मला तरी या घटनेकडे टोकाचा व अतिरेकी स्त्रीवाद म्हणून बघता येत नाही. स्त्रीकडे प्रथम एक माणूस म्हणून बघण्याच्या प्रवासातला हा स्त्रीच्या शरीराशी निगडीत असलेला हा एक महत्वाचा टप्पा मला वाटतो. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला मात्र जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, अनोरेक्सियाने अगदी लहान वयात मृत्यूमुखी पडलेल्या पोरी, फॅड डाएट किंवा महिन्याभरात २०-२५किलो वजन कमी करून देणार्‍या तथाकथित आहारतज्ञांच्याकडची गर्दी, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मेडियाने केलेले नको इतके कौतुक, सर्व जाहिरातींमधून, दृश्य माध्यमांमधून दिसणारी अतिशय सडपातळ अशी स्त्रीची प्रतिमा, हॉलिवूडमधील अमुक एक नटीने बाळंतपणानंतर दोन महिन्यात वजन उतरवले याबद्दल तपशीलांसकट वाचायला मिळणारी कहाणी या सगळ्या गोष्टी सध्या माझ्या आजूबाजूला मला दिसत वा ऐकू येत रहातात.

बाईने कुठल्याही परिस्थितीत सुंदर असायला हवं आणि सुंदर बाई म्हणजे अमुक एक माप, रंग इत्यादी ह्यात काहीच बदल झालेला दिसत नाही. बायांच्या मनातही. ‘अमुक एक’ चे तपशील बदलत रहातात फक्त. तरीही १९६० च्या दशकातल्या घटनेने बर्‍याच मोठ्या प्रमाणात सामान्य बायांचे हाल कमी केले हे नाकारता येणार नाहीच.

बाकी ब्रा-बर्निंग संदर्भाने चेष्टा, आंबटशौकीन वर्णनं होतच रहाणार. तुम्ही करायची का नाही हे तुमच्या माणूसपणाच्या पातळीवर अवलंबून. नाही का?

- नीरजा पटवर्धन




Tuesday, February 19, 2013

संस्कार २ - ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा ||

हा लेख मायबोली.कॊम या संकेतस्थळाच्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
प्रयोगाची तारीख चार दिवसांवर आली होती. तालमी जोरदार चालू होत्या. यावर्षी आमचंच कॉलेज जिंकणार ह्याची खात्रीच होती आम्हाला सगळ्यांना. सॉलिड विषय, तुफान स्क्रिप्ट आणि आमच्या मते एकदम हिट्ट अभिनय करणारं पब्लिक होतं आमच्या ग्रुपात. आऊचा काऊ असा दुवा जोडत एका मोठ्या नाट्यकर्मीला तालमीच्या इथे बोलावलं होतं आमच्या दिग्दर्शकाने. त्या नाट्यकर्मीने तालीम पाह्यली. आता आम्ही प्रशंसेचा आणि कौतुकाचा मारा झेलायला अगदी तयार, असे त्यांच्यासमोर उभे राह्यलो प्रतिक्रियांसाठी. "बरं करताय. पण तुम्ही नटमंडळी ऐकत नाही का रे एकमेकांचं? नुसती वाक्यावर वाक्यं चाललीयेत. आधी ऐका बरोबरचा नट काय बोलतो ते आणि मग तुमचं बोला." त्यांनी कौतुक केले नसल्याने आम्ही त्यांचं ऐकायच्या वगैरे भानगडीत पडलो नाही आणि स्पर्धेत वाजले बारा.

आता आपला अभिनय घासूनपुसून नीट केला पाहिजे तर वर्कशॉप बिर्कशॉप करायला हवं असं वाटायला आणि दुबेजींच्या वर्कशॉपची जाहिरात पेपरात यायला एकच गाठ पडली. अस्मादिक वर्कशॉपमधे रुजू झाले. सगळ्यांना पार ठार इम्प्रेसच करून सोडायचं असा निश्चयच होता माझा. एक दिवस वर्कशॉपमधे काहीतरी एक प्रश्नार्थक वाक्य कानावर पडलं आणि मी तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे स्मार्ट, चौकस आणि हुशार मुलगी असल्याने उत्तर द्यायला लग्गेच तोंड उघडलं. काही बोलणार त्या अगोदरच कानफडात मारल्यासारखं दुसरं वाक्य आलं. "डोन्ट आन्सर राइट अवे बाई, लर्न टू लिसन फर्स्ट. विचाSSर कर मग उत्तर दे." स्पर्धेच्या जोषात त्या नाट्यकर्मीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इथे दुर्लक्ष करणं काही शक्य नव्हतं. कंपलसरी विचार सुरू झाला की 'हे ऐकण्याचं काये?'

दोन माणसांच्यातला साधा संवाद असतो.
- जेवलास?
- हो
- भूक भागली?
- हो
पहिल्या प्रश्नानंतरच उत्तरादाखल हो येतो. पहिला प्रश्न कानावर पडतो, मेंदूपर्यंत जातो, तिथे त्याचा अर्थ स्पष्ट होतो, मेंदू उत्तर ठरवतो, बोलण्याच्या उर्जेसकट ते उत्तर स्वरयंत्राकडे, तोंडाच्या स्नायूंकडे पाठवतो आणि मगच आपण 'हो' असं उत्तर देतो. ह्या मधल्या प्रक्रियेसाठी अगदी किंचित किंवा खूप जास्त असा काळ जाऊ शकतो. किती काळ जावा ते प्रश्नोत्तरे करणार्‍या दोघांच्या नात्यावर, त्यांच्यात आधी काय घडून गेलंय, सद्य परिस्थिती काय आहे या सगळ्यावर अवलंबून असतं. साध्या 'हो' च्या मागे पुढे बरंच काही असू काही शकतं. मात्र रंगमंचावर होतं काय की आपण सगळे संवाद इतके चोख पाठ केलेले असतात की या कश्शाकश्शाचा विचार न होता धडाधड एकानंतर एक पल्लेदार वाक्यं बोलली जातात. नट आपापली भाषणं पाठ म्हणत असतात आणि दोन व्यक्तिरेखांचं एकमेकांच्यातलं नातं, एकमेकांच्यातला दुवा गायब असतो. रंगमंचावर 'ऐकून बोला' हा विविध लोकांनी केलेला उपदेश कशासाठी हे आता कुठेतरी थोडं थोडं उमगायला लागलं.

पण दुबेजी रंगमंचापुरतं नव्हते सांगत. ते एरवीच ऐकायला सांगत होते. विचारलेला प्रश्न किंवा समोरच्याचं म्हणणं काय आहे? कुठे आहे त्याचा रोख? बोलणारा कशाबद्दल आणि काय बोलतोय नक्की? हे सगळं समजून घेतल्याशिवाय रिअ‍ॅक्ट होऊ नका, उत्तर द्यायची घाई करू नका असं सांगत होते. 'कान आहेत, ऐकू येतंय तर आता वेगळं ऐकायला शिकायची गरज काय?' असा प्रश्न माझ्यातल्या स्मार्ट, चौकस आणि हुशार मुलीला पडलाच. तसंही इतर बाजूंनी म्हणजे 'व्यक्तिमत्व विकास' करून देणारी ४ दिवसांची शिबिरे, विविध आखीव ग्रुप डिस्कशन्स अशा ठिकाणी पटकन उत्तरं देणे, पटकन रिअ‍ॅक्ट होणे हे भयानक हुशारीचं लक्षण मानलं जात होतं. तरीही भरपूर कानपिचक्यांच्यानंतर का होईना 'ऐकल्याशिवाय' लगेच रिअ‍ॅक्ट न होणे, प्रश्न समजून घेऊन मगच उत्तर देणे हळूहळू अंगवळणी पडायला लागले. आणि मग अनेक ठिकाणची संवादांची दारे सहजगत्या उघडायला लागली. 'लर्न टू लिसन!' या मंत्राची महती चांगलीच पटली.

आता हल्ली माझे विद्यार्थी मी शिकवत असताना माझं वाक्य संपूर्णपणे वेगळ्याच दिशेने पुरं करू पहातात तेव्हा मूळचा विषय बाजूला ठेवून 'लर्न टू लिसन!' चा एक वळसा दिल्याशिवाय मला चैन पडत नाही. कामाच्या इथल्या सहकार्‍यांशी चर्चा करताना, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना कुणी एकाचं वाक्य मधेच तोडून आपलं गाडं पुढे घुसवतो तेव्हा मनातल्या मी जोराजोरात 'लर्न टू लिसन!' ओरडत असते.

पहिलं वाक्य बोलत असलेला लिंक तोडली गेल्याने वैतागलेला असतोच. कधीतरी त्याचा फ्यूज उडतो आणि तो चिडचिडू लागतो.
- मला माझा मुद्दा पुरा करू देत, मधे बोलू नकोस
- तू कोण मला सांगणारा
- माझं वाक्य तरी पूर्ण होऊ देत
- काय बोलणार होतास असं अमुक तमुक आणि ढमुक हेच ना.
- नाही माझं म्हणणं वेगळंच होतं.
- होक्का? मग सांग बरं काय ते?
- जाऊ दे मरू देत. आता नाही इंटरेस्ट.
- आता बोलायलो सांगतोय तर ते नाही.
- तू म्हणशील तेव्हाच बोलायचं का मी? कोण समजतोस स्वतःला?
- असं म्हणलंय का मी? उगाच खुसपटं!
- तू च्यायला दर वेळेला माझी मुस्कटदाबी कर आणि वर मलाच म्हणतो खुसपटं बिसपटं.

असं काहीतरी, छोट्या किंवा खूप मोठ्या तीव्रतेचं होतं. दुसर्‍याने आपला मुद्दा ऐकला पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची होऊन बसते. विषय संपला तरी इगो दुखावलेले असतात. समोरच्याने आपलं वाक्य पण ऐकून घेऊ नये किंवा आपल्याला बोलायलाही नको म्हणावं अशा अपमानाची बोच टिकून रहाते. दुसरा आपल्याला कमी लेखतो असं मानत संवाद संपतो. असं सतत होत गेल्यावर त्या दोघांच्यातलं नातं तडकायला लागत असावं का?

कुठलंही नातं मग ते क्षणिक असो की अनंतकाळचं म्हणलं गेलेलं असो. नातं म्हणलं की संवाद आला. संवाद म्हणजे देवघेव आली. गंमत अशी की अशा नको त्या ठिकाणी आपण सगळे कसले दानशूर बनतो. आपले विचार, भावना, शब्द, वाक्यं सगळं नुसतं देत असतो आपण समोरच्याला आणि इनकमिंगचं विसरतो.

म्हणजे कसं की, 'माझ्या एका मैत्रिणीला इतकं सतत काहीतरी सांगायचं असतं मला. आम्ही गप्पा मारतो तेव्हा माझी उत्तरं तिच्या डोक्यात माझ्याआधी तयार होतात. उत्तरादाखल मी तोंड उघडताच हवे ते ते उत्तर मी योग्य वेळेला दिलंय असं गृहित धरून ती पुढे बोलू लागते. मग मी काय उत्तर दिलं असावं हे मी तिच्या पुढच्या वाक्यावरून समजून घेते.'
'एक मित्र आम्ही सगळे गप्पा मारत असताना मी कुठल्याही विषयाबद्दल बोलत असले तरी ते वाक्य मधेच तोडून तिसराच विषय सुरू करतो.'
'नवरा मी काय सांगतेय ते न ऐकता नुसतं हो हो म्हणत जातो. आणि मग ऐन वेळेला जे करायला नको होतं नेमकं तेच्च करतो.'
'बायको मी जे बोलतो त्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं ऐकते आणि वैतागते.'
'बॉसला माझं कुठलं म्हणणं ऐकूच जात नसावं बहुतेक. कायम दुर्लक्ष माझ्या प्रॉब्लेम्सकडे.'
'ऑफिसप्यूनला कुठल्याही वाक्यातला अर्जंट हा शब्द ऐकू येत नाही.'
आणि मग शेवटी . . . द ऑलटाइम क्लासिक!
'मला कुणी समजूनच घेत नाही.'
सगळी उदाहरणं निव्वळ न 'ऐकण्याची'.

सतत दुसर्‍याला काहीतरी सांगायची, दुसर्‍यापर्यंत काहीतरी पोचवायची लसलस आणि दुसर्‍यानं ते ऐकावं, दुसर्‍याला ते समजावं अशी अपरंपार इच्छा प्रत्येकाच्यातच असते. या इच्छांना शरण जाता जाता आपण आपलं सांगण्याचं कौशल्य घासूनपुसून लख्ख करायला बघतो, ऐकण्याचं राहूनच जातं. मग हळूहळू संवाद संपतो, मग विसंवाद पण संपतो आणि दोन माणसं अनोळखी बनून जातात. नातं कुठल्याकुठे गायब, ओरखडे मात्र चिरस्थायी.

हे काय भलं नाही राजे!
मग वो?
मग एवढंच . . .

"लख्ख झळझळीत नात्यासाठी हवा उत्तम संवाद
उत्तम मोकळ्या संवादासाठी
बोलण्याइतकेच महत्वाचे . . .
आज आत्ता या क्षणापासून आजमावून बघण्याजोगे . . .
ऐकणे ऐकणे एकदम चोख ऐकणे!"
--- डिंग डाँग ---
आजकी ये प्रसारण सेवा यहीं समाप्त होती है|

- नीरजा पटवर्धन


संस्कार १ - येतोच... आलोच... - http://aatalyaasahitmaanoos.blogspot.in/2011/07/blog-post.html

Tuesday, July 31, 2012

वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....

