Tuesday, December 3, 2019

आनंदवन मोमेण्ट्स!

एक दिवस शीतल आमटेचा मेसेज आला. शीतल सोशल मिडिया मैत्रिण होती बरेच दिवस. तिला माझं वायरवर्क आवडलंय हे ती सांगेच वेळोवेळी. तर तिचा मेसेज आला की आमच्याकडे दिव्यांग लोकांसाठी वायर ज्वेलरीचं वर्कशॉप घेशील का?
आनंदवनासंबंधी महारोग्यांची सेवा, उपचार, पुनर्वसन याबद्दल थोडीफार कल्पना होती. समिधा वाचलेले असल्याने कश्या प्रकारे हे काम उभे राह्यले हे ही साधारण माहिती होतेच. जलसंधारणाच्या कामाबद्दलही पुसटशी माहिती होती. त्यामुळे कधीतरी आनंदवनाला भेट द्यायचीये हे पक्के डोक्यात होते. आता तर काय आयतीच संधी चालून आली.
पण दिव्यांग लोकांना जमेल का? वायरकामासाठी हात आणि डोळे व्यवस्थित असावे लागतात. वगैरे कुशंका मी उपस्थित केल्याच. ती ज्या दिव्यांग गटाबद्दल विचारत होती ते शक्यतो कर्णबधिर लोक असणार होते. वायरकाम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. तसेच त्यांच्याशी कम्युनिकेट करायला इंटरप्रिटर बरोबर असेल हे ही तिने स्पष्ट केले. मग मी तातडीने होकार कळवून टाकला.
मग सुरू झाली सगळी जमवाजमव. तारकामाची हत्यारे आणि तारा. वरोर्‍यात तर काही मिळणार नव्हतं. मला मुंबईतल्या मार्केटांशिवाय काही माहिती नव्हतं. मुंबईतून हत्यारे, तारा घेऊन नागपुरापर्यंतचा प्रवास करणे शक्य नव्हते. एकदीड महिना, एक व्हॉटसॅप ग्रुप, शेकडो मेसेजेस, अर्धशेकडो फोनकॉल्स, वर्कशॉपच्या कोऑर्डिनेटर लोकांची फिराफिरी या सगळ्यांच्या अखेरीस मी पोचले तेव्हापर्यंत सगळे सामानही आनंदवनात पोचले.
फ्लाइट काहीच्या काही लेट झाल्याने रात्री साडेनवास म्हणजे आनंदवनाच्या मध्यरात्री मी तिथे पोचले. त्यामुळे संध्याकाळी आनंदवनात पोचल्यावर सगळे छान मांडून ठेवू, शीतलशी गप्पा मारू, आनंदवनात फिरू असे सगळे इमले हवेत फुर्र झाले. गेस्ट हाऊसमधे शिरतानाच एक बोर्ड दिसला. इथे वायफाय नाही. हे १९९५ असल्यासारखे एकमेकांशी गप्पा मारा. मग या आज्ञेचे पालन म्हणून रात्री प्रोग्राम कोऑर्डिनेटर माधवी आणि सोशल मिडियासाठी काम करणारी मधुवंती यांच्याबरोबर मध्यरात्रीपर्यंत मस्तपैकी गप्पांचा फड रंगला.
१. गप्पा मारा
nowifi.jpg
सकाळी आवरून गेस्टहाऊसच्या बाहेर आले. सुंदर ऊन आणि जिकडेतिकडे फुलझाडे. मन एकदम प्रसन्न झाले. लगेच फोटो काढणे,
गेस्टहाऊसच्या बाहेर व्होडाफोनला रेंज असल्याने फोटो फेबुवर टाकणे वगैरे उद्योग करून झाले लगेच.
२. ही ती सुंदर सकाळ
sakal.jpg
मला धुळीचा वास लगेच येतो. त्रासही होतो. नोव्हेंबर म्हणजे कोरडा महिना आणि विदर्भाची कोरडी हवा. त्यामुळे वातावरणात धूळ असणार हे मी गृहितच धरले होते. पण तशी धूळ जाणवलीच नाही. इतकी स्वच्छ हवा हे जरा अप्रूपाचेच झाले.
८ वाजता ब्रेकफास्टची वेळ असते. साधा, पोटभरीचा आणि चविष्ट ब्रेकफास्ट झाला. कॅण्टिनचे वैशिष्ट्य म्हणजे खाऊन झाले की आपापली ताटवाटीचमचा वगैरे आपणच घासून टाकायचे. लोकांना सहजपणे ताटवाटी घासता यावी यासाठी नळांची रांग, ताट ठेवायला तिपाई, प्रत्येक दोन नळांच्या मधे साबणाचे पाणी आणि स्पंज ठेवलेली बादली, एका बाजूला सगळे खरकटे टाकून द्यायला ठेवलेली बादली आणि घासून झाल्यावर सगळे निथळत ठेवायचे टेबल अशी एकदम शिस्तशीर व्यवस्था आहे. हा प्रकार मला फारच आवडला.
