सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही पांडुरंग येणार भेटीला.
मला त्या आवाजातच पांडुरंग भेटून गेल्यासारखं वाटलं.
स्वैपाकातले हात थबकले. ते अप्रतिम स्वरब्रह्म शक्य तितकं पिऊन घ्यावं म्हणून मी क्षणभर स्तब्ध झाले. ऐकत राह्यले.
आता लक्षात आलं ही रेकॉर्ड नाहीये. कुणीतरी खरंच गातंय.
मी खिडकीकडे धावले.
खाली रस्त्यावर ५-६ वारकर्यांचा जथा चालला होता. पेटी किंवा पखवाज गळ्यात बांधलेला, एकिकडे वाद्य वाजवणं आणि एकिकडे गाणं असं ते रस्त्यावरून चालत होते.
जथा थोडा थबकला होता आणि जथ्यातला पुढचा माणूस पैसे मागत होता.
रस्त्यावर पैसे मागायला येणार्या विविध लोकांबद्दलचे सगळे संदर्भ माझ्या शहरी आणि बंद डोक्यात चमकून गेले.
मला पैसे द्यायचे नव्हते असं नाही पण खाली जाणं सुरक्षित वाटलं नाही. का कोण जाणे.
रस्त्यावर जाऊन पैसे देणं हे थोडं त्या स्वरब्रह्माचा अपमान केल्यासारखंही वाटणार होतं. कारण मी देऊन देऊन ५०-१०० रूपयापेक्षा जास्त थोडीच देणार होते.
सकाळच्या कामांच्या धांदलीत अजून अंघोळ उरकायची होती आणि अंगावरचा गाऊन हा काही रस्त्यावर खाली जाण्याच्या लायकीचा नव्हता.
५-१० मिनिटात पाणी जाणार होतं त्याच्या आत स्वैपाकाचं सगळं पाण्याचं काम उरकायचं होतं.
असा काय काय विचार होतोय जेमतेम दोन मिनिटात तोच जथा पुढे सरकला. पैसे मागायला ठाण मांडून बसणारे लोक नव्हते तर हे.
नवर्याचं ऑफिस पलिकडच्या गल्लीत. त्याला फोन करून सांगितलं असं असं आहे. तुझ्याइथे ते आले तर पाच मिनिट गाणं ऐक आणि त्यांना पैसे दे. नवरा अजून अतरंगी. आणि त्याच्याबरोबर कामाला बसलेला आमचा सीए व्यंकटेश त्याच्याहून जास्त गाण्याचा वेडा. २-५ मिनिटात तो जथा यांच्या गल्लीत पोचला नाही तर काम टाकून बाइकवरून त्यांना शोधायला निघाले. आजूबाजूच्या बर्याच गल्ल्या धुंडाळल्या शेवटी महिला संघकडून हनुमान रोड कडे येणार्या रस्त्यावर ते त्यांना सापडले. जथा वारकर्यांचाच होता. रोज थोडं थोडं चालत ते पंढरपूरला निघाले होते. जिथे असू तिथे सकाळी गात गात प्रभात फेरी करायची. त्यात मिळेल त्या पैशातून दिवसभराचा गुजारा करायचा. अशी त्यांची पद्धत.. असो...
एक मात्र झालं त्यांना बघितल्यानंतर ते दिसेनासे होईपर्यंत त्यांचं गाणं ऐकलंच नाही मी.
-नी