Monday, January 25, 2010

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.
शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...
गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.
त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.
याच आसपास दुसर्‍या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...
अश्या तर्‍हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.
अजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्‍यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?
या लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर? आणि का?
बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू? ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण?मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.
प्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.
प्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्‍या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.
यानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट न लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्‍याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.
अनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.
आता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.
नाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम परफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.
दुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्‍यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है. --------- अ‍ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- अ‍ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्‍हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू न देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.
सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...
- नी

Monday, January 18, 2010

ब्लॉग, ब्लॉगर्स, ब्लॉगिंग....

दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी दुपारी  ४ वाजता पुण्यातल्या पु.ल.देशपांडे उद्यानात मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा पार पडला. ही कल्पना सुचलेल्यांचे आणि सुचल्यानंतर ती सत्यात उतरवणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. आभारसुद्धा!


मेळावा छान झाला अनेक अर्थाने. अनावश्यक औपचारीकता वगळलेली होती पण तरी उगाच अघळपघळ स्वरूप नव्हते. थोडक्यात, सुटसुटीत पण तरीही खूप काही महत्वाच्या गोष्टींची सुरूवात म्हणून मानला जाईल असा छान मेळावा.

मेळाव्यामधे काही छान मुद्दे मांडले गेले आयोजकांकडून आणि माध्यमाइटस वाल्यांकडून (योगेश जोशी आणि प्रसन्न जोशी). तसंच प्रत्येक जण स्वतःची थोडक्यात ओळख करून देत असताना त्यातूनही काही चांगले मुद्दे चर्चेत आले.

ते सगळे एकत्रित स्वरूपात असे...
१. एकूण साहित्यविश्वातलं आणि आयुष्यातलं ब्लॉगिंगचं स्थान, महत्व, कारण इत्यादी.
२. ब्लॉगवरील उस्फूर्त लेखन हा साहित्याचाच भाग असल्याने साहित्य संमेलनाध्यक्ष द.भि.कुलकर्णी यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉगबद्दल बोलण्यासाठी निवेदन देणे
३. मराठी ब्लॉगर्सचे एकत्रित अस्तित्व म्हणून गूगल किंवा याहूग्रुपची सुरूवात करणे
४. ब्लॉगसंबंधी तांत्रिक माहीतीची देवाणघेवाण
५. ब्लॉगद्वारे किंवा ब्लॉगिंग चळवळीद्वारे काय काय घडवता येऊ शकते, साध्य करता येऊ शकते
६. ब्लॉग किंवा ऑनलाइन लिखाणातून होणारे वाङ्मयचौर्य आणि त्याबाबतीत काय करता येऊ शकते.
७. मराठी भाषेच्या उत्कर्षाविषयी केले जाणारे प्रयत्न.

हे सगळं चर्चून झाल्यावर वैयक्तिकरित्या ब्लॉगर्सनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि मग हळूहळू सगळे पांगले.

यापुढे...
माझ्यासारख्या केवळ स्वान्त सुखाय ब्लॉग लिहिणारीला किंवा खरंतर कळ आल्यावर रहावत नाही म्हणून लिहिणारीला सगळी चर्चा, उद्दिष्टे पटली असली तरी पचतीलच, झेपतीलच असं नाही. उदाहरणार्थ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काही प्रयत्न करणे. मी मराठीत लिहित असले तरी ते मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी नव्हे. मला मराठीतंच व्यक्त होता येतं म्हणून मी मराठीत लिहिते. माझ्या लिखाणात बरेचसे शब्द मराठी येत असले तरी प्रत्येक विंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असं मी करत नाही किंवा अश्या अट्टाहासाने मराठीचा उत्कर्ष होईल असा काही माझा गैरसमज नाही. यातला फोलपणा राजीव सरांनी कधीच समजावून दिलेला आहे. मग मी मराठी भाषेला तारक काम करते की मारक.. माहीत नाही..

ऑनलाइन किंवा ब्लॉगवरच्या वाङ्मयचौर्याच्या समस्येसाठी परिणामकारक कायदे/ नियम आणि यंत्रणा अजूनतरी अस्तित्वात नाहीत.  मराठी ब्लॉगर्सचं किंवा एकुणात सर्वच ब्लॉगर्सचं एकत्रित अस्तित्व या गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करू शकेल का? कुणी वकील ब्लॉगर किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस संदर्भात काम करणारं कुणी मार्गदर्शन करू शकेलच. अचाट महत्वाकांक्षी कल्पना आहे पण याबाबतीत विचार करायला काय हरकत आहे नाही का?

मेळाव्याबद्दलचे बाकीचे वृत्तांत इथे बघू शकता..


- नी

Saturday, November 21, 2009

अभंग, जथा, शहर आणि मी...

सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही पांडुरंग येणार भेटीला.
मला त्या आवाजातच पांडुरंग भेटून गेल्यासारखं वाटलं.
स्वैपाकातले हात थबकले. ते अप्रतिम स्वरब्रह्म शक्य तितकं पिऊन घ्यावं म्हणून मी क्षणभर स्तब्ध झाले. ऐकत राह्यले.
आता लक्षात आलं ही रेकॉर्ड नाहीये. कुणीतरी खरंच गातंय.
मी खिडकीकडे धावले.
खाली रस्त्यावर ५-६ वारकर्‍यांचा जथा चालला होता. पेटी किंवा पखवाज गळ्यात बांधलेला, एकिकडे वाद्य वाजवणं आणि एकिकडे गाणं असं ते रस्त्यावरून चालत होते.
जथा थोडा थबकला होता आणि जथ्यातला पुढचा माणूस पैसे मागत होता.
रस्त्यावर पैसे मागायला येणार्‍या विविध लोकांबद्दलचे सगळे संदर्भ माझ्या शहरी आणि बंद डोक्यात चमकून गेले.
मला पैसे द्यायचे नव्हते असं नाही पण खाली जाणं सुरक्षित वाटलं नाही. का कोण जाणे.
रस्त्यावर जाऊन पैसे देणं हे थोडं त्या स्वरब्रह्माचा अपमान केल्यासारखंही वाटणार होतं. कारण मी देऊन देऊन ५०-१०० रूपयापेक्षा जास्त थोडीच देणार होते.
सकाळच्या कामांच्या धांदलीत अजून अंघोळ उरकायची होती आणि अंगावरचा गाऊन हा काही रस्त्यावर खाली जाण्याच्या लायकीचा नव्हता.
५-१० मिनिटात पाणी जाणार होतं त्याच्या आत स्वैपाकाचं सगळं पाण्याचं काम उरकायचं होतं.
असा काय काय विचार होतोय जेमतेम दोन मिनिटात तोच जथा पुढे सरकला. पैसे मागायला ठाण मांडून बसणारे लोक नव्हते तर हे.

नवर्‍याचं ऑफिस पलिकडच्या गल्लीत. त्याला फोन करून सांगितलं असं असं आहे. तुझ्याइथे ते आले तर पाच मिनिट गाणं ऐक आणि त्यांना पैसे दे. नवरा अजून अतरंगी. आणि त्याच्याबरोबर कामाला बसलेला आमचा सीए व्यंकटेश त्याच्याहून जास्त गाण्याचा वेडा. २-५ मिनिटात तो जथा यांच्या गल्लीत पोचला नाही तर काम टाकून बाइकवरून त्यांना शोधायला निघाले. आजूबाजूच्या बर्‍याच गल्ल्या धुंडाळल्या शेवटी महिला संघकडून हनुमान रोड कडे येणार्‍या रस्त्यावर ते त्यांना सापडले. जथा वारकर्‍यांचाच होता. रोज थोडं थोडं चालत ते पंढरपूरला निघाले होते. जिथे असू तिथे सकाळी गात गात प्रभात फेरी करायची. त्यात मिळेल त्या पैशातून दिवसभराचा गुजारा करायचा. अशी त्यांची पद्धत.. असो...

एक मात्र झालं त्यांना बघितल्यानंतर ते दिसेनासे होईपर्यंत त्यांचं गाणं ऐकलंच नाही मी.

-नी

Friday, November 20, 2009

ब्लॉग माझा

आज सकाळी एक मेल येऊन थडकली मेलबॉक्समधे.
त्यात लिहिलं होतं की माझ्या आतल्यासहीत माणूस या ब्लॉगला म्हणजे तुम्ही आत्ता वाचताय त्या माझ्या ब्लॉगला स्टार माझाच्या मराठी ब्लॉगस्पर्धेत दुसरं बक्षिस मिळालं.
मलातरी आनंद झाला बुवा आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा मोह काही आवरला नाही. स्वतःचं कौतुक करून घ्यायला कोणाला आवडत नाही. (तुम्हालाही आवडतंच की!)तर म्हणून हे पोस्ट..

हा पूर्ण रिझल्ट.
RESULT OF BLOG MAJHA 2009 COMPETITION

FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra
http://manatale.wordpress.com

Neeraja Patwardhan
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Dipak Shinde
http://bhunga.blogspot.com

REMARKABLE PARTICIPATION:
Hariprasad Bhalerao
www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar
http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal
www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary
www.netbhet.com

Pramod Dev
http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain
http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske
http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam
http://policenama.blogspot.com

deepak kulkarni
http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare
http://anandghan.blogspot.com

-नी

Sunday, November 15, 2009

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या
स्वच्छतेच्या बैलाला.. (http://vishesh.maayboli.com/node/26) या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच
http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला.
आणि मग थांबला.

सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

या विषयावर एक डॉक्यु करून ती संबंधितांवर हॅमर केली पाहीजे असं काही वाटत होतंच.

मध्यंतरी याच विषयावर एक डॉक्यु ऑलरेडी केलेली आहे असं कळलं होतं. 'Que to Pee' असे त्या डॉक्यूचे नाव आहे. कॉपी अजून मिळालेली नाही त्यामुळे पाह्यलेली नाही.

मी बनवायच्या डॉक्युच्या दृष्टीने रिसर्च मटेरियल जमा होतच आहे. माझं त्या दृष्टीने काम चालूच आहे. मला गरज आहे तुम्हा सगळ्यांच्या मदतीची. आर्थिक मदत नव्हे तर संशोधनात प्रत्यक्ष सहभाग याअर्थी.

संशोधनात जे लोक मदत करू इच्छित असतील त्यांच्यासाठी मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती.

डॉक्यु करण्याच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या काही गोष्टी पुढे सरकल्या आहेत. मधे दुसर्‍या एका एनजीओ साठी मी एक डॉक्यु बनवून दिली त्यामुळे संपूर्णपणे आपण काही गोष्टी करण्याचा अनुभव पदरात आलाय. ती चांगली झालीये असा त्या एनजीओ आणि इतर काही लोकांकडून निर्वाळा मिळाल्याने आत्मविश्वास वाढलाय. अजून एका डॉक्युचं काम मिळाल्याने अजून थोडा अनुभव आणि आत्मविश्वास...
कॅमेरा आणि एडिट सेटप या बाबींचं प्रकरण लवकरंच हातात येणार आहे. अ‍ॅव्हिड सेटप हाताशी असल्याने एडिट शिकणंही सोपं जाणारे. अर्थात हे आमच्या फिचर फिल्मच्या शूट नंतर पण तरीही सेटप असणं महत्वाचं.

बाकी काय काय मुद्दे आणि कसे कसे यायला हवेत याबद्दल कोणालाही काही शेअर करायचे असल्यास मला toiletdocu@gmail.com इथे संपर्क करा.

धन्यवाद,
नीरजा पटवर्धन
on 11/15/2009 01:49:00 PM by नीरजा पटवर्धन | 12 comments  Edit

Sunday, September 27, 2009

उत्तेजनार्थ...!

'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.
मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं.

दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी. तो काही यावर्षी आला नाही तेव्हा मी आपलं मला केळं मिळालं असं समजून चालले होते. आणि अचानक आज कळलं अगदीच केळं नाही तर निदान उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं.

असो तर बातमी ही की माझ्या कथेला उत्तेजनार्थ का होईना बक्षिस मिळालंय. ब्लॉगवर पिडीएफ कशी चढवायची हे शिकले की त्या कथेची ही लिंक इथे टाकेन. साप्ताहिक सकाळच्या आज प्रसिद्ध झालेल्या कथा विशेषांकात माझी कथा छापलेली नाहीये पण पुढच्या एक दोन अंकांमधे ती छापली जाणार आहे.

उत्तेजनार्थ का होईना १२००-१५०० च्या गठ्ठ्यातून आपण १० मधे आलो हे काही छोटं प्रकरण नाही अशी स्वतःचीच पाठ थोपटत मी फेसबुकमधे स्टेटस अपडेट करायला गेले. उत्तेजनार्थ बक्षिसाचं भाषांतर Consolation Prize असं लिहिलं आणि मी थबकले.

हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले.

पण मग परत मायमराठीतला मजकुर आठवला. तिथे माझं बक्षिस उत्तेजनार्थ होतं. 'तू बरं लिहितेस गं पण काय करणार बाकीच्यांच्या कथा तुझ्या पेक्षा खूप चांगल्या होत्या. तुझी कथा पहिल्या पाचात नाही येऊ शकली. पण म्हणून निराश व्हायची गरज नाही. तू अजून चांगलं लिहावंस. अजून चांगला प्रयत्न करावास म्हणून तुला उत्तेजनार्थ बक्षिस देतोय आम्ही' असं म्हणणारं उत्तेजनार्थ बक्षिस. तेव्हा पहिल्या पाचात आलीस म्हणजे कायमच येशील असं नाही असा गर्वाचा फुगा फोडणारं, आता लिही परत पहिल्या पाचांपेक्षा जास्त चांगलं असं आवाहन करणारं उत्तेजनार्थ बक्षिस.

दहाच मिनिटात या बक्षिसाने केवढं शिक्षण केलं माझं. आणि माझं नशीब हे की हे समजायची अक्कल परमेश्वरानी माझ्या डोक्यात घातली.

तेव्हा आता त्या दिल्या अकलेला जागून तरी का होईना लिहिणे, लिहीत रहाणे क्रमप्राप्त आहे.
तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!!

-नी

माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे. आत्तापर्यंत त्याने बघितलेल्या जागा पटकथेला आकार देत होत्या. व्यक्तिमत्व देत होत्या. पटकथा अधिक जिवंत व्हावी यासाठी मदत करत होत्या.

आता या अनेक जागांच्यातून प्रत्यक्ष चित्रीकरणाची स्थळे नक्की करायची होती. त्यांचे तपशील जमवायचे होते. त्यांच्या कानाकोपर्‍यासकट. पटकथेचा पोत, व्यक्तिरेखांचं अस्सलपण दिसण्यात अधोरेखित करणार्‍या जागा आता नक्की करायच्या होत्या.

आतापर्यंत पटकथेतील किंवा दिग्दर्शकाच्या डोक्यात असलेली चित्रपटाची दृश्य संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रक्रिया आता सुरू होत होती. चित्रपटाची दृश्य संकल्पना म्हणजे संपूर्ण चित्रपट कसा दिसणार आहे, चित्राचे रंग, पोत, त्यातल्या रेषा कश्या कश्या असणार आहेत, त्यात कश्या कश्या तर्‍हेने काय स्वरूपाचे दृश्यबदल होणार आहेत याचा एक आराखडा. यातील बदल हा केवळ स्थळबदलापुरताच अपेक्षित नाही. सगळ्या दिसण्यातून येणारा, निर्माण होणारा अनुभव महत्वाचा आहे. त्यामुळे नदीचा तीर म्हणला की नदीच्या पाण्याचा रंग (सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी), नदीचं वळण, तीरावरची झाडी, त्यांची हिरवाई, गवताचे रंग, मातीचा किंवा वाळूचा पोत हे सगळं सगळं बारकाईने समजून घेऊन आपल्या आत उतरवावं लागतं. इथे visual designer चं काम सुरू होतं. दिग्दर्शकाच्या डोक्यात या सगळ्या गोष्टींचा उत्तम अंदाज होता. आणि याबाबतीतला उरला हातभार द्यायला छायालेखक संजय मेमाणे होता आणि मीही होतेच.