सकाळी नऊ वाजता वर्कशॉप सुरू झाले. हे वर्कशॉप म्हणजे छंदवर्ग नाही. सुरूवात जरी छंदवर्गासारखी असली तरी इथे शिकवायचे आहे त्याचा उद्देश शिकणार्‍यांसाठी पुढे जाऊन रोजगारनिर्मिती व्हावी हा आहे. त्यामुळे जे काही शिकवायचे त्यात परफेक्शन, फिनेस याची पूर्ण ओळख करून द्यायची ही एक गोष्ट मी लक्षात ठेवली होती. तीन कर्णबधिर लोक आणि एक अस्थिव्यंग असलेली व्यक्ती यांच्यासह एकूण आठनऊ लोक होते वर्कशॉपमधे. हत्यारांची ओळख करून देताना आपले म्हणणे डेफ लोकांपर्यंत पोचेल का? त्यांना समजेल का? वगैरे धाकधुक होती मनात. पण इंटरप्रिटरच्या मदतीने तो भाग पार झाला. साइन लँग्वेज मला अजिबातच येत नाही पण काही खुणा या निव्वळ लॉजिकवर असतात असेही लक्षात आले.
३. वर्कशॉपमधील बॅनर
Banner at workshop.jpg
वर्कशॉपमधे मी अगदी बेसिक स्पायरल, गाठ यांच्यापासून सुरू करते. त्यासाठी मी एक छोटेसे वर्कबुकही तयार केलेले आहे. एकेका स्पेसिमेनचे चित्र, नाव आणि वायरची मापे व इतर नोंदी करण्यासाठी बरीच रिकामी जागा असे आहे त्या वर्कबुकात. कर्णबधिर मुलींसाठी ते जास्त उपयोगाचे ठरले असावे असे वाटते. स्वतः शीतलही सुरूवातीला वर्कशॉपला बसली होती. अर्थात आनंदवनाची सीईओ ही जबाबदारी पार पाडत असताना वर्कशॉपला जास्त वेळ थांबणे तिला शक्य नव्हतेच. पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच-सहापर्यंत चालले वर्कशॉप. मधे एक तास जेवायची सुट्टी फक्त. संध्याकाळपर्यंत सगळ्यांची बोटे हुळहुळी झाली होती हे खरे पण प्रत्येकाची पाचसहा लिंक्सची इजिप्शियन कॉइल तयारही झाली होती.
४. विद्यार्थ्यांची पहिलीवहिली इजिप्शियन कॉइल
Egyptian coil day 1.jpg
संध्याकाळी डॉ. विकास आमटे यांना भेटायचे ठरले होते. माधवीबरोबर त्यांच्या ऑफिसमधे गेले. त्याआधी वर्कशॉपमधे केलेल्या इजिप्शियन कॉइल्स शीतलने त्यांना दाखवलेल्या होत्या. ते काम खूपच आवडलेले होते त्यांना. एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटायचे म्हणजे दडपणच होते जरा. पण माणूस एकदम दिलखुलास. दहा वर्षांपूर्वी संदीप तिकडे जाऊन आला होता. ते त्यांच्या लक्षात होते. आणि वर्कशॉपबद्दल त्यांच्याकडून कौतुक ऐकल्यावर मी रिलॅक्सच झाले.
ते सांगत होते. बाबा आमट्यांबद्दल, त्यांच्या आईबद्दल, पत्नीबद्दल, मुलीबद्दल, आनंदवनाबद्दल, तिथल्या जगण्याच्या संकल्पनेबद्दल, त्यांच्या लहानपणाबद्दल, बाबा आमट्यांना मिळालेल्या सेवन्थ नोबेलबद्दल, पुलंच्या दरवर्षी आनंदवनात येण्याबद्दल, पर्यावरणाबद्दल,
हा आश्रम नाही. हे जगणं आहे. ही चॅरिटी नाही, 'चॅन्सिटी' (चान्स + चॅरिटी) आहे. इथे नव्या कल्पनांचे, बदलांचे स्वागत आहे.
आनंदवन ही काय कल्पना आहे नक्की याची ओळख होण्याचा माझा प्रवास तिथे सुरू झाला.
त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक शिळा आणि काही दगड रचून एक इन्स्टॉलेशन सारखे केलेले आहे. ही माझी स्मरणशिला. मीच तयार करून ठेवलीये असं हसत हसत म्हणाले. वयाने आधीच्या पिढीतली पण मित्र असलेली कित्येक मंडळी आठवली.
दुसर्‍या दिवशी सकाळी आनंदवन बघण्यासाठी फिरायचे ठरले. आर्किटेक्ट अमृता माझ्याबरोबर आली होती. सुरूवात केली ती मियावाकीच्या धर्तीवर केलेल्या अटल आनंदवन डेन्स फॉरेस्ट या प्रकल्पापासून. शीतल या प्रकल्पाची प्रमुख आहे. मियावाकीची कल्पना समजून घेत, प्रयोगाला मिळत असलेल्या यशाबद्दल अवाक होत तो सगळा भाग फिरलो. मग श्र्द्धावनाकडे निघालो. वाटेत शेती, अप्रतिम तळे, त्यात बदके, तळ्याच्या बाजूला बसायची जागा असे काय काय दिसत होतेच.
५. एका तळ्यात होती (हे नाव देणे मराठी माणसांना कंपलसरी असते)
badake.jpg
आनंदवनाचा सगळा परीसर जुन्या बंद झालेल्या कोळशाच्या खाणीवर उभा आहे. हे सांगितल्याशिवाय कुणाचाही विश्वास बसणार नाही. माणसांच्या पुनर्वसनाबरोबरच निसर्गाचे पुनर्वसनही केलेले आहे. हायवेच्या दुसर्‍या बाजूला औष्णिक वीज केंद्राच्या चिमण्या धूर ओकतायत, पलिकडे अजूनही चालू असलेली एक कोळशाची खाण आहे. अश्या परिस्थितीत हवेत प्रदूषणाने होणारी घुसमट जाणवायला हवी पण आनंदवनात त्याचा मागमूसही नाही.
