Saturday, August 6, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप 6 - पाऊस

 रिपरिप, संततधार, एका लयीत, सतत असा पाऊस पडत राहतो. पावसाच्या शेजारी बसून माझं काम चालू असतं. हाताने काहीतरी घडवण्याचं. पावसाच्या लयीवर डोक्यात शब्द, आठवणी, घटना, वाक्यांचे पुंजके आणि नुसतंच काहीतरी वाटणं - याला हिंदीत एहसास म्हणतात. मराठीत इतका सुंदर शब्द का नाहीये? - असं सगळं घरंगळत असतं.

मेंदूचा एक भाग हातातल्या वस्तूच्या घडत राहण्यावर लक्ष ठेवून असतो. बाकी भाग लयदार पावसाबरोबर मोकाट सुटलेला.
मग तो जाऊन पोचतो माझ्या प्रिय गावाला. प्रिय शब्दात मावतच नाही खरं तर माझं आणि त्या गावाचं नातं. पण सध्या प्रियच म्हणूया.
त्या प्रिय गावात डोंगरमाथ्यावर असलेल्या ऑपेरा रांचच्या कॉश्च्युम शॉपच्या डेकच्या बाजूच्या दाराबाहेर एक शेड आहे. तिथे बसून मी काम करते. कधी फॉलस्टाफच्या गाऊन्सना मॅचिंग होतील असे शूज रंगवणे, कधी लुचिया डी लमारमूरच्या कोरसचे स्पोरॅन बनवणे, कधी व्हीनस अँड अडोनिस साठी युरोपातून आलेल्या मास्कवर काम करणे असे काहीही असू शकते.
रांचवर प्रत्यक्ष ऑपेरा हाऊसमध्ये येण्याचा रस्ता या बॅकडेकवरूनच आहे. पुढच्या बाजूने फक्त प्रेक्षक येतात. बाकी सगळी यंत्रणा इथूनच येते. कोण आले कोण गेले मला सगळे दिसतात. पायऱ्यांवर बसलेला हातशिलाईचा अड्डा दिसतो. आता मी त्याचा भाग नसते. यावर्षी मी कॉश्च्युम क्राफ्टच्या टीममध्ये आलेली असते. एक प्रमुख, एक फर्स्ट हॅन्ड, एक असिस्टंट, एक अप्रेंटीस आणि गरजेप्रमाणे व्हॉलंटियर्स असा आमचा छोटा परीवार आहे. पण आमच्याकडे बरीच जादू घडत असते. पायापासून चेहऱ्यापर्यंत ज्या ज्या बारीक सारीक accessories (याला चांगला मराठी शब्द सुचवल्यास... ) असतात त्या इथे बनतात, दुरुस्त होतात, सजवल्या जातात. खऱ्या आयुष्यात ती वस्तू जशी आणि ज्या गोष्टीपासून बनते तसे इथे असेलच असे नसते. सोन्याचा पत्रा लावलेले चिलखत कॅनव्हासचे, चांदीचे स्पोरॅन पॉलिमर क्लेचे अशी सगळी गंमतजंमत असते.
तर ही सगळी कामे त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे हवेशीर जागी बसून करावी लागतात. अश्या तऱ्हेने बॅकडेकला लागून असलेली शेड माझी कर्मभूमी बनते. आणि मी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांवर नजर ठेवून काम करत राहते. अंगावर शंभर डाग पडलेला एप्रन, नाकावर रेस्पिरेटर, डोळ्यांवर सेफ्टी गॉगल्स, हातात वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळी केमिकल्स अडवणारे ग्लोव्ह्ज अश्या सगळ्या किंवा काही वस्तू असतात. त्यात मी गायब होऊन जाते.
काही गायकनट, काही डिझायनर्स, विविध शॉपमधली काही माणसे येताजाताना दिसली की त्या वाळवंटात, उन्हाळ्यात, डोंगरमाथ्यावर मस्त गार वाटतं. कधीकधी अशी माणसे बघायला म्हणून लुचियाचा कॉश्च्युम डिझायनर चार्ली माझ्या शेडमधल्या टेबलाशी जास्त रेंगाळतो. मग आम्ही कामाच्या चर्चेबरोबर येताजाता दिसणारे चटके आणि त्यांनी डोळ्याला दिलेला गारवा यांची प्रतवारी करतो, क्रम लावतो.
पण एखादा दिवस वेगळा असतो. चटका माणसे आणि त्यांचा गारवा खिजगणतीतही राहात नाही. डेकवरून दिसणारा आकाशाचा स्वच्छ पण तापता निळा, डोंगररांगांचा लालसर पिवळा, मधूनच उगवलेल्या खुरट्या झुडुपांचा हिरवा काळा, बॅकडेकच्या फरशीचा पिवळट राखाडी, ऑपेरा हाऊसच्या भिंतींचा अडोबी लाल, दूरवर दिसणाऱ्या कोलोरॅडो हायवेचा मळकट ग्रे, सगळ्यावर पडलेला भगभगीत उजेड असे सगळे वाळवंटाचे रंग बदलायला लागतात. आकाशात जांभळे, लाल, काळे रंग दिसायला लागतात. भिंतींचा अडोबी लाल सोडून सगळे रंग आपला स्वत्व सोडून ग्रे स्केलवर वेगवेगळ्या जागी जायला लागतात. मग सगळं आभाळ गच्च काळंजांभळं होतं. आणि दोन मिनिटात पावसाचा खेळ सुरू होतो. सर्व जग ग्रे झालेलं असतं.
माझ्या भारतीय मनाला पावसात भिजायची तहान लागते. अमेरिकन येड्यांना ही गोष्टच समजत नाही. मी मात्र हाताने काम करता करता मेंदूने सह्याद्रीत भिजत भिजत फिरून आलेली असते.
जशी आत्ता वसईत बसून सँटा फे ला फिरून आले!!

0 comments:

Search This Blog