दिग्दर्शकाची पटकथेची, व्यक्तिरेखांची व दृश्याची हाताळणी हे सगळं समजावून घेतल्याशिवाय दिग्दर्शकाच्या कल्पनेतलं दृश्य आमच्या कल्पनेशी मेळ खाणार नव्हतं त्यामुळे कोकण फिरताना दिग्दर्शकीय संकल्पना आपल्या आत उतरवणे हे महत्वाचंच. अर्थात माझ्या सुदैवाने बरेच आधिपासुन मी हे करतच होते. दिग्दर्शकाला सगळाच धुंडाळत होते तेव्हा हाताला लागलेल्या बर्‍याच गोष्टींबरोबर हे सगळे होतेच.

पहिली लोकेशन बघण्याची ट्रिप कधी झाली ते मी आधी सांगितलंच आहे. नंतर मात्र आम्ही खरोखरच लोकेशन शोधण्यासाठी, अभ्यासासाठीच कोकणात, सिंधुदुर्गात फिरलो.

प्रत्येक जागेचे तपशील गोळा करण्याची पद्धत तशीच. जाउ त्या प्रत्येक ठिकाणी होकायंत्र ठेवून सगळ्या दिशा, सुर्यप्रकाशाच्या दिशा, झाडे, डोंगरकडे, समुद्राचा किनारा इत्यादी इत्यादी लिहून किंवा चित्र काढून ठेवायचं. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास शूट होणार त्यामुळे त्यावेळेला तीच जागा कशी असेल याचा अंदाज घ्यायचा. अश्या सगळ्या अगदी मूलभूत गोष्टी करतच होतो पण त्याआधी मुळात कोकणातली दृश्ये म्हणजे फोनच्या दृश्यातले कटस आणि शेवट सोडला तर सगळा आठवणीतला मामला आहे. तेव्हा आजोबा आणि परश्याच्या भावविश्वाशी निगडीत सगळ्या जागा हव्यात. आणि दृश्य त्या त्या वेळेच्या मनस्थितीत परश्या किंवा आजोबांना जे आठवू शकेल त्याच्याशी संबंधित हवे. कथेला, कथेतल्या परिस्थितीला, अनुभवाला अधोरेखित करणारे हवे. हा सगळा तोल सांभाळत सगळा भाग अभ्यासायला लागलो. एका ६ वर्षाच्या मुलासाठी कोकणातल्या छोट्या गावातलं खाउन पिउन सुखी आयुष्य कसं कसं असेल, त्याच्या जगात कोण कोण आणि काय काय असेल ह्याचा अंदाज घेणं हेही सुरू केलं. ही प्रक्रीया दोन बाजूंनी होत होती. संदीपने परश्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल मोजके संदर्भ दिले होते. त्या संदर्भाशी मिळणार्‍या व्यक्तिरेखा दिसतायत का शोधणं आणि संदीपने दिलेल्या संदर्भातून ती व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात उभी करत जाणं. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून होत्याही आणि नाहीही पण कोकणातली स्थळं(चित्रीकरणासाठीच!) शोधतानाच व्यक्तिरेखांचा अभ्यास चांगला होत होता.

परश्याच्या घरात आधुनिक वस्तुंची समृद्धी आणि चकचकाट नसणार होता पण अठरा विश्वे दारीद्र्यही नसणार होतं. अचानक चार माणसं आली तर आमटीभाताला घर महाग असणार नव्हतं. उन्हातून ताबडत आलेल्या अनोळखी पाहुण्याला पटकन झाडावरून उतरवून गार शहाळं देण्याची वृत्ती आणि सुबत्ता दोन्हीही परश्याच्या घरात असणार होती. अनोळखी पाहुण्याला आपलसं करेल असं प्रसन्न अंगण आणि उघडं दार असणार होतं. आणि अश्या घरात रहाणारे लोक हे परश्या, आजोबा, परश्याचे आईवडील असणार होते.

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळच्या आधी काही किलोमीटर ओरोस म्हणून एक गाव लागतं तिथे राजधानी नावाचं हॉटेल आहे. राजधानीचे आनंद डिचोलकर हे संपुर्ण सिंधुदुर्ग फिरलेले आहेत. निवतीचा किल्ला, भोगव्याचा समुद्रकिनारा या काही गोष्टी त्यांच्याच पोतडीतून आम्हाला कळलेल्या.

सकाळी ८ पर्यंत ओरोसचं राजधानी सोडायचं आणि कुडाळ, मालवण व वेंगुर्ले या पट्ट्यातला एकेक भाग बघत बघत जायचा आणि रात्री ९ - १० पर्यंत कधीतरी परत यायचं असा या ट्रिप्सचा दिनक्रम असायचा. आधीच्या पाटीपासून पुढच्या पाटीपर्यंतचे किलोमीटर, कुठला फाटा कुठून कुठे किती अंतरावर आहे इत्यादी सगळं लिहून ठेवत परश्याचं घर शोधत जायचं. परश्याचं शेत, परश्या मुंबईहून परत येईल तो नदीकाठ सगळं सगळं शोधत फिरायचं. आपल्या संकल्पनेच्या जवळचं काही दिसलं की गाडीतून उतरायचं आणि कुण्या अनोळख्याच्या अंगणात जाऊन त्यांच्याच घराची पहाणी करायची. कुणी विचारलं तर सगळा पाढा वाचायचा.... का, कशासाठी इत्यादी इत्यादी. मग कुणी अगत्याने गुळपाणी देत नाहीतर कंटाळल्या चेहर्‍याने माना डोलावूनच हो नाही म्हणत. एखाद्याचं घर लांबून छान वाटे पण अंगणात गेल्यावर संदीपचा चेहरा नकार देताना दिसे. असं करत करत सगळा परीसर पिंजून काढत होतो.

असं करता करता सिंधुदुर्गातला एकेक खजिना समोर येत होता. कोकण समजत होतं. तिथला माणूस, त्याच्या जिव्हाळ्याच्या जागा त्याही समजत होत्या.

फिरता फिरता एक दिवस गाडीने पाट(हे गावाचे नाव आहे!) सोडले आणि थोड्यावेळाने परुळ्यामधे प्रवेश केला. आज पाट परुळे हाच पट्टा होता. उजव्या बाजुला डोंगर असल्याने तिकडे काही घरं सापडणार नव्हतीच. डाव्या बाजुला दरी होती त्यामुळे इथे काय असणार अश्या विचारात होतो तेवढ्यात डावीकडे रस्त्यापासुन थोडं खोल काहीतरी सुंदर दिसलं. खरंच दिसलं की भास म्हणून ड्रायव्हर ला गाडी मागे घ्यायला सांगितली आणि गाडी थांबवून पाह्यलं. एक हसरं अंगण, कौलारू घर आणि पांढरा चाफा आमच्याकडे बघून खुदखुदत होता.

हेच ते घर आणि चाफा. पण ही फ्रेम चित्रपटातली आहे. त्यामुळे आस्पेक्ट रेश्यो सिनेमास्कोप आहे. १:२.३५ असा.

Saturday, September 26, 2009

गणपतिबाप्पा मोरया!




गणपति विसर्जनानंतर ४-५ दिवसांनी ४ गणपति आपल्या विरघळण्याची वाट बघताना दिसले. पैकी एकाने आडवे होण्यापर्यंत मजल गाठली होती. अंगावरचे सोनेरी सोडून सगळे रंग सोडून गेले होते. एकाच्या हातांचे तपशील संपले होते.
स्थळः आरोंदा गावातील एक वहाळ.
कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्स L 15, ऑटोवर काढलाय.

स्कार्लेट

मार्गारेट मिशेल च्या Gone with the wind ची नायिक Scarlet o’Hara. काल्पनिक असली तरी कुठल्याही खर्‍या माणसाइतकीच किंबहुना जास्तच माणूस वाटणारी हे स्कार्लेट.

मला मात्र ही सुरुवातीला भेटली लिंडा गुडमनच्या 'सन साइन्स' मधून. हसू नका प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेय नक्कीच आपापल्या टिनेज इयर्स मधे. तर ह्या पुस्तकात लिंडा बाई म्हणतात ”Scarlett O’Hara is the very epitome of the Mars-ruled Aries female.” आणि हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देतात. सन साइन्स प्रमाणे मी ही एरिस असल्याने कोण ही स्कार्लेट असे कुतुहल निर्माण झाले. Gone with the wind ठरवून पाह्यला न कंटाळता. तरीही स्कार्लेट तितकिशी समजली नाही पण ’I will never be hungry again!’ हे स्वतःच स्वतःला दिलेले वचन मात्र लक्षात राह्यले. मग एक चाळाच लागला अयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी स्कार्लेट शी ताडून बघायचा जो आजतागायत चालू आहे. साम्य किती नी कुठे हा मुद्दा दुय्यम पण यातून झाले मात्र एक की स्कार्लेट उलगडत गेली. मैत्रिण बनली.

ही स्कार्लेट मुळात अमेरीकेच्या जुन्या गर्भश्रीमंत अश्या दक्षिणेतली southern belle. अतिशय मनस्वी आणि हट्टी मुलगी. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत 'lady like' वागण्यासाठी असलेली बंधने हे एकमेव दु:ख असलेली, एका मुलाच्या प्रेमातही पडलेली, त्याला मिळवण्यासाठी काहीही करू शकणारी, अगदी 'reputation' ही त्याच्यापुढे महत्वाचे न समजणारी. पण काय करता त्याने, म्हणजे अ‍ॅशली ने तर मेलनीशी लग्न ठरवलेले असते. निराश स्कार्लेट रागाच्या भरात एका वेगळ्याच तरूणाला लग्नाला होकार देते. लग्न होतं. हा काळ अमेरीकेतील उत्तर व दक्षिणेत झालेल्या Civil war चा आहे. सगळेच तरूण Confederate Army मधे गेले आहेत. त्यात तिचा नवराही. तो युद्धावर कामी येतो. त्याच्या शोकाचे काळे कपडे घालताना तिला एवढेच वाटत असते 'I am too young to be a widow!' लवकरच तिला ज्याच्यावर कधीच प्रेम केले नाही अश्या नवर्‍याच्या मृत्युप्रित्यर्थ कराव्या लागणार्‍या शोकाचा किंवा त्या देखाव्याचा कंटाळा येतो. Charity Ball च्या वेळेस काळा स्कर्ट आणि सफ़ेद क्रिनोलाइन नि त्याच्या खाली नुसतेच नाचणारे पाय हे दृश्य सगळ्यांना आठवतच असेल. ती काळे कपडे टाकून देते. र्‍हेट बटलर तिला समजावतो की तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इथे तिचा कणखर आणि मनस्वी स्वभाव जास्त ठळकपणे जाणवायला लागतो

युद्धाची तीव्रता वाढत जाते. Old south चा सगळा डोलारा कोलमडून पडायची वेळ येते. स्कार्लेट या ठिकाणी युद्धातील जखमींची शुश्रुषा करणार्‍या नर्सच्या रूपात दिसते. केवळ अ‍ॅशली ला दिलेले वचन पाळण्यासाठी ती मेलनीचे बाळंतपणही करते अगदी एकटीने. युद्धात Confederate Army चा पराजय होतो. स्वतःच्या नि उरलेल्या सगळ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्कार्लेट आपल्या शिरावर घेते एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमणे. ह्याच वेळी ती स्वत:ला ते वचन देते

”As God is my witness, as God is my witness, they're not going to lick me! I'm going to live through this, and when it's all over, I'll never be hungry again - no, nor any of my folks! If I have to lie, steal, cheat, or kill! As God is my witness, I'll never be hungry again.”
(देवाला साक्षी मानून मी स्वतःलाच वचन देते की मी यातून तावून सुलाखून बाहेर पडेन आणि मग सगळा गोंधळ संपल्यावर मात्र मी कधीच उपाशी रहाणार नाही, मी नाही आणि माझी माणसंही कधी उपाशी रहाणार नाहीत. मला मग त्यासाठी खोटं बोलावं लागलं, फसवावं लागलं, कुणाला मारावं लागलं तरी चालेल पण देवाशपथ मी कधीही उपाशी रहाणार नाही!)
जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशा याचे याहून मोठे उदाहरण कुठले? मला खात्री आहे की प्रत्येक झोपडीतल्या बाई मधे हेच म्हणणारी स्कार्लेट असते. खरेतर प्रत्येक जणातच ही अशी स्कार्लेट दडलेली असते का?

ह्यानंतर आपली जमीन वाचवण्यासाठी फ्रँक केनेडीशी स्कार्लेट लग्न करते. जो खरंतर तिच्या धाकट्या बहिणीचा प्रियकर असतो. हे स्कार्लेटला माहित असते पण हेही माहित असते की जर सगळ्यांचेच देशोधडीला लागणे टाळायचे असेल तर हे करणे जरूरीचे आहे. हळूहळू त्यांना बरे दिवस येऊ लागतात. पण युद्धामुळे ढवळून निघालेला समाज अजून स्थिर नाहीये. अराजकाची स्थिती, लूटमार चालू आहे. अश्यातच स्कार्लेटवर हल्ला होतो. स्कार्लेट वर झालेल्या हल्ल्याचा सूड घ्यायला म्हणून अ‍ॅशली आणि फ्रँक जातात आणि त्या धामधुमीत फ्रँक मारला जातो. ती परत एकदा विधवा होते. याच वेळेला तिला तिच्या आईची तीव्रतेने आठवण येते आणि ती हेही कबूल करते की तिला तिच्या आइसारखेच व्हायचे होते. मृदु आणि दयाळू. पण ती कबूल करते की ती जे काही आहे ती मृदु नि दयाळू यापासून शेकडो योजने दूर आहे.
र्‍हेट तिच्यावरच्या आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करतो. पूर्णपणे प्रेमासाठी नाही तरी पैशासाठी ति त्याच्याशी लग्न करते. एव्हाना तिला अ‍ॅशली आपला होणे नाही हे मात्र पटलेले असते. र्‍हेट आणि स्कार्लेटला एक मुलगी होते पण तीही त्या दोघांना जवळ आणण्यात अयशस्वी होते. र्‍हेटचा संयम संपत जातो. अश्यातच बॉनीचा त्यांच्या मुलिचा अपघाती मृत्यू होतो आणि र्‍हेटच्या दृष्टीने तुकडा पडतो.
मेलनीचाही मृत्यू होतो आणि त्यावेळेला अ‍ॅशली चा विलाप पाहून स्कार्लेटला हे वास्तव लक्षात येते की ह्याचे आपल्यावर कधीही प्रेम नव्हते आणि तिला हेही जाणवते की ते तसे नव्हते याचे आपल्याला काहीच वाटत नाहीये.
तिला र्‍हेटची आठवण येते. त्याच्याबद्दल प्रचंड ओढ दाटून येते आणि याच वेळेला तो तिला सोडून निघालेला असतो. त्याचे मन तिच्या प्रेमाची वाट बघायला विटलेले असते त्यामुळे तिच्या कुठल्याच विनवणीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ”Frankly, my dear! I dont give a damn!”(खरं सांगायचं तर मला काहीही फरक पडत नाही!) असा घाव घालून तो निघून जातो.
पण स्कार्लेट ला हरणे मान्य नाहीये. तिने ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केले ते खोटे ठरलेले आहे, ज्याच्यावर तिचे खरे प्रेम आहे असा तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे, तिची मुलगी ही गेलेली आहे. अश्या अवस्थेलाही ती पराजय मानत नाही. ती आपल्या पहिल्या घरी जाण्याचे ठरवते.
”...Tara!...Home. I'll go home, and I'll think of some way to get him back! After all, tomorrow is another day!” (टेरा.. माझं घर.. मी घरी जाइन आणि त्याला [र्‍हेटला] परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीन. शेवटी उद्याचा दिवस वेगळाच असणारे ना!)
स्कार्लेट स्वार्थी, मानी पण कुठल्याही गोष्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून जे आहे ते आहे, नाही ते नाही असं सांगू शकणारी अशी, एक खरिखुरी माणूस. प्रत्येक चांगल्या वाइट गोष्टींसकट. प्रत्येक संकटाला, दुर्दैवाला '|Tomorrow is another day!’ म्हणून ठेंगा दाखवणारी प्रचंड आशावादी. तापट आणि कणखर पण त्याच वेळेला एखाद्या निरागस बाळाप्रमणे वाटणारी . प्रेमासाठी सगळे ओवाळून टाकले तरी प्रेमापेक्षाही इतर अनेक महत्वाच्या गोष्टी जगात असतात यावर विश्वास ठेवणारी. र्‍हेटशी लग्न करून आपण आपल्याहून वरचढ माणसाला स्थैर्यासाठी विकले, बांधले गेलो आहोत कि काय अशी भिती बाळगणारी एक मुक्त आणि स्वच्छंदी जीव, Free spirit.
आजही ही स्कार्लेट माझ्या मनात प्रत्येक वेळी Tomorrow is another day म्हणत रहते. सतत भेटत राहते. नि आजही तिच्याशी मला ताडून बघण्याचा माझा चाळा सुटलेला नाही.