९ ते ११ फेब्रुवारी २०१२ या दरम्यान फ्लेम, पुणे येथील कॅम्पसमधे आंतरराष्ट्रीय थिएटर कॉन्फरन्स झाली. 'नाट्यप्रशिक्षणाचे शास्त्रः भारतीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन(थिएटर पेडगॉजी: इंडियन अ‍ॅण्ड इंटरनॅशनल परस्पेक्टीव्ह)' असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
मी २००१ पासून ललित कला केंद्र - पुणे विद्यापीठ, अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस - मुंबई विद्यापीठ, फ्लेम - पुणे, नाट्यदिशा - नेहरू सेन्टर, नॉर्थ लखिमपूर-आसाम येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे एक्स्टेन्शन वर्कशॉप अश्या विविध नाट्यप्रशिक्षण केंद्रांमधे वेशसंकल्पन शिकवत आहे/ शिकवले आहे. तसेच वेशसंकल्पन या विषयातच माझे पदव्युत्तर शिक्षण (एम एफ ए - थिएटर मेजर, कॉश्च्युम डिझाइन फोकस) झालेले आहे. या माझ्या अनुभवावर आधारीत वेशसंकल्पनेच्या शिक्षणासंदर्भात एक पेपर सादर केला होता. माझ्या पेपरचे शीर्षक होते 'टिचिंग कॉश्च्युम डिझाइन..' कॉन्फरन्समधला पेपर असला तरी हा विषय म्हणजे रॉकेट सायन्स नाही आणि पेपरमधले मुद्दे सर्वांच्यासमोर आलेच तर कदाचित हे क्षेत्र समजून घ्यायला मदत होईल या हेतूने खालील लेख लिहित आहे. प्रस्तुत लेख माझ्या पेपरमधील काही भागाचा अनुवाद आहे. काही गोष्टींना मराठी प्रतिशब्द वापरता आले नाहीयेत तर काही ठिकाणी ते तसे वापरणे हे अतिक्लीष्ट तसेच मुद्दा चुकीच्या दिशेला नेत असल्याने वापरले नाहीयेत.
----------
वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....
रंगभूमी हे दृकश्राव्य माध्यम आहे जिथे संवाद व संगीत ऐकून तर नटांच्या हालचाली व रंगमंचाची मांडणी बघून प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेत असतो. हा जो बघण्याचा किंवा दृश्य भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कुठल्याही नाटकाचा दृश्य भाग किंवा संरचना कथा व व्यक्तिरेखांना खरेपणा देतो, आधार देतो.
या दृश्य भागाचे एक महत्वाचे अंग म्हणजे वेशसंकल्पन. नाटकाचे मुख्य कार्य जे कथा सांगणे त्यामधे वेशभूषेचा मोठा वाटा आहे. वय, व्यवसाय अश्या ढोबळ गोष्टींपासून स्वभावातल्या बारीक सारीक कंगोर्‍यांपर्यंत व्यक्तीरेखेच्या अनेक संदर्भांची ओळख प्रेक्षकांना वेशभूषेमुळे होते. प्राचीन काळी म्हणजे जेव्हा नाटक लिहिलेही जात नव्हते तेव्हापासून नटाचे/ नर्तकाचे भूमिकेत जादूई रूपांतर करण्यासाठी वेशभूषेचा उपयोग असेच. नटाचे भूमिकेत रूपांतर करण्यासाठी आजही या कलेची जरूर आहे. हे सर्व असले तरीही रंगभूमीच्या सर्व कलांमधे वेशसंकल्पना ह्या कलेबद्दल अजूनही प्रचंड गैरसमज आहेत आणि अजूनही या कलेला योग्य स्थान दिले जात नाही .
बहुतांशी वेशसंकल्पनेला फॅशन डिझायनिंगचा एक प्रकार मानले जाते. व्यक्तीरेखा व कथेप्रमाणे कपडे, दागिने, इतर अ‍ॅक्सेसरीज, डिझाइन करून वेशसंकल्पक एक पूर्ण चित्र निर्माण करतो. एक व्यक्तिरेखा डिझाइन करण्यासाठी व्यक्तिरेखेच्या सखोल अभ्यासाबरोबरच संहितेची शैली, दिग्दर्शकाची ट्रीटमेंट, सादरीकरणाची पद्धत, अभिनयाची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास वेशसंकल्पकाला करावा लागतो. यासाठी वेशसंकल्पकाला वेगळे शिक्षण घ्यावे लागते जे फॅशनच्या अभ्यासापेक्षा नाट्यशिक्षणाशी जास्त नाते सांगते.
वेशसंकल्पनाचे शिक्षण: पाश्चात्य विचार
पाश्चात्य जगात वेशसंकल्पनाचे शिक्षण हे स्पेशलायझेशन किंवा संपूर्ण नाट्य प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून असे दोन्ही प्रकारे घेता येते. जवळजवळ सर्वच विद्यापीठांच्यात जिथे नाट्य शिक्षण आहे तिथे पदव्युत्तर (ग्रॅड स्कूल/ मास्टर्स - एम एफ ए) स्पेशलायझेशन करता येते. तसेच काही ठिकाणी पदवीही (बॅचलर्स - बी एफ ए) करता येते. या सर्व अभ्यासक्रमांच्या मागे एक विशिष्ट मेथडॉलॉजी आहे.
वेशसंकल्पक बनण्यासाठी संपूर्ण नाट्यकलेचे ज्ञान असणे आवश्यक मानले आहे. यामुळे रंगभूमीचा इतिहास व संहिता विश्लेषण ह्या अतिशय महत्वाच्या विषयांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असतो. रंगभूमीच्या इतिहासाचा अभ्यास करताना जगभरातल्या रंगभूमीवर प्रचलित असलेल्या सादरीकरणाच्या पद्धती, त्यांची उत्पत्ती, वेळोवेळी केले गेलेले प्रयोग यांची ओळख होते तर संहिता विश्लेषण शिकताना विविध शैलींमधे लिहिलेली नाटके अभ्यासली जातात, अनेकविध दृष्टीकोनांच्यातून तपासली जातात. साहित्यिक प्रवाहांचाही अभ्यास यामधे केला जातो.
याबरोबरच वेशसंकल्पनेची सैद्धांतिक मूलतत्वे आणि प्रात्यक्षिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी वर्गामधले छोटे प्रोजेक्टस तसेच पूर्ण नाटकाच्या प्रत्यक्ष सादरीकरणासाठीही वेशसंकल्पन करणे आवश्यक असते. या प्रक्रियेच्या दरम्यान दिग्दर्शक व वेशसंकल्पक एकमेकांबरोबर काम कसे करतात याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळते. सेमिनार क्लाससाठी विद्यार्थी महत्वाचे विविध वेशसंकल्पक आणि त्यांचे कलेसाठीचे योगदान याच्याबद्दल अभ्यास, संशोधन करून समजून घेतात. एखाद्या क्लास प्रोजेक्टसाठी किंवा प्रयोगासाठी वेशसंकल्पन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना कागदावर दृश्यस्वरूपात आणणे अपेक्षित असते. यासाठी चित्रकलेच्या शिक्षणाचीही गरज असते. वेशसंकल्पनासाठी उपयोगी अश्या स्केचिंग, जलरंग, कोलाज अश्या विविध तंत्रांचे शिक्षणही दिले जाते. मोठ्या मोठ्या नाटक कंपन्यांची कॉश्च्युम शॉप्स अथवा ज्येष्ठ वेशसंकल्पकाच्या हाताखाली इंटर्नशिप करून व्यावसायिक जगातील कामाच्या पद्धतीचा अनुभव घेणे हे सुद्धा या शिक्षणात अनिवार्य असते.
यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे वेशभूषेचा इतिहास. यामधे कपड्याच्या इतिहासाबरोबरच कला, सजावट व वास्तुकलेचा इतिहासही अभ्यासला जातो. तसेच कला इतिहास आणि सामाजिक व राजकीय इतिहासाचा परस्परसंबंधाबद्दलही तपशीलात जाऊन विचार केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृती आणि समाजाच्या जडणघडणीच्या संदर्भाने एक व्यापक दृष्टीकोन मिळतो जो एखादी व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी अत्यावश्यक असतो.
वेशसंकल्पन करताना इतर बाकीच्या संकल्पनाबद्दलही म्हणजे नेपथ्य व प्रकाशयोजना यांबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान असायला हवे कारण या दोन्ही विभागांच्याबरोबरच काम केले जाते. त्यामुळे नेपथ्य व प्रकाशयोजना या दोन्ही कलांबद्दल शिकणे अनिवार्य असते.
वेशसंकल्पकाला कापड, कपडा बेतणे, शिवणे, आल्टरेशन्स या सर्व गोष्टी उत्तमपणे येणे अत्यंत जरूरीचे असते. त्यामुळे वेशभूषा तयार करण्याचे शास्त्र हा अभ्यासक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग असतो.
उत्तर अमेरिकेतील बहुतेक सर्व विद्यापिठांच्या नाट्यविभागामधे वेशसंकल्पनामधे मास्टर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना 'शॉप असिस्टंटशिप' मिळते. ज्यायोगे शिक्षणाच्या आर्थिक बाजू सांभाळली जाण्याबरोबरच विद्यापिठाच्या कॉश्च्युम शॉपमधे काम करण्याचा अनुभवही मिळतो.
वेशसंकल्पनाचे शिक्षण: भारतीय वस्तुस्थिती
वेशसंकल्पनाच्या शिक्षणासंदर्भात भारतातील परिस्थिती अभ्यासल्यास काही ठळक महत्वाचे मुद्दे दिसून येतात.
भारतात केवळ वेशसंकल्पनाचे शिक्षण देणारी एकही संस्था नाही. केवळ राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथील तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदविके अंतर्गत 'नाट्य तंत्रज्ञान व संरचना' या विषयामधे दुसर्‍या व तिसर्‍या वर्षात स्पेशलायझेशन करता येते. इथेही केवळ वेशसंकल्पन नाही.
बर्‍याचश्या नाटक शिकवणार्‍या संस्थांमधे वा विद्यापिठातील विभागांमधे सेट शॉप, कॉश्च्युम शॉप तर दूरच स्वत:चे नाट्यगृह/ सादरीकरणाची जागाही असतेच असे नाही.
काही फॅशन डिझायनिंग शिकवणार्‍या संस्थांमधे वेशसंकल्पन हा विषय थोडक्यात शिकवला जातो. तिथल्या शिक्षणामधे तारेतारकांचे ग्लॅमरस स्टायलिंग जास्त करून शिकवले जाते. वेशभूषेचा इतिहास या विषयाचा अंतर्भाव फॅशन डिझायनिंगच्या शिक्षणात नक्कीच असतो पण नाट्यशिक्षण वा चित्रपटनिर्मिती यासंदर्भात अर्थातच काहीही शिकवले जात नाही.
इथले पदव्युत्तर नाट्यशिक्षण हे संपूर्ण नाट्यकलेविषयी(कॉम्प्रिहेन्सिव्ह) शिक्षण देणारे असते. असे असले तरीही अभ्यासक्रमात अभिनयशिक्षणावर सगळ्यात जास्त भर असतो. काही शिक्षणसंस्थांच्या मते वेशसंकल्पन वा इतर तंत्राधारीत गोष्टींना अभ्यासक्रमात तोंडओळखीच्या पलिकडे स्थान देण्याची गरज नाही कारण येणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा अभिनय वा दिग्दर्शनाकडेच असतो.
वेशसंकल्पनाची सैद्धांतिक बाजू शिकवण्यासाठी ठेवलेला वेळ जरूरीपेक्षा अतिशय कमी ठेवलेला असतो. या थोडक्या वेळात जे शिकवले जाईल त्याचे प्रात्यक्षिक करून बघण्याची संधी क्वचित उपलब्ध होते कारण मुळात नाट्यशिक्षणासाठी गरजेचे असलेले इन्फ्रास्ट्रक्चरच अस्तित्वात नसते. याच प्रकारे गुणांकन व्यवस्थेमधेही सैद्धांतिक व प्रात्यक्षिक विभागात वेशसंकल्पना या विषयाचा अंतर्भाव असतोच असे नाही. 

मी जॉर्जिया विद्यापिठात शिकत असताना एक भारतीय म्हणून मला स्वतःची एक महत्वाची कमतरता जाणवली, ती म्हणजे दृश्य संवेदना आणि दृश्यात्मक विचाराचा अभाव. हाच अभाव आज मला माझ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्यातही दिसून येतो. दृश्यकलांचा अतिशय श्रीमंत वारसा लाभूनही भारतीय विद्यार्थ्यांच्या नाट्यकलेसाठी पोषक अश्या दृश्य जाणिवा पुरेश्या विकसित नसतात. आपल्या शालेय शिक्षणात दृश्यकलांचा अतिशय माफक वापर असतो. दृश्यात्मकता हे शिकण्या-शिकवण्याचे साधन म्हणून क्वचित वापरले जाते. समकालीन दृश्य कलांचे जग हे नेहमीच एक समांतर जग असते आणि माणूस म्हणून घडण्याच्या प्रक्रियेत त्याचा काहीच सहभाग नसतो. अर्थातच दृश्यकलांसंदर्भाने विचार व जाणिवा अविकसितच रहातात.  बहुतेक नाट्यप्रशिक्षणसंस्थांना दृश्यकलांचा प्रयोगकलांशी संबंध आहे आणि त्यांचा अंतर्भाव शिक्षणात केला पाहिजे असे वाटत नाही. हे सगळे मुद्दे या 'गोष्ट सांगण्याच्या कलेच्या' दृश्य भागाबद्दल शिकणे अवघड करून ठेवतात. यामुळेच बहुतेक रंगमंच संरचनेला नाट्यप्रशिक्षणामधे फारसे महत्व दिले जात नाही. 

