"या 'नदी वाहते' मधे गावासारखं गाव दिसतंय, माणसासारखी माणसं दिसतायत मग बाई तुम्ही प्रॉडक्शन
डिझायनर म्हणून केलंत तरी काय?"
असा प्रश्न विचारला कुणी तर प्रश्नातच उत्तराचा
एक महत्वाचा भाग लपलेला आहे असं सांगता येईल. प्रश्नाचा रोख उपरोधिक नसेल तर तिथून
चर्चाही सुरू होईल. गावासारखं गाव दिसणं, माणसांसारखी माणसं दिसणं, परत ते
केल्यासारखं न दिसता आपसूक दिसणं आणि त्यामुळेच ते खरं वाटणं हे कुठल्याही
वास्तवतावादी चित्रपटासाठी गरजेचं असतं. त्याचबरोबर आशयाची, विषयाशी आणि
दिग्दर्शकाच्या दृष्टीशी मेळ खाणारे असे चित्रपटाचे चित्र दिसणे हे ही गरजेचे
असते. ते सगळे तसे जमले तर डिझायनिंग केलेले वेगळे दिसत नाही आणि मग डिझायनर
म्हणून केलंत तरी काय? असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. तेच कसं नि काय केलं याची
कथा सांगतेय आज.
संदीपचा (लेखक व दिग्दर्शक: संदीप सावंत) पटकथेसाठीचा
रिसर्च एका टप्प्यापर्यंत आल्यावर, पटकथेचा एक आराखडा तयार झाल्यावर ही कथा
सह्याद्रीच्या पायथ्याच्या कोकणात घडते हे त्याने नक्की केले होते. सह्याद्रीच्या
पायथ्याचा म्हणजे कोकणातल्या पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्रीत उगम पावून जिथे
उतरतात तो भाग. कथेतली नदी ही सुद्धा एक पश्चिमवाहिनी छोटी नदी असणार होती.
सह्याद्रीत उगम पावून कोकणपट्ट्याला छेदून अरबी समुद्राला जाऊन मिळणारी
पश्चिमवाहिनी.
या टप्प्याला माझे प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम
सुरू झाले. हा संपूर्ण भूभाग समजून घेणे, ओळखीचा करून घेणे ही पहिली पायरी होती. माझी
पाटी पूर्ण कोरी करून या सगळ्या जगाला भिडायचं होतं मला.
नक्की कसा असतो सह्याद्रीच्या पायथ्याचा भाग?
नदी म्हणजे काय असते नक्की? कसा कसा असतो नदीचा काठ? छोटी नदी कशी असते? छोटी
म्हणजे किती छोटी आणि मोठी म्हणजे किती मोठी नदी? काय रंग असतात इथले? कुठल्या
ऋतूत कुठले रंग दिसतात? कुठली पिकं असतात? कुठली झाडं असतात? कसली फुलं येतात?
कुठल्या भाज्या खाल्ल्या जातात? सणवार, उत्सव कसे साजरे होतात? काय असतो माहौल
तेव्हाचा? घरांचे रंग कसे असतात? देवळांचे कसे असतात? शाळांचे रंग कोणते? नदीतले
कातळ कसे दिसतात? कुठल्या वेळेला किती पाणी असतं? कुठल्या वेळेला पाण्याचा रंग काय
असतो? उगमापासून किती अंतरावर कसा असतो ओघ नदीचा? कसा असतो काठ? ऋतूंप्रमाणे
सगळ्या आसमंताचा पोत कसा बदलतो? पावसाळ्यात सगळ्यावर ग्रे वॉश दिल्यासारखा दिसतो
तर डिसेंबरात सगळं काही आखीव रेखीव दिसतं, एप्रिलमधे पिवळट तपकिरी गवती रंगाचे
साम्राज्य. कसं वाटतं प्रत्येक ऋतूत, नद्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी?
अश्या असंख्य गोष्टी समजून घेत, नोंदी करत फिरणे
चालू होते. हजारो फोटोग्राफ्स जमत होते. रंग, पोत, आणि बाकीच्या सगळ्या
मुद्द्यांना घेऊन उगमापासून समुद्रापर्यंत नदी आणि आसपासच्या परिसर वेगवेगळा
दिसतो. नदीची रूपे वेगळी दिसतात. त्याबद्दलच्या नोंदी करून घेतल्या. भरपूर
वेगवेगळ्या लोकेशन्सची यादी जमा झाली होती.
हा झाला अभ्यास. पण वास्तवतावादी सिनेमामधेही दृश्याची
सिनेमाभर एकसंधता/ एकवाक्यता साधायची तर पूर्ण सिनेमाची एक दृश्य संकल्पना हवी.
रंग, पोत, मूड, अनुभव सगळ्याच पातळ्यांवर एक चौकट हवी ज्याच्या आतमधे संपूर्ण
चित्र असायला हवे. नदी वाचवायची आहे, प्रेक्षकांनाही ती वाचवावीशी वाटली पाहिजे. काय वाचवायचंय नक्की आणि का हे प्रसंगांतून येईलच पण त्या आधी दृश्यातून दिसले पाहिजे.