-नी

Friday, September 25, 2009

माझा 'श्वास' - ३

आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती.

आम्ही शोधत होतो. चारी दिशांना दूत पाठवले होते म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मुलगा ६-७ वर्षांचच हवाय हे स्पष्ट कळवूनही चित्रपटाच्या मोहाने आपल्या १०-१२ वर्षाच्या बाब्यालाही "लहानच दिसतो हो तो" म्हणत आम्हाला भेटायला येणार्‍या आया पाहिल्यावर त्या मुलाची दयाच येत असे.

अश्यात एकदा माझ्या आईने एक फोटो दिला आम्हाला बघायला. ती एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गेली होती तिथे एका चुणचुणीत छोट्याने एक नाट्यछटा केली होती. त्याचा फोटो आईने मागून घेतला होता. तो हा फोटो होता. फोटोतल्या cartoon चे गमतीशीर डोळे, त्याचा सावळा रंग आणि कपाळावरचे केसांचे मजेशीर छप्पर हे पाहून आम्ही दोघेही खुश झालो.



त्याच्या घरी पोचलो. लाल शर्ट आणि काळी चड्डी अश्याच वेषात साहेब आमच्यासमोर हजर झाले. समोरच्या दिवाणावर तो आणि त्याची आई बसली होती. इकडे खुर्च्यांवर आम्ही दोघं. संदीपने त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. संदीपच्या हातात व्हिडीओ कॅमेरा होता. तो हळूच त्याने चालूही केला. ज्यूनियर चितळे आपल्याला भेटायला कुणीतरी आलंय म्हणून जाम खुश होते आणि किंचित लाजतही होते. संदीपच्या हातातल्या कॅमेर्‍याकडे त्याचं वारंवार लक्ष जात होतं. संदीप त्याला, "इकडे ये!" म्हणाला, समोरचा दिवाण ते संदीप बसला होता ती खुर्ची यातलं अंतर ५ - ६ पावलं असेल नसेल पण जवळजवळ मॅरेथॉन मधे धावावं एवढ्या वेगात त्याने धाव घेतली आणि पटकन संदीपच्या जवळ आला. आजही माझ्या डोळ्यासमोरून त्याची ती धाव हटत नाही. संदीपला आणि मला जाम हसायला आलं. साधारण दीड मिनिटात त्याचा बुजरेपणा संपला होता आणि तो आमच्याशी गप्पा मारायला लागला होता. नंतर त्याला त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल २ ओळी बोलायला सांगितल्या कॅमेर्‍यात बघून. "माझे नाव अश्विन मिलिंद चितळे आहे. माझे वय ६ वर्ष आहे. नुकतीच माझी मुंज झाली. तेव्हा मला खूप मजा आली." अशी वाक्य म्हणताना हळूच एकीकडे हसू न आवरणं, हसण्याच्या नादात शब्दांची गडबड करणं, त्यावरून जीभ बाहेर काढून किंवा मानेनेच 'नाही' म्हणून वाक्याची परत सुरूवात करणं, आणि यामुळे त्याला अजूनच हसायला येणं असं त्याचं चालू होतं. 'तू टीव्ही बघतोस का? काय आवडतं? मारामारी करायला आवडते का?' असं काय काय संदीपने त्याला विचारलं. मारामारीचं नाव काढल्यावर स्वारी खूशच. संदीपने त्याला माझ्याशी मारामारी करायला सांगितली. हे सगळं संदीपच्याकडे टेप होत होतं आणि हे त्या पिल्लाला विसरायला झालं होतं एव्हाना. मी तर तेव्हाच खुश झाले होते. हाच 'तो' अशी माझी खात्री पटली होती. आणि संदीप अर्थातच इतक्या पटकन खुश होणार्‍यातला नसल्याने "चांगला आहे. शक्यता आहे हाच ठरण्याची. पण अजून screentests कराव्या लागतील" असं म्हणून आम्ही चितळ्यांच्या घरून बाहेर पडलो.

यानंतर संदीपने अश्विनशी छान मैत्री वाढवली. त्याला घरी जाऊन भेटणे, त्याला बाहेर खेळायला घेऊन जाणे इत्यादी सुरू झाले. त्याच्याशी संदीपने खूप गप्पा मारल्या. अगदी आज शाळेत काय झालं पासून काल आईने फटका दिला होता इथपर्यंत सगळं तो संदीपला सांगू लागला. अश्विन संदीपच्याबरोबर खूपच रूळला, comfortable झाला. हळू हळू संदीपलाही १००% खात्री पटली की हाच 'परश्या' आणि मग त्याचे ट्रेनिंग चालू झाले. साधारण चारपाच महिने हे ट्रेनिंग चालू होते.

ह्यातच मग हळूहळू 'परश्या' साकारण्यासाठी म्हणून विशिष्ठ inputs द्यायला संदीपने सुरूवात केली. 'तुला काय वाटतं काय करायला हवं आता परश्यानं? किंवा असं झालं तर तुला कसं वाटेल?' अश्या साध्या साध्या संवादांच्यातून संपूर्ण पटकथा गप्पा मारत मारत, चर्चा करत, हळू हळू संदीपने अश्विनपर्यंत पोचवली.

पटकथेच्या अनुषंगाने येणार्‍या ठिकाणी विशेषतः हॉस्पिटलमधे, डॉक्टरांच्या क्लिनिकमधे त्याला फिरवूनही आणले होते. अगदी मेल सर्जिकल वॉर्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंत. हेतू हा की त्याला या सगळ्या वातावरणाची सवय व्हावी. पहिल्यांदा त्याला तिथे घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हालाच तो घाबरेल का? रडेल का अशी थोडी भिती होती. पण एव्हाना आमच्या दोघांची विशेषतः संदीपकाकाची त्याला इतकी सवय झाली होती की तो कणभरही घाबरला नाही. मजेत होता. अगदी हॉस्पिटलमधे स्ट्रेचर वर झोपवून त्याला OT मधे नेऊन आणले तेव्हाही. वर स्पिरिटचा वास मला खूप आवडतो असंही सांगितलं त्याने.

अस सर्वच दृष्टीने त्याला 'परश्या' करण्यासाठी तयार करणं चालू होतं. पण सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे अश्विनला या सगळ्याचा त्रास न होणं. वय लहान आणि कर्करोग, आंधळं होणं या गोष्टी नट म्हणून अंगावर घेताना त्याच्या मनावर आयुष्यभरासाठी 'स्कार' होणं ही शक्यता खूपच होती. आणि त्याचा परिणाम film मधल्या performance वर होण्याची शक्यताही होती. त्यामुळे पहिल्यापासून त्याला हे सगळं खोटं आहे. ही एक गोष्ट आहे आणि ती एकदम खरी वाटेल अशी आपल्याला दाखवायचीये हे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संदीपने समजावून दिलं. म्हणजे कसं की..

"आजारी कोण आहे?"
"परश्या"
"लोकांना कळलं पाहीजे तो आजारी आहे. परश्या कोण करतंय?"
"अश्विन"
"मग अश्विन बरं नाहीये असा दिसला तर लोकांना कळेल ना परश्या आजारी आहे ते.."

अश्या गप्पांच्यातून परश्या आणि अश्विन हि सीमारेखा संदीपने कायम ठेवली. त्यामुळे पुढे शूटींगच्यावेळेला अत्यंत intense scenes च्या वेळेलासुद्धा अश्विन एकदम relax असायचा.

नेहमी भेट झाल्यावर काय काय झालं, संदीपकाका काय काय बोलला असं सगळं त्याला लिहून ठेवायला संदीपने सांगितलं होतं. कधी कधी संदीप त्याला प्रश्नही द्यायचा ज्याच्याबद्दल पुढच्या वेळेपर्यंत त्याने लिहून आणणं अपेक्षित असायचं. हे प्रश्न म्हणजे 'मग आता परश्यचं काय झालं? आजचा गोष्टीतला जो भाग होता त्याबद्दल तुला काय वाटतं? आज आपण अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे तुला कसं वाटलं?' विविध स्वरूपाचे असायचे. वय वर्ष सहा, इयत्ता दुसरी या वयाला साजेसं, जमेलसं तो त्यात लिहायचा. अर्थात तो काही अभ्यासू विद्यार्थी नव्हता ( thank god! ). कधी कधी कंटाळाही करायचा. कधी कधी वात्रटासारखं "मला झोप आली म्हणून आईला लिहायला सांगितलं." असं उत्तरही यायचं त्याच्याकडून किंवा एकदा वहीची दोन पानं मोठ्ठ्या अक्षरात 'काही नाही' असं लिहिलं होतं त्याने. मग संदीपकडून एखादी खरीखुरी किंवा शाब्दिक चापटही खायचा तो तेव्हा पण एकुणात त्याने पटकथा, परश्या हे सगळं पचवायला सुरूवात केली होती हे नक्की.

दूध जमा करून घेणारा माणूस



हा फोटो हुमरस (सिंधुदुर्ग) येथील एका दूध डेअरीचा आहे. वेळ पहाटे ५:३०-६ दरम्यानची. म्हणायला डेअरी असली तरी हे दुधाचे कलेक्शन सेंटर आहे. पहाटे ५:३० ला हा माणूस या टेबलावर येऊन बसतो. सगळी उपकरणी मांडून. दूध घेऊन आलेल्या लोकांच्या दुधातलं फॅट कन्टेन्ट मोजतो आणि दूध जमा करून घेतो. गेली २५ वर्ष तरी हा माणूस हे न चुकता रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन तास करतो.

कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्सचा L 15. पूर्णपणे ऑटो. फ्लॅश वापरलेला नाही. मागच्या पडवीमधे एक ट्यूबलाइट चालू होती तिचाच काय तो उजेड. मूळ फोटो हा रंगीत असला तरी पहाट असल्याने रंग फारसे डिफाइन्ड नाहीयेत. मूळ फोटो ब्लू मोनोक्रोमॅटीक दिसतो. फोटोशॉपमधे मोड चेन्ज करून ग्रेस्केल ला आणलाय आणि ब्राइटनेस व कॉन्ट्रास्ट किंचित वाढवला

Thursday, September 24, 2009

माझा श्वास्’ – २

लग्नानंतर आम्ही गेलो मालवणला. मालवणच्या आसपासचा परिसर फिरत होतो. धामापुरच देऊळ ओलांडून तिथून मग नेरूरपार कडे येऊन काळश्याला खाली उतरून वनलक्ष्मीच्या बोटीतून कर्ली नदीमधे फिरून आलो. फार मस्त होता तो भाग. मला आपलं नवीन लग्न झालेल्या मुलिला जसं वाटावं तसं छान छान वाटत होतं तिथे फिरताना आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती. सगळ्या परिसराची बैजवार माहिती घेऊन ठेवली. काळश्याचे केशव सावंत, वनलक्ष्मीची बोट चालवणारे कोरगावकर, त्या परीसरातली हिरवाई, उन्हाच्या दिशा इत्यादी इत्यादी. एकाच ठिकाणी २-३ वेळा जाऊन आलो आम्ही ६ दिवसांत आणि ही एवढी माहिती... परत ओळख झालेल्या रिक्षेवाल्याबरोबर त्याचे गाव, खोताचे जुवे, सुरुचे बन इत्यादी बघून येणे, तिथल्या परिसराचे फोटो काढणे, माणसांशी ओळखी करून घेणे.. इत्यादी इत्यादी इत्यादी. दिग्दर्शकाच्या उत्साहाची लागण मलाही झाली. त्या भरात तपशीलवार माहिती लिहून घेणे, हे गाव त्या’ मुलाचं म्हणून योग्य वाटेल की नाही इत्यादी चर्चा दिग्दर्शकाबरोबर करणे हे सर्व मीही केलं. पण मग अचानक मला आठवल आपण हनीमून ला आलोय आणि location hunting करतोय लग्नानंतरचे पहिले कडाक्याचे भांडण यावरून झाले. ते अजूनही अधून मधून वर येते पण आता location hunting नसलेला second HM दिग्दर्शकाने मला प्रॉमिस केलाय आणि मी वाट बघतेय!!

मुंबईत परत आलो आणि संदीपच्या पायाला परत भिंगरी लागली. डॉ. पुणतांबेकर व कॅन्सरशी संबंधित इतर व्यक्ती नी संस्थांना भेटणे. स्वतःच्या notes काढणे. पटकथेची बांधणी करणे. हे सगळं सुरू झालं. मुंबईत तो लिखाण करत होता तेव्हा रोज सकाळी आम्ही डबा घेऊन निघायचो आणि वडाळ्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसायचो. रात्री ८ वाजता ग्रंथालय बंद व्हायचे. मग तेव्हा तिथून निघायचे आणि शिवाजी पार्क किंवा अजून कुठेतरी जाऊन कथेवर चर्चा किंवा कधी कॅमेर्‍याच्या movement बद्दल किंवा कधी general filmmaking मधला एखादा कुठला तरी मुद्दा घेऊन चर्चा करत असू. अजून माझा सहभाग चर्चेपुरताच जरी मर्यादीत असला तरी जे काही त्याच्या डोक्यात आकार घेतंय त्याच्या treatment ची थोडी कल्पना यायला लागली होती.

संशोधन हा कुठल्याही पटकथेचा महत्वाचा भाग असतो. इथे कथेची पार्श्वभूमी वैद्यकीय असल्याने त्या जगाबद्दल आतून समजून घेणे गरजेचे होते. फक्त कथेच्या अनुषंगाने येणारीच माणसे नाहीत तर त्या त्या जगातली सगळीच माणसे, त्यांचे आपसातले व्यवहार, त्यांची मानसिकता इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात. कथेतील महत्वाच्या आणि कमी महत्वाच्याही व्यक्तिरेखा ह्या त्यांच्या बारीक बारीक कंगोर्‍यांसकट खर्‍या वाटल्या पहिजेत. त्यांची प्रत्येक कृती तर्काला धरून असायला हवी. खरोखरिच माणूस वागेल तसे ते वागायला हवेत लेखकाने लिहिलय म्हणून नव्हे. प्रत्येक घटना ही आधीच्या घटनेनंतर सहजतेने येणारी वाटायला हवी. ह्यासाठी व्यक्तिरेखांचा तपशीलात अभ्यास करायची गरज होती. त्यासाठी संदीप डॉक्टर पुणतांबेकरांच्या बरोबर अक्षरश दिवसरात्र फिरत होता. स्वत डॉक्टर, त्यांचे असिस्टंटस, त्यांना भेटायला येणारे कॅन्सरच्या वेगवेगळ्या अवस्थेतले रूग्ण, सपोर्ट ग्रुप्स चालवणारे काउन्सेलर्स इत्यादी सगळ्यांना बघणे, भेटणे, सपोर्ट ग्रुप्स च्या मिटींग्ज अटेण्ड करणे, सिप्ला सेंटरमधील रूग्ण (सिप्ला सेंटर हे कॅन्सरच्या शेवटच्या स्थितील रूग्णांची काळजी घेणारे केंद्र आहे), त्यांचे नातेवाईक, तिथले डॉक्टर्स, सोशल वर्कर्स यांना भेटणे, बघणे अश्या अनेक पद्धतींनी संशोधन चालू होते.