भारतीय वस्तुस्थिती आणि प्रस्तावित शिक्षण पद्धती
विविध नाट्यप्रशिक्षण संस्थांमधे जवळजवळ अठरा वर्षे मी वेशसंकल्पन शिकवत आहे. येथील वस्तुस्थिती लक्षात घेता पाश्चात्य जगात ज्या प्रकारे शिकवले जाते तो अभ्यासक्रम तसाच्या तसा इथे शिकवता येणे शक्य नाही हे उघड आहे. भारतीय प्रशिक्षण संस्थांमधे संपूर्ण नाट्यकलेचा अभ्यासक्रम शिकवला जातो हे लक्षात घेऊन मी वेशसंकल्पनेच्या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या मॉड्युल्सचा प्रयोग करत आलेली आहे.
अ. वेशसंकल्पनेची प्राथमिक तत्वे - यामधे वेशसंकल्पनेचे प्रयोगातील स्थान व महत्व अधोरेखित होईल अशी काही मॉड्युल्स मी वापरते.
१. वेशभूषेचा मानसशास्त्रीय परिणाम - विद्यार्थी एका व्यक्तीचे कपडे, राहणी, अ‍ॅक्सेसरीज या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात व त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधण्याचा प्रयत्न करतात. रोजच्या आयुष्यातले कपडे, वस्तू व्यक्तीमत्वावर आणि व्यक्तिमत्व या वस्तूंवर कसा परिणाम करत असते यावर चर्चा होते. चपखल निरीक्षण आणि बारकावे/ तपशील यांना यामधे महत्व दिले जाते.
२. तुलनात्मक अभ्यास - यामचे फॅशन डिझायनिंग आणि कॉश्च्युम डिझायनिंग या दोन शास्त्रांची साम्यस्थळे व फरक याबद्दल चर्चा केली जाते. वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझायनिंग) हा फॅशन डिझायनिंगच्या कलेचा एक भाग नाही ह्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते. उत्तम प्रकारचे कापडचोपड, अत्युत्तम कारागिरी वापरून बनवलेले कुत्यूर/ कुटूर आणि इमिटेशन, उच्च दर्जा व किमतीचा भास निर्माण करणार्‍या वस्तू वापरून बनवलेले कॉश्च्युम यातला फरक स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या कॉश्च्युममधे फेविकॉल आणि रंग यांच्या पेस्टने चित्र काढून उत्तम भरतकामाच्या नमुन्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो.
३. वेशभूषेचे रसग्रहण - विद्यार्थी एखादे नाटक एकत्र बघून त्यातील वेशभूषेचे सखोल विश्लेषण करतात.
ब. वेशसंकल्पनाची प्रक्रिया - बहुतांश विद्यार्थी हे अभिनय वा दिग्दर्शनातच रस असलेले असतात. त्यामुळे संहिता ते प्रयोग या प्रवासातली वेशसंकल्पनेची प्रक्रिया अभ्यासताना, अभिनेता किंवा दिग्दर्शकाच्या संदर्भाने ही प्रक्रिया समजावून सांगितली जाते. अभिनेत्याचे वा दिग्दर्शकाचे या प्रक्रियेतील योगदान आणि भूमिका तसेच अभिनेता व वेशसंकल्पक आणि दिग्दर्शक व वेशसंकल्पक या दोन्ही नात्यांबद्दल सविस्तर चर्चा केली जाते.
१. शब्दशः कोणतेही नाटक हे दिग्दर्शकाचे 'व्हिजन' असते असे म्हणता येईल. दृश्य भागासंदर्भाने, प्रेक्षकांना कश्या प्रकारचा अनुभव द्यायचा आहे याची स्पष्ट कल्पना दिग्दर्शकाच्या मनात असायला हवी आणि ती कल्पना तीनही डिझायनर्सना उत्तम प्रकारे समजावून देता यायला हवी.
२. अभिनेत्याने वेशभूषेची संकल्पना समजून घ्यायला हवी. वेशसंकल्पकाच्या अभ्यासाचा आदर करायला हवा. मला हे आवडत नाही ते आवडत नाही असता कामा नये. तसेच तालमींच्या वेळेस वेशभूषेचा सराव व्हावा म्हणून घालायचे कपडे, वेशभूषा व नटांच्या हालचाली या सर्व गोष्टींची चर्चा दोघांमधे व्हायला हवी.
क. दृश्य जाणिवा - हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे याबाबतीत काही प्रमाणात विशेष काम करण्याची गरजही आहे. विद्यार्थ्यांनी दृश्यात्मक विचार करावा, त्यांच्या डोळ्यांवर संस्कार व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चित्रांची/ शिल्पांची प्रदर्शने, वेगवेगळ्या पुस्तकांच्यातले चित्र वा शिल्पांचे फोटो, आंतरजालावर उपलब्ध असलेली चित्रे बघावीत हा माझा प्रयत्न असतो.
१. दृश्य संवाद - संरचनेचे घटक व मूलतत्वे, घटकांचे मानसशास्त्रीय परिणाम यांचा तपशिलात अभ्यास.
२. नाटकाच्या संहितेची शैली, सादरीकरणाची शैली आणि नाटकाचे दृश्य संकल्पन यांच्यातले नाते याचा मुळातून व सविस्तर विचार.
वरील दोन्ही गोष्टी समजायला मदत व्हावी म्हणून या चर्चेदरम्यान भरपूर वेगवेगळी दृश्ये, मोठ्या मोठ्या चित्रकारांची चित्रे, महत्वाच्या नाट्यप्रयोगांचे फोटोग्राफ्स असे बरेच काही दाखवून त्यावरही चर्चा केली जाते.
अतिशय कमी तासिकांची उपलब्धता आणि प्रात्यक्षिकाचा अभाव यामुळे ही याही मॉड्यूल्स तशी मर्यादित स्वरूपातच यशस्वी होतात.
भारतीय वस्तुस्थिती: आता यापुढे...
भारतीय नाट्यप्रशिक्षण संस्था व विद्यापीठीय नाट्यविभागांमधे काही मूलभूत बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेकडे स्वतःचे नाट्यगृह आणि स्वतःची कॉश्च्युम, सेट, प्रॉपर्टी, लाइट वर्कशॉप्स असणे गरजेचे आहे. यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज पडणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने नाट्यविभागाचा भाषा किंवा अश्या विषयांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणे अत्यंत जरूरीचे आहे. नाट्यविभागाच्या गरजा वेगळ्या आहेत हे समजून घेणे अनिवार्य आहे.
योग्य प्रकारे पायाभूत सुविधा उभारल्या जाव्यात यासाठी नाट्यप्रशिक्षण संस्था वा नाट्यविभागांचा डिझायनिंग किंवा दृश्य संकल्पन या गोष्टींबद्दलचा दृष्टीकोन बदलणे नितांत गरजेचे आहे. कोरी पाटी घेऊन येणार्‍या विद्यार्थ्याला अभिनय वा दिग्दर्शन यातच रस असणे हे साहजिक आहे कारण आपल्याकडे नाटकाच्या तांत्रिक वा दृष्यसंकल्पनाच्या अंगांबद्दल सामान्य माणसांना फारसे माहित नसते, त्यासंदर्भाने तेवढी जागरूकता नसते. पण हे अज्ञान आहे हे कारण अभ्यासक्रम आखतानाचा पाया असता कामा नये. एकत्रित किंवा संपूर्ण नाट्याभ्यासक्रमात सर्व बाजूंना योग्य ते स्थान दिले गेले पाहिजे. दृश्य भाग हा पैशाअभावी काट मारण्याचा 'जास्तीचा' भाग नव्हे हे प्रशिक्षण संस्थांनी वा विद्यापिठांतील नाट्यविभागांनी लक्षात ठेवायला हवे. याचबरोबर दृश्यसंकल्पनाचे विषय शिकवण्यासाठी ठेवला जाणारा वेळ पण वाढवायला हवा जेणेकरून विद्यार्थ्यांना विषयाची किमान तोंडओळख तरी व्यवस्थित होऊ शकेल.
गुणांकन पद्धतीमधेही या अनुषंगाने बदल व्हायला हवेत. विद्यार्थ्यांना मूल्यमापनात शिकलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक करून बघायची संधी मिळायला हवी. संपूर्ण नाट्यप्रशिक्षणाच्या काळात किमान एका तरी प्रॉडक्शनमधे विद्यार्थ्याने वेशभूषा विभागात काम करणे अनिवार्य ठेवायला हवे.
प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थी याच क्षेत्रात उतरणार असतात त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम कश्या प्रकारे चालते याचा अंदाज येण्यासाठी प्रशिक्षणाचा भाग म्हणून व्यावसायिक व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अनिवार्य असायला हवे. जेणेकरून या क्षेत्राशी प्रत्यक्ष ओळख तर होतेच पण संपर्क वाढल्याने बाहेर पडल्यावर काम मिळण्याच्या दृष्टीनेही मदत होऊ शकते.
सर्वात शेवटी अतिशय मह्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय पारंपरिक रंगभूमीची ओळख व नाळ जोडली जाणे. भारताची पारंपरिक रंगभूमी ही विधिनाट्य ते लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अश्या सर्व प्रकारच्या अनेक शैलींचा समावेश असलेली श्रीमंत रंगभूमी आहे. प्रत्येक पारंपरिक रंगभूमी वैशिष्ठ्यपूर्ण दृश्य संकेतांचे पालन करते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातही हे उल्लेख आहेत. अभिनय प्रकारापैकी 'आहार्य अभिनय' ह्या संकल्पनेत रंगमंच, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांचा विस्तृत स्वरूपात विचार केलेला आहे. बहुतेक नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमात पारंपरिक रंगभूमीचा आढावा घेतला जातो. पण तो आढावा शारीरीक हालचालींची पद्धत, वारंवार दिसून येणारे विषय, संगीताचा प्रकार यासंदर्भात जास्त करून असतो. वेशभूषेचे वर्णन केलेले असते पण ते वस्तूंची यादी, त्या शरीरावर कुठे घातल्या जातात इतपतच असते. ठराविक वेशभूषा असण्याच्या मागचा संरचनात्मक विचार आणि त्याचा भारतीय दृश्य कलांशी घातलेला मेळ याबद्दल काहीच मिळत नाही. ह्या विषयाची किमान तोंडओळख होण्याइतपत तरी चर्चा केली जायला हवी. अर्थात या विषयामधे खूप मर्यादित स्वरूपात संशोधन उपलब्ध आहे. भारतीय रंगभूमीच्या इतिहासाच्या या पैलूबद्दल खोलात जाऊन केलेल्या संशोधनाची, संदर्भांची इथे नितांत आवश्यकता आहे.
समारोप
वेशसंकल्पन किंवा रंगभूमीच्या कुठल्याही पैलूचे व्यावसायिक शिक्षण देणार्‍या अभ्यासक्रमात त्या त्या विषयाचे संपूर्ण सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान या दोन्हीचा समावेश असायला हवा. अश्या प्रकारच्या प्रशिक्षणातून तयार झालेला विद्यार्थी बाहेर पडल्यावर आपल्या क्षेत्रात अर्थातच उत्तम कामगिरी करेल. त्याच्यामुळे त्याच्यासारख्या इतर अनेकांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जाईल. त्यामुळे अनेकांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे प्रशिक्षण संस्थांकडे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी जमा होणे हे पण सोपे होईल.
सध्यातरी ऐकायला स्वप्नवत वाटतेय.. नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमातील दृश्यसंकल्पन या विषयाची पुनर्बांधणी केल्यावरच हे सर्व स्वप्न की वास्तव हे खरोखर समजू शकेल.
-----------------------------------------------------------------------------
संदर्भसूची
पुस्तके:
द मॅजिक गार्मेंट - रिबेका कनिंगहॅम
कॉश्च्युम डिझाइनः टेक्निक्स ऑफ मॉडर्न मास्टर्स - लिन पेक्टेल
संकेतस्थळे:
डिपार्टमेंट ऑफ थिएटर अ‍ॅण्ड फिल्म स्टडीज; युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया
स्कूल ऑफ थिएटर; कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ आर्टस
स्कूल ऑफ ड्रामा; कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी
टिश स्कूल ऑफ आर्ट; न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी
स्कूल ऑफ थिएटर, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन; यूसिएलए
रॉयल अ‍ॅकेडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस

Monday, January 9, 2012

धमाल!

dubeyji.jpg
रिक्षा सोडली आणि जानकी कुटीरमधे प्रवेश केला. पृथ्वीच्या गेटमधून आत शिरताना आपोआप नजर उजवीकडे कॅफेतल्या टेबलांवर फिरून आली.
आहेत का?
च्च आता कसे असतील? ते नाहीत म्हणून तर इथे जमलेत सगळे.

अ‍ॅब्सेन्स.. गैरहजेरीनेच जाणवणार आहात का यापुढे?
नो नो डोन्ट वरी.. नो रोतडूगिरी. ओन्ली 'धमाल'

एक रंगमंच, अनेक कलाकार नवशिके ते मान्यवर..
काही कविता, काही नाट्यप्रवेश, काही नाच, काही गाणी.....
सोनालीने म्हणलेली दुबेजींची आवडती कविता 'झाड'..
स्वानंदने गायलेलं 'बावरा मन'.
रत्नाजींनी वाचून दाखवलेला आजोबांनी नातवंडासाठी झाड लावण्याबद्दलचा उतारा...
क्षणात कोंडणारा घसा, डोळ्याला ओल, गालांवरून वाह्यलेलं पाणी..
बट आय अ‍ॅम नॉट क्रायिंग सर!

