जून महिना लग्नघाईचा असतो तिकडे. त्या सीझनसाठी घेतलेले गायकनट ते क्रू मधले सर्व विभागांचे लोक रांचवर असतात. रांच म्हणजे ऑपेरा रांच.
मुख्य गावाकडून उत्तरेला जायला जुना ताओस हायवे किंवा हायवे 285 पकडायचा. जात राहायचं, जात राहायचं मग एका ठिकाणी डावीकडे ऑपेरा ड्राइव्हवर शिरायचं. थोडा चढ आणि काही वळणे झाली की आपण डोंगरमाथ्यावर पोचतो. तिकडे उजव्या बाजूला आकाशात घुसलेली ऑपेरा हाऊसच्या छताची टोके आणि अडोब बांधकाम दिसते. मग गेट दिसते. पार्किंग लॉट दिसतो. हा सगळा ऑपेरा रांच.
तर या रांचवर जून महिना लग्नघाईचा असतो. जून अखेरीला शनिवारी रात्री सीझनचा पहिला ऑपेरा लोकांसाठी ओपन होणार असतो.
हातशिलाईचा अड्डा आता तोंड कमी आणि हात वेगात चालवताना दिसायला लागतो. गायकनट हाऊसच्या गेटमधून येताना दिसला की हातातल्या हेमिंगचा वेग वाढवून ते पूर्ण करायचे आणि मग तो ताजा ताजा गारमेंट पळत पळत ट्रायल रूममध्ये ठेवून यायचा. अश्याही गमती घडतात.
ऑपेराच्या स्टेजवर तालमी चालूच असतात. उत्कृष्ट गायकांचा कोरस, त्याहून उत्कृष्ट आणि अनुभवी गायक प्रिन्सिपल (प्रमुख भूमिका) गायला आणि त्याच तोडीचे उत्कृष्ट वादक. व्हायोलीन्स, व्हायोलाज, चेलो, कॉन्ट्राबास, बेसून, ओबो, trumpet आणि बासऱ्या अशी एकूण 20-25 वाद्ये. हे सगळे मिळून विविध प्रवेशांच्या तालमी होत. स्वर्गीय सूर आसमंतात भरून गेलेले असतात.
हे असं ऐकत ऐकत हातातले काम करायचे. आपल्याला शिवणकाम करायला सुकून मिळावा म्हणून हे सगळे प्रत्यक्ष गातायत अश्या रम्य कल्पना केल्या जायच्या. पण शेवटी कितीही सुंदर असलं तरी सवयीचं, परिचयाचं, शब्द कळतील असं, मस्त ठेका असलेलं असं संगीत नाहीच ते. हरवल्यासारखं व्हायचं. मग वॉकमन( ) बाहेर काढायचा. हेडफोन कानावर लावायचे. बरोबरच्या कॅसेटसपैकी एक आत ढकलायची. ओळखीच्या गाण्यांचा माहौल तयार करायचा आणि परत थिंबल चढवून हातशिलाईला भिडायचे.
0 comments:
Post a Comment