श्रद्धावनाच्या इथे माणसाच्या विकासासाठी धारातीर्थी पडलेल्या वृक्षांची आणि मुलाच्या सोसापायी गर्भातच मारल्या गेलेल्या मुलींची स्मरणशिला आहे. हे काहीतरी वेगळेच.
६. स्मरणशिला
smaranashila.jpg
अजून वेगळे म्हणजे आजवर आनंदवनात जेवढे कार्यकर्ते होऊन गेले त्या सगळ्यांच्या नावे एकेक झाड लावलेलं आहे. म्हणून हे श्रद्धावन. याच झाडांच्या सावलीत बाबा आमटे आणि साधनाताई आमटेही विसावा घेतायत. मी एरवी बधीर काळजाची बाई आहे पण तिथल्या वातावरणात माझ्याही डोळ्यात पाणी आलं.
तिथे भोवती विविध प्रकारचे दगड आणून ठेवलेले आहेत. एकसेएक देखणे दगड. आपल्या नैसर्गिक आणि पॉलिश बिलिश न केलेल्या रूपात. "ही विकासभाऊंची आवड. त्यांना माहितीयेत कुठले कुठले दगड आहेत ते." अमृताने माहिती पुरवली. दगड आवडणारी माणसे म्हणजे काय एकदम भारीच की.
श्रद्धावनातून मग आम्ही वर्कशॉप्सकडे आलो. ग्रिटींग्ज विभागात गनिकाका वेगळ्याच प्रकारे पेंटिंग्ज बनवतात. मक्याच्या कणसाची साल, भाताचे उरलेले तूस, केळीचे सुकलेले साल अश्या गोष्टींचे कोलाज करतात. अगदी पोर्ट्रेटस सुद्धा. कमाल आहे तो प्रकार.
७. पोर्ट्रेटस
ganikakaportraits.jpg
तिथून टेक्स्टाइल विभागात गेलो. तिथे मी रमणार हे उघड होतंच. हातमाग, पॉवरलूम्स दोन्ही बघितले. १००% कॉटन तेही इतके सायीसारखे तलम मऊ. सुख आहे त्या कापडाचा स्पर्श म्हणजे. असं कापड हवं रोजचं रोज. काही झालं तरी कापडाचा मऊपणा सुखावतच राहील. विरार ट्रेनमधे काही होवो, तरी चिडायला होणारच नाही.
तिथून स्वरानंदवन या ऑर्केस्ट्राच्या हॉलमधे गेलो. शारीरीक वा मानसिकरित्या दिव्यांग माणसाकडे एक कमतरता भरून काढायला दुसर्‍या कुठल्यातरी क्षमतेचे भन्नाट दान मिळालेले असते याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणावे अशी सुंदर गाणी ऐकली.
एव्हाना वर्कशॉपची वेळ झाली होती त्यामुळे पटकन कॅण्टिनला जाऊन पोहे खाऊन घेतले आणि वर्कशॉप सुरू केले. विद्यार्थ्यांची कालची एक्साइटमेंट किंचित कमी झालेली होती. पहिला जमून गेलेला स्पायरल आता वेडावाकडा होत होता. बोटांच्या हुळहुळीचं करायचं काय समजत नव्हतं. आणि शिकवणार्‍या निर्जाबै दुष्टासारख्या पंधरा लिंक पूर्ण करा तरीही म्हणून ढकलत होत्या.
८. वर्कशॉप
Nee teaching.jpg
दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या दिवशी कस लागतो तुमच्या पेशन्सचा, तुमच्या बोटांचा, तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का नाही याचाही. ती प्रक्रिया सुरू झाली होती. एखाद दोन लोक वगळता सगळे टिकून होते.
दोन कर्णबधिर मुलींशी संवाद साधणे थोडे थोडे जमायला लागलेय असे वाटत होते. पुढच्या वर्कशॉपच्या आधी काही किवर्ड्स शिकून यायचेत साइन लँग्वेजमधले हे स्वतःशीच नोंद करून ठेवले.
दुपारी साडेचारला मला निघावे लागणार होते. नागपूरमधला ट्रॅफिक पार करून विमानतळावर वेळेत पोचायचे होते. त्यामुळे सूचना, फोटो, गप्पा अश्या सगळ्यात घाई घाई करत मी निघाले. या सगळ्यात शीतलशी गप्पा आणि चर्चा हा कार्यक्रम राहूनच गेला. पण ही मैत्रिण मात्र फारच आवडली.
'तुमची पुरेशी प्रॅक्टिस झाली नाही तर मी परत येणार नाही' असे बजावून निघाले खरी पण मला माहितीये मी जात राहणार आहे परत तिथे. आत्ता कुठे आनंदवनाची बारीकशी झलक बघितलीये. अजून बरंच बघायचंय, समजून घ्यायचंय. जमलंच तर काही कामही करायचंय. बघूया.
- नी