पहले सांस लो फिर बोलो.
फोकस..
सेन्टेन्स पुरा बोलो,
बाई, पिच अर्धा सूर खाली,
तुम्ही तेव्हा गमतीदार मराठी बोलायचात.
एकही उच्चार चूक नसायचा पण तरी वाक्याचा रिदम वेगळा होता.
ते फार मस्त वाटायचं कानाला.

पूर्वा नरेशचे अप्रतिम आणि सहज सुंदर नृत्य
इप्टा वाल्यांनी तुमच्यासाठी म्हणून सादर केलेली अप्रतिम गाणी...
अधून मधून तुमच्या आठवणी,

तू पुण्यातली कोकणस्थ. तुला स्टेजवर रडता येत नसेलच.
काय ओळखलंत!
तुमचा पेन एक्सरसाइझही माझ्यापुढे निष्प्रभ ठरला होता.
पण 'आडा चौताल' मधे मला रडण्यापासूनच सीनची सुरूवात करायला लावलीत.
रडायला शिकवलंत खरं..
तरी मी आत्ता रडत बसणार नाहिये!

'खुदा के लिये.. मत देखना' मधला तुम्हीच तुमच्या 'संभोग से सन्यास तक' मधून कॉपी केलेला सीन,
कुमुद-सुहिताचे 'सुदामा के चावल'
टाळ्यांचा कडकडाट, हसण्याचा धबधबा..

सगळं काही तुमच्या ओढीने. ही कुठली जादू होती तुमच्याकडे?
जो जो तुमच्या संपर्कात आला त्याला श्रीमंत करून सोडलंत. अगदी आयुष्य बदलण्याइतकं श्रीमंत.
हे करताना त्या त्या प्रत्येकावर प्रेम केलंत. शिव्या घालत, समोरच्याचा इगो डिवचत प्रेम केलंत.
अगदी माझ्यासारख्या चिरकुट लोकांपासून पार नसीरजी, अमरिश पुरी यांच्यासारख्यांपर्यंत.

तुम्ही स्वतःच स्वतःची घेतलेली मुलाखत. थँक्स टू सुनिल आणि हिदा.
स्वतःचं डिसेक्शन करून ठेवलं होतंत तुम्ही. 'संगीत नाटक अकादमी' अवॉर्ड मिळालं तेव्हा.

सरतेशेवटी "आयुष्यभरात राहून गेलेल्या झोपेचा कोटा पुरा करत होते दुबेजी गेले तीन महिने, जेणेकरून स्वर्गात गेल्यावर लगेच नाटक करता यावं. ही मस्ट बी मेकिंग 'हेल' आउट देअर!" इति नसीरजी
"येस 'अंधा युग' विथ ओरिजिनल कास्ट!"
व्हॉट अ 'धमाल!!'

- नीरजा पटवर्धन
--------------------------------------------------------

तळटिपा - १. कोणीही उस्फूर्तपणे स्टेजवर येऊन एकट्याने/ समूहाने ५ मिनिटाचे काहीतरी परफॉर्म करायचे. क्रम ठरवलेला नाही, एकत्रित तालमी बिलमी असं काही नाही. असा दीड दोन तासाचा कार्यक्रम म्हणजे 'धमाल!' दुबेजींची अतिशय आवडती अ‍ॅक्टिव्हिटी होती. हे नावही त्यांनीच दिलेले होते.
२. 'अंधा युग' हे धर्मवीर भारतींचं अतिशय गाजलेलं नाटक. महाभारतावर आधारित आहे.

Thursday, October 27, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २

----------------------------------------
कशे आसंत सगळे? बरा मां?
पुढची पुरचुंडी सोडतंय त्याआधी
एक म्हणजे माका फ्रेंच, स्पॅनिश आणि बाकीचो भाषा येऊक नाय. स्पेलिंग आणि उच्चार यांचा मेळ जमतलाच असा काय नाय तर माफीच करून टाका. आणि दुसरं म्हणजे हयसरलो डिस्क्लेमर परत वाचा बघू. स्मित
वाचलात. समजला मां? आता येवा पुरचुंडी बघूक.
पुरचुंडीत पयलो रत्न आसां
द मिनिस्टर (L'exercice de l'etat) - पियेर शूलर या दिग्दर्शकाचा हा फ्रेंच चित्रपट. एका ट्रान्सपोर्ट मिनिस्टरच्या आयुष्यातील काही घडामोडींभोवती ही घटना घडते. एका प्रचंड मोठ्या अपघातापासून कथा सुरू होते. मंत्र्याचं अत्यंत तणावग्रस्त आणि धावपळीचं आयुष्य, हा मंत्री कुठल्याही 'टायटल्ड' घराण्यातला नसणं, त्याला जनतेची चाड असणं हे त्यातून उलगडत जातं. मंत्री आणि त्याचा ड्रायव्हर यांच्यातलं माणुसकीचं मैत्रीपूर्ण नातं आपल्याला दिसतं पण त्याचा पार टडोपा करत नाहीत. मग रेल्वेस्टेशन्सचे खाजगीकरण या मुद्द्यावरून राजकारणातले बेरिजवजाबाकीचे खेळ आपल्यापुढे यायला लागतात. शेवटी या मंत्र्याला दुसर्‍या खात्यावर टाकून खाजगीकरणाचे गाडे पुढे सरकते. राजकारणाचे खेळ, मैत्री या शब्दाचा पोकळपणा, 'टायटल' चा युरोपियन सोस, एकटेपणा अश्या सगळ्या गोष्टींना घेऊन सिनेमाची गाडी पुढे जाते. नुसत्या राजकारणाच्या कोरड्या खेळापेक्षा मानवी स्वभाव आणि नात्यांना स्पर्श करत कथा जाते त्यामुळे कंटाळा येत नाही.

हयसर आसंय एक बाभळी..
लास अ‍ॅकेशियास (Las acacias) - अर्जेंटिना आणि स्पेनची निर्मिती असलेला, पाब्लो जिऑर्जेयी (Pablo Giorgelli) या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. भाषा इस्पॅनोल (स्पॅनिश). पेरूग्वे ते ब्युनॉस आयर्स या रस्त्यावर ही कथा घडते. वर्षोनवर्षे याच रस्त्यावरून ट्रक चालवणारा एक ट्रक ड्रायव्हर रुबेनच्या आयुष्यातल्या वेगळ्या दिवसाची ही गोष्ट. प्रवासाच्या सुरूवातीला जेसिंता त्याच्या ट्रकमधे ब्युनॉस आयर्सपर्यंत लिफ्ट मागते. जेसिंताबरोबर तिची आठ महिन्यांची मुलगीही आहे. संपूर्ण प्रवासभर ते फारसे बोलत नाहीत पण तरी संपूर्ण अनोळखीपणापासून मैत्रीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो फार सुंदर. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या आयुष्याबद्दल भोचकपणे प्रश्न विचारून फुकटचे तत्वज्ञानाचे डोस ते एकमेकांना पाजत नाहीत. एकमेकांच्या खाजगीपणाचा आदर ठेवून एकमेकांचे प्रवासाचे साथी होतात, एकमेकांना गरज पडल्यास मदत करतात. या सगळ्यात छोट्या मुलीचं तिथं असणं हा पण एक सुंदर कॅटॅलिस्ट. चित्रपटाचा दिग्दर्शक स्क्रिनिंगनंतर बोलताना म्हणाला की मी लिहिलेल्या पहिल्या स्क्रिप्टमधे मी खूप बडबड लिहिली होती पण दुसर्‍या तिसर्‍या ड्राफ्टला येताना ती बडबड इतकी अनावश्यक वाटायला लागली आणि संवाद अगदी कमीतकमी झाले. जे काय प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं ते नुसत्या सीन्समधूनच पोचवता येईल हे लक्षात आलं. एकूणात चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाबद्दलचा हा डोस मला फार महत्वाचा वाटला. अभिनयाबद्दल रुबेन, जेसिंता आणि बेबी अनाही तिघांची दृष्ट काढायला हवी. चित्रपट बघायला हवा. उरलेला दिवस प्रसन्न होऊन जाईल.

इथे आहे लंकेतून आलेला भुरभुर पाऊस
ऑगस्ट ड्रिझल (Nikini Vassa) - मी बघितलेला पहिला श्रीलंकन चित्रपट. दिग्दर्शन अरूणा जयवर्दना या दिग्दर्शकाचे. संपूर्ण चित्रपटात मृत्यू प्रमुखस्थानी आहे. पण चित्रपट खूप जड इत्यादी नाही. सोमलता ही मृतदेहांना साफ करून, मेकप करून चांगले कपडे घालून पुरण्यासाठी तयार करण्याचे काम करत असते. वडिलांच्या नंतर हे काम तिच्याकडे आलेले आहे. तिने लग्न केलेले नाही या कारणास्तव गावात तिच्याबद्दल वाईट साईट चर्चा करणारे खूप आहेत. गावासाठी स्वतःच्या खर्चातून एक स्मशान बांधून द्यावे जेणेकरून आपल्याला थोडी तरी प्रतिष्ठा मिळेल गावात असा सोमलताचा विचार आहे. या कामादरम्यान सोमलताची भेट एका आर्किटेक्टशी होते. जो गावातलाच असूनही गावाच्या मानसिकतेपेक्षा वेगळा असतो. दोघांचं वेगळेपण त्यांना जवळ आणतं. पण स्मशान बांधणे आणि त्यातून सोमलताला मिळू शकणारी प्रतिष्ठा हे गावातल्या तिच्या प्रतिस्पर्ध्याला (मृतदेह साफ करण्याच्या धंद्यातला प्रतिस्पर्धी) पचणारं नसतं. त्याची ताकद आणि वजन गावात भरपूर आहे. त्यामुळे त्यावरून खूप मोठं राजकारण सुरू होतं. शेवटी सोमलताचा यात खून होतो. सिनेमा संपतो. श्रीलंकन गावातलं वातावरण आपल्यासाठी एकाचवेळी अनोळखी आणि ओळखीचं वाटतं. सोमलताची व्यक्तिरेखा करणार्‍या अभिनेत्रीचा चेहरा वेगळाच सुंदर आणि अभिनयक्षमता अफाट आहे. एकदा बघावा असा.

हयसर अमेरिकेतल्या त्रासलेल्या सुंदर्‍या आसत!
डॅम्झेल्स इन डिस्ट्रेस - शीर्षक वाचूनच बारीकसं फिदी टाइपचं हसू येतं. सगळा सिनेमा त्याच धर्तीवर आहे. गुडीगुडी हॉलिवूड स्टाइल मशी अमेरिकन कॉलेज ड्रामा प्रकारच्या फिल्म्सवर स्पूफ आहे(काय मराठी आहे वा वा!) . व्हिट स्टिलमन हा दिग्दर्शक. ज्यांना हॉटशॉटस, स्क्रीम असे स्पूफ सिनेमे आवडले असतील त्यांनी जरूर बघाच. जास्त काही सांगण्याची जरूरच नाही.स्मित

आणि या १७ पोटुश्या पोरी
१७ गर्ल्स (17 Filles) - २००८ मधे एका अमेरिकन हायस्कूलमधे घडलेल्या 'प्रेग्नंसी पॅक्ट' या घटनेवरून प्रेरणा घेऊन बनवलेला हा फ्रेंच चित्रपट. म्युरिएल आणि डेल्फिन कोलिन या बहिणींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. यातल्या म्युरिएल कोलिनने किस्लॉव्हस्कीच्या 'थ्री कलर्स' आणि इतर अनेक फिल्म्ससाठी कॅमेरा डिपार्टमेंटमधे काम केले आहे. फ्रान्समधल्या समुद्रकिनार्‍याला लागून असलेल्या एका छोट्याश्या गावी ही कथा घडते. एका हायस्कूलमधल्या १६ वर्षाच्या काही मैत्रिणी एकत्र गरोदर रहायचं ठरवतात आणि एकत्र राहून मुलांना वाढवायचं ठरवतात त्याची ही गोष्ट. कॅमेरा वर्क अप्रतिम. फिल्म बाकी ठिकठाक असली तरी सगळ्या टिनेजर मुली आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर आल्या आहेत हे बघता त्यांच्या अभिनयाला आणि दोन्ही दिग्दर्शक ताईंना टोप्या उडवून सलाम!!

आता उरलंसुरलं...
काही फिल्म्स बाकी आवडल्या नाहीत फारश्या पण त्यातली दिग्दर्शकीय प्रयोगशीलता आणि प्रामाणिकपणा फार महत्वाचा वाटला. यात एक इराणी फिल्म 'मोर्निंग' आणि रोमेनियन फिल्म 'बेस्ट इंटेशन्स' यांचा खास उल्लेख करायला हवा.