नदी आणि निसर्गाचे सौंदर्य आहेच मात्र ते लॅण्डस्केप पोस्टर्सवर असते तसे गुळगुळीत
खोटे दाखवायचे नाहीये. नदीचे कधी गूढ दिसणे, कधी थोडेसे भितीदायक, कधी पोटात खूप काही
साठवून ठेवलेलं शांत रूप हे ही दाखवायचं होतं. नदी म्हणजे काय हे पोचवण्यासाठी हे गरजेचं
होतं. खर्यासारखे असले पाहिजे, साधेपणा हवा, विनाकारण
गुळगुळीतपणा वा चकचकाट नको आणि तरीही एक काव्यात्म अनुभव देता येणे अशी ती चौकट
आखून घेतली.
हे सगळं कॅमेर्यासमोर उभं करायचं तर
त्याला काहीतरी एक सूत्र हवे. आणि त्या सूत्रानुसार आहे त्या निसर्गातून,
गावांतून, घरांतून सिनेमातले गाव, नदी, निसर्ग चितारायला हवे. त्यासाठी सिनेमातल्या
नदीचे म्हणजे अंतीचे आणि तिच्या परिसराचे उगमापासून समुद्रापर्यंत असे भाग केले. एक काल्पनिक
नकाशा. त्या भागाचे ऋतूनुसार रंग, पोत वगैरे ठरवून घेतले झालेल्या अभ्यासातून.
नकाशातल्या भागांप्रमाणे यादीतल्या सगळ्या लोकेशन्सची परत वर्गवारी केली गेली.
हा सिनेमा नदीबद्दल आणि नदीच्या माणसांबद्दल. मग
नदीच्या अनुषंगाने या नकाशामधे प्रत्येक महत्वाच्या पात्राचे स्थान म्हणजे घराची
जागा, कामकाजाची जाग, नेहमी जायच्या जागा आणि नेहमीचा प्रवास इत्यादी निश्चित
करण्यात आले.
अंतीचा नकाशा |
पटकथेत घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग
यांचेही या नकाशाप्रमाणे वर्गीकरण केले. घटनेमधे असलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे
नदीच्या संदर्भाने असलेले स्थान यांचाही विचार केला गेला.
तसेच त्या त्या स्थानाचे आणि व्यक्तिरेखेचे नाते
हे ही महत्वाचे होतेच. म्हणजे उदाहरणार्थ अनघाच्या घराची जागा आणि निसर्ग हा एक
भाग झाला. दुसरा भाग म्हणजे अनघा आणि तिची आई या दोघी कसं राखतील ते घर? काय काय
उद्योग असतील तिथे. भाजीच्या जुड्या बांधणे, आमसुलाच्या पिशव्या बांधणे, शेती,
गाईचा गोठा या सगळ्या गोष्टी असतीलच. घर जुने असणार. सिमेंटचे, स्लॅबचे घर बांधून
चकचकीत करण्याच्या मागे लागण्याचा या दोघींचा स्वभाव नाही. अनघाची स्वत:ची एक जागा
असणार तिथे जी घराची छोटी माडी असेल. तर आप्पा नाईक सारख्या माणसाला शहराची ओढ
आहे, शहरी चकचकाट हवा आहे. गावात असलो तरी शहरी लोकांसारखेच ’सुधारलेले’ आहोत हे
दाखवायचा सोस आहे त्यामुळे पारंपरिक घर मोडून कधीच त्याने शहरी प्रकारचा बंगला
बांधलेला असणार. जराशी भडक आणि डोळ्यात भरणारी रंगसंगती हे त्या बंगल्याचे मुख्य
वैशिष्ट्य असणार.
अर्थातच जशीच्या तशी घरे, जागा मिळणार
नव्हत्याच. अनघाचे घर आणि नाईकचे घर दोन्हीही त्या त्या व्यक्तिरेखांशी मेळ खातील
आणि संकल्पनेच्या चौकटीच्या आत असतील अश्या प्रकारे रंगवून घेतली. किती
वर्षांपूर्वी या घरांचे रंग केले असतील याचा विचार करून ते नव्याने रंगवताना तेवढे
जुनेही करून घेतले.
यानंतर प्रत्येक प्रसंगांसाठी अनुरूप लोकेशन्सची
यादी करून मग कॅमेर्याच्या दृष्टीने सोय गैरसोय यांचा विचार करण्यात आला.