Tuesday, March 5, 2019

नवीन कलेक्शन येणार!

मार्च महिना आला. दरवर्षीप्रमाणे नवीन कलेक्शन अनाऊन्स करायची वेळ झाली.
माझ्या नी ब्रॅण्डला आता ४ वर्षे पूर्ण होतील.
अजूनही कासवाचीच गती असली तरी हळूहळू पुढे जाणे नक्की चालू आहे.
इथल्या मैत्रिणींना माहिती नसेल पण गेल्यावर्षी नदी ही थीम घेऊन पूर्ण कलेक्शन केले होते.
यावर्षी बराच वेळ घेऊन मोठी उडी मारायचा बेत होता. पण एक काम लांबले आणि यावर्षी अ‍ॅनिव्हर्सरी कलेक्शन करताच येणार नाही असे चित्र तयार झाले. आता तेच काम अजून थोडे लांबलेय त्यामुळे मोठी उडी नाही तरी दरवर्षीचा नेम चुकू नये इतपत कलेक्शन करता येणार आहे.
तर यावर्षी छोटेसे कलेक्शन करणार आहे. आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या प्रकारच्या डिझाइन्सचा म्हणजे आदिकथा, रांगोळी, ट्री ऑफ लाइफ, ट्विस्ट विथ ट्रॅडिशन, म्हादेई कलेक्शन, डेट विथ अलेक्झांडर काल्डर इत्यादी सर्व डिझाइन्सचा किमान एकेक तरी नमुना या कलेक्शनमधे असेल. त्याचबरोबर जी मोठी उडी मारणार होते त्याची एक बाळपाऊल म्हणावे अशी झलकही असेल.

ही एक छोटीशी झलक आजवरच्या कलेक्शन्सची 

Thursday, February 21, 2019

मेकप मेकप मेकप!

एकेकाळी म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे.
ब्रायडल करताना 30 रंगाच्या मुलीला 23 रंगाची करा, साडीला मॅचिंग मोरचुदी रंगाचीच शॅडो लावा, मेकपला पैसे घेता आणि गालावरचा गुलाबी रंग इतक्या कंजूषपणे काय वापरता?, असे बरेच आग्रह नवरीमुलगी आणि इतर जानोश्याचे असायचे. अहो नवरी गोड, सुंदर वगैरे दिसायला हवीये मेकपकी दुकान नाही हे समजवताना मी हैराण परेशान होऊन जायचे. त्यात मुलीच्या सासरच्यापैकी कुणी ब्युटीशीयन असली किंवा साधे थ्रेडिंग शिकत असली तरी ती आत येऊन उगाचच सासरचा तडका देऊन जाणार आणि नसलेली अक्कल पाजळणार. सासरघरची त्यामुळे तिची अक्कल भारी असाच अभिनय करायला लागणार वगैरे धमाल व्हायची. गोरी नाही दिसत असं म्हणत एका नवऱ्यामुलीच्या सासूने मेकअप टेबलावरची पावडर घेऊन केलेल्या मेकअपवरून बचाबचा चोपडून खारा दाणा करून टाकले होते. नवऱ्यामुलीचे अश्रू आणि लिंपलेली पावडर पुसून परत चेहरा होता तसा सुंदर करण्यात रिसेप्शनला स्टेजवर जायला अर्धा तास उशीर झाला होता. लग्न लागल्यानंतर काही तासातच लग्न केल्याचा पश्चात्ताप नवऱ्यामुलीला होउ लागला होता.
नाचाच्या मेकपांची अजून वेगळी तऱ्हा. एखाद्या नाचाच्या क्लासने त्यांच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलेलं असायचं. अरंगेत्रम किंवा गुरुपौर्णिमा वगैरे. भारतीय शास्त्रीय नृत्य. ठराविक प्रकारे डोळ्यांचा मेकअप ही त्या मेकअपची खासियत. मुळात पुरातन काळी जेव्हा हे नृत्य सादर होत असे तेव्हा उपलब्ध असलेली प्रकाशयोजना म्हणजे मशाली तत्सम. तर त्यांच्या उजेडात डोळ्यांच्या मुद्रा व्यवस्थित दिसाव्यात यासाठी खरंतर भरदार डोळे रेखनाचे प्रयोजन होते. मग नंतर विशिष्ट प्रकारे आयलायनिंग करणे हा नृत्यशैलीच्या आहार्य अभिनयाचा भाग बनला. आता आपल्याकडे भरपूर प्रकाश असतो स्टेजवर तर हे डोळे रेखन सौंदर्य वर्धन आणि शैलीचा भाग म्हणूनच आणि तितपतच यायला हवे. हे सगळे मला माझ्या गुरूने शिकवले होते. पण अनेक क्लासच्या गुरूंना त्यांच्या गुरूने शिकवले नसावे.
‘गर्दभी अप्सरायते’ वयातल्या गोड मुली, तलम त्वचा वगैरे असताना नको ते मेकअपचे थर असं व्हायचं. पण कार्यक्रमाचा अवधी, नाचून येणारा घाम वगैरे सगळ्यामुळे बराच वेळ टीकेल असा मेकअप करणे ही गरज असे. तसेच शैलीदार डोळे, ओठ रेखणे ही ही. पण किमान दोन मिलीमीटर रुंदीचे आयलायनिंग केले नाही तर आयत्यावेळेला नाच विसरणार असा काही शाप असावा. त्यामुळे क्लासच्या ताईंच्या गुरू मी केलेल्या मेकपवर आपल्या प्रकारे डोळे रेखत. दोन मिलीमीटर जाडीची रेषा, तीही थरथरती आणि गाल कुणी मारल्यासारखे आरक्त. सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे. माझा वैताग होई. आधीच स्टेज परफॉर्मन्सचं टेन्शन, त्यात हा वाढीव बटबटीत मेकअप तोही साक्षात गुरूंच्या गुरूने केलेला त्यामुळे गोंधळलेल्या मुली समोर असत. आरश्यातला स्वतःचा घुबड चेहरा बघून क्वचित डोळ्यात पाणी आलेले असे. यांच्यासमोर मी काय वैतागणार?
शाळेच्या गॅदरींग्जचे वेगळे नियम. सर्व मुलांना गालांवर गुलाबी टिळे आणि चट्टक लाल लिष्टीक (शाळेत असेच म्हणतात!) लावली नाही तर मेकअपवाल्यांना पैसे देत नाहीत. मग मुले ‘आज गोकुळात’ वर नाचणार असोत की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे बनून भिंत हलवणार असोत की कोवळा शिवबा आणि मावळे बनून रोहिडेश्वराची शपथ घेणार असोत गालावर गुलाब फुललेले आणि डाळिंबाचं दानं व्हटावरी चुरडलं असायलाच हवं. अशी समस्त शिक्षक आणि पालकांची धारणा. चुकून अशी धारणा नसली तर आम्ही कौतुकाने ज्ञानेश्वर, राधा, शिवबा, टिळक वगैरे रंगवत जायचो. अचानक राधाबालेच्या माऊलीला गालावरच्या गुलाबांची हौस यायची. मग ती आमच्या मेकपवर गुलाब फुलवायची. तिच्या गालावरचे गुलाब बघून टिळकांना आपल्याशी मेकपमध्ये पार्श्यालिटी झालीये असे वाटून रडू येऊ लागायचे. ते रडू थांबवायचे तर टिळकांचेही गाल गुलाबी. मग लागण कंटिन्यू टू ज्ञानेश्वर, शिवबा, मावळे, नाटकातले आजोबा इत्यादी. मेकअपवाले हताश!
आता काम बदललं. पण या दर्जाचा हताशपणा अजूनही अनुभवायला मिळतोच. त्याबद्दल पुढे केव्हातरी.
तळटिप: भरतनाट्यम या कलेविषयी मला अपार प्रेम आहे आणि सर्व गुरूंविषयी आदरही आहे. मात्र त्यातल्या काही गुरूंची मेकप वगैरे बाबतीतली समज थोडी अविश्वासार्ह आहे इतकेच.
- नी 