ही अजून एक पुरचुंडी पाह्यलेल्या आणि राह्यलेल्या पश्चात्तापाची..
पाह्यलेल्या पश्चात्तापाचो पतेरो
१ - सगळ्यात मोठा पश्चात्ताप 'मेलनकोलिया' - झेक रिपब्लिकची निर्मिती असलेला टिपिकल साय-फाय धर्तीचा हॉलिवूडी विंग्रजी चित्रपट. फिल्मच्या सुरूवातीची १० मिनिटे टायटल्स, काही अ‍ॅनिमेशन असा एक टॅब्लो आहे. तो अप्रतिम आहे पण त्यानंतर फिल्म बघायची काहीही गरज नाही. व्हिज्युअली उत्कृष्ट असली तरी कमालीची कंटाळवाणी आहे. आणि सगळ्याला 'काय उगाच?' हा प्रश्न आहेच. मेलनकोलिया नावाचा एक ग्रह पृथ्वीवर आदळून सगळं जग नष्ट करून टाकणार असतो त्यामुळे अतिप्रचंड श्रीमंत लोक वेड्यावेड्यासारखे विचित्र वागू लागतात त्याची गोष्ट आहे. या चित्रपटाचे आयएमडिबी रेटिंग बरेच आहे. त्यामुले २ तास रांगेत तंबू ठोकून हा चित्रपट बघितला आणि स्वतःचे डोके फोडून घ्यावेसे वाटले.
२ - ब्रेकफास्ट लंच डिनर - साउथ इस्ट एशियामधल्या तीन देशातील तीन दिग्दर्शक बायांनी केलेला हा चित्रपट. वेगवेगळ्या तीन जेवणाच्या तीन वेगळ्या गोष्टी. पण मूळ विषय प्रेम हा आहे. असे क्याटलॉगबुकात लिवलेले. कमालीची संथ हाताळणी. हॉटेलमधे १ मुलगी बसून बॉयफ्रेंडची वाट बघते. त्याला १५ मिनिटे उशीर होतो तर आपणही 'रियल टाइम' मधे १५ मिनिटे घालवतो असला खेळ. आणि त्याने काही होत नाही, कथा पुढे सरकत नाही. प्रेम कंटाळवाणे असते यापलिकडे काही अनुभव मिळत नाही.. दुसरी कथेचा कंटाळा इतका कंटाळवाणा झाला की कंटाळून आम्ही बाहेर पडलो.
३ - अरेंज्ड हॅपिनेस - काश्मिरमधल्या एका अ‍ॅरेंज मॅरेज कम प्रेमाची ही कथा आहे असं सिनॉप्सिस सांगतो. क्याटलॉगबुकात वाचून सिनेमा बघावासा वाटतो. वैधानिक इशारा की हा चित्रपट फिक्शन फिचर नसून माहितीपट आहे. एक स्वीडनची मुलगी, साउथमधल्या एका काश्मिर एम्पोरियममधे गालिचे बिलिचे विकणार्‍या एका तरूणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्या काश्मिरमधल्या घरी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गेली. बहिणीचे लग्न अ‍ॅरेंज्ड मॅरेज होते. तिथे गेल्यावर गोरी मेमचे आणि त्या तरूणाचे अफेअर अजूनतरी जाहिर केलेले नाही. ही पार्श्वभूमी. या गोर्‍या स्विडीश मुलीने लग्नाच्या सगळ्या विधींचे केलेले चित्रण ही आख्खी फिल्म. महान कंटाळा
४ - लव्ह यू टिल डेथ - एल वाय टि डी - रफिल एलियास या अ‍ॅडफिल्ममेकरने ही हिंदी फिल्म केलीये. सिनेमा चालू व्हायच्या आधी स्वतःच्याच चित्रपटाबद्दल नको इतके ग्रेट बोलून घेतले या सगळ्या टिमने. आणि चित्रपट रद्दी, सी ग्रेड, चीप, सॉफ्ट पोर्नो स्वरूपाची...

बघायचे राहून गेलेले बरेच पश्चात्ताप आहेत. कॅटलॉग वाचत गेले तर जेवढे बघितलेत त्याच्या दुप्पट राह्यलेले पश्चात्ताप होतील. पण हे काही अगदीच महत्वाचे...
१. पिना - पिना बॉश या नृत्यकर्मीवर असलेली ही डॉक्यु. डॉक्यु थ्रीडी आहे. आणि ज्यांना बघायला मिळाली ते बहुतेक सगळेच स्तुती करताना थकत नाहीयेत. माझं नशिब कधी उघडेल कुणास ठाऊक..
२. फाउस्ट - गोथ च्या फाउस्ट या ट्रॅजेडीचे अ‍ॅडप्टेशन. महोत्सवात डोक्याचे सॅच्युरेशन झाल्यावर शेवटी बघायला मिळाली. जड आहे आणि बरंच रक्त, आतडी असलं काय काय आहे. माझी कपॅसिटी संपली होती त्यामुळे १० मिनिटात उठून आले. फिल्म इंटरेस्टिंग असणार होती.

अशी आमची जत्रा संपन्न झाली. दर्शन तर घडले. देव पावण्याची वाट बघूच आता.
(समाप्त)

- नीरजा पटवर्धन

Saturday, October 22, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - २

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १ 
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
 ---------------------------------------------
तर मंडळी या बसा घटकाभर! बघा आमच्या शिदोरीच्या गठुळ्यात काय काय जमलंय ते.
पण गठुळं खोलायच्या आधीच एक 'वैधानिक इशारा' आणि 'आमचे हात वर' (डिस्क्लेमर)
जगभरातले चित्रपट हे वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले, वेगवेगळ्या मानसिकतेबद्दल सांगणारे असतात. आपल्या अतिप्रचंड भयंकर महान आणि पुरातन संस्कृतीमधे बसणारे असतीलच असं नाही (म्हणजे काय कुणास ठाऊक). आपल्यापेक्षा वेगळं म्हणजे मानसिक आजारी नव्हे हे शिकण्यासाठी या शिदोरीचा वापर केल्यास आनंद होईल. न केल्यास केवळ तुमचाच तोटा. आवडलेले चित्रपट आवडल्याबद्दल आणि नावडलेले नावडल्याबद्दल कुठल्याही कोर्टात आम्ही उभे तर रहाणारच नाही पण त्या अनुषंगाने तुमची महान संस्कृती, आमची आजारी मानसिकता अश्या सगळ्या चर्चेला आत्तापासूनच उत्तमरित्या फाट्यावर मारण्यात आलेलं आहे.
तर असो!!
गठुळं खोलेंगे.... गठुळं खोल!!
गठुळ्यात बटवे, पुरचुंड्या, पुड्या. हा बटवा सगळ्यात रत्नजडीत. आधी बघू त्यात काय आहे..
ये देखो... ये तो 'मामि' मधली बेस्ट फिल्म छे!
'माय लिटल प्रिन्सेस' - सतत गायबच असलेली हॅना परत येते आणि अचानक फोटोग्राफर बनते. आपल्या १० वर्षाच्या मुलीला व्हियोलेताला आपल्या फोटोग्राफीसाठी मॉडेल बनवते. पापभीरू, साध्या असलेल्या पणजीकडे राहणार्‍या व्हियोलेताला आपल्या आईचं रंगीबेरंगी जग, त्यातली मजा, आपण आईसाठी महत्वाच्या आहोत हे वाटणं हे सगळं खेचून घेतं. एरॉटिक आर्टच्या जगात या फोटोंमुळे हॅनाचं नाव होतं. व्हियोलेता पण सुरूवातीला सगळा ड्रेसिंग अप, ग्लॅमर आणि स्टारडम एंजॉय करत असते. दोघींच्यातलं आई-मुलगी + फोटोग्राफर-मॉडेल हे नातं इव्हॉल्व्ह होत असतं. पण हळूहळो व्हियोलेताला हे सगळं नको व्हायला लागतं. अशातच हॅनाला चाइल्ड अ‍ॅब्युज बद्दल दोषी धरलं जातं इत्यादी. हॅना चुकतेय हे आपल्याला कळत असलं तरी ते हॅनाला समजतच नसतं. ती केवळ कलेच्या पॅशनपायी सगळं करत असते. मुलीवर तिचं प्रेम नाही आणि मुलीला छळायचं हा तिचा हेतू नक्की नसतो पण घसरण कधी सुरू झाली हे तिला कळलेलं नसतं. आपल्याला हॅनाचा राग येतो पण कीव पण येत रहाते अश्या विचित्र तणावांच्यातून हा चित्रपट जातो. एक क्षणभरही आपल्याला पडद्यापासून नजर, कान, मेंदू हलवू न देणारा असा अप्रतिम फ्रेंच चित्रपट. दिग्दर्शिका आहे इव्हा आयनेस्को. इव्हाने ११ वर्षाच्या वयात रोमन पोलान्स्कीच्या 'द टेनन्ट' मधून बाल-अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. दिग्दर्शक म्हणून ही तिची पहिली फिचर फिल्म. पण चित्रपटावरची दिग्दर्शक म्हणून पकड आणि सफाई बघून ही पहिली फिल्म आहे असं अजिबातच वाटत नाही.
व्हियोलेता झालेल्या छोट्या अभिनेत्रीने जे काही केलेय ते थक्क करणारे आहे. ते तिच्याकडून करून घेणे हे दिग्दर्शिकेने कसे जमवले असेल याची मला प्रचंड उत्सुकता आहे. या छोट्या अभिनेत्रीला बरेच पुरस्कार मिळाले आहेत या रोलसाठी. 'मामि' मधे सुद्धा.
याच चित्रपटाच्या स्क्रिनिंगमधे २-३ वेळेला प्रोजेक्शनिस्टने प्रचंड माती खाल्ली. पुढचं रीळच जोडलं नाही (प्लॅटरवर असून हे कसं काय जमवलं हे मला माहित नाही पण पडदा पांढरा स्वच्छ दिसू लागला काही काळ. नुसताच प्रोजेक्टरचा आवाज.. ), एकदा खाली डोकं वर पाय रीळ जोडलं होतं असं काय काय आणि हे सगळं असूनही एकालाही निघून जावेसे वाटले नाही इतकं या चित्रपटाने सगळ्यांना पकडून ठेवलं होतं.
हा पुढचा घास 'हजारो विदूषकांचा'!
अ थाउजंड फूल्स ( मिल क्रेटिनोज) - १५ वेगवेगळ्या कथांना एकत्र घेऊन बांधलेला हा स्पेनमधला स्पॅनिश गुच्छ. सगळ्या कथांना विनोदाचा डूब दिलेली असली तरी त्यांचा गाभा धो धो हसवणार्‍या विनोदाचा नाही. विनोदाचा वापर करून दु:ख, वेदना, म्हातारपण, मृत्यू, प्रेम या गोष्टींवर चुरचुरीत भाष्य आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकदा येतो तो माणसाचा माणूस म्हणूनच करू शकेल असा मूर्खपणा.
पंधरा कथांमधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे जणू काही मनोरंजन करायला ठेवलेले विदूषक (फूल्स) म्हणून तेच चित्रपटाचं नाव. स्पॅनिश दिग्दर्शक व्हेन्चुरा पोन्स याने अतिशय ब्रिलियंटली केलेली हि फिल्म. नक्की बघावी अशी.
या पुढे आता. इथे अजून विचित्र काहीतरी दिसतंय..
मायकेल - कान, मॉस्को, टॉरान्टो अश्या महत्वाच्या फेस्टिव्हल्समधून यावर्षी नावाजला गेलेला हा मार्कस श्लाइन्झर या दिग्दर्शकाचा ऑस्ट्रियन चित्रपट. मायकेल नावाचा एक दिसायला साधासरळ, चार लोकांसारखं घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढंच आयुष्य असलेला, एकटा रहाणारा, थोडासा बावळटच वाटावा असा पिडोफाइल. एरवी त्याच्याकडे बघून त्याच्या या बाजूची कुणाला शंकाही येणार नाही. त्याने व्होल्फगांग नावाच्या एका १० वर्षाच्या मुलाला आपल्या घाणेरड्या शौकासाठी आपल्या घराच्या बेसमेंटमधे कोंडून ठेवलेय. या मुलाचा बाहेरच्या जगाशी संपर्क येऊ देत नाही. त्याला खाऊ, खेळणी तिथेच आणून देतो. दिवसभर मायकेल ऑफिसला असेल, अचानक बाहेरगावी गेला असेल तर अन्नाचा साठा बेसमेंटमधे करून ठेवलेला आहे. याच मुलाच्याबरोबर मायकेल ख्रिसमस पण साजरा करतो. घरी ट्री आणून इत्यादी. तेवढ्यापुरता त्याला वरती घरात येऊ देतो. पण बाकी बेसमेंटमधेच. बेसमेंटचं दार बाहेरून कुलूपबंद त्यामुळे घरी कोणी आलं तरी कोणाला सुतराम कल्पना येणार नाही की इथे कोणी आहे. मुलगा त्याच्या पातळीवर प्रोटेस्ट करतोच पण आईवडिलांनी शिस्त लावायला तुला माझ्याकडे पाठवलाय त्यामुळे मी म्हणेन ते तुला ऐकलं पाहिजे ही थाप त्या मुलाला असहाय्य करते. पुढे काय होते? त्याची सुटका होते का? मायकेलला शिक्षा मिळते का हे मी इथे सांगत नाही. दिग्दर्शकीय हाताळणी तशी प्लेन सिंपल नॅरेटिव्हची आहे. अधूनमधून बारीकश्या विनोदांचा वापरही आहे. आपण त्यावर हसतो आणि दुसर्‍याच क्षणाला कशावर हसलो आपण असं होतं. या सरळसोट नॅरेटिव्हमुळेच हा चित्रपट जास्त अंगावर येतो.
आता हे रत्नं बघा.
इव्हन द रेन - इश्यार बोलेन (Iciar Bollain) या दिग्दर्शिकेचा स्पेन-फ्रान्स-मेक्सिको अश्या तिन्ही देशांची एकत्रित निर्मिती असलेला स्पॅनिश भाषेतील हा चित्रपट. चित्रपटात चित्रपट अशी रचना तुम्हाला पूर्णवेळ खेचून धरते. कोलंबसाने अमेरिका शोधून पादाक्रांत केली या ऐतिहासिक कथेला धरून कोलंबसाचे जुलमीपण आणि स्थानिक लोकांची वाताहात यासंदर्भात चित्रपट करण्यासाठी सबॅस्टियन हा दिग्दर्शक, निर्माता कोस्टा आणि इतर क्रू बरोबर बोलिव्हिया मधे येतो. बोलिव्हियाच लोकेशन म्हणून निवडण्याचं कारण केवळ 'स्वस्त पडेल' हेच असतं. बोलिव्हियामधे २००० साली पाण्यावरून जो उठाव झाला त्याची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. कोलंबसाने सोनं मिळवण्यासाठी स्थानिक माणसे, स्थानिक निसर्ग यांच्यावर जुलमी सत्ता प्रस्थापित करणे आणि अमेरिकन/ युरोपियन कंपन्यांनी स्थानिकांच्या हक्काच्या पाण्यापासून त्यांना वंचित करणे अश्या दोन गोष्टी समांतरपणे घडताना आपल्याला दिसतात. ज्यातली एक ५०० वर्षांपूर्वी घडून गेलेली आहे आणि चित्रिकरणाच्या निमित्ताने आपल्याला दिसतेय तर एक आपल्यासमोर खरोखर घडत रहाते. म्हणलं तर भडक आणि म्हणलं तर तश्या नाजूक अश्या विषयावर अश्या प्रकारे इतक्या सुंदररित्या फिल्म करणं आणि कुठेही प्रचारकी कंटाळवाणी न होऊ देता आपला मुद्दा प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे महाकठीण आव्हान या दिग्दर्शिकेने लीलया पेललेले आहे. मी अजून ४-५ वेळा तरी ही फिल्म बघायच्या विचारात आहे. तुम्ही पण बघा.
आता हा तुटका आरसा घ्या. हा कधी खोटं बोलत नाही.
मिरर नेव्हर लाइज - कमला अंडिनी या इंडोनेशियन दिग्दर्शिकेची हि पहिली फिचर फिल्म. आजवर मी तरी एकही इंडोनेशियन चित्रपट पाह्यलेला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. इंडोनेशियन बेटांच्या समूहातल्या एका छोट्या बेटावर समुद्राला लागून तरंगणार्‍या घरांच्या वस्तीत राहणार्‍या पाकिस या १२ वर्षाच्या मुलीची ही कथा. ही सगळी वस्ती मासेमारी करणारे किंवा समुद्रातून विविध वस्तू आणून विकणार्‍यांची वस्ती आहे. पाकिसचे वडील मासेमारी करायला गेलेले असताना दुर्घटनेत गेलेत पण पाकीसचा विश्वास आहे ते हरवलेत. पाकिसच्या आईलाही खरी गोष्ट माहितीये पण ती पाकिसच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीये. त्यामुळेच ती बाजो जमातीच्या प्रथेप्रमाणे चेहर्‍यावर सफेद रंगाचा लेप लावून आहे. पाकिसकडे तिच्या वडिलांनी दिलेला एक आरसा आहे ज्यावर मंत्र टाकला असता ते असतील तर तिला दिसतील असा तिचा (तिच्या जमातीचा) विश्वास आहे. पाकिस आणि तिचा बेस्ट फ्रेंड लुमो यांचं शाळा, समुद्रात भटकणे, आईला मदत करणे, आईची बोलणी खाणे असं आयुष्य चालू असतंच दरम्यान जाकार्ताहून एक डॉल्फिन्सचा अभ्यास करणारा तुडो त्यांच्या घरात भाड्याने रहायला येतो. मग तुडो आणि मुलांची मैत्री, पाकिसला तुडोवर वाटणारा अधिकार, तुडो आणि पाकिसच्या आईमधे उमलू पहाणारे नाते यातून प्रवास करत शेवटी लुमोच्या वडिलांचा समुद्रात अपघाती मृत्यू, त्याचदरम्यान पाकिसच्या वडिलांच्या बोटीचे मिळालेले तुकडे आणि पाकिसला वडिलांचा मृत्यू मान्य करायला लागणं या ठिकाणी हा चित्रपट संपतो. अतिशय सुंदर असं निसर्गाचं दर्शन, वेगळ्याच प्रकारच्या जमातीच्या आयुष्याचं चित्रण ज्यात कुठेही माहिती सांगण्याचा सूर नाही, या दोन्ही पार्श्वभूमीवरची साधेपणाने सांगितलेली एक सुंदर गोष्ट अश्यामुळे हा चित्रपट आरश्यावर पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबासारखा चकचकत रहातो आणि आवडतो.
आता हे चित्र मिश्र संस्कृतींमधलं
लकी - हा पंजाबी चित्रपट नाही. झुलू, इंग्लिश आणि हिंदी अश्या तिन्ही भाषेत असलेला हा दक्षिण आफ्रिकेतला चित्रपट आहे. याचा दिग्दर्शक अवि लुथरा हा भारतीय वंशाचा ब्रिटीश माणूस आहे.
जगात एकटा उरलेला १० वर्षाचा झुलू मुलगा लकी आणि अल्बम्समधल्या फोटोंसकट एकटी उरलेली एक भारतीय आजीबाई पद्मा यांच्यातल्या शब्दांच्या पलिकडल्या नात्याची ही कहाणी. शब्दांच्या पलिकडले नाते अशासाठी की लकीला झुलू भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही आणि पद्माआजींना झुलू येत नाही. लकीने शाळेत गेलं पाहिजे अशी त्याच्या आईची शेवटची इच्छा आहे. लकीचा मामा एकदम ऐय्याश आणि बेकार माणूस आहे. लकीला शाळेत जायचंय. 'काळा' म्हणून लकीला कशालाही हात लावू न देणारी पद्माआजी त्याने शाळेत जावं यासाठी आपले आयुष्यभर जमवलेले दागदागिने विकून पैसा उभा करण्यापर्यंत पोचते हा प्रवास बघण्यासारखा आहे. या प्रवासात आपण जास्त गुंतून रहातो ते लकी आणि पद्मा साकार करणार्‍यांच्या अभिनयामुळे. पद्माची व्यक्तिरेखा करणार्‍या बी. जयश्री या कन्नड नाट्यकर्मी आणि आता राज्यसभा सदस्यही आहेत. त्यांची ३-४ नाटके मी पुण्यात काही महोत्सवांच्यात पाह्यली होती. आणि भाषा कुठेही समजत नसूनही मी भारले गेले होते. तेव्हापासून त्यांची मी पंखी आहे. त्यांना या चित्रपटात पडद्यावर बघणं हा एक अप्रतिम अनुभव होता.
आता ही रत्नजडीत बटव्यातली शेवटची वस्तू
टॉमबॉय - फ्रेंच सिनेमा. सेलिन सायमा ही स्त्री दिग्दर्शिका. १० वर्षाची एक मुलगी हा कथेचा केंद्रबिंदू. अतिशय सरळपणाने कथा जाते. १० वर्षाच्या लॉरे या मुलीला आपण मुलगी आहोत हे आवडत नसतं तिला मुलगाच व्हायचं असतं. सगळं कुटुंब नवीन घरात रहायला जातं आणि नवीन ठिकाणी मित्रमैत्रिणी जोडले जाताना लॉरे स्वतःची ओळख मिकेल नावाचा मुलगा अशी करून देते. बारीक केस, मुलांसारखे कपडे आणि अजून आकारात न आलेलं शरीर यामुळे ती थाप पचते. मग थाप टिकवायला आपल्या बालबुद्धीने लॉरे काय काय करते आणि अखेरीस खरं उघडकीला आल्यावर काय होतं अशी सगळी ही फिल्म. कुठेही गिमिकल हाताळणी न करता सहजपणे सांगितलेलं नॅरेटिव्ह आणि कुणावरच, कशावरच दोषारोपण न करता पुढे नेलेली कथा यामुळे ही फिल्म अक्षरशः अडोरेबल बनते. इतका अवघड विषय इतक्या सहजपणे आणि संवेदनशीलपणे हाताळल्यामुळे आपल्या मनात घर करून रहातो.
असा हा रत्नजडीत बटवा. कंटाळा आला नसेल तर गाठोड्यातल्या बाकी पुड्या-पुरचुंड्या पुढच्या भागात सोडूया. नाहीतर इथेच थांबूया. काय म्हणता?
क्रमशः लिहू की समाप्त?

