Wednesday, June 7, 2017

हॉरर वगैरे!

त्यादिवशीची मधली सुट्टी फार म्हणजे फारच बेकार होती. त्याच दिवशी माझ्यावर निर्लज्ज असण्याचा पहिला शिक्का बसला. अतिशय प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यात पाण्याचा टिपूसही येत नव्हता आणि शेजारच्या बाकावरची मुलगी हमसून हमसून रडत होती. तिच्याभोवती सांत्वनकरूंचा गराडा पडलेला होता. मला कणभर रडू येत नसल्याने सर्व सांत्वनकरू माझ्याकडे दुष्ट खलनायिकेकडे तुच्छतेने बघावे तश्या बघत होत्या. मला जाम राग येत होता. रडू येत नसल्याचा आणि सांत्वनकरूंचाही. भूक पण लागली होती पण वातावरण असे की डबा कसा खायचा? त्यामुळे राग अजून वाढला होता.
एव्हाना काहीतरी भयानक घडले असावे हा समज वाचकांचा झाला असेल तर मग आता वाचकांचा पोपट करायला हरकत नाही.
इयत्ता पाचवीपासून आम्हा सर्व ’सुशील आणि सुविद्य’ होऊ घातलेल्या कन्यांच्या आयुष्यात एक मोठा बागुलबुवा शिरला होता. त्याचे नाव वर्तनपत्रिका. शाळेत उशीरा येणे, गृहपाठ केलेला नसणे, गणवेश नीट नसणे, वर्गात बडबड करणे, बेशिस्त वागणे वगैरे सर्व प्रचंड गंभीर गुन्ह्यांचे प्रत्येक विद्यार्थिनीचे रेकॉर्ड असे ही वर्तनपत्रिका म्हणजे. महिना की आठवड्याचे एकेक पान एवढी विस्तृत होती ती. ज्या दिवशी जो गुन्हा केला असेल त्याची नोंद त्या महिन्याच्या पानावर त्या त्या तारखेने व्हायची. याला म्हणले जायचे तारीख पडणे. स्वत:चे हे क्रिमिनल रेकॉर्ड रोज बरोबर बाळगणे अनिवार्य असे. ही दरवर्षी नवीन मिळे.तीन तारखा की अमुक एक वजा, असे तीन अमुक एक वजा म्हणजे एक मार्क वजा असे काय काय गणित होते.
तर उपरोल्लेखित प्रसंगामधे मी आणि अजून एक मुलगी वर्गात बडबड करताना आढळल्यामुळे आमच्या दोघींच्या वर्तनपत्रिकांवर तारीख पडली होती. इयत्ता पाचवी आणि पहिलीच सहामाही असल्याने क्रिमिनल रेकॉर्डही कोरेच होते. मी बहुतेक मुळातच निर्ढावलेली असल्याने पहिल्या गुन्ह्यालाही मला रडू येत नव्हते आणि ती अजून एक मुलगी आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे विदीर्ण होऊन विलाप करत होती.
पुढे दहावीपर्यंत वार्षिक एखाद्या गुन्ह्याचे रेकॉर्ड मी कायम राखले. दहावीनंतर शाळा संपल्याचा अतोनात आनंद झाला तो प्रामुख्याने गणवेश नाही आणि वर्तनपत्रिका नावाचे भूत डोक्यावरून उतरले या दोन कारणांसाठी.
पण कसलं काय.. काल रात्रीच स्वप्नात वेळेवर गृहपाठ न करता फेसबुकवर टाकमटिकला करत बसण्याबद्दल तारीख पडलेली वर्तनपत्रिका स्वप्नात आली होती. बाकी कशाला घाबरत नाही मी पण वर्तनपत्रिका म्हणजे वर्तनपत्रिका.. घाबरनाच पडता है ना बॉस!
तर फेसबुक टाकमटिकला कमी करायचे चालले आहे. वर्तनपत्रिकेनेच घाबरवल्यामुळे कदाचित जमेलही. पण तोवर आहेच.... - नी

5 comments:

Unknown said...

बाळीचे पाय पाळण्यात नाही, तरी पाचवीच्या वर्गातच दिसले होते होय..!

Chinmayee sumeet said...

हीहीही.... ही नी... नीच नी ( चमच्यातला च, चहातला 'च'नाही..भारी आहेस तू.कसं लिहवतं ग तुझ्याच्याने असं भारी.. भी जरा ' विदिर्ण विलाप' कॅटेगरीत असल्याने तू हिरोच वाटतेस मला.

mrinmayee said...

वर्तनप्रत्रिका वगैरे लागू करणाऱ्याला भर चौकात... वगैरे वगैरे.
हाॅरर आहे हा प्रकार. त्यातनं तू तगून बाहेर पडलीस. आयॅम प्राउडाॅफ यू नी.

NeeDhaPa said...

चिन्मयी, वर्षानुवर्षे बेशिस्तीबद्दल, सज्जन नसण्याबद्दल खाल्लेले टोमणे आणि बोलणी याची एवढी कमाई आहे की हे वेगळं सुचायची गरजच पडत नाही बघ.. :)

मृण, उगाच नाही हुजूरपागेच्या सुशील कन्या कोडग्या होत! ;)

Shrikant Lokhande said...

mast lekh ahe ani comment hi bharich ahe.

Search This Blog