Wednesday, July 18, 2018

पाऊस, मी आणि ....!

तर यंदा मी ही पावसावर लिहिलंय. आजच्या लोकमतच्या मंथनमधे ते थोडे काटछाट करून छापूनही आलेय. त्याच ललिताचे अनकट व्हर्जन इथे देते आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
कॅलेण्डरमध्ये पावसाचा महिना लागला आणि तुझी वाट बघणे सुरू झाले.
'बदललंय हं चित्र आजूबाजूचं!, थोडा झगझगीतपणा कमी झालाय!, एक ग्रे वॉश चढायला लागलाय सगळ्यावर!' तुझ्या येण्याची वर्दी येऊन पोचली.
दरवर्षीप्रमाणे आम्ही तुझ्या स्वागताला लागलो. शब्दांची भरपूर तयारी केली. तू आल्यावर चिंब व्हायचंय, मेघ दाटलेले असणार आहेत, नवचैतन्य येणार आहे, धरती हिरवा शालू नेसणारे, मातीचा धुंद वास आम्हाला आर्त करणार आहे. अशी सगळी बेगमी करून झाली.
पडायला लागशील तेव्हा पहिल्या पावसात खुश झालेली माणसे, हिरवे भिजलेले डोंगर, वाहते पाणी, खिडकीच्या गजातून दिसणारा ओला रस्ता, ओले झाड, दिव्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या पावसाच्या रेषा, अति पडलास की सगळं ग्रे आणि एकमेकात मिसळल्यासारखं दिसणारं असं शहरातलं काहीतरी, कमी पडलास तर जमिनीच्या भेगा, असे सगळे फोटो आम्ही आखून ठेवले.
पावसाळी भटकंतीसाठी कसे कसे आणि कुठे कुठे जाल किंवा कसे कसे कुठे कुठे भिजून आलो याबद्दलचे लिखाण कढईत टाकले. मासिके, पाक्षिके, दैनिके, ब्लॉग्ज आणि फेसबुक सगळीकडे लवकरच वाचायला मिळेल हे बघितले. त्याबरोबरच कांदा भजी व इतर पावसाळी हादडणे कार्यक्रमासाठी सुयोग्य पाककृती वगैरेही तयार ठेवल्या.
आणि तू आलास.
आलास तो असा की सगळ्यांची दाणादाण उडवलीस. रोजचे जगणे मुश्कील करून ठेवलेस. कपडे वाळत नाहीत. रिक्षात, ट्रेनमधे पाऊस सर्व बाजूंनी आत येतोय. कामाला पोचायला उशीर, घरी यायला उशीर, कुठे कोरड्या अंगाने पोचायची शक्यताच नाही. सक्तीची घरकैद. स्कूटर स्किड झाली, रेनकोटला गळ्याशी भेग पडलीये त्यातून पाणी आता झिरपतंय. भिंतींना ओल आहे. पावसाळी भटकंतीला जाणे हा जिवाशी खेळच झालाय. कुठे कुठे पूर आलाय. अनेकांचं जगणं त्यात वाहून गेलंय.
एका बाजूला हे तर दुसरीकडे शोष पडलाय. तुझी वाट पाहताना माणसांची आयुष्ये काळवंडून गेलीयेत. तुझी नक्षत्रं कोरडी चाललीयेत.
असा कसा तू? नको तिथे चवताळलायस आणि नको तिथे पाठ फिरवलीयेस. आमची हतबलता झाकायला आम्ही स्पिरीट हा शब्द पांघरून घेतोय. तो ही आता तोकडा पडायला लागलाय. का करतोस असं? हे असंच करणारेस का यावर्षी सगळावेळ? ज्याच्या हिरोसारख्या एंट्रीसाठी एवढी तयारी केली तो तू असा व्हिलनसारखा का वागतोयस? सिनेमातल्या व्हिलनच्या नावाने बोटं मोडतात लोक. तेच होतंय आता. तुझ्या नावाने उपहासाच्या फोडण्या पडायला लागल्या आहेत.
आणि तू सोशल मीडियावरच्या लिखाणखोर दुनियेसारखा उगाच हळवा झालायस. तुझ्या या वागण्यावरही रम्य प्रतिक्रिया, लाईक्स आणि प्रेम देणं बंधनकारक झालंय. नाहीतर हल्ली तुलाही न्यूनगंड येतो आणि मग तुझा मूड जातो. आणि मग असा विचित्र वागतोस.
तुझा मूड गेलेला नाही आवडत मला. तुझ्याबरोबर खूप जुनी मैत्री आहे. तुझी गरज आहेच जगाला, मला. तुझ्या गोष्टी आठवणं, चघळत बसणं आवडतं मला. तुला माहिती नसलेली एक गोष्ट सांगते. बघ तुलाही छान वाटेल.
‘किंचितशी खिन्न छटा चेहऱ्यावर वागवत ती उभी. अचानक तिच्या गालावर एक थेंब पडतो. पहिल्या पावसाचा त्वचेला पहिला स्पर्श. काय घडतंय हे समजायला तिला काही क्षण लागतात. तोवर दुसरा, मग तिसरा थेंब पडतो. तिचा चेहरा आनंदाने चिंब. हातावर पाण्याचे थेंब झेलत ती गिरकी घेते. तिच्या आजूबाजूला अश्याच तिच्यासारख्या मैत्रिणी. पावसाशी खेळणाऱ्या. प्रत्येकीचा पाऊस वेगळा. हळूहळू जमिनीवर पाणी थोडेसे. ती त्यात जोरात उडी मारते. तिच्या मैत्रिणीच्या अंगावर ते पाणी उडते. मग मैत्रीण पण तेच करते. असा सगळा खेळ. थोड्याच वेळात त्या सगळ्या जणी नखशिखांत भिजलेल्या, मातीचिखलाने माखलेल्या. वरून पडणारे पाणी आणि हातापायाच्या तळव्याशी लोण्यासारख्या चिखलाचा स्पर्श ती अनुभवत राहते. हळूहळू अंतर्मुख होते. तिच्या मैत्रिणीही. एका हातावर थोडीशी माती घेऊन एकेक जण उभी राहते. सगळं चित्र बदललेलं. तळव्यावर ठेवलेल्या मातीकडे बघून मग समोर बघत कविता म्हणायला सुरू करते. मंचावरचा प्रकाश बदलतो. ती आणि सगळ्या मैत्रिणी समोरच्या प्रेक्षकाला पावसातून बाहेर काढून वेगळीकडे नेतात आणि अंधारात दिसेनाश्या होतात.’