- नीरजा पटवर्धन

Friday, October 21, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
 -------------------------------------------------------------------------
दरवर्षी काहीनाकाही कारणाने राहून जात होतं ते अखेर यावर्षी घडलं. यावर्षीच्या उत्सवाला हजेरी लागलीच.
७ - ८ दिवस नुसती धुमशान.
सकाळी उठून धडाधडा आवरून सिनेमॅक्स, वर्सोवा (तेच ते इन्फिनिटी मॉलमधलं!) गाठायचं. थेट्राबाहेर लायनी लावायच्या. जागा पकडायच्या. सिनेमा बघायचा. संपला की एक्झिटच्या दारातून पळत पळत ४० पायर्‍या उतरायच्या दुसर्‍या बाजूचा जिना गाठायचा परत सिक्युरिटीसाठी पर्स उचकायला द्यायची आणि ते झालं की पळतपळत दुसरीकडच्या ४० पायर्‍या परत चढायच्या. परत थेट्राबाहेर रांगेत. रांग लावायची म्हणून जेवण स्किप करायचं. किंवा रांगेत ४-५ जणांनी मांडा ठोकून बसायचं आणि तिथेच जेवायचं, घुसायला लागले लोक तर आरडाओरडा करायचा, कसतरी मरतमरत आत घुसायचं आणि परत तेच... रात्री थकल्या डोळ्यांनी घरी. अधल्यामधल्या वेळात उद्याच्या फिल्म्स कोणत्या, कुठल्या बघायच्या याचा कॅटलॉगमधून अभ्यास करायचा. कॅटलॉगमधे पुरेशी माहिती नसेल तर रात्री गुगलायचं. 'उद्या सकाळी अमुक वाजता स्क्रीन अमुकच्या लायनीत भेट' असले समस...
मज्जा न काय एकुणात!
१३-२० ऑक्टोबर २०११ या काळात घडलेल्या 'मामि' चित्रपट महोत्सवाची ही गोष्ट. दिवसाला प्रत्येक माणूस ५ चित्रपट बघू शकतो. माझी रोजच तेवढी क्षमता नव्हती. किंवा कधी चित्रपट सुरू झाल्यावर १० मिनिटात बकवास म्हणून बाहेर यायचो आम्ही मग पुढच्या चित्रपटासाठी रांग असायचीच त्यामुळे रांगेत तंबू. असे करून एकुणात २५ तरी सिनेमे बघितले गेले.
यावर्षीचं 'मामि' चं चित्रपटांचं कलेक्शन मस्त होतं यात वाद नाही. साधारण ७-८ स्पर्धात्मक आणि अ-स्पर्धात्मक विभाग ज्यामधे कान महोत्सवात नावाजले गेलेले चित्रपट, फ्रेंच सिनेमा, गाजलेले भारतीय चित्रपट यांपासून मुंबई या विषयावर नवख्या/ विद्यार्थी फिल्ममेकर्सनी केलेल्या शॉर्ट फिल्म्स असे सगळे रंग होते. या विविधरंगी गुच्छाबद्दल फेस्टिव्हल प्रॉग्रॅमिंग टीम आणि सिलेक्शन टीमचे विशेष अभिनंदन आणि आभार.
यावर्षी पहिल्यांदाच सिनेमॅक्समधे हा महोत्सव होत होता. सिनेमॅक्स, वर्सोवा हे मुख्य ठाणे तर सिनेमॅक्स, वडाळा आणि मेट्रो ही अजून दोन ठाणी या महोत्सवाची केंद्रे होती. सिनेमॅक्सच्या स्टाफला वेड्याविद्र्या चित्रपटांसाठी ३-३ ४-४ तास रांगा लावून बसलेल्या वेड्यावाकड्या जनतेला सांभाळताना आणि शिस्त राखताना घाम फुटला असणार. पण त्यांच्याशिवाय हे सगळं सुरळीत होऊ शकलं नसतं.
मात्र सिनेमॅक्सच्या प्रोजेक्शनिस्टससाठी आणि प्रोजेक्शनिस्टसबरोबर कोऑर्डिनेट करणार्‍या 'मामि' च्या लोकांसाठी चित्रपट महोत्सवात कसे काम करावे याचे मोठ्ठे वर्कशॉप कुणीतरी तज्ञ लोकांनी घेण्याची प्रचंड जरूर आहे. आलेल्या फिल्म्सची रिळे बरोबर न जोडणे किंवा अजिबातच न जोडणे किंवा खाली डोके वर पाय अशी जोडणे, सबटायटल्सशिवायच स्क्रिनिंग चालू करणे, आस्पेक्ट रेश्यो पार गंडलेला त्यामुळे सबटायटल्स दिसतील किंवा माणसांची डोकी तरी असले प्रकार, गोंधळ झाला काही तर थेट्रातले लोक आरडाओरड करत नाहीत तोवर दुर्लक्ष करणे, गोंधळ निस्तरून मधली ५-१० मिनिटे गायबच करून डायरेक्ट पुढचाच भाग सुरू करणे असले अक्षम्य अपराध प्रत्येकी रोज ४ वेळातरी हे लोक करत होते.
प्रत्येक चित्रपट बघत असताना सुरक्षेला धोका उत्पन्न होईल असं काहीतरी प्रत्येकाकडे निर्माण होतं असा सिक्युरिटीवाल्यांचा समज असावा कारण ४० पायर्‍या उतरणे आणि परत ४० पायर्‍या चढणे या परिक्रमेमधे दर वेळेला सगळी पर्स पूर्ण उचकून पाचकून बघितली जात होती. जाम जाम वैताग. अर्थात ते लोक त्यांची ड्यूटी करत होते त्यामुळे त्यांना दोष काय देणार पण निर्णय घेणार्‍यापुढे माझे कोपरापासून हात जोडलेले
तरीही बघायला मिळालेल्या सिनेमांची शिदोरी इतकी महत्वाची की त्यांचं पारडं जडच...
त्यांच्याबद्दल पुढच्या भागात...
(क्रमशः)
- नीरजा पटवर्धन