पटकथेचा कच्चा आराखडा तयार होत आला आणि आता तपशील भरण्यासाठी, दृश्य अधिक जिवंत व्हावे यासाठी चित्रीकरणाच्या जागा निश्चित करणे गरजेचे होते. प्रत्येकाची लिहायची विशिष्ठ पद्धत असते. संदीप पटकथा लिहीत असताना मुंबईत एका जागी बसून लिहू शकत नाही. संशोधनामधे सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्याबरोबरच, घटना घडण्याचे अवकाश(स्पेसेस) शोधत जाणे, त्यातून त्या त्या अवकाशाचे आणि पर्यायाने घटनेचे कॅरेक्टर निश्चित करत जाणे हि प्रक्रिया संदीपसाठी गरजेची असते. हॉस्पिटल म्हटले की कुठलेही हॉस्पिटल किंवा नुसते पांढरे पडदे लावून चालत नाही. प्रत्येक घटना कुठे घडते यावर ती कशी कशी घडते हे अवलंबून असते. हे सगळे काम साधारण सप्टेंबर ऑक्टोबर २००२ च्या दरम्यान सुरु झाले. आणि त्या त्या ठिकाणाची तपशीलवार माहिती जमवणेही. यावेळेला मग संदीपबरोबर मीही वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या फेर्‍या मारू लागले. लोकेशनची तपशीलवार माहिती म्हणजे प्रत्येक भागाचा बारीक बारीक गोष्टींसकट नकाशा किंवा चित्र काढणे. आत असेल तर दारे, खिडक्या, वस्तू आणि बाहेरची जागा असेल तर झाडे, कुंड्या, रस्ता सर्व काही. नैसर्गिक (खिडकीतून वा परावर्तित होऊन येणारा सूर्यप्रकाश) व कृत्रिम(वेगवेगळ्या प्रकारचे दिवे) अश्या प्रकाशाच्या sources ची माहिती लिहून ठेवणे. दिशांसकट हे सगळं टिपून ठेवायचं. बरोबर संदर्भासाठी फोटो जोडायचे. असा सगळा कार्यक्रम असायचा. दिवसातल्या आणि वर्षातल्या कुठल्या वेळेला ती ती जागा कशी कशी दिसेल याचा अंदाज येण्यास यातून मदत होते कारण अर्थातच सप्टेंबर मधे असलेली परिस्थिती फेब्रुवारि मधे रहाणार नव्हती. अर्थात ऋतुबदलाने बदळणारी परिस्थिती हे outdoor locations च्या बाबतीत जास्त महत्वाचे ठरते.

चित्रपटाच्या आर्थिक आधारासाठीही धडपडणे चालू होते. सुरूवातीला मिळालेला आधार हा संपूर्ण नसणार हे माहित होते त्यामुळे बाकीचा बराच मोठा भाग उभा करण्यासाठी यत्न चालू होते. अनेकांशी अरूण आणि संदीप बोलत होते. काहीजण पुढे येत होते आणि एकदोन मिटींग्ज नंतर गळत होते. अरूणच्या ओळखीतल्या एका हितचिंतकाने interest दाखवला. अनेक मिटींग्ज संदीपने केल्या त्यांच्याबरोबर आणि त्यांना ह्या project चे महत्व पटले, संदीपची passion लक्षात आली आणि त्यांनी उरलेली सगळीच आर्थिक अडचण दूर केली. ही घटना ३-४ ओळीत सांगितली असली तरी हे सगळे साधारण २००२ च्या जूनपासून डिसेंबरपर्यंत चालू होते.

असा सगळा माहौल हळूहळू तयार होत होता. याच्याबरोबर पात्रयोजनेतला सगळ्यात crucial भाग म्हणजे लहान मुलगा, त्याचा शोध चालू होता. तो मिळत नव्हता. त्यावेळेला आजूबाजूला दिसत असलेल्या बालकलाकारांच्यात कोणीच योग्य वाटत नव्हता.

-नी

Wednesday, September 23, 2009

माझा 'श्वास' – १

'श्वास' या चित्रपटाने २००४ मधली बहुतांश सर्व पारितोषिके, राष्ट्रीय पुरस्काराचं सुवर्ण कमळ मिळवून इतिहास घडवला. भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट.
या चित्रपटाचा प्रवास मी खूप जवळून अनुभवला. वेशसंकल्पक या नात्याने तसेच इतर अनेक पातळ्यांवर माझे योगदानही दिले. हा माझा प्रवास मी शब्दबद्ध करतेय 'माझा श्वास' या लेखमालेत.
-------------------------------------------------------------------------------------
"आपल्याला इ-टीव्ही साठी एक टेलिफिल्म करून द्यायची आहे. स्पंदन या स्लॉटसाठी. त्या आंधळ्या मुलाच्या गोष्टीवर." एक दिवस संदीप ने सांगितले. ऑक्टोबर २००१ मधली गोष्ट ही. त्याआधी महिनाभर त्याने मला आंधळ्या मुलाची गोष्ट ऐकवली होती. तेव्हा मी नुकतीच परत आले होते भारतात आणि आता काम सुरू करायचे, चांगले कामच करायचे अश्या विचारात होते. होणार्‍या नवर्‍याबरोबर एकत्र काम करण्यासाठीही उत्सुक होते.

त्या गोष्टीतला विचार खूपच छान होता. आणि संदीप ज्या पद्धतीने तो विचार पुढे यावा यासाठी ती treat करू पहात होता ते खूपच interesting वाटत होते.

माधवी घारपुरे यांच्या काही कथा त्यांनी संदीपकडे वाचायला पाठवल्या होत्या. त्यातली संदीपला potential वाटलेली ही एकमेव गोष्ट. य गोष्टीत एक सच्चा आणि enriching अनुभव देण्याच्या शक्यता संदीपला जाणवल्या होत्या. मग संदीपने या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा असं कळलं की पुण्यातले प्रसिद्ध कर्करोगतज्ञ व सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर हे त्यांच्या सुरूवातीच्या काळात जेव्हा मुंबईत टाटा’ मधे होते तेव्हाचा त्यांचा हा अनुभव आहे.

तर अश्या ह्या कथेवर आधारीत एक टेलिफिल्म करायची आहे. साधारण डिसेंबर मधे शूट असेल, असं संदीपने सांगितल. आणि लवकरच आम्हाला कळल की इ-टीव्ही ने तो स्लॉटच बंद केलाय. त्यामुळे आता ती टेलिफिल्म होणे नाही.

असंच होत होतं संदीपच्या बाबतीत दर वेळेला. हाती येतेय असे वाटतंय तोच समोरून काम निघून जावे असे प्रत्येक project मधे होत होते.

पण संदीपला मात्र या कथेने, यातल्या अनुभवाने घेरून टाकले होते. इतक्या सहजासहजी हे project सोडून द्यायला तो तयार नव्हता. त्यामुळे या कथेवर feature film करावी असे त्याच्या मनाने घेतले.

साधारण डिसेंबर २००१ च्या सुमारास अरूण (नलावडे) आणि संदीप यांच्यात बोलणे झाले की एखादी छोट्या बजेटची फिल्म असेल तर करता येण्यासाठी आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यावर संदीपने ही आंधळ्या मुलाची गोष्ट अरूणला सुचवली. दोघांचेही ही फिल्म करायची असे ठरले.

संदीप संशोधनाच्या कामाला लागला. डॉक्टरांचा मूळ अनुभव, कॅन्सर, हॉस्पिटल, लहान मुलाचे भावविश्व, तो गावाकडचा होता पण गाव कुठच हे ठरवणं… एवढ्या सगळ्या गोष्टींवर अगदी खोलात जाऊन संशोधन करायची गरज होती. 'तेवढं नाही केलं तर ते खरखुर कसं वाटणार. त्य कथावस्तुची dignity कशी पाळली जाणार? त्यामुळे ते करायलाच हवे' इतका साधा सोपा approach होता संदीपचा.

मार्च २००१ मधे आमची engagement झाली. ठरलं होतं आधीच फक्त घरच्यांसाठी सोपस्कार पार पडले. त्याच वेळेला या गोष्टीवरच्या फिल्म साठी चक्र जोरात फिरायला लागली होती.

संदीप दिवसचे दिवस पुण्यात येऊन रहात होता डॉ. शैलेश पुणतांबेकरांना भेटण्यासाठी. ते बिचारे पडले बिझी सर्जन आणि कर्करोगतज्ञ. पेशंटस, ऑपरेशन्स यातून एका सिनेमासाठी ते किती वेळ देऊ शकणार होते. त्यामुळे अनेकदा ठरलेल्या appointments cancel व्हायच्या. पण संदीप चिकाटीने थांबून रहायचा त्यांच्यासाठी. मला आठवतंय अशी कधी ठरलेली meeting cancel झाली की मी जाम चिडायचे, ‘ते असं कसं करू शकतात?’ म्हणून.. पण तोवर मला त्यांचे आयुष्य माहित नव्हते. आणि आता माहित झाल्यावर त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल फारच आदर वाटतो.

मे २००२ मधे आमचं लग्न झालं. या मधल्या वेळात संदीप त्या संशोधनात इतका गुरफटायला लागला होता की मला वाटल ह्याला लग्नासाठी दोन दिवस तरी काढता येणारेत की नाही! मग तेव्हढ्यात मलाही एक छोटं project मिळालं होतं मुंबईमधे त्यामुळे मी लग्नासाठी वेळेत पुण्यात पोचणार आहे की नाही अशी भिती मला वाटायला लागली. पण तस काही न होता आम्ही वेळेत पोचलो आणि लग्न झालं. लग्नाच्या आधी २-३ दिवस डॉक्टरांकडे संदीप गेला होता. त्यांनी त्याला सांगितले की 'असं कर आता २४ तारखेला तू ये. त्यादिवशी तुला अजून काही पेशंटस भेटतील.' संदीप हो’ म्हणता म्हणता थांबला (बहुतेक माझा चिडलेला चेहरा आठवून…) आणि म्हणाला, "२४ च्या ऐवजी नंतर थोडे दिवसांनी चालणार नाही का?" डॉक्टरांना कळेना याला काय झालं अचानक. त्यांनी विचारलं, "का?" "नाही एक छोटासा problem आहे. त्याच दिवशी माझं लग्न आहे, त्यामुळे जमणार नाही." (पण नसेल नंतर शक्य, तर मी येईन थोडा वेळ काढून.. हे वाक्य त्याने भितीनेच गिळले असावे..) डॉक्टर हसू लागले. "कृपया पुढचे १५ दिवस तरी येऊ नका इथे." असा दम दिला असावा त्यांनी कारण लग्नानंतर चक्क १०-१२ दिवस संदीप त्यांच्याकडे गेला नाही.

-नी

Tuesday, September 22, 2009

गुंडाळलेल्या कापडाची कहाणी!!

लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्‍या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता.

'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला शिकणं, नेसणं, नेसवणं हे ओघानेच आलं. मग कधी जाणता राजामधे लावण्या नाचता नाचता दोन एन्ट्र्यांच्यामधे घड्याळ लावून पाच मिनिटात घुंगरू, नव्वारी शालू उतरवून परत दुसरा शालू नेसून घुंगरू बांधून परत नाचायला तयार इत्यादीची प्रॅक्टीसही गरजेप्रमाणे करून झाली. नव्वारीमधला अवघड आणि गूढ पणा संपला. पण खानदानी पणा रूजून राह्यला.

पुढे नाटकसिनेमातलं कापडचोपड हाताळायच्या धंद्यात उतरायचं ठरवलं तेव्हा सगळ्याच वस्त्राभूषणांचा अभ्यास डोळसपणे सुरू केला. आणि आपल्या म्हणजे भारताच्या वेशभूषेच्या प्रवासाने मोहवून टाकलं.
लांबलचक कापड अंगावर वेगळ्या वेगळ्या जागी गुंडाळायच्या, लपेटायच्या केवढ्या त्या तर्‍हा, त्यातली कला, त्यातलं सौंदर्य, त्यातली उपयुक्तता सगळंच अचंबित करणारं होतं.

तिथे कुठेतरी हे ही ठळकपणे जाणवलं की अरे नव्वार हे काही साडीचे, नेसायच्या पद्धतीचे नाव नाहीच्चेय. ते साडीचे माप आहे केवळ. आणि मग आपसूक नव्वारीचा बोली भाषेतला संधी फोडून नउवारी असं म्हणायला सुरूवात झाली.

पुढे अभ्यासत जाताना जगभरातल्या इतर प्राचीन संस्कृतींमधील वेशभूषा आणि भारतीय वेशभूषा यांची नकळत तुलना होत असायची. प्राचीन ग्रीक, रोमन, असिरीयन, इजिप्शियन, बॅबिलोनियन इत्यादी सगळ्याच वेशभूषा आणि भारतीय वेशभूषेत साम्यस्थळं पण अनेक आढळली. प्राचीन रोमन वेशभूषेमधे तरूण स्त्रियांच्या डोक्यावर ओढणीसारखं काही असे डोकं झाकण्यासाठी त्याला 'पल्ला' म्हणतात ज्याचा आपल्याकडे अर्थ पदर असा होतो अश्या काही गमती सापडल्या.

सगळ्या प्राचीन युरोपियन व पर्शियन वेशभूषांच्यात मात्र सापडली नाही ती एक गोष्ट म्हणजे 'कासोटा' किंवा कपड्याचे 'दुटांगीकरण'.

प्राचीन भारताच्या बाकी भागात हे 'दुटांगीकरण' प्रकर्षाने दिसून येतेच. पण प्राचीन भारताचा विस्तार आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे तेव्हाच्या गांधार देशापर्यंत मानला जातो. या गांधार देशात सुद्धा कपड्याचे 'दुटांगीकरण' अस्तित्वात असल्याचे भरपूर पुरावे मिळतात. हे 'दुटांगीकरण' बहुतांशी धोतर नेसल्यासारखे, एक पदर मागे कासोटा म्हणून नेणे आणि दुसर्‍या पदराचा पुढे पंखा करणे किंवा खरंच पदर म्हणून वापरणे असं दिसतं. किंवा धोतरासारखे दुटांगीकरण आणि दुसरे वेगळे वस्त्र वरचे शरीर झाकायला असं दिसून येतं. स्त्रिया व पुरूष दोघांच्याही अंगावर याच प्रकारचे 'दुटांगीकरण' दिसून येते.
गुप्त काळात मात्र (early 4th cent to mid 8th cent AD) आपल्याला आपल्या ओळखीची दुटांगी साडी दिसून येते. हिचे दुटांगीकरण हे धोतरापेक्षा वेगळे आहे आणि तेच कापड सलगपणे पदरापर्यंत गेलेले आहे. तेही अजंठाच्या लेण्यात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात. आता ही साडी खरोखरच नऊवारी होती की नाही ते मात्र सांगणं कठीण आहे. पण त्या गूढ, अवघड आणि खानदानी प्रकाराचा पहिला बिंदू हा धरायला हरकत नाही.

ही पद्धत नक्की कशी आहे याचं गूढ अनेकांना असेलच त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात म्हणजे आपल्या नेहमीच्या साडीसारखीच सुरूवात करायची. पण साडीची लांबी मोठी असल्याने ज्या भरपूर निर्‍या येतात त्यांचा मध्य काढून तो दोन पायांच्या मधून मागे नेऊन कमरेपाशी खोचायचा. झाली बेसिक पद्धत. कमरेशी खोचताना निर्‍यांची दिशा मात्र आपल्या नेहमीच्या साडीपेक्षा उलटी ठेवायची, पदराची एक कड उजव्या खांद्याच्याखालून तर दुसरी कड गुढघ्याच्या खालून डाव्या खांद्याकडे यायला हवी, पदर खूप मोठा काढायचा नाही, पदर मागे एका रेषेत असता कामा नये तर तो दोन खांद्यावर/ डोक्यावर घेतल्यावर मागे एक समान पातळीवर यायला हवा अशी काही महत्वाची पथ्य पाळायला शिकलं की बास.