खोट्या पावसाची खोटी आठवण. खोट्या पावसात भिजण्याची आठवण. प्रत्येक प्रयोगात पाऊस खोटा होता पण प्रत्येक प्रयोगात आम्ही खऱ्याच भिजलो होतो हे पक्कं आठवतंय. तू खरा येतोस तेव्हा असंच भिजायचं असतं हे तेव्हाच माझं ठरलं होतं.
वाळवंटातले डोंगर बघत राहता येतील अश्या जागी काम करायचे. तिथे तू आलास आणि मी अशीच भिजले. खरोखरीचा आलास. जून-जुलैचे म्हणजे खास तुझेच महिने. तिथलं ऋतूचं गणित वेगळं पण माझ्यासाठी हे तुझेच महिने. समोर लांबचलांब बॅकडेक. त्याच्या पलिकडे वाळवंटातले डोंगर. त्यातून कोलोरॅडोला जाणारा रस्ता. डोंगराच्या वर भगभगीत आकाश. तू यायला झालास की समोरच्या चित्रात लगबग सुरू व्हायची. पाच मिनिटात भगभगणारे आकाश खरोखरीच गडद जांभळं व्हायचं. वाळूच्या रंगाचे डोंगर आणि त्यावरची खुरटी झुडपे फोटोशॉपमध्ये सॅच्युरेशन कमी करावे तशी रंगहीन आणि काळपट होत जायची. बॅकडेकच्या फरशीवर वाळवंटाची पिवळी झाक पडलेली असायची ती गायब व्हायची. तिथे बर्फगार राखाडी रंग पसरायचा. जिथे काम करायचे त्या इमारतीचा अॅडोबी गुलाबी रंग नक्की दिसत राहायचा. तुझ्या रेषा मधेच प्रकाश पकडून चमकायच्या. माझ्या हातात कधी कुणाचे शूज रंगवायला असायचे तर कधी चामड्याचे पट्टे तयार करायचे असायचे कधी पुरुषांच्या स्कॉटिश पर्सेस नाहीतर कधी चित्रविचित्र दागिने. माझे हात काम करत राहायचे. डोळे तुला पिऊन घ्यायला उतावीळ. आल्या पावसात भिजायची असोशी माझ्याशिवाय कोणालाच नाही. हे खास भारतीयत्व वगैरे म्हणावं का? पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये तुझ्या अगदी काठावर उभे राहायचे. हळूच स्वतःचीच नजर चुकवून दोन तीन पावलं पुढे जायचे. तोवर कुणीतरी टोकायचेच. सर्दी होईल वगैरे म्हणून नाही. पण तुला असे भेटणे ही मज्जा म्हणून करायची गोष्टच नाही म्हणून. मी काठाशी परत. मी त्या फिरंगी मैत्रिणींना मॉन्सून ट्रेक्स बद्दल सांगायला जाई आणि एरवीचं हायकिंग ठीके पण तू कोसळत असतानाच जायचं काय नडलंय हे त्यांना कळत नसे. तिथे तू येतच असतोस अधूनमधून. आमच्याकडे वर्षातून चार महिने आणि तेही उन्हाळ्याने चांगले भाजून काढल्यावर. म्हणून बहुतेक तुझं कौतुक इतकं.
आता माझ्या शहरात तू वेड्यासारखा येतोस. छळतोस. पण तूच तर मला या शहराला आपलंसं करायला भाग पाडलंस. माझं शहर म्हणायला भाग पाडलंस. नरीमन पॉइंटला मी छत्री उघडली आणि “आपुन आया तो भिगनेका! क्या!” अशी दादागिरी करत ती तू उलटीपालटी करून टाकलीस. हे शहर मी सुंदरही करतो अनेकदा असं खडसावून सांगितलंस. मग एकदा एका आलिशान ठिकाणी कुणाला तरी भेटायला थांबलेले असताना खिडकीतून तू दिसत होतास. इतका जोरदार तुझा आवाज, तुझा वेग. मी खिडकीशी आले, खिडकीतून बाहेर पडले की खिडकीच विरघळली माहिती नाही. माझा आकार मात्र विरघळला होता. एकमेकांच्या आरपार जात होतो आपण. मी कोसळत होते तुझ्यासारखी अथक. नाचत होते. पण मी नव्हतेच. मी तू होते की तू मी होतास? कुणीतरी चहा विचारेपर्यंत मी अशीच आकारहीन होते. हातात चहाचा कप घेऊन मी खिडकीबाहेर बघितलं आणि तू डोळे मिचकावून परत कोसळायला लागलास. ही तुझीमाझी गंमत.
इकडचे तिकडचे शब्दांचे महापूर, तुझं असून अडचण नसून खोळंबा असणं हे सगळं तुझ्या एका स्पर्शाने गायब होतं. मी आपली गंमत परत जगते. थोडी जगण्याची तलखी कमी होते. जगण्याने श्वास कोंडल्यासारखा झालेला असतो तो जरा मोकळा होतो. थोडं बरं वाटतं. थोडी कविता सुचते.
- नी
-------------------
दैनिक लोकमत, मंथन पुरवणी, १५ जुलै २०१८ मधल्या लेखाची ही लिंक.
तू आणि मी... पावसासोबतचा दिलखुलास संवाद.