Monday, October 17, 2011

सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं

पुस्तकाचे नाव - सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं
मूळ लेखन - सी. एस. लक्ष्मी
अनुवाद - उर्मिला भिर्डीकर, उज्ज्वला मेहेंदळे
संपादन - अंजली मुळे
प्रकाशक - स्पॅरो SPARROW
प्रथम आवृत्ती - ऒगस्ट २०००
--------------
मुखपृष्ठावर इंटरेस्टिंग चित्र, स्पॅरोचा संदर्भ आणि पुस्तकाचं नाव यांच्यामुळे हे पुस्तक फारसा विचार न करता विकत घेतले. पुस्तकाचं नाव फारच गोंधळात पाडणारं आहे. दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची मनोगतं याचा अर्थ मला जो समजला त्याच्या तर मी मोहातच पडले होते. दृश्य कथा म्हणजे एखादा पूर्ण किंवा छोट्या लांबीचा चित्रपट मग तो माहितीपट असेल अथवा फिक्शन. स्पॅरोतर्फे अशी एखादी फिल्ममेकिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असावी आणि त्या कार्यशाळेत सहभागी असलेल्यांनी आपापल्या ज्या फिल्म्स बनवल्या त्या संदर्भातल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक असावं असा माझा समज झाला.
हा समज अर्थातच चुकीचा होता हे पुस्तक वाचायला घेतल्यावर हळूहळू लक्षात यायला लागलं. दृश्य कथा कार्यशाळा हा स्पॅरोचा एक महत्वाचा उपक्रम आहे. स्त्री-कलाकाराला कलेच्या जगात काम करताना कलाकाराचं स्त्रीपण खूप महत्वाची भूमिका बजावत असतं. या स्त्री कलाकारांकडून त्यांची अभिव्यक्ती, त्यासाठी त्यांनी शोधलेला/ मिळवलेला अवकाश, त्यांचे अनुभव याची ओळख या कार्यशाळेतून करून दिली जाते. या स्त्री कलाकारांना कार्यशाळेत बोलावून त्यांची मुलाखत घेतली जातेच. त्याचबरोबर कलाकाराच्या घरी, कामाच्या ठिकाणीही स्पॅरो सदस्य भेट देतात आणि कलाकाराचं स्त्री म्हणून जगणं, काम करणं समजून घेतात. हे सगळं ध्वनिचित्रमुद्रित केलं जातं. आणि मग त्यातून हे असं पुस्तक निर्माण होतं. साधारण १९९६-१९९७ दरम्यान घडलेल्या या कार्यशाळांमधे विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधक सहभागी होते. या पुस्तकामधे एकुणात सहा कलाकार स्त्रियांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा आहे. मुलाखती आणि कलाकारांशी त्यांच्या त्यांच्या अवकाशात भेट, त्यांना बोलतं करणं हे वेगवेगळ्या व्यक्तींनी केलं आहे. आणि त्याचे या पुस्तकामधे शब्दांकन सी. एस लक्ष्मी यांनी केले आहे.
पहिल्या आहेत जुन्या जमान्यातील चित्रपटांतील नटी व निर्माती प्रमिला उर्फ एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम. यांची मुलाखत स्वत: सी एस लक्ष्मी यांनीच घेतलेली आहे. १९९७ साली ८१ वर्षांचे वय असताना प्रमिला यांनी या कार्यशाळेसाठी मुलाखत दिलेली आहे. १९३५ ते १९६१ अशी अभिनयाची कारकीर्द आणि १९४२ ते १९६० अशी निर्माती म्हणून कारकीर्द असा प्रमिला यांचा आलेख आहे. इतक्या जुन्या काळात चित्रपट निर्माती स्त्री हे माझ्यासाठी फारच कुतूहलाचे होते. परंतू पाण्यात पडल्यावर पोहणे पेक्षा 'मी बिचारी बाई कशी पोहणार तरले कशीबशी' असाच अप्रोच जास्त जाणवला. संपूर्ण मुलाखतीचा सूर ’गाऊ तयांची आरती’ टाइप आहे. त्यातून प्रमिला यांच्या आयुष्याचा घटना-घटना-घटना असा आलेख मिळतो पण स्त्री म्हणून चित्रपटसृष्टीशी त्यांचे नाते, मर्यादा, अनुभव याबद्दल फार थोडे मिळते. आणि हा आलेख बघता प्रमिला यांचं कर्तुत्व, धडाडी यामधे बरंच काही ऐकण्यासारखं, शिकण्यासारखं असणार जे मुलाखतकाराला पकडता आले नाहीये हे सतत वाटत रहाते.
दुसर्‍या स्त्री कलाकार एक पारंपारीक व व्यक्तिचित्र शिल्पकार आहेत. त्यांचं नाव कनका मूर्ती. यांची मुलाखत लेखिका शशी देशपांडे यांनी घेतलीये. १९४२ साली म्हैसूरजवळच्या एका छोट्या गावात, अत्यंत पारंपारीक व कर्मठ वातावरणात जन्म घेतलेल्या कनका यांना आईने वडलांच्या मिनतवार्‍या करून पदवीपर्यंत शिकवणे आणि नंतर कनकांनी पारंपारिक शिल्पकलेच्या क्षेत्रातच काम करण्याचे ठरवणे यापासून ते त्यात त्यांनी यशस्वी होणे इथपर्यंत हा सगळा प्रवास अतिशयच प्रेरणादायी आणि अभ्यासण्यासारखा. विश्वकर्मा समाजातल्या स्त्रीने प्रख्यात शिल्पकार बनणे यासारखी सर्वच बाबतीत विरोधाभासाने पुरेपूर भरलेली घटना सत्यात उतरताना कनका यांना बरीच मानहानी, अविश्वास, कमीपणा सहन करावा लागला असणारच पण त्याबद्दल त्यांच्या पूर्ण मुलाखतीत कुठेही कडवटपणाचा अंश जाणवत नाही. त्या आपल्या कलेविषयी बोलताना कुठेच मी मी प्रकार नसतो. त्या पूर्णपणे कला आणि कलाकृती घडत जातानाची प्रक्रिया याबद्दल बोलतात. ही मुलाखत मला फारच आवडली.
तिसर्‍या स्त्री कलाकार आहेत नृत्यांगना दमयंती जोशी. ही मुलाखत नीला भागवत यांनी घेतलेली आहे. अतिशय गरिबीत मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. ही सगळी घटना प्रचंड रोचक आहे. ती मुळातून वाचायला हवी. दमयंती जोशींबद्दल लिहिताना मादाम मेनका यांच्या मादाम मेनका बनण्याच्या प्रवासाबद्दल पण या मुलाखतीत आले आहे. तेही तितकेच वाचनीय आहे. आणि हे सगळे १९३०च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनकाबाईंनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंतीबाईंनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान प्रचंड महत्वाचे आहेच. २० पानी मुलाखतीमधे हा सगळा आलेख थोडा कोंबल्यासारखा वाटतो. तसेच बरेच संदर्भ सतत मागे पुढे मागे पुढे होत रहातात त्यामुळे गोंधळ उडू शकतो पण त्याला पर्याय नाही. नृत्याबद्दल आस्था असणार्‍यांसाठी दमयंतींचा प्रवास समजून घेणे हे फार महत्वाचे ठरावे.
चौथ्या स्त्री कलाकार आहेत आपल्या सगळ्यांनाच माहित असलेल्या सुषमा देशपांडे. बारामतीमधे गेलेलं बालपण, मग पुण्यात कॉलेज, नाटक, पत्रकारितेचं शिक्षण आणि पत्रकारिता करताना स्वत:चा म्हणून गवसलेला नाट्यपत्रकारितेचा रस्ता (व्हय मी सावित्रीबाई, तिच्या आईची गोष्ट हे प्रयोग) हे सगळं फार छान मांडलेलं आहे. ’व्हय मी सावित्रीबाई’ या प्रयोगाची संपूर्ण संहिताही यामुलाखतीसोबत आहे.
पाचव्या स्त्री कलाकार आहेत नाटक जगणार्‍या समकालीन नाट्यकर्मी माया. यांची मुलाखत/ माहिती जे काय म्हणाल ते प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात एका मोनोलॉगसदृश चिंतनात आहे. आजूबाजूची स्पेस, वस्तू चाचपडत, शोधत, नव्याने शोधून काढत या मोनोलॉगचा प्रवास सुरू होतो तो शेक्सपिअर, कथकलीची तत्वे, मॉडर्न स्कूलमधलं शिक्षण, विविध प्रयोग, शरीर नटाचं साधन, श्वासावरची पकड अश्या अनेक स्टेशनातून जातो. नाटक डसतं म्हणजे कसं नक्की ते समजून घ्यायला हे नक्कीच वाचलं पाहिजे. भारतीय समकालीन नाट्यविचार समजून घेण्यासाठीही या मोनोलॉगचा प्रचंड उपयोग आहे आणि आमच्यासारख्या चिरकुट नाटकवाल्यांसाठी बरीच मोठी प्रेरणा.
सहाव्या स्त्री कलाकार आहेत चित्रकार समाजातील नसूनही म्हैसूर शैलीतली चित्रकारी आपला व्यवसाय म्हणून निवडलेल्या नीला. परंपरेनुसार ही कला स्त्रियांसाठी नसते. चित्रकार समाजातसुद्धा घरातल्या मुली-सुनांना ही कला शिकवली जात नाही किंबहुना त्यांच्यापासून ती गुप्तच राखली जाते(हे भारतातल्या बहुसंख्य हस्तकलांच्या बाबतीत बघायला मिळते). अश्या वातावरणात या शैलीला व्यवसाय म्हणून निवडण्याची इच्छा, हिंमत आणि चिकाटी दाखवणार्‍या नीला यांच्याबद्दलची माहिती या लेखात आहे पण माफक प्रमाणात. या माहितीबरोबरच ’अकाली गेलेली नणंदच पोटी जन्माला आली’ यासारख्या बिनमहत्वाच्या गोष्टी पण आहेत. परंतू भारतातील पारंपरिक चित्रशैली, रंग बनवण्याच्या पद्धती, या चित्रशैलींमधला विचार, वापरल्या जाणार्‍या वस्तूंबद्दल टिप्पण्या, म्हैसूर चित्रशैलीचे तपशील अश्या विविध गोष्टींसंबंधी असलेल्या संदर्भचौकटी कलाअभ्यासकांसाठी उपयोगी ठराव्यात.
स्पॅरोच्या पुढच्या उद्दिष्टांबद्दल सुतोवाच करून हे पुस्तक संपतं. कलाकार स्त्री म्हणून या सगळ्यांना जे अनुभव आलेत त्यातून मी काही गोष्टी शिकतेच पण मुलाखत, मुलाखतीचे शब्दांकन यासंदर्भातही काही करावे ते/ करू नये ते (dos & don'ts) मी शिकते.
- नीरजा पटवर्धन

Wednesday, September 21, 2011

मंदिर!!

पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.
रोज रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट दुसर्‍या दिवशी फिरायची, बघायची, फोटु मारायचे. असं करता करता एक दिवशी संध्याकाळच्या सुमारास नानेली गावात पोचलो. हि वाडी, ती वाडी असं करत करत एका ठिकाणी एक गंजकी पाटी पाह्यली गणपतिमंदिराची. पाटी बाण दाखवत होती त्या दिशेला एक पायवाटेसारखी वाट. निघालो. बरीच वळणं घेत शेवटी येऊन पोचलो ते एका अप्रतिम शांत, सुंदर अश्या जुन्या मंदीरापाशी
देवाकडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूने मंदिराकडे वाट येते. तिथून येऊन देवळाला सामोरे गेलो. हे असे



देऊळ नक्कीच बरंच जुनं होतं. सुंदर तर होतंच. देवळात कोणी चिटपाखरूही नाही. गाभार्‍यात एक छोटासा बल्ब लटकत होता. लोड शेडींगची वेळ संपली होती त्यामुळे तो उजळून निघाला.अंधार पडायला लागला होता. हे देऊळ पाह्यला परत यायचं असं ठरवून आम्ही निघालो.
दुसर्‍या दिवशी सकाळचेच आलो देवळात. आत्ताही देवळात कोणीही नव्हतं.
हा देवळाचा मंडप.


हा त्याचा डावा खण


हा उजवा खण


एकेक खांब जांभ्याच्या सुबक गोल चिर्‍याचा. आत्ता उखडलेली दिसत असली तरी शेणाने सारवली जात असलेली जमीन. उजव्या खणाच्या पलिकडे चिर्‍यांनी बांधून काढलेली छोटीशी विहीर.
एका बाजूने या देवळाचा पूर्ण फोटो काढायला पॅनोरमा प्रकरण वापरावे लागले.