याच साडीचा उजव्या पायावरचा घोळ उचलून डाव्या बाजूला कमरेपाशी खोचून पंखा तयार केला आणि पदर केवळ दोन्ही खांद्यावरूनच घेतला की झाली ब्राह्मणी नऊवारी.

दोन्ही पायांवर साडी चापूनचोपून घट्ट बसवली आणि मागच्या काष्ट्याला दोन्ही काठ एकाला एक लावून बसवले की झाली नाचकामाची साडी.

दोन्ही पायांवरून घोळ उचलून त्या त्या बाजूला कमरेपाशी खोचले आणि पदर डाव्या खांद्यावरून मग डोक्यावरून आणि मग उजव्या खांद्याच्या खालून नेऊन कमरेशी टोक खोचलं की झाली कामकरी, शेतकरी बाई.

एक मोठा वेढा साडीच्या आत घडी घालून घेऊन मग निर्या आणि काष्टा घालायचा, दोन्ही पायावरचा घोळ किंचितसा उचलून कमरेशी खोचायचा. क्युलॉटस सारखी पोटर्‍यांपर्यंत साडी नेसायची. ही झाली सिंधुदुर्गातल्या ख्रिश्चन बायांची साडी.

वेगवेगळ्या पद्धतीने पायावरचा घोळ आटवून त्याचे मोठ्ठे खिसे करायचे, साडी अगदीच शॉर्टस च्या उंचीची होते. ही झाली गोवा आणि सिंधुदुर्गातल्या भागातली कामकरी लोकांची भातलावणीच्या वेळी, डोंगरात काम करतेवेळी नेसायची साडी.

या सगळ्या नेसण्यांमधे समान आहे ते म्हणजे साडीच्या एका टोकापासून सुरूवात करणे, कमरेभोवती गाठ मारून त्यावर साडी तोलणे आणि निर्‍या दुंभगून दुटांगीकरण करणे.

पण याबरोबरच नऊवारच साडी पण निर्‍या, गाठी असं काही न करता एकावर एक बरेच वेढे घेऊन नेसायच्याही काही पद्धती आहेत. सुरूवातीलाच काष्ट्यासाठी चांगला लांबलचक भाग ठेऊन द्यायचा आणि खूप सारे वेढे घ्यायचे. सगळे वेढे घेऊन संपल्यावर आतमधे काष्ट्यासाठीचा भाग दोन पायांतून मागे नेऊन सगळ्या वेढ्यांच्या वरून मागे कमरेशी खोचायचा अशी साधारण पद्धत. पदरासकटचे आणि पदराशिवायचे असे दोन्ही प्रकार यात दिसतात. ठाणे जिल्ह्यातले वारली आदीवासी, रायगडातले कातकरी आणि ठाकर आदीवासी, मुंबईच्या कोळणी, मुंबईतलाच आगरी समाज, रत्नागिरीतला कुणबी समाज, सिंधुदुर्गातला आणि गोव्यातला धनगर समाज अश्यांच्या साडी नेसायच्या पद्धती या दुसर्‍या पद्धतीत येतात.

भारतातलं विशेषतः मध्यभारतापासून दक्षिणेकडे हवामान उष्ण त्यामुळे अंगावरचं कापड चोपड हे हवा खेळती राहील असं हवं. आणि एकावर एक थर नसलेलं हवं यातूनच मोठ्या कापडाची एकच साडी दुटांगी करून नेसायच्या पद्धतीने जन्म घेतला असणार. एका नऊवार कापडामधे संपूर्ण शरीर झाकलं जातं तरीही दुटांगीकरण केल्यामुळे कसंही वावरायला, बसाउठायला काहीच प्रॉब्लेम नाही, काष्टा हा सगळ्या वेढ्यांच्या/ थराच्या वर असतो त्यामुळे नैसर्गिक विधींच्यासाठीही संपूर्ण साडी सोडायची गरज नाही. आणि शरीर झाकलं तरी शरीराची सगळी वळणं बरोब्बर अधोरेखित केली जातात. त्यामुळे स्त्री शरीराची कमनीयता, सौंदर्यही दिसून येते.

तसंच त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, कामधंदे इत्यादीचा विचारही त्या त्या नेसणीमधे दिसतो. कोकणामधे चिखल, पाणी जास्त त्यामुळे तिथल्या सगळ्याच पद्धतींमधे साड्या ह्या पायघोळ नाहीत. घोट्याच्या वरती किंवा क्वचित गुडघ्याच्या वरतीही जाणार्‍य पद्धती दिसतात. तसंच डोंगरदर्‍यांमधल्या बिकट वाटांशी दोन हात करत रोजचं जगणं जगायचं असल्याने कातकरी, धनगरी पद्धतींमधे कमरेभोवती बरेच वेढे घेऊन पाठीला आधार दिलेला दिसतो.

हे असं सगळं अभ्यासायला लागलं की पूर्वजांच्या बुद्धीबद्दलचा आदर वाढतो. त्यांचं निसर्गाशी समजून उमजून जगणं उलगडायला लागतं समोर. साड्या, त्यांचे तपशील हा एक भाग झाला पण निसर्गाशी पूर्वजांनी टिकवून ठेवलेलं नातं आपण जपायला पाहीजे असं कुठंतरी जाणवायला लागतं. काय म्हणता?

-नी

Monday, June 15, 2009

उजाड!!



विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..

-नी

Thursday, February 5, 2009

मिनीची आई

हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता. पुणे लोकसत्ता मधे प्रसिद्ध झाला होता पण त्यांनी संपूर्ण न छापता शेवटचा काही भाग जागेअभावी गाळला होता. तस्मात पूर्ण लेख इथे लिहित आहे.
--------

वाड्याच्या ओट्यावर छोटीशी मिनी बसलेली असते. आईला टाटा करत असते. मिनीची आई, गोरीपान, एक वेणी आणि खांद्याला पिशवी. "रडायचं नाही हं. अण्णांना आजीला त्रास द्यायचा नाही. आई क्लासला जाउन दोन तासात येईलच हं." आई सांगते. मिनी हसत हसत टाटा करते. आठवणींचा तळ गाठायचा झाला तर मिनीला आईची पहिली आठवण आहे ती ही. चांदणं फुलल्यासारखा आईचा लख्ख हसरा चेहरा मिनीला आजही लक्षात आहे.

गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरला रात्री मात्र ते चांदणं हरवलं होतं. आई हॉस्पिटलात होती. ती हसत नव्हती. चेहरा वेदनेनं पिळवटून निघाला होता. "नाही सहन होत गं आता. तुला माझा पॅनही उचलावा लागतो. कसतरी वाटतं." आईचा त्रास पाऊन मिनी कळवळली होती. पहाटे कधीतरी आईला ग्लानी आली होती. चेहर्‍यावर वेदनांचं जाळं. एवढीश्शी झालेली आई. बेडच्या बाजूला उभं राहून मिनी तिच्याकडे पहात होती. मिनी खूप घाबरली होती. लहानपणी दोन तासासाठी केलेला टाटा आता कायमचा तर ठरणार नाही ना ही भिती मिनीचा जीव खाऊन टाकत होती. आणि तसंच झालं ४ नोव्हेंबर २००७ च्या दुपारी सगळं असह्य होऊन आई अज्ञाताच्या प्रदेशात निघून गेली. आईच्याच एका कवितेतल्याप्रमाणे प्रकाशाची झाडं शोधायला.

१० वर्षं मिनीच्या आईनी आजाराशी लढाई केली. एका बाजूला लढत असतानाच विद्यार्थ्यांन समरसून शिकवणं, कॉलेजातले त्रास सहन करणं, स्वतःचा कवितासंग्रह प्रसिद्ध करणं, मिनीचं परदेशातलं शिक्षण आणि मग परत आल्यावर लग्न नी तिचे सणवार असं सगळं अगदी यथासांग पार पाडलं. हसतमुखानी. झाला त्रास उगाच ओठ मिटून सहन केला नाही आणि आपल्या त्रासाने सगळ्यांनी अडकावं असं अपेक्षिलंही नाही.

उगाचच त्यागमूर्ती बनण्यातलं फोलपण तिने वेळीच जाणवून दिलं होतं मिनीला पण स्वतःच्या पलिकडेही विचार करायचा असतो याचं प्रात्यक्षिक ती रोजच देत होती. चूल मूल किंवा नुसती खर्डेघाशी या पलिकडे अस्तित्व असायला हवं याची ठिणगी मिनीच्या मनात आईनीच पेटवलेली होती. मुलीच्या जातीला.. या पठडीतला राग आईनी कधी आळवला नाही. पण त्याचवेळेल मुलगी म्हणून बाहेर फिरताना काय काय सामोरं येऊ शकतं याबद्दल सावध मात्र नक्कीच केलं. दिवाळीचा फराळ, पापड, वाळवणं इत्यादी स्पेशल 'करण्या'च्या गोष्टीत मिनीला नको असताना आईनी कधी ओढलं नाही. वेळ येईल तेव्हा करशील नाहीतर मिळतं हल्ली सगळं विकत. इतका साधा दृष्टीकोन असायचा आईचा. मुलींना घरात ज्या ज्या गोष्टींमुळे अडकावं लागतं आणि मग बाहेर काही करण्यावर बंधनं येतात अश्या सगळ्या गोष्टीतून मिनीला आईनी मोकळं केलं होतं. घरत पाहुणे येणार आहेत, घरात अमुकतमुक व्रताची पुजा आहे असल्या सगळ्या वेळी 'शाळा/ कॉलेजची लेक्चर्स बुडवायची नाहीत. तू तुझ्या कामांना/ अभ्यासाला जा.' अशी मोकळीक आईनी दिलेली होती. पण आई बरीचशी महत्वाची व्रतवैकल्यं नेमाने करायची. अर्थात त्याचं फार अवडंबर न माजवता आणि फार घोळ न घालताच. उपास करणे म्हणजे पोटाला विश्रांती, सव्वाष्ण घालणे म्हणजे रोजच्यातली नसलेल्या कुणा ओळखीच्या बाईशी संपर्क असा साधा सरळ दृष्टिकोन असे. आणि यातल्या कुठल्याच गोष्टींचं मिनीवर बंधन असं नसे. वर्षातले दोन उपास मिनीला आई करायला लावायची पण पुढे दौर्‍यानिमित्त पुण्याबाहेर आणी मग नंतर शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर हे ही उपास सुटले तेव्हा त्याचा बाऊ तिने केला नाही. 'तुला पटतंय आणि झेपतंय ते कर. नाही केलं तरी काही बिघडत नाही.' इतकं साधं सरळ लॉजिक असायचं तिचं या बाबतीत.

झेपतंय तितकंच करण्याचं लॉजिक डोळसपणे जगण्याला लावलं नाही आईनी. जे जगतो ते विचारांच्यातही पटलेलं हवं हा तिचा आग्रह असायचा. मिनीच्या प्रत्येक कृतीवर ती प्रश्न विचारायची. भांडण व्हायची. मग मिनीही ते प्रशन घेऊन आपले निर्णय तपासायची. आपंच आभाळ स्वच्छ करत असायची.

वाचण्याचंही तेच. 'झेपणं बिपणं काही नाही वाचलंच पाहिजे.' हा आग्रह तिचा नेहमीच असायचा. मिनीची सगळ्यत मोठ्ठी चैन म्हणजे नेमाने मिळणारी गोष्टींची पुस्तकं. मिनी दोन दिवसात नवीन पुस्तकांचा फडशा पाडायची आणि परत आ वासायची. मुलगी वाचतेय या जाणिवेनं आई खुश व्हायची. अगदी लहान वयात मिनीला वेगळी लायब्ररी लावून दिली होती आईनी. तिथे जायचं, पुस्तक शोधायचं, बदलायचं सगळं काही एकदा दाखवून मग मिनीवर सोडून दिलं होतं. पण लहान वयात काय वाचतेय नक्की मुलगी याच्याकडे लक्ष असायचंच तिचं. वाचायच्या नादापायी मिनी बोलणीही खायची पण आईनी कधी पुस्तकापासून दूर नाही केलं मिनीला. वाचायची सवय आईनी लावलीच पण वाचलेल्यावर लिहायलाही लावलं. वाचलेल्यावर लिहिणं, परीक्षण म्हणजे काय याचे पहिले धडे १०-११ वर्षाच्या वयातच मिनीने आईकडूनच गिरवले होते.

वाचलेल्यावर लिहिण्याचे धडे गिरवता गिरवता मिनीनी आईकडून लिखाणाचेही धडे गिरवले. आईच्या मदतीने मिनीनी पहिली कविता लिहिली कधीतरी लहानपणी. आईनी कौतुक केलं. घरातल्या सगळ्यांना कविता दाखवली. पण मुलगी आता कवी झाली असं समजून डोक्यावर नाही घेऊन बसली. मिनीनी लिहायला हवं म्हणून मिनीच्या वेडेपणाच्या सगळ्या कळा सोसत राह्यली. असह्य झाल्या की आपल्या कवितेतून, लिखाणातून मोकळी होत राह्यली. मिनीला कवितेचं बक्षिस मिळालं, मिनीला फिरोदियामधे लिखाणाचं बक्षिस मिळालं.. एवढ्याश्या बक्षिसाने आई केवढी सुखावत रहायची. "तुला माझ्यापेक्षा चांगलं लिहीता येतं. तू लिहित रहा गं." आई म्हणायची. आईशी भांडायच्या काळात तिच्या प्रत्येक गोष्टीला नाकारताना मिनीनी लिहिणंही नाकारलं. आई कळवळली असणार पण काही म्हणाली नाही. आणि एकदा अचानक बांध फुटल्यासारखी मिनी लिहायला लागली. मग तिला मिळालेल्या बक्षिसाच्यावेळी आजारातही सगळं सहन करत मिनीसाठी समारंभाला आली होती. मिनीपेक्षा बहुतेक आईच खुश झाली होती.

तेव्हा वाटलं असेल का तिला की 'मुलीला आता सूर मिळाला तिचा. आता आपली गरज संपली' ? म्हणून गेली असेल का त्यानंतर महिन्याभरात निघून? प्रकाशची झाडं शोधायला असं सगळ्यांनाच सोडून जावं लागतं का? आईचा कवितासंग्रह हातात धरून मिनी विचार करते. उत्तरं मिळत नाहीत.

कसं जगायचं असतं आईशिवाय? निपचित अश्या आईकडे बघत मिनीनी आईलाच विचारलं होतं. आईनी काही उत्तर नाही दिलं. ती तशीच निपचित होती. हिरवी साडी, कपाळावर कुंकू, तोंडात तुळशीपत्र. सगळा शेवटचा साज मिनीने केला आईला. लहानपणी आई मिनीला तिटीपावडर लावून द्यायची ज्या प्रेमानं तसाच अगदी. आईचा चेहरा तेव्हा वेदनारहीत झाला होता.

मिनीला आईबरोबर शेवटपर्यंत रहायचं होतं. आगीच्या तोंडात आईचा देह अस ढकलून देताना पाह्यला तिने. त्या आगीत जाताना आईला खूप भाजलं असणार. आई त्रासली, ओरडली असेल. आपण काही करू शकलो नाही. विद्युतदाहिनीची झडप बंद झाली. आपण सगळे तिला तसंच तिथं सोडून निघून आलो. तिच्या एवढ्या हौसेच्या घरातून तिला बाहेर काढलं आपण आणि असं आगीच्या तोंडी देऊन आलो. मिनी आजही स्वतःला माफ करू शकत नाही.