Sunday, May 20, 2018

ड्रेस कोडची बहुरंगी भानगड

आज म्हणजे २० मे २०१८ च्या महानगरमध्ये आलेला माझा लेख 
-----------------------------------------------------------------
आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून मैत्रिणीच्या लग्नात घालण्यासाठी खास फाडलेल्या जीन्स खरेदी केल्यात.” 
ऍडमिशन झालीरोज कॉलजमध्ये जायला खास बनारसी साड्या घेतल्यात.”
कॉन्फरन्समध्ये भाषण आहेमेंदीवालीला बोलवायला हवंदोन्ही हात आणि पायभरून मेंदी काढून घेणारे मी.  ”

काहीतरी गफलत वाटतेय नाचुकीच्या ठिकाणी चुकीचे काहीतरी चाललंयमैत्रिणीच्या लग्नात फाटक्या जीन्स घालायलाकॉलेजमध्ये रोज बनारसी साडी नेसायला आणि कॉन्फरन्समध्ये मेंदी लावून जायला बंदी नसतेतसं गेलं तर तिथून हाकलून देणार नसतंपण तरीही हे चुकीचं वाटतंया तिन्ही ठिकाणी कशा प्रकारचे कपडे घालायचे याचे काही नियम आपण पाळतोचते नियम समाजाने पाळावेत अशी समाज म्हणून अपेक्षाही असते. 

या नियमांनाच आपण ड्रेस कोड म्हणतोकधी हे लिखित असतात तर कधी अलिखितवेगवेगळे मुद्दे धरून हे नियम बनवलेले असतातमग ते शक्यतो पाळले जातात आणि कधी कधी तोडलेही जातातआता नियम तोडणे हे चूकचत्यामुळे ड्रेस कोड पाळलाच पाहिजे अशी अपेक्षा असते. 