देवळाचे सगळ्या बाजूंनी निरीक्षण करत, फोटो काढत फिरता फिरता काही गावकरी मंडळी देवळात येऊन गेली. गुरवाने येऊन पूजा केली बाप्पाची. सुंदर काळ्या कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती. देवळाच्या बांधकामातला साधेपणा मूर्तीत अजिब्बात नव्हता. दोन वेगळ्या काळात किंवा वेगळ्या शैलीत केले गेले असण्याची शक्यता नक्कीच वाटत होती. देवाच्या डोक्यातच प्रकाश पडावा अशी इच्छा असल्यासारखा बल्ब बरोबर देवाच्या डोक्याशी टांगत होता त्यामुळे आमच्या फोटुमधे जरा जास्तच उजेड पडला. :) 


देऊळ कधीचं, किती वर्षं जुनं असं एकदोघांना विचारलं तर त्यांनी केवळ स्मितहास्यानेच उत्तर दिलं. गुरवनानांना विचारलं तर 'जुना आसां.' असं उत्तर मिळालं. मग दोन बाइकवीर आले. गावातलेच असावेत असं वाटत होतं. थाटमाटावरून गावच्या राजकारणात प्रवेश करत होत्साते वाटत होते. त्यांना देऊळ किती जुनं असं विचारलं असतं तर नक्की 'पांडवकालीन' असं उत्तर मिळालं असतं.
त्यांना आम्ही काही विचारायला गेलो नाही तरी तेच आले आम्हाला विचारायला.
'काल संध्याकाळी पण गाडी पाह्यली. काय विशेष? कुठून आलात? मुंबईला कुठे असता? काय करता?'
शूटींगच्या तयारीसाठी आलोय कळल्यावर प्रश्नांचा टोन बदलला. संशय कमी झाला.
'हे जुनं झालंय देऊळ. पार मोडायला आलंय. आता जीर्णोद्धार समिती झालीये स्थापन. लवकरच जीर्णोद्धार होणार देवळाचा! मग तेव्हा शूटींग घ्या तुम्ही. एकदम सुंदर असेल देऊळ.'
असा मोलाचा सल्ला देऊन ते बाइकवीर निघून गेले.
जीर्णोद्धार हा शब्द ऐकून जरा काळजाचा ठोका चुकल्यासारखंच झालं. चिर्‍याचे खांब दिसेनासे होऊन सिमेंटचे खांब येणार. त्याला ठराविक निळे, पिस्ता, गुलाबी, पिवळे ऑइलपेंट फासले जाणार. शेणाच्या जमिनीऐवजी घसरवणार्‍या चकचकीत फरश्या येणार. सिमेंटची स्लॅब येणार. देऊळ वाटावं म्हणून त्याला उगाच बिर्ला टाइपच्या महिरपी येणार आणि कोकणातल्या मंदीर वास्तुकलेचा अजून एक नमुना धारातीर्थी पडणार.
त्यात समितीतल्या कोणीतरी पैसे खाल्ले तर हे सगळंच काम तकलादू होणार आणि २-४ वर्षातच देवळाला पूर्ण अवकळा येणार. वाईट वाटलं खूप.
परत ३-४ महिन्यांनी कामासाठी त्या भागात जाणं झालं तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला नसल्याचं कळलं आणि आम्ही थोडं हुश्श केलं. देवळाकडे चक्कर मारली. आज देवळातली वर्दळ वाढलेली होती. पताका होत्या देवळात लावलेल्या.


गावकर्‍यांशी थोडी प्रश्नोत्तरे झाली. 'मायनिंगवाले नाही. शूटींगवाले आसंत' कळल्यावर लोकांना हुश्श झालं. जीर्णोद्धाराचा विषय निघाला. देवळाच्या सद्य वास्तूकलेचे सौंदर्य आम्ही नावाजत होतो. हे सौंदर्य असंच जपून जीर्णोद्धार केला जाऊ शकतो. असे आर्किटेक्ट लोक आहेत असं काय काय आम्ही आपल्या परीने सांगितलं. हसर्‍या आणि कीवयुक्त चेहर्‍यांनी त्यांनी ते ऐकून घेतलं. याहून आम्ही काय करणार होतो कुणास ठाऊक.
पर्वाच मैत्रिणीचा झारापहून फोन आला. नानेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होतोय लवकरच. येत्या महिन्याभरात आलात तर बघायला मिळेल पूर्वीचं मंदीर. मग नाही. अशी बातमी तिने दिली. नाणेली गावाशी माझा तसा काहीच संबंध नसतानाही किंचित अस्वस्थ व्हायला झालंच.
जीर्णोद्धार आणि सौंदर्यदृष्टी यांचा एकमेकांशी संबंध का नसतो? चकचकीत ऑइलपेंटस, गुळगुळीत टाइल्स जमिनीला याच गोष्टीत सौंदर्य भरून राह्यलंय हे कुठे शिकवलं जातं? जुन्या प्रकारचं बांधकाम, जुन्या प्रकारचं अमुक तमुक हे काळाबरोबर लयाला जाणार हे मान्यच पण म्हणून कोणी ताजमहाल नव्याने बांधत नाही ना सिमेंट, ऑइलपेंट, टाइल्स लावून जीर्णोद्धाराच्या नावाखाली की कोणी रेम्ब्राँच्या पेंटींगवर परत नवीन पद्धतीने रंग मारत नाही लेटेस्ट स्टाइल म्हणून. आपली देवळं ही जरी जगातली आश्चर्यं किंवा मास्टरपीसेस नसली तरी त्या त्या वास्तूकलेचा नमुना आहेतच ना. त्या सगळ्या खुणा पारच पुसल्या जाऊन हे असं का आणि कसं होतं?
नानेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होणार आहे याबद्दल मला अजूनतरी कल्पना नाही. तोपर्यंत 'सुखद धक्काच द्या हो बाप्पा!' अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे नाही का? :) 
- नीरजा पटवर्धन

Sunday, July 24, 2011

For here or to go?







बरेच दिवसांपासून वाचेन म्हणत होते ते शेवटी काल संपवलं वाचून.

इथे लिहितेय म्हणजे पुस्तक खूप महत्वाचं वाटतंय मला असं काही नाही. रादर अजिबातच नाही वाटत म्हणून हा प्रपंच.  तुम्ही स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल अन्यथा शक्यता कमी.

लेखिकेने केलेल्या मेहनतीचे कौतुक. ३०-४० वर्षांच्याही बरंच आधी अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांच्या अजिबात माहित नसलेल्या कहाण्या आणि त्यांची पाय रोवायची धडपड याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती खरंच इंटरेस्टिंग आहे. इथे माझ्यादृष्टीने या पुस्तकाचे प्लस पॉइंटस संपले.

पुस्तकात अमेरिकेबद्दल वाईट लिहिले हो म्हणून ज्यांच्याबद्दल रडले गेलेय त्या रमेश मंत्री, सुभाष भेण्डे आणि बाळ सामंत यांचंही काही वाचलं नाही. रमेश मंत्री आणि सुभाष भेण्डे दोघांची अमेरिकेबद्दलची जी पुस्तकं होती त्याची मुखपृष्ठ आवाज-जत्रा टाइपची चावट असल्याचं आठवतंय (हा समजुतीचा घोटाळा असू शकतो) त्यावरून त्या पुस्तकांना हात लावायची गरज वाटली नाही. अमेरिकेतील सर्वांनी ह्या लेखकांना सिरीयसली घेऊन फार दु:ख करून घेतले हे लेखिकेचे म्हणणे थोडे जास्त बढाचढाकेच वाटते.

एकुणात रिपिटेशन प्रचंड आहे. काही अंशी भारतात राह्यलेल्यांना धडा शिकवायला अधोरेखित केलेले मुद्दे असल्यासारखे वाटले.

३०-४० वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या पिढीच्या धाडसाबद्दल जे लिहिलेय त्याचे कौतुक आहे निश्चित पण ज्यांच्यात धाडस होते ते अमेरिकेत गेले आणि ज्यांच्यात धाडस नव्हतं ते भारतात राहून नुसतेच टोमणे मारत राह्यले अश्या प्रकारचे ठोकताळे पटले नाहीत. त्या बाबतीत हे पुस्तक प्रचंड एकांगी होते.

काही मुद्दे तर अगदी डोक्यात जाणारे. देशात आल्यावर हक्काने उकडीचे मोदक खायला आत्याकडे जायचं असेल तर आत्याने मुलीसाठी स्थळ बघ म्हणलेलं का खटकावं बुवा? किंवा तिने विकतचे मोदक वाढले तर आत्यापण आता थकलीये आणि काळ बदललाय याची जाणीव न होता हृदय का भळभळावं?
एकुणातच भारतात महिन्याभराच्या सुट्टीसाठी आल्यावर झालेल्या बदलांनी केलेले अपेक्षाभंग फारसे पचनी न पडलेले सगळ्या अनुभवांच्यात लक्षात येतं. पण भारतातल्या आपल्या घरांमधे बदल होणारच यातली अपरिहार्यता का कळत नाही? किंवा का समजून घेता आली नाही? ते बदल म्हणजे जखम असल्यासारखं उराशी का बाळगलं गेलं हा प्रश्न सतत पडत होता. भारतात आल्यावर सतत प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आमच्याकडे असं नाहीये असं म्हणण्याबद्दल 'आपल्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून खरी परिस्थिती लपवली' हे जरा जास्तच उगाच सारवासारव केल्यासारखं होतं. नाहीच पटलं. इथल्यांच्या प्रत्येक कुजक्या शेर्‍याटोमण्यांनी घायाळ होणार्‍यांना आपल्याकडून असे शेरेटोमणे जात नाहीयेत ना याचं भान का उरलं नाही म्हणे?

मात्र यासंदर्भात अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन एकदम रिफ्रेशिंग आणि जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी.

शेवटाला येताना इकडचे-तिकडचे हा वाद संपवायच्या गोष्टी करत करत लेखिका परत इकडचे-तिकडचेची पाचर मारूनच ठेवते.

एकुणात ठराविक अजेंड्यासाठी 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.

ज्यांनी वाचले नसेल त्यांनी नाही वाचले तरी आयुष्यात काही बिघडणार नाही. अर्थात भेळेचा कागदही वाचून काढण्याइतके वाचन अंगी मुरले असेल तर घ्या बापडे...

- नी

Thursday, July 21, 2011

संस्कार १ - येतोच... आलोच...

अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.
आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते.
खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय.
असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक.
गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या).

आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं.
तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला.
आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्‍याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच.
दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?
हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?
-------------------------
संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.


- नी

Friday, May 20, 2011

एकदा दुपारी!

"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.

इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता.

"अति झालंय हं तुझं आता!"
"बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू."
"शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!"
असे आणि या अर्थाचे संवाद अधून मधून आईबाबांच्याकडून येत होते. छोटुकल्याला काय करावं सुचत नव्हतं. आईच्या हाताला धरून चालत जाणं एवढंच तो करत होता. मधेच दादाकडे नजर टाकत होता. छोटुकल्याचा दादा मात्र कळवळून रडत ओरडत होता.

'सगळे नियम गेले खड्ड्यात, इतका कळवळतोय तो 'शू लागली' म्हणून. मुलगाच आहे. लहानही आहे. जाउदेत त्याला त्या बाजूच्या कचरापेटीच्या इथे.' असं भोचकपणे सांगायची जाम इच्छा झाली होती मला.
तेवढ्यात गल्ली वळली आणि मी वळताना मला त्या आईचा चेहराही दिसला. असेल माझ्याच आसपासच्या वयाची. जे काय चाललंय त्याची प्रचंड शरम, दु:ख, राग सगळंच होतं तिच्या चेहर्‍यावर. बाबाच्या चेहर्‍यावर पण वेगळं काही नव्हतंच.

मग लक्षात आलं मुलाला चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी 'शू लागली' यासंदर्भाने हे सगळं घडत नव्हतंच. जे काय होतं ते बरंच काही आत खोलवर होतं. मुलाला कदाचित खरंच शू लागलेलीही नव्हती. काहीतरी झालं होतं आणि 'शू होतीये' असं रडून ओरडून मुलगा आपला संताप, हतबल होणं सगळंच व्यक्त करत होता. बोर्डींगचा धाक, थोडंफार दुर्लक्ष अशी कुठलीतरी हत्यारं वापरून आईबाबाही तेच सगळं व्यक्त करत होते. कुठेतरी कुणीतरी चुकलं होतं नक्कीच. आईबापांना दोष द्यावा असं वाटलं नाही कारण मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते. आणि नक्कीच मुलाचा छळ करण्याइतके निर्दय वाटत नव्हते. मुलगा रस्त्यात लाज काढतोय या रागापेक्षा आपण कमी पडतोय याची शरम त्यांच्या चेहर्‍यावर सहज दिसत होती.

पुढे मी रिक्शा पकडली आणि जिथे पोचायचं होतं तिकडे निघाले. पुढे काय झालं माहित नाही. मी मदत काही केली नाही/ करू शकले नाही. मदत काय करणार होते म्हणा. त्यांच्या कुटुंबात जो काय प्रश्न असेल तो मी तिथे मधे पडून सोडवू शकणार नाहीये हे मला पक्कं उमजलं होतं. आणि बाहेरच्या माणसाने असे नाक खुपसून त्यांना अजून लाजिरवाणं वाटायला लावणं हे काही माणुसकीला धरून वाटत नव्हतं.

मी जरी तिथे काहीच केलं नाही तरी गेला आठवडाभर या एका प्रसंगाला धरून कहाण्याच्या कहाण्या माझ्या मेंदूने विणल्या. अजूनही तो प्रसंग डोक्यातून जात नाही. फुगा घ्यायला नाही म्हणाल्यावर रस्ताभर जोरात भोकाड पसरून आईबाबांना कानकोंडं केल्याच्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी असतीलच. त्याने आपल्या आयुष्यावर परिणाम नाही झाला काही. तशीच ही घटना ठरो अशी आशा करणंच उरतं आपल्याकडे.
पण तरी ही गल्ली चांगलीच लक्षात राहील माझ्या आणि हे कुटुंबही.

- नी

Search This Blog