व्हॅलेन्टाइन निमित्त लिहिलेले काही
वाचण्यात आलेल्या प्रेमाच्या गोष्टींमधे जिच्या गोष्टी जास्त खर्या, जास्त हाडामासाच्या आणि हे असे प्रेम जास्त शक्य आहे अश्या वाटल्या तिच्याबद्दल थोडेसे...
माझ्या टीनएज काळात आजूबाजूला अनेक ठरीव आणि कंटाळवाण्या गोष्टी होत्या. मुली स्वप्नांचे पतंग उडवू लागल्या तर ‘सासरी चालणार का पण?’ असला भिकारडा प्रश्न विचारून त्या स्वप्नांची वाट लावणे हे आपले परम कर्तव्य आहे असे अनेकांना वाटत असे. जे काय थोडेफार वाचन वगैरे करणारे लोक होते त्यांची झेप वपु काळे व तत्सम यापलीकडे जात नसे. हसरा समाधानी चेहरा, कामाला वाघ, पाहुण्यारावळ्यांना अर्ध्या रात्रीही चारी ठाव स्वंयपाक करून वाढेल अशी अधिक शयनेषु रंभा अशी एक स्त्री प्रतिमा आदर्श म्हणून प्रोजेक्ट केली जात असे. स्त्री वा पुरुष साहित्यिकांच्या लिखाणात प्रकर्षाने हेच दिसत असे. सिनेमांच्याबद्दल तर सांगण्यातही अर्थ नाही.
पण अश्या घट्ट कंटाळवाण्या माहौलमध्ये माझे घर जरा वेगळे होते. स्त्री, मिळून सार्याजणी, गौरी देशपांडे, आहे मनोहर तरी अश्या खिडक्यांच्यातून आलेल्या वेगळ्या वार्यांचे माझ्या घरी स्वागत होते. आजूबाजूच्या वातावरणातून दिसणार्या आयुष्याबद्दलच्या, स्त्री-पुरूष नात्याबद्दलच्या ज्या टिपिकल शक्यता समोर होत्या त्यांच्यापलीकडे अनेक शक्यता आहेत जगण्याच्या हे भान येण्यासाठी गौरी देशपांड्यांच्या लिखाणाचा मला उपयोग झाला. आजूबाजूचे वातावरण ज्या बावळट चौकटी घट्ट ठोकून बसवू पाहात होते ते नाकारले तरी बाई ही बाई असतेच आणि खरी व चांगलीही असू शकते हे तिने सांगितले मला. यासाठी ती मला महत्वाची आहे, आवडते हे म्हणायला लाज नाही वाटत मला. माझ्या अनेक मैत्रिणींना लग्नाचे रूखवत, हरतालिकेची पूजा एकत्र करणे ही लाडकी अॅक्टिव्हिटी वाटत असे. मला त्यावर आलेलाकंटाळा हे माझ्या वाया गेलेपणाचे प्रतिक होते. जीन्स घातल्यावर कपाळाला टिकली नाही म्हणून टिकलीचे पाकीट विकत घेऊन देऊन "आपण हिंदू आहोत.." वगैरे लेक्चर झोडणारे आचार्य लोक माझ्या मित्रमंडळात होते. माझ्या शाळेतल्या अनेक शिक्षिकांना आजही आमच्या शाळेच्या मुली घराला पहिलं महत्व देतात याचं कौतुक आहे.
या सगळ्यात माझी टिनेज/ कॉलेजची वर्षे तिच्या लिखाणाचा मला आधार मिळाला. परंपरा, संस्कृती वगैरेचे फास मी स्वतःला बसू दिले नाहीत ते तिच्यामुळे. ती परीपूर्ण लेखिका वगैरे आहे किंवा नाही हा मुद्दाच नाही. आज तिचे वाचल्यावर ती मला तशीच आवडेल, पचेल, पटेल का हे माहिती नाही. ती महत्वाची लेखिका होती हे नक्की.
तिच्या साहित्यिक महत्वाला छाटून कमी करण्यासाठी कीबोर्ड सरसावून अनेकांनी बरीच विधाने नुकतीच केली होती फेबुवर. अमिताभ बच्चन ला मिळालेली प्रसिद्धी आणि गौरीला मिळालेले फॉलोइंग एकाच प्रतीचे, गौरीच्या व्यक्तिमत्वामुळे तिचा साहित्यिक बोलबाला झाला असले काहीही तर्क वाचले. हे तर्क करणारे सगळे पुरुष आहेत ही एक वेगळी गंमत. हाडामासाची नायिका विथ ऑल हर फॉलीज आणि पुरुषी इगोला फारशी भीक न घालणारी हे अजूनही किती जणांना दुखते आहे हे बघून मजा वाटली.
- नी
0 comments:
Post a Comment