आई नसलेलं हे पहिलं वर्ष मिनीच्या झोळीतलं. आईशिवाय जगणं हे ही आईकडूनच शिकतेय मिनी. मिनी खूप लहान होती. मिनीची आज्जी, मिनीच्या आईची आई आजारी होती म्हणून आईची धावपळ चालत असलेली मिनीला आठवतेय. मग एकदा मिनीनी विचारलं होतं "आज्जी कुठंय?" आईनी मिनीला समजावलं होतं, "आजी खूप आजारी आहे म्हणून तिला मामाकडे नेलंय." आईचा गळा कोंडला होता बहुतेक. मिनीला तसं कळलं नव्हतं पण परत हा प्रश्न विचारायला नको एवढं मात्र नक्की कळलं होतं. स्वतःच्या आईच्या आठवणी काढून हसणारी, उदास होणारी आई मिनीनी लहानपणापासून पाह्यली होती. स्वतःच्या आयुष्यातला हा मोठ्ठा खड्डा मिनीला कधी दिसू दिला नव्हता आईनी.

मिनीनी वचन दिलंय आईला. आईला भेटायला त्या आगीत शेवटी जाणारच आहे मिनी. आपला देह तिथे पोचेपर्यंत आईनी दिलेले वाचनाचे, लिखाणाचे, डोळसपणे जगण्याचे आणि आईशिवाय जगण्याचेही वळसे मिनी नक्कीच गिरवत रहाणार आहे.

-नी

Tuesday, November 11, 2008

स्वच्छतेच्या बैलाला..!!

मायबोलीच्या दिवाळी अंकात माझा 'स्वच्छतेच्या बैलाला..!!' हा लेख प्रसिद्ध झाला.
-------------------------------------------------------------------
"इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?"
प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता. अत्यंत त्रासिक चेहर्‍यापासून सुरू करून मग थोबाडावर एक गलिच्छ हसू घेऊन मुस्कटात मारल्यासारखं उत्तर जयंतने फेकलं.
"मला इतर कामं आधी करू देत."
'तुम्हा पोरींचे नखरेच जास्त, काम कमी..' इत्यादी सगळं तो मनात बडबडला असणारच. नखशिखांत घाण वाटली मला. थोडक्यात लेडीज टॉयलेट ही गरज नसून चैन होती. गरजेला कुठलाही आडोसा जवळ करणे हे अपेक्षित होते. स्टारच्या सगळ्या मागण्या अजिजीने झेलणार्‍या प्रोड्युसरला युनिटमधल्या बायांसाठी फिरते टॉयलेट किंवा जास्तीची व्हॅनिटी मागवणे परवडण्यासारखे नव्हते, असेही नाही. पण प्रॉडक्शन मॅनेजरचा हा घाणेरडा ऍटिट्यूड मला तसाही नवा नाही. कामाच्या निमित्ताने मी बरीच फिरते. शहरात आणि शहराबाहेरही. सगळीकडे हेच.

रेल्वे किंवा विमानाचा प्रवास असेल तर काही प्रश्न नसतो पण बस किंवा कारने जाणार असू तर प्रवासात पाणी पिणं हे संकट होऊन बसतं. पाण्याच्या एकेका घोटाबरोबर एकेक प्रश्न उगवत असतात. वाटेत टॉयलेट मिळेल ना? कमोड असेल की इंडियन? कमोड असेल तर निदान लेडीज वेगळं असेल ना? जे काही मिळेल ते स्वच्छ असेल ना? तिथल्या खिडक्या तुटलेल्या नसतील ना? तिथे हात धुवायला पाणी मिळेल ना? हजार गोष्टी. मग पाणी पिणं टाळायचं. 'खूप वेळ कंट्रोल आहे माझा' असं अभिमानानं म्हणायचं आणि अनेक रोगांना निमंत्रण द्यायचं.

सुरूवात कधी झाली बरं या सगळ्याची?? बरोबर.. शाळेपासून.
"बाई गच्चीला जाऊ?"
असं रूपालीने विचारल्यावर सगळा वर्ग फिसफिसला होता. आपण विचारलं तर आपल्यालाही हसतील त्यापेक्षा नकोच ते. सुट्टीपर्यंत थांबू. असं म्हणत पहिल्यांदा पायावर पाय ठेवून पुढचा तास काढला होता.
'गच्चीपाण्याच्या सुट्टीत खूप मोठी रांग असते.'
'खूप घाण वास येतो.'
'तिथे पाणीच नाहीये.'
'तिथे अंधार आहे. अंधारात काही असलं तर?'
अश्या अनेक कारणातून हळूहळू 'शाळेतून घरी गेल्यावरच काय ते बघू' हे अंगवळणी पडलं.

मग थोडंसं मोठं झाल्यावर शाळेच्या वेळातही पर्याय उरेना, डाग पडण्याची भिती असे. तेव्हा मनात दाटणारी सगळी घाण, सगळी मळमळ घेऊन आत जायचं. तिथला अंधार, तिथली जळमटं, तिथे पाणी नसणं किंवा असलं तरी ते डबडं घाण असणं, नापास होणार्‍या मोठ्ठाड मुलींनी कर्कटकानी कोरून ठेवलेलं विचारवाङ्मय आणि चित्र असं सगळं सगळं सहन करत आपला कार्यभाग उरकायचा. आईकडून तिच्या लहानपणी बाजूला बसण्याबद्दल ऐकलं होतं ते बरं असं वाटायचं. "हे जे काय तुमच्या शरीरात घडतंय ते काही घाण नाहीये. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं शरीर आई होण्यासाठी तयार होऊ लागलंय." असं 'त्या' लेक्चर्समधे सांगितलं होतं खरं पण त्या लेक्चर्सच्या बाईंना कुठे त्या टॉयलेटमधे जावं लागतं बदलायला. असं काय काय डोक्यात येऊन मग ते दिवस नुसतं घाण घाण वाटायचं.

लहानपणी आईबाबांच्या बरोबर प्रवासाला जाताना शक्य असेल तिथे रेल्वे असायची सुदैवाने. कारण मी नी बाबा दोघेही मोठ्ठे 'वकार युनूस!' त्यामुळे एसटीच्या भानगडीत आम्ही पडत नसू. पण आईबरोबर कोकणात जायचं तर एसटीनंच जावं लागायचं. एकदा तिसरी चौथीतली गोष्ट असेल. बरेच नातेवाईक मंडळी एकत्र कोकणात जात होतो. रात्रीचा खूप वेळाचा प्रवास. तोही एसटीने. आपापल्या आयांबरोबर एसटी स्टॅण्डवरच्या टॉयलेटमधे जायला आम्ही दोघी बहिणींनी नकार दिला. तिथली अवस्था काय वर्णावी. तिथे जायच्या रस्त्यावर बरंच आधी पुढे काय असणार आहे हे वासावरनंच कळत होतं. साधारण जिथून आडोसा सुरू होतो तिथे रात्रीचा मिणमिणता दिवा. खाली बघितलं तर जमीन सगळी ओली आणि कुठे कुठे साचलेलं पाणी नि त्यावर टाकलेली माती. पण एकाही नळाला पाणी नाही. आतली टॉयलेट्स फुटलेली नी कोरडी ठाक. आतमधे भरपूर जळमटं नि माती. त्यात एक बाई आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या बाहेरच काम उरकून मोकळी झालेली दिसली. तेव्हा ओली जमीन आणि साचलेल्या पाण्याचं गणित अगदी नीट कळलं. अश्या ठिकाणी जायला नकार दिल्यावर मग साधारण लहानपणी जे शक्य होतं ते म्हणजे पूर्णपणे बाहेर साधारण कडेचा भाग बघून सर्व भावंडांना एका लायनीत बसवलं होतं. एसटीच्या प्रवासातला हा सगळ्यात भीषण प्रकार तेव्हापासून डोक्यात बसला तो बसलाच.

शाळेनंतर कॉलेजमधे गेल्यावरही फार काही फरक नाही पडला. शाळा निदान फक्त मुलींची होती. भल्या मोठ्ठ्या शाळेच्या कुठल्याही दिशेचं टॉयलेट हे आमच्यासाठीच होतं. आता कॉलेजमधे झालं असं की क्षेत्रफळ वाढलं. वर्ग लांब लांब आणि आमच्यासाठी एकुलती एक एलआर(लेडीज रूम) ज्यात आत बरीच टॉयलेटस होती. म्हणजे दोन लेक्चर्सच्या मधे जाउन यायचं तर पुढच्या लेक्चरची पाचदहा मिनिटं गेली. नपेक्षा बंक मारलेला काय वाईट. त्यामुळे कधी टॉयलेटला जाण्यासाठी लेक्चर बंक तर कधी लेक्चरसाठी एलआरला जाणं बंक.

कॉलेजच्या काळातच नाटकासाठी दौरे, एनसीसी चे कॅम्पस इत्यादी सुरू झालं. मग 'हाल कुत्रे खात नाही' या म्हणीचा अर्थ चांगलाच लक्षात आला. दौर्‍यांना श्रीमंती थाट अर्थातच नसायचा. जिथे थांबू तिथे जसं असेल तसं टॉयलेट वापरायचं आणि निमूट पुढे जायचं. हेच अंगवळणी पडायला लागलं. अगदी त्या दिवसात सुद्धा. परत वर माझा आठ आठ तासाचा कंट्रोल आहे हे अभिमानानं मिरवायचं आपापसात. हीच गोष्ट कॅम्पची. १०-१२ दिवस ४००-५०० मुली जिथे रहाणार तिथे निदान बर्‍या टॉयलेट्सची, आंघोळीची सोय असावी असं त्यांना कधी वाटलं नाही. बहुतेक 'सैन्यात का घेत नाही तुम्हाला कळलं?' असं काहीतरी सांगायचं असेल त्यांना. पाणी कमी प्यायची सवय अशीच लागत गेली असावी.

शिक्षण संपलं. परदेशातलं शिक्षणही उरकलं आणि मुंबईत कामाला सुरूवात झाली. लग्नही झालं होतं. तेव्हा व्यवस्थित पाणी पिणे आणि एकुणात या सगळ्याच गोष्टींचा awareness, गांभीर्य इत्यादि कळून चुकलं होतं. पण म्हणून नष्टचर्य संपतं का? तर मुळीच नाही.

हल्ली प्रवास करताना वर म्हणल्याप्रमाणे by road असेल तर चिंताच चिंता असतात. अजूनही छोट्या ठिकाणची एस्ट्यांची टॉयलेट्स त्याच भयाण अवस्थेत असतात. अजूनही गावंढळ बायका आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या आडोश्याच्या भागातच बसतात. छोटेमोठे धाबे भरपूर असतात. पण तिथे टॉयलेट असतंच असं नाही. असलं तर एकच जे अंधारं, इकडनं झाकलं तर तिकडे उघडं पडतंय अश्या स्वरूपाचं आणि अतीव घाण असं असतं. चकचकीत हॉटेल शोधण्याशिवाय आणि तिथल्या माजोरीला तोंड देण्याशिवाय पर्याय नसतो. बर एवढं करूनही तिथे लेडीज टॉयलेट वेगळं असेलच आणि ते स्वच्छ असेलच याची खात्री नाही. पेट्रोल पंपावर लेडीज टॉयलेट वेगळं असतं ते बर्‍याचदा तिथे काम करणारी पोरं स्वत:चं खाजगी टॉयलेट म्हणून वापरतात. आडवळणाच्या प्रवासात असल्या ठिकाणी जाण्यापेक्षा झाडाझाडोर्‍याचा, दगडांचा आडोसा शोधून तिकडे जाणे हे जास्त स्वच्छ वाटतं.

'प्रवासात कुठे थांबायचं?' यावरून आमच्या दोघांच्यात (मी आणि नवरा) एकतरी प्रेमसंवाद ठरलेला असतो. आजवरच्या अनुभवाने मी paranoid असते की हा कुठेतरी भयाण जागी थांबवणार गाडी. किंवा ड्रायव्हरने थांबवली अश्या कुठल्याही जागी तर त्याला काही म्हणणार नाही. मग होतं miniature World War III. नवरा बरोबर नसेल आणि बरोबर केवळ ड्रायव्हर असेल किंवा असे लोक असतील की ज्यांना योग्य टॉयलेट हवं असं मी सांगू शकत नाही किंवा सांगितलं तरी त्यांच्या स्वच्छच्या व्याख्या वेगळ्या असतात तर मग मी केवळ देवाची प्रार्थनाच करू शकते. सगळा प्रवास याच टेन्शनमधे. कधी निर्लज्जपणे याबद्दल बोललेच तर मग वरती शूटवरचा जो अनुभव दिलाय त्याची पुनरावृत्ती. अगदी ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर फिरतानाही यात काही फरक नाही.

हा प्रवासातला अनुभव पण मुंबईतल्या मुंबईत फिरताना होणारी फरपट काही कमी नसते हो. कापडाचं, कपड्याचं मार्केट एका ठिकाणी तर टेलर दुसर्‍या ठिकाणी, डाय करणारा अजून तिसर्‍या ठिकाणी. प्रॉडक्शनचं ऑफिस अजून एका ठिकाणी. अशी त्रि च नाही तर अनेकस्थळी यात्रा मला एका दिवसात पार पाडायची असते. पाण्याची बाटली बरोबर ठेवलेली असते पण पुढच्या दोन तासात टॉयलेट मिळेलच याची खात्री नसतेच. सुलभची अवस्था काही ठिकाणी बरी म्हणावी इतपतच आहे. पण तिथेही माझ्या हातातली खरेदीची (कामाच्या खरेदीची) बोचकी ठेवायची कुठे हा प्रश्न असतोच. लोकलच्या स्टेशन्सवरची टॉयलेटस हा एक मोठ्ठा विषय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने चर्चेला घेतला होता, तेव्हा त्या लेखातून मिळालेलं चित्र भयाण होतं. अर्धवट फुटलेल्या भिंती, पाणी नसणं, लेडीज टॉयलेट हे सगळ्यांच्या नजरेसमोर असणं, खिडकीच्या जागी फक्त रिकामा चौकोन, लेडीज टॉयलेटमधे छक्के, गर्दुले, दलाल, बेघर कुटुंब यातल्या कुणाचं तरी राज्य असणं हे सगळं सगळं त्यात फोटोसहित होतं. कुणीतरी विषयाला तोंड फोडलं यावर बरं वाटलं होतं पण नंतर काहीच नाही. रेल्वे प्रशासन किंवा अजून यासंदर्भातले इतर विभाग यातल्या कोणालाच त्याविषयी काही करावं असं वाटलं नाही. माझ्यासारख्या अनेक जणींच्या रोजच्या hygiene शी संबंधित असलेला हा विषय कुणालाच लक्ष घालावं इतका महत्त्वाचा वाटला नाही.

मॉल्स, मॅक्डोनाल्डस, सिसिडी, बरीस्ता इत्यादी यांचा चंगळवादाशी संबंध जोडा तुम्ही पण त्यांनी आमची किंचित का होईना सोय बघितलीये हे विसरता कामा नये. कारण फिरत असताना अधेमधे कुठे खावं आणि तिथेच टॉयलेट वापरावं तर अनेक छोटी छोटी हॉटेल्स तर बिना टॉयलेटचीच असतात. मॉल्स सोडा पण या बाकीच्या ठिकाणचं टॉयलेट वापरण्यासाठी मला एका वेळेला किमान ५० रूपये त्या त्या ठिकाणी खर्चावे लागतात त्याचं काय! दिवसाला केवळ टॉयलेटला जाता यावे म्हणून दिडशे दोनशे (किंवा गरजेनुसार जास्त) रूपये खर्च करणे हे कुणाला नि कसं परवडावं? गरोदर बाया काय करत असतील अश्या वेळेला? हे सगळे प्रश्न चिवचिवत रहातातच.