अजून एक महत्वाची गोष्ट ठरवलेली होती ती म्हणजे
प्रॉपर्टी किंवा छोट्या मोठ्या वस्तू. गावातले घर म्हणले की काही ठराविक गोष्टी
असायलाच पाहिजेत, दिसायलाच पाहिजेत आणि काही ठराविक गोष्टी नसायलाच पाहिजेत असा
बरेच सिनेमे बघून आपला ग्रह झालेला असतो. हे असले कुठलेही ग्रह मनावर घ्यायचे
नाहीत. जे आजूबाजूला दिसतंय त्याचाच विचार करायचा हे नक्की ठरवलं. फ्रेम रिकामी
आहे म्हणून भर प्रॉपर्टी, डेफ्थ ऑफ फिल्डसाठी घे आणि भर कुठलीही प्रॉपर्टी हे
टाळलं. एकही वस्तू फ्रेममधे उगाच सजवून ठेवायची नाहीये, अस्थानी वाटण्यासारखी एकही
वस्तू फ्रेममधे असता कामा नये हे फार काटेकोरपणे पाळले. निसर्गदृश्यांमधे तर अजून
काटेकोरपणे या गोष्टी केल्या. उगाचच जास्तीच्या फांद्या फ्रेममधे आणून ठेवणे,
सौंदर्य वाढवायला काहीच संबंध नसलेले फूल खोचून ठेवणे वगैरे गोष्टी टाळल्या.
या सगळ्यात एक वेगळे असणारे प्रकरण होते तो
म्हणजे प्रोजेक्ट हेडच्या बंगल्यात ठेवलेले धरणाचे मॉडेल. एकूण केवळ तीन
प्रसंगांमधे दिसणारी ही वस्तू. पण तरीही तिचे जसे हवे तसेच असणे हे फार महत्वाचे
होते. खर्यासारखे दिसेल पण तरी खरोखरीचे नाही, मॉडेल आहे हे स्पष्ट कळेल असे हे
प्रकरण हवे होते. यामधे धरणाची भिंत वर येणे, वाहती नदी असणे, जी वर आलेल्या
धरणाच्या भिंतीने अडवली जाणे आणि मग मागे पाणी साठणे गरजेचे होते. जेव्हा धरण
बांधायचे ठरते तेव्हा त्यासंदर्भाने काही छोटेखानी मॉडेल्स तयार करून त्यातून पाणी
खेळवले जाते, अडवले जाते वगैरे. पाणी साठवण्याची क्षमता, पाण्याचा जोर आणि भिंतीची
ताकद आणि अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही मॉडेल्स केली जातात. माझ्या
बालमैत्रिणीचे वडील श्री प्रमोद देवळालीकर यांची ही सगळी माहिती मिळण्यासाठी मदत
झाली. प्रत्यक्ष जिथे धरण बांधायचे त्या परिसराची काटेकोर मापे घेऊन त्याचे मिनिएचर
मॉडेल तयार केले जाते. हे मॉडेल टू द स्केल म्हणजे खर्या मापांचेच प्रमाण असलेले
असते. दिसायला मात्र यात नोंदी नीट करता याव्यात यासाठी वेगवेगळे रंग लावलेले
असतात. दिसताना ते अजिबात खर्यासारखे नसते. तसेच मॉडेल असले तरी शेकडो एकरचे
असल्याने त्याची व्याप्ती साताठशे स्क्वेअरफुटाचीही असू शकते.
आम्हाला अर्थातच याचा उपयोग नव्हता. आमचे
संपूर्ण मॉडेल ३ फूट गुणिले ४ फूट एवढ्या टेबलावरच असायला हवे होते. आम्हाला दिसायला
हवे असलेले तपशील, टेबलाचा आकार आणि परिसराचा आम्हाला अपेक्षित असलेला पसारा बघता
’टू द स्केल’ मॉडेलमधून काहीही निष्पन्न झाले नसते. त्यामुळे स्केल/ प्रमाण थोडे
मागेपुढे करून मॉडेल बनवायचे ठरले. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची तपशीलवार माहिती
होईल अशी मिनिएचर मॉडेल्स बनवणारे श्री राजू टिपरे आणि शिल्पकार श्री दिपक थोपटे
दोघांनीही ही जबाबदारी उचलली. दिलेल्या फोटोंमधून आणि अनेक प्रयोगांच्यातून आमची
अंती आणि तिच्या परिसराची छोटेखानी प्रतिकृती तयार झाली. पाणी वाहणे, धरणाची भिंत
वर येणे वगैरे सर्वच गोष्टी त्यात घडवून आणल्या.
क्ले मॉडेल तयार होताना |
क्ले मॉडेल |
पहिल्यांदा पाणी अडवले |
शूटींगच्या वेळेस |
अंतीचा परिसर |
धरणाचे मॉडेल ही एक गोष्ट. अश्या अनेक बारीक
सारीक गोष्टी पूर्ण चित्रपटामधे जेमतेम दिसून जातात. अश्या
सगळ्या छोट्यामोठ्या गोष्टींना एकत्र घेऊन तोल सांभाळण्याची ही प्रॉडक्शन
डिझायनिंगची प्रक्रिया. यातला अजून एक महत्वाचा भाग म्हणजे कपडे, मेकप वगैरे.
त्याबद्दल पुढच्या भागात सांगते.
तूर्तास ’बाई तुम्ही केलंत तरी काय?’ याचं हे एक उत्तर.- नी
2 comments:
nee, great work!
(this is pradnya9)
Thank you 9! :)
Post a Comment