हे इतकं साधंसोपंसरळएकरेषीय असतं तर काय हवं होतंपण तसं होत नाहीकान महोत्सवात रेड कार्पेटवर आपल्या उंच टाचांच्या चपलाहातात घेऊन एखादी क्रिस्टन स्टुअर्ट रेड कार्पेटचा ड्रेस कोड मुद्दामून तोडतेतर एकीकडे न्यायमूर्ती मॅडम तरुण वकील मुलींना अमुक प्रकारचे कपडे घालू नका असा ड्रेसकोडमध्ये नसलेला उपदेश करतातया दोन्ही घटना नुसत्या कपड्यांशी संबंधित नसतात तर ही दोन्हीही महत्वाची सामाजिक विधाने असतातयातूनच चर्चा सुरू होते. 

माणसाचे कपडे ही दृश्य संवादाची भाषा असतेएखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या ठराविक ठिकाणी जे काही मत तयार होते ते त्या व्यक्तीने कपडे काय आणि कसे घातलेतकेस कसे राखलेतदागिने वगैरे काय आहेत वा नाहीयेत इत्यादी सगळ्या जामानिम्यावरूनमग अशा वेळेला ठराविक ठिकाणी एखाद्याबद्दल काय मत व्हायला हवे याबद्दल अपेक्षा तयार होतातया अपेक्षांना धरून नियम बनवलेले असतात. 

दोन वर्षांपूर्वी कान चित्रपट महोत्सवामध्ये महत्वाच्या इव्हेण्टला काही महिलांना उंच टाचांचे शूज घातले नाहीत म्हणून प्रवेश दिला गेला नाहीखरंतर चित्रपट महोत्सवाला असा लिखित ड्रेस कोड नाही पण जगभरात चित्रपटफॅशननाटक या गोष्टींशी संबंधित सोहळेमहोत्सव वगैरे बघितले तर अश्या सर्व प्रतिष्ठित ठिकाणी बहुतेक सर्व स्त्रिया या उंच टाचांच्या शूजमधेच दिसतातस्त्रियांसाठी उंच टाचांचे शूज हा अलिखित ड्रेस कोडच आहेउंच टाचांचे शूज म्हणजे सौंदर्यकमनीयतातारूण्य या सगळ्याचे एक प्रतीक असल्यासारखेसौंदर्यकमनीयतातारूण्य याशिवायच्या स्त्री अश्या ठिकाणी निषिद्धच असे प्रवेश  द्यायचा निर्णय घेणाऱ्यांचे म्हणणे असावेया म्हणण्याला विरोध म्हणून तिने यावर्षी रेड कार्पेटवर अनवाणीच जाणे पसंत केलेती यावर्षीच्या ज्युरीमधे होतीच त्यात तिचे हॉलिवूडमधले स्थान बघता तिला अर्थातच कुणी अडवले नाही आणि तिचा विरोधही नोंदवलागेलामहोत्सवाच्या आयोजकांकडून असा नियम नाही हे वदवून घेण्यासाठी ही कृती महत्वाची ठरली.  

स्त्रीचे शरीरआकार यांना नियमांमधे बसवून वस्तूकरण करण्याला आजवर जो विरोध झालेला आहे तो असाच वेगवेगळे ड्रेस कोडस तोडूनच झालेला आहेमग ते स्त्रीवादी चळवळीच्या सुरूवातीच्या काळातले ब्रा-ज्वलन असो किंवा १८४० च्या दरम्यान अमेलिया ब्लूमरने तयार केलेला ब्लूमर कॉश्च्युम असो. 

हे झाले वस्तुकरणाबद्दलपण जेव्हा न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा स्त्री वकिलांना व्यवसायाला योग्य असे आणि सभ्य जामानिमा असावा असा उपदेशकरतात त्यात वस्तूकरण नसूनही त्याबद्दल चर्चा होतेच. 

बघायला गेलं तर हा उपदेश अगदी योग्य आहेभारतीय बार कौन्सिलने स्त्रिया  पुरुषांसाठी ड्रेस कोड ठरवून दिलेला आहे त्यात व्यवसायाला योग्य आणि सभ्य असे शब्द येत नाहीतपण अर्थातच ते अध्यहृत आहेतपण जेव्हा न्यायमूर्ती मॅडम पलाझोसारखी कपड्यांची नावे घेऊन बोलतात तेव्हा प्रश्न पडतातचबार कौन्सिलने दिलेल्या ड्रेस कोडमध्ये पलाझो येत नाहीतपण त्यांना लांब स्कर्ट चालतोसाडी चालतेसलवार आणि कुडता चालतोओढणीसकट की शिवाय हे स्त्रियांनी स्वतः ठरवायचे आहे. 

लांब स्कर्ट म्हणजे नक्की किती लांबगुडघ्यापर्यंतगुडघ्याखालीकी घोट्यापर्यंतपांढरी साडी म्हणजे हिंदी सिनेमातल्या विधवा मॉं सारखीकी पांढऱ्या साडीत पावसात भिजणारी हिरवीण दाखवतात तिच्यासारखीसलवार कुडता वापरताना कुडत्याची लांबी कितीतो अंगाबरोबर असायला हवा की घट्ट की ढगळत्याचा गळा किती खोल हवाओढणी घेतली तर कशी घ्यायचीया सगळ्या प्रश्नांना लिखित उत्तरे बार कौन्सिलच्या ड्रेस कोडमध्ये नाहीतआपण घालू त्या कपड्यात सभ्यतेचेप्रतिष्ठेचे कितीवळसे आहेत हे जिच्या तिच्या तारतम्यावर आधारित आहेया तारतम्याचे काय करायचेतारतम्याचे नियम लिहिता येत नाहीत आणि  तारतम्य कुठे विकतही मिळत नाही. 