बर मॉल्स सोडून या इतर ठिकाणी लेडीज आणि जेन्टस अशी वेगळी टॉयलेटस नसतात. आणि त्यातून तो कमोड असतो. डिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर ही आपल्याकडे अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. आणि टॉयलेट पेपर बहुधा संपलेलाच असतो. कमोडची सीट वापरताना वर ठेवावी हे बहुतांशी भारतीय पुरुषांना माहीत नसतं किंवा ते तसं करणं हे त्यांच्या इगोला झेपण्यासारखं नसतं. त्यामुळे अश्या ठिकाणी जाणं हे अनेक रोगांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. "शेवटी आपल्याला तिथे बसायचं असतं. कसलंही infection आपल्यालाच आधी होणार ना!" एका मैत्रिणीचं वाक्य सतत पटत रहातं. सीसीडी वा बरिस्ताच नव्हे तर अनेक मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्स मधे नियमानुसार असायला हवे म्हणून एक टॉयलेट असते, जे कुक, साफसफाई करणारी पोरे, इतर स्टाफ आणि ग्राहक असे सगळ्यांसाठीच असते. आता हे असे कमोडवाले टॉयलेट बायकांनी वापरायच्या लायकीचे असेल का याचा तुम्हीच अंदाज घ्या. आणि हे केवळ उडपी टाइप्सच्या हॉटेल्सबद्दल नाही तर दादर, पार्ला, जुहू, लोखंडवाला अश्या ठिकाणची 'अपमार्केट' म्हणता येईल अशी रेस्टॉरंट्स पण आहेत जिथे टॉयलेट मात्र एकच आहे. त्यामुळे चांगल्या कॉफीशॉपमधे बराच वेळ बसायचं असेल तर मग मेरियाट किंवा ऑर्किड किंवा तशी ४-५ तारेवाली हॉटेल्स बरी पडतात. कारण तिथे वेगळी वेगळी टॉयलेटस असतात आणि एकदम स्वच्छही असतात. पण हे ज्याला परवडेल त्याला. सामान्य उत्पन्न असलेल्या बाईने बाहेर 'जाऊच' नये का मग? आणि गेली तरी पाणी पिऊ नये, प्यायलंच तर भरपूर चालावं उन्हातून म्हणजे घाम येउन जाईल आणि जायची गरजच भासणार नाही? आणि पिरीयडच्या दिवसात तर घराच्या बाहेर पडूच नये?

पॅथोलॉजीवाली डॉक्टर मैत्रिण माझ्याशी गप्पा मारत होती.
"मधे एक केस आली होती. २०-२५ वर्षांची मुलगी. युरिन एकदम व्हाईट. पासिंगच्या वेळेला जळजळ प्रचंड. मी तिला विचारलं की पाणी पितेस का भरपूर तर म्हणे कसं पिणार? फिरण्याचा जॉब माझा. जाणार कुठे? ती मुलगी सकाळी घरून निघायच्या आधी जायची ते पार संध्याकाळी घरी येईपर्यंत तशीच. पण एकुणातच अश्या कारणांनी युरिन इन्फेक्शन असण्याचं प्रमाण खूप वाढलंय."
"काय करणार गं. नसतंच शक्य कुठे जाणं. थांबावंच लागतं. कंट्रोल ठेवावाच लागतो."
"पण याचे परिणाम काय होतील कळतंय का? एकतर हे असलं इन्फेक्शन म्हणजे त्रास. बर तेवढ्यावर भागत नाही. उद्या या मुलीचं लग्न होणार. सगळ्या गोष्टी शेवटी एकाच जागी. किती त्रास? आणि pregnant राहिल्यावर हे असं न जाणं म्हणजे तिच्या आणि बाळाच्या आरोग्याशीही खेळच की गं."
"पण मग करायचं काय नि कसं? सगळं सोडून घरी बसणं हा तर उपाय होत नाही ना!"
या वाक्याशी सगळं संभाषण संपलं. अनुत्तरितच.

नाही, हे नखरे नाहीत किंवा अतिस्वच्छता नाही. पंचतारांकित सोयींची अपेक्षाही नाही. किमान सुविधांची गरज आहे.
पूर्वीच्या बायका कसं करायच्या हा युक्तिवादही उपयोगाचा नाहीये. कारण, पूर्वीच्या बायका पण प्रवास करायच्या आणि हे सगळं सहन करायच्या. पण एकतर त्यांनी लाजेकाजेपोटी हे सहन केलं असेल आणि कदाचित आम्ही आज जितक्या फिरतो तितक्या त्या सगळ्या फिरत नसणार त्यामुळे ह्या समस्या तेव्हा काहीजणींच्याच असणार.

एवढा त्रास होतो तर बसा घरातच असं काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसं म्हणतीलच पण तेही उत्तर नाही, निश्चितच नाही. गरजेच्या वेळेला लेडीज टॉयलेट मिळणं ही एक बेसिक गोष्ट आहे. हा बेसिक हक्क आहे. आणि दुर्दैवानं हे आपल्या विविध व्यवस्थांपैकी कुठल्याच व्यवस्थेत महत्त्वाचं मानलेलं दिसत नाही. कुणालाच त्याचं महत्त्व जाणवत नाही.

मग काय करायचं? आपण आपलं भरपूर पाणी प्यायचं नि आपले आपल्याला परवडतील आणि झेपतील असे उपाय शोधायचे हे नक्की. मग ते मॉल मधे घुसणे, प्रत्येक उपनगरात एक तरी ओळखीचं घर मॅनेज करणे, सगळी किळस बाजूला ठेवून सुलभमधे शिरणे, हॉटेलमधे किंवा ऑफिसेसमधे गेल्यावर निर्लज्जपणे टॉयलेट विचारणे, टॉयलेट विचारल्यानंतर उत्तर देणार्‍याच्या चेहर्‍यावरचे सगळे घाणेरडे भाव दुर्लक्षित करणे, प्रवासात/ बाहेरगावच्या शूटवर योग्य टॉयलेटसाठी भांडण करणे यातले काहीही असो... आणि त्यातूनही चिडचिड उरलीच तर असा लेख लिहायचा...

तेव्हा (हातामधे प्यायच्या पाण्याची मोठ्ठी बाटली घेऊन) स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाने.... चांगभलं...! चिअर्स...!!

-------------------------------------------------------------------------------


लोकांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्याच पण या संदर्भात काही करायला हवे ही भावना मूळ धरू लागली. त्यानुसार या विषयावर एक चर्चाही सुरू केलीये मायबोलीवर. लेख आणि चर्चा दोन्हीची माहिती तुम्हाला कळावी म्हणून ब्लॉगवर दुवे टाकतेय. जरूर वाचा. तुमच्या मनात काय येतंय तेही आम्हाला कळूद्या. मायबोलीवर वा इमेलने आम्हाला कळवा. सहभागी व्हा.
-नी

Saturday, November 8, 2008

व्हॉट काइंड ऑफ आयडीया दुबेजी इज....

कालची मेजवानी....
द दुबे शो
स्थळ - पृथ्वी थिएटर, जुहू
सादरकर्ते/ सूत्रधार - सुनील शानबाग आणि आकाश खुराना.

दुबेजींच्या कारकिर्दीचा लेखाजोखा. त्यांच्या अभिनेत्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार. जुनी क्लिपिंग्ज. दुबे आणि वर्कशॉप्स आणि त्यातले excercises. all the things that hee keeps saying and he has said before... important, eccentric.. all of it. A real tribute to Dubeyji...त्यांच्या सगळ्या स्टुडण्टस कडून.. रत्ना पाठक शहा, सुलभा देशपांडे, नीला भागवत, उत्कर्ष मजुमदार यांच्यासारख्या दिग्गजांनी सांगितलेल्या आठवणी, त्रिशला, दिव्या आणि इरा या आमच्या पिढीतल्या दुब्यांच्या मुलींनी शेअर केलेल्या गोष्टी. किशोर कदमचं दुब्यांबद्दलचं बोलणं. सातासमुद्रापलिकडून अलकनंदा समर्थ यांनी पाठवलेली क्लिपिंग्ज आणि आठवणी, चेतन जायच्या आधी त्याने दुबेजी आणि सावल्याच्या प्रोसेस विषयी बोललेलं त्याचं क्लिपिंग (इथे मात्र I choked) दुब्यांच्या नाटकातले काही तुकडे.... असं अजून खुप सारं.. आणि हे सगळं बघताना प्रेक्षकांच्यात बसलेल्या दुबेजींची expressions बघत राहणं..
२ तास... खूप मज्जा, खूप दंगा, आपल्या गुरूबद्दल परत एकदा खूप काही वाटणं, खाल्लेल्या शिव्या, घातलेले वाद आठवणं.... मोठ्ठी मेजवानी...

नंतर दुबेजींच्याबरोबर खूप उशीरापर्यंत गप्पा नेहमीप्रमाणेच..

Should Thank Sanjana and Prithvi for this..
Muahhh.. Love you Dubeyji!!

Sunday, November 2, 2008

दिवाळीचं लिखाण...

ऑनलाइन दिवाळी अंकाची प्रथा चालू करण्याचं श्रेय www.maayboli.com या संकेतस्थळाला जातं. मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंकाचं हे यंदाचं ९वे वर्ष. हा दिवाळी अंक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2008/

त्यात या ठिकाणी माझा लेख आहे. जरूर वाचा.
http://vishesh.maayboli.com/node/26

झुंजुमुंजु नावाचा एक दिवाळी अंक आहे. ज्यावर राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र मुखपृष्ठावर आहे. या अंकात पण माझी एक कथा आली आहे.

रेषेवरची अक्षरे हा एक मराठी ब्लॊगविश्वातल्या ब्लॊगज चा दिवाळी अंक आहे.
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1
यामधेही माझी एक कविता आहे.

Sunday, September 28, 2008

प्रिय मित्रा!!

क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या 'प्रिय' या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही

या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे....

-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच

हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखवून जाण्यासाठी..

या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भितीही वाटली.

प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?

सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!

-नी

Saturday, September 20, 2008

सूर्यास्त





गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.

Friday, September 19, 2008

ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी

"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

Tuesday, May 6, 2008

पोर्ट्रेट - मेराल्डिना



गेल्या आठवड्यात पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे 'मी एक माझे दोन' हे कॉमेदिया देलार्त पठडीचे नाटक सादर झाले. कपडे अर्थातच मी डिझाइन केले होते. त्यातल्या एका व्यक्तिरेखेचे हे रंगमंचाच्या मागे काढलेले छायाचित्र.
कॅमेरा निकॉन कूलपिक्स एल १५, ८ मेगापिक्सल. ऑटो फोकस विथ ३ एक्स ऑप्टिकल झूम.
सेटिंग - सीन:पोर्ट्रेट.
फ्लॅश नाही.
लाइटिंग म्हणजे मागे पब्लिक तडफडू नये म्हणून एक ६० चा बल्ब वरती टांगला होता तेवढाच. बाकी अंधार. फोटो काढला तेव्हा संध्याकाळचे ७:३० - ८ झाले होते.
तयार झालेल्या निगेटिव्ह स्पेसेस, शार्प हायलाइटस, पिरियड चा फिल या सगळ्यामुळे मला इंटरेस्टिंग वाटला. थोडासा पेंटिंगसदृश वाटला. तुम्हाला काय वाटतंय बघा. दिग्गजांच्या प्रामाणिक कॉमेंटस अपेक्षित आहेत.

Thursday, April 3, 2008

मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.
पहिल्या पावसात, नव्याकोर्‍या लेदर सीटस असलेल्या बीएमडब्ल्यूमधे मोगर्‍याचा गजरा हातात घेऊन बसायचं.. सुखाची परमावधीच की. झालं! ठरलं! हे कधीतरी जमलं पाहिजेच.

पैसा कमवायचाच हे परत एकदा अधोरेखित झालं होतं डोक्यात. बास झालं आता कलेसाठी समर्पण.
इतकं खपलो, आत्ता पैसा नाही कमावला तर कधी?
येणार्‍या कामाचं बजेट विचारल्याशिवाय बाकी काही बोलायचंच नाही असा परत एकदा मी निश्चय केला. आणि मोबाइल वाजला. नोकियाचं ते जुनं पुराणं मॉडेल बघत मी स्वत:लाच वचन दिलं की आता बास ही गरीबी.

नृत्यांगना अमुक तमुक नवीन बॅले करतायत त्यासाठी त्यांनी डिझाइन करायला बोलावलं. शक्यच नव्हतं वेळेचं. घरात एका पाठोपाठ एक ८ दिवसाच्या अंतरानी दोन लग्नं होती. अगदी जवळची. पण घरातली धावपळ बाजूला ठेवून मी गेले धावत. जेवढं शक्य तेवढं करून दिलं. हाती आला एक चेक ज्यावरची रक्कम बघून स्पॉटबॉय पण लाजला असता. वर 'तुला वेळ नव्हताच ना तपशीलात सगळं करायला त्यामुळे या ताइंनीच सगळं निभावून नेलं.' अशी उगाच गिल्टी वाटायला लावायची मखलाशी. निश्चय गेला तेल लावत!

नंतर दिल्लीहून फोन होता. एका बाइंचा. कुठूनकुठून त्यांना माझा संदर्भ मिळाला होता. आणि आता त्यांना त्यांच्या पुस्तकातल्या महाराष्ट्राच्या विभागासाठी माझ्या 'एक्सपर्टीज' ची गरज होती.
दिल्लीवाला फोन, मधाळ हिंदी आणि माझ्या 'एक्सपर्टीज' चा उल्लेख. पैशाचं विचारायचं राहूनच गेलं ना.
बाईंच्या सहायिकेबरोबर इकडे फिर, तिकडचे फोटो काढ असं करत करत ४ - ५ दिवस नुसतेच निघून गेले. यातच मराठी साडी नेसवून दाखवायला त्या मागच्या नृत्यांगनेच्या एका नवख्या शिष्येचे दोन तास मागितले तर नृत्यांगना बाई म्हणतात, "पैशे किती देणार?"
"मी नंतर फोन करते!"
आता आयत्यावेळेला काही प्रात्यक्षिक स्वत:वर काही अश्याच एका दत्तूवर दाखवून. दिल्लीवालीचं काम पूर्ण झालं.
दिल्लीहून एक इमेल आला (यावेळेला फोन नाही!) आभाराचा.
आमचा खिसा रिकामाच राह्यला.

मराठी फिल्म करायचीये म्हणून जुनी ओळख सांगत एक जण आला. ऐतिहासिक चित्रपट. आणि बजेट म्हणाल तर डोकीच्या वस्तूलाही पुरणार नाही. इथे आमचा निश्चय होता मोठा. कपड्यांचे एवढे, माझे एवढे. जमत असेल तर ठिक नाहीतर जाउदेत. "आपली जुनी ओळख म्हणून मी तुझ्याकडे आलो. आणि तू एवढं बजेट सांगतेस?" "अरे पण ऐतिहासिक करायचं तर बजेट लागतं तेवढं. नगाला नग वस्तू वापरायच्यात का? शेवटी माझ्या reputation चा पण प्रश्न आहे." "पण ही काय रक्कम झाली?" "तुला १०० चा मॉब हवा, २५ ब्रिटिश शिपाई आणि २५ ब्रिटिश पोलिस हवेत, महत्वाच्या व्यक्तिरेखा १०, भरपूर ऍक्शन सीक्वेन्स म्हणजे कपडे डबल डबल एवढं सगळं जमवायचं/ बनवायचं तेही इतिहासाप्रमाणे तर किमान दोन लाख तरी नकोत? आणि मी, माझे असिस्टंट राबणार ५० दिवस मग मला काहीतरी पैसे मिळायला नकोत? माझ्या असिस्टंटस ना काहितरी द्यायला नको?" "ते काय मला माहित नाही. तुझ्या पेमेंटसकट कपड्याचं सगळं ८०००० मधे भागव!" "शक्य नाही तू दुसरी व्यक्ती बघ!"
माझ्यावर पैशाची हाव असल्याचा शिक्का बसला.
माझा खिसा रिकामाच होता तेव्हा.

तशी तक्रार अशी काहीच नाही. पण चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.
सध्या मला मोगरा परवडतो. पावसाचा वास आपला आपण येत असला तरी तो उपभोगायला सवड होत नाही आणि बीएमडब्ल्यू चं चित्रही मी विकत घेतलेलं नाही.

