जरा तपेलीभर पाऊस पडला की भक्क असा आवाज येऊन दिवे जात. प्रमोदबनमधे राहणारी काही मंडळी आपापल्या गॅलर्यांमधे रस्त्यावरून येणारे जाणारे लोक बघत. घरामधे मेणबत्त्या, गॅसच्या बत्त्या वगैरे. समोर डावीकडे कामवाल्यांची वस्ती. तिथली सगळी पोरंटोरं वस्तीच्या बाहेर येऊन पारेकर टेलरच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर. पारेकरचं दुकान वस्तीत नाही. वस्तीला लागून असलेल्या दुमजली चाळीत. चाळीत ज्यांची घरे रस्त्याकडे तोंड करून तेही सर्व आपापल्या गॅलर्यांमधे. तिन्ही ठिकाणच्या समवयस्क जनतेमधे रस्त्याच्या आरपार गप्पा चालत. विशेषत: कॉलेजातल्या दादा ताई जनतेत. त्या गप्पाटप्पांचे प्रमोदबनमधल्या बालिकेस कोण कौतुक. पण ते ऐकायला घराच्या गॅलरीमधे उभे राहू न देता तिची आई तिला संध्याकाळचा परवचा म्हणायला लावायची. पाढे म्हणायला बस म्हणायची. एरवीही अभ्यासाचा कंटाळा असलेली ती मेणबत्तीच्या उजेडात हात धरून भिंतीवरच्या सावल्यांचे खेळ करत बसायची.
मग थोड्या वेळाने कुठून तरी ’आले आले...’ असा पुकारा अंधुकसा ऐकू यायला लागायचा. आवाज बदलत बदलत तो पुकारा प्रमोदबनमधून सुरू व्हायचा आणि तेव्हाच परत भक्क आवाज होऊन घरातले दिवे लागायचे.
गॅलर्यांतली मंडळी आपापल्या घरात परत. पाच दहा मिनिटात ज्यांच्या घरी टिव्ही आहे त्यांच्या घरून टिव्हीचे आवाज सुरू व्हायचे, काहींच्या घरचे रेडिओ सुरू व्हायचे. कुणाच्या घरच्या कुकरच्या शिट्ट्या, ताटं घेतल्याचे आवाज, कुणाच्या घरातलं भांडण, कुठून तरी हास्यविनोद असं सगळं कानावर यायचं.
जवळपासच्या वस्तीतला आप्पा वेगळ्या पातळीला पोचून रस्त्याच्या मधे बसून कुणाकुणाला शिव्या देत देत अभंग म्हणू लागायचा.
’ही रोजचीच संध्याकाळ, रात्र!’ जग आश्वस्त, निर्धास्त आणि सैलावलेलं.
0 comments:
Post a Comment