Tuesday, June 13, 2017

पावसाच्या गोष्टी - २

वर्गामधे गणवेश न घालता बसणे यात कसली भारी गंमत आहे. पावसातच ते शक्य आहे.
एरवी शाळेत जाणं म्हणजे वाटेत इतक्या मैत्रिणींची घरं. आपली त्यांची वेळ जुळली तर आपण तिथून जात असताना त्या भेटणार. मग गप्पा मारत मारत, तुळशीबागेच्या गल्लीतले मांडलेले खजिने बघत बघत शाळेत पोचायचं यात केवढी मज्जा आहे. आख्ख्या दिवसातली धमाल त्या गप्पांच्यात आहे. पण पावसामधे शाळेत जाणं हा वैताग असतो.
पावसाळ्यात खांद्यावर दप्तर आणि वरून रेनकोट असं माकड बनून या गर्दीच्या गल्ल्यांमधून जायचं हे जरा कंटाळवाणेच. बाजीराव रोडवरून गेलं तरी दप्तरावरून रेनकोट घातल्यामुळे रेनकोटला गळ्याजवळ ही मोठी भेग. त्यातून टिप टिप पाणी आतमधे. दप्तरामुळे तो रेनकोट पुढून दुभंगून वर उचलला गेलेला. त्यात बराचसा स्कर्ट भिजलेला.
रस्त्याला साचलेले, समोरच्याच्या फटक फटक चपलांमुळे आपल्यावर उडणारे पाणी आणि चिखल.
हे असं ध्यान शाळेत पोचणार. वर्गातल्या सर्व खिडक्यांची तावदाने मुलींच्या टांगलेल्या रेनकोटसनी भरून जाणार.
सायकलवरून येणार्‍या मुली, बसने छत्री घेऊन येणार्‍या मुली, रिक्षाने येणार्‍या मुली आणि आमच्यासारख्या चालत येणार्‍या मुली सगळ्या भिजलेल्या. मध्यमवर्गीय शाळा त्यामुळे पावसापायी घरून कुणी गाडीने सोडायला येणे वगैरे प्रकार तसे दुर्मिळच. त्यात लक्ष्मी रोड. त्यामुळे पावसातही न भिजता येणार्‍या मुली नाहीतच. कितीही चिकचिक असली तरी पावसात न भिजता असण्याची कल्पनाही तशी नामंजूर करण्यासारखीच.
खूप भिजून गेल्यावर त्या शंभर (किंवा कमीही) वर्ष जुन्या दगडी इमारतीत बसायचे. थंडीने कुडकुडणे अपरिहार्य.
पण कसल्या कस्ल्या प्रॅक्टिसेससाठी थांबणार्‍या बालिकेकडे खेळासाठी शॉर्टस आणि टिशर्ट असणारच. अतिच भिजल्यावर शाळेचा स्कर्ट ब्लाऊज काढून वर्गात शॉर्टस आणि टिशर्ट घालून बसायचं. आख्ख्या पावसाळ्यातला तो गणवेशविरहीत शाळेचा दिवस बालिकेसाठी जाम मजेचा. त्यादिवशी गणवेश न घालूनही वर्तनपत्रिकेवर तारीख नाही पडायची.
पाऊस असा तेव्हापासून आवडतो तिला..

- नी

0 comments:

Search This Blog