Monday, January 28, 2008

वळू

ऑक्टोबर मधे प्रीव्ह्यू पाह्यला होता.चित्रपट मला अजिबात आवडला नाही.
गोष्ट म्हणायची तर गावात देवाला सोडलेला वळू असतो तो हिंसक होतो. त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला त्या वळूला पकडायला बोलावतात. त्या ऑफिसरबरोबर त्याचा अतिउत्साही Docu-maker भाऊही असतो.
वळूला पकडायला गावात फारेश्ट चं येणं, सोबत डाक्यूमेंट्रीचं गावात येणं, गावातल्या लोकांनी डुरक्या (वळू) च्या गोष्टी सांगणं यातून गाव आणि व्यक्तिरेखा उलगडत जातात. शेवटी वळू पकडला जातो. फारेश्ट त्याला घेऊन जातो आणि गावात दुसर्‍या एका गायीला गोर्‍हा होतो तो नवीन वळू असं सांगत चित्रपट संपतो.
वळू आणि त्याला पकडणे इत्यादी गोष्टींचा एक metaphor म्हणून वापर करायचा आणि परिस्थितीवर भाष्य करायचे की केवळ एक गावरान विनोदी ढंगातला सिनेमा करायचा यामधे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा गोंधळ दिसतो. त्यामुळे मधेच परिस्थितीवर भाष्य करायच्या नादाला जाता जाता परत ग्रामीण विनोदाकडे गाडी घसरते. साध्य काहीच नाही.
गावाचं वातावरण तपशीलात दाखवायचं या सोसापोटी सभेला जाताना छोट्या पोराला त्याची आई देवळाच्या बाहेरच शू करायला धरते ह्या दृश्याने चित्रपटात भर काहीच पडत नाही अगदी विनोदनिर्मिती सुद्धा. सतत बिघडलेल्या पोटाने घाण वास सोडणारा किंवा लोटा घेऊन जाणारा देवळाचा पुजारी या व्यक्तिरेखेसाठी दिलीप प्रभावळकर कशासाठी हवेत? कोणीही करेल की ते. सतत संडासला जाणे यापलिकडे ही व्यक्तिरेखा काहीच फारसं करताना दिसत नाही. बर या प्रकारच्या विनोदांना किती वेळा हसायचं?
फारेष्टचा भाऊ डाक्यूमेंट्री ह्याने मराठी किती कृत्रिम बोलावं याला काही अर्थच नाही. वृषसेन दाभोळकर हा नट इतकंही वाईट मराठी बोलत नाही (माझ्या नाटकातला मुलगा आहे, मी याला लहानपणापासून ओळखते. थोडी कृत्रिम झाक आहे मराठीमधे पण एकदा सांगितल्यावर हे बाळ सुतासारखं सरळ मराठी बोलू लागतं हा अनुभव आहे.) आणि ते सुधारून घेणे हे दिग्दर्शकाचे काम नाही का?
अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून खूप ताकदीचा आहे हे आता माहित होऊन जुनं झालं पण इथे त्याचाही गोंधळ उडाल्यासारखा वाटतो. विनोदी अंगाने जाणारे मर्मभेदी भाष्य अश्या काहीश्या presentation format मधे तो जायला बघतो. त्यामुळे अभिनयाची शैलीही थोडी लाउड, caricature सारखी त्याने ठेवली आहे. ते चित्रपटाला कुठेही मदत करत नाही. पण याठिकाणी दोष बिचार्‍या अतुलचा नाही, पटकथेच्या form, lack of focus यांचा व दिग्दर्शकाचाच आहे असं जाणवत रहातं. अतुलला कपड्यात कृपया stir-ups देऊ नयेत. वरचं शरीर कमावलेलं आणि खाली मोराचे काटकुळे पाय हे अतिशय विचित्र दिसतं.
अमृता सुभाष मात्र तिच्या व्यक्तिरेखेमधे चोख बसलीये. तिच्या अभिनय पद्धतीला जाणारी भडक, लाउड व्यक्तिरेखाच तिला मिळाल्यामुळे ते जमून गेलेय.
बाकी सगळं जिथल्या तिथे ठीक. कपडे गावाच्या मानाने फारच स्वच्छ आणि नवेकोरे वाटतात. तसंच सगळं visual ही. नाटकाच्या सेटसारखं बनवलेलं वाटतं.
हे सगळ दिसत रहातं कारण पटकथेतल्या गोंधळामुळे आपण नाट्यापासून तुटत रहतो.
एक उत्तम potential असलेली कथा आणि पटकथेमधे त्याचं झालेलं वांगं एवढंच impression शेवटी डोक्यात उरतं.
हे झालं माझं मत. पहावी की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं.

Saturday, January 26, 2008

'ते पुढे गेले'

तडजोडी, खटपटी करत जगताना, यशस्वी नाहीतरी किमान 'पुढे' जाताना थांबवून कुणी तुम्हाला नागडं करणारा आरसा दाखवला तर काय होईल? त्यातून तुम्ही स्वतःला संवेदनशील वगैरे म्हणवून घेत असाल, चुक बरोबर चा निवाडा आत कुठेतरी जागा असेल अजून तर काय होईल तुमचं?
बास हेच होतं 'ते पुढे गेले' बघताना.
माणसाचा सतत पुढे जाण्याचा हव्यास, obsession च खरंतर आपल्याला सगळा विधिनिषेध विसरायला लावतो. कुठलीही किंमत मोजून पुढे जाताना कुणाचं तरी शोषण, कुणावर तरी अन्याय करावाच लागतो ही अपरीहार्य वस्तुस्थिती आहे असं आपण स्वतःला समजावतो. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचाच दोष आहे यात असं सोयीस्करपणे समजतो आपण. अन्याय करणं जेवढं मुर्दाड आणि निर्ढावलेपणाचं तेवढा पुढे जाण्याचा वेग जास्त.
ही परिस्थिती. नीट, सूक्ष्मात जाऊन आणि प्रामाणिकपणे विचार केला तर कुठेना कुठेतरी आपण या परिस्थितीचा भाग आहोत. याच गोष्टीला हातभार लावतोय हे लख्ख जाणवतं. असह्य त्रास होतो ह्या आरश्यात बघण्याचा.
हा नाटकातला मूळ विचार अधोरेखित करण्यासाठी नाटकात रूपक (metaphor) म्हणून मृत्यूनंतर माणसे पोचतात अशी एक जागा/ एक दालन, तोंड मिटलेल्या बाईवर बलात्कार ह्या गोष्टी येतात. अत्यंत साध्या आणि प्रभावी संवादांच्यातून हे सगळं येतं त्यामुळे जास्त अंगावर येतं.
नाटकाचं सादरीकरण हे अत्यंत साधेपणाचं आणि म्हणूनच परिणामकारक आहे. हा विषय spectacular visuals नी मारला जाऊ शकतो. हे ओळखून नेपथ्य म्हणजे एक void , अंधार असे नेपथ्याचे निर्णयन केल्याने तीव्रता अजून वाढते. नेपथ्यासाठी बजेट नही, करायचा काय सेट नाटकाला अश्या पळवाटांमधून हा void येत नाही. तर नेपथ्याचे design म्हणून येतो. विचारपूर्वक घेतलेला निरणय म्हणून येतो. म्हणून तो महत्वाचा ठरतो. प्रकाशयोजनेतील patterns व लय यांच्यामुळे आपण अजून अजूनच आशयाच्या जवळ पोचतो. आणि कलाकारांच्य वागण्यातील सहजता. 'अ' चं खूप बोलणं आणि 'ब' चं गोंधळलेलं असणं, 'ब' चं 'सोपा उपाय' शोधू पहाणं. हे सगळं सगळं अगदी जिथल्या तिथे. अभिनय केल्याचं जाणवतच नाही.

प्रयोगभर होतं असं की हळू हळू आरसा दिसायला लागतो. मग तो लख्ख दिसतो आणि मग सहन होईनासा होतो. नेपथ्यातल्या void मुळे claustrophobic वाटायला लागतं, अंधार हुडहुडी भरवू लागतो.

पृथ्वी थिएटर मधलं नाटक संपलं सोमवारी २१ जानेवारीच्या रात्री. माझ्या मनात अजून प्रयोग चालूच आहे. आणि भरलेली हुडहुडी अजून तशीच

Monday, January 7, 2008

गंध कुणाचा...

वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.
नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासाMसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो.. अशिश्टन म्हनायचं काय...) जो असतो तो एक शस्त्र काढतो आणि त्यातून एक फवारा मारून उंदीर मारण्याचं अति गोडमिट्ट औषश कसं असेल तसा वास गाडीभर पसरवतो. इथे आपल्या पोटातील उंदीर ते औषध पिण्यासाठी आतुर झाल्यासारखे उड्या मारू लागतात आणि पोटात सगळं काही आतल्याआत ढवळायला सुरूवात होते.
तुम्ही कुठल्याही सीटवर असलात तरी या सुगंधी कट्ट्यापासून तुमची सुटका नाही. पुढची सीट मिळाली.. ऐसपैस जागा (ही व्होल्वो च्या बाहेरच असते. आत कोणे एके काळी असायची!!) मिळाली असं समजून तुम्ही सुखावताय तोच तुमच्या पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या जागी चालक(मराठीचा विजय असो!!) स्थानापन्न होतो. आणि त्याच्या डोक्यातल्या चमेलीच्या तेलाबरोबर त्याच्या डोक्यातला घाम मिसळून तयार झालेल्या रसायनाच्या भयाण लहरी तुमच्या नाकात शिरतात आणि नाकालाच काय तुमच्या पोटालाही परत एकदा झिणझिण्या येतात त्या थांबतच नाहीत. पोटातली उलाढाल अजून वाढते.
हे घडलं नाही तर स्वत:ला एवढ्यात भाग्यवान समजू नका. तुमच्या शेजारी कोण येणारे ते अजून तुम्हाला कळलेलं नसतं. कोणीच येऊ नये अशी तुम्ही देवाची करूणा भाकत असता (एकदम आकाशातल्या बापा इश्टायल...) आणि देव म्हणत असतो आत्ता आठवलो काय मी, घे अजून एक सुगंधी ठोकळा.. (मला बुडवताना तुम्ही नाचता ना? अस म्हणणार्‍या बाप्पा श्टायल...). तर एक सर्व बाजूनी सुटलेला बोजा किंवा बोजी तुमच्या शेजारी आदळतो/ते. बोजा असेल तर तो हमखास 'पनवा, पान मसालवा असं काहीतरी खायके' आलेला असतो. त्या जिन्तान किंवा तत्सम सुगंधी मसाल्याचा वासाचं वलय त्या बोजाभोवती असतं. त्यात त्याने हिरा पन्ना मधून घेतलेलं लेटेष्ट सेंट मारलेलं असतं. शेजारी बोजी आली तर तिने अंगावर टाल्कम पावडर ओतलेली असते शक्यतो गोडुस वासाची. आणि अंगावर कुठलं तरी 'गुलाबी' सेंट ही ओतलेलं असतं. ह्या सगळ्या सेंटसमधे एक काहीतरी द्रव्य असतं बहुतेक ज्याची माझ्या नाकाशी आणि मग पोटाशी कुंडली जुळत नाही. मग परत पोटात 'घुसळण प्रेमाची काढली'.
बर सेंटचा प्रादुर्भाव झाला असला तरी त्यातून एक छुपा वास येतच असतो. कसला काय विचारता!! अहो एवढं सेंट/ टाल्कम पावडर कशासाठी असते? सोप्पय, अहो त्या बोज्या/जीचे कपडे धुतलेले नसतात किंवा ८-१० दिवस केस धुतलेले नसतात. वाळलेल्या घामाचा कुसका कडू वास आणि बोजीच्या न धुतलेल्या केसांचा आंबुस वास हे या सगळ्या वरच्या वासांमधून आपलं अस्तित्व दाखवतातच.
एखाद्या दिवशी देव प्रसन्न झाला तर सुदैवाने तुमची शेजारची सीट रिकामी असते किंवा फार वास न येणारा/री शेजारी येतो/ते. पण तुम्ही देवाचे आभार मानत असताना देव खदाखदा हसत असतोच (मला बुडवताना तुम्ही नाचता ना!!)
गाडी सुरू होते. ४ तासात तुम्ही म्हातारे किंवा शिळे होऊ नये ही जबाबदारी बस कंपनीची असते त्यामुळे ते तुमच्यावर सतत गार हवेचे झोत सोडत असतात. गाडी जशी हलते तसे वासांचे संक्रमण होत असते. गाडीत कुणालातरी काल फक्त रात्री तासभर घातलेला गजरा आजही प्रवासात घालायची बुद्धी झालेली असते. गजरा आता सुकलेला असतो. तेवढ्यात कुणीतरी हात उंचावून आळस देते आणि नेमका त्यांनाच ह्या फ्रिजमधे बसून देखील घाम आलेला असतो.
हे सगळं परवडलं अस म्हणायची वेळ एकदा आली होती. मागच्या सीटवरच्या सदगृहस्थांना बिडी ओढायची सुरसुरी आली होती. "मला विडीच्या वासाने ढवळतंय. उलटी व्हायला लागली तर तुमच्या अंगावर ओकेन" अशी धमकी दिल्यावर तो थांबला.
तेवढ्यात "गाडी टॉयलेटके लिए २० मिनिट रूकेगी!" असं स्पष्ट शब्दात ओरडून सांगितलं जातं. गाडी थांबते. गाडीमधे काही घोळ होऊ नयेत, लोकांना वासांचे त्रास होऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतात हे लोक. कश्यासाठी उतरायचं हे नीट सांगतात. पण लोक ऐकतील तर ना. ते आपले मोकळं होतात पण हादडूनही घेतात. परत गाडीत खायलाही घेऊन येतात. शेजारचा वास न येणारा कचकून सिगरेट ओढून आलेला असतो. आणि जळक्या बोळ्यासारखा घमघमत असतो.
२० मिनिटात सगळं उरकायचं म्हणून गपागपा खाल्लेलं असतं. वर ढेकर द्यायची राहून गेलेली असते. गाडी सुटते आणि ज्या बाजूने ढेकर येईल तिकडे वडापाव कि मिसळ कि चाट हे ओळखायचा खेळ खेळता येऊ शकतो. त्यात हातात बांधून आणलेल्या वस्तूंचे वासही गाडीभर भ्रमण करत असतातच. इतकं खाल्यानंतर ढेकर नाही तर अजून कशापद्धतीने तरी पवनमुक्ती होतेच.
सुदैवाने व्होल्वो घाट मात्र अजूनही सुसाट वेगाने पार करते त्यामुळे पोटात प्रेमाची घुसळण चालू असली तरी ती घाटाच्या वळणांमुळे वाढत नाही.
घाट संपल्यावर टोलच्या आसपास पुण्याकडे येताना कंपनीतली चिकन्स आणि मुंबईकडे जाताना कुठल्यातरी कारखान्याची मळी यांचा वास बाहेरूनही वसकन बसमधे घुसतो आणि आधीच गंधलेल्या हवेवर चार चांद चढवतो.
टोल संपला की थोड्या वेळाने गाडीचा वेग अतिच मंदावतो. गार हवेचे झोत सुरूच असतात. आता तुम्हाला फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाला काय वाटत असेल तसं वाटायला लागतं. आंबल्यासारखं...
तुमच्या सहनशक्तीचा कडेलोट होत असतो तेव्हा गाडी सायनमधून धारावी मधे शिरत असते आणि आत येणारा कॅनॉलचा वास तुम्हाला आता तुम्ही मुंबई नामक उकीरड्यात आलात बरंका असं सांगू लागतो.
ह्या सगळ्यातून न ओकता ( कधी खरंच झालं ओकायला तर काय होईल?) आणि सर्दीने भरलेली (thanks to फ्रिजमधली गार हवा!)मी पार्ल्यात उतरते. घरी पोचल्यावर मात्र मला मी टाकलेल्या खिचडीच्या फोडणीचा वास येणंही शक्य नसतं.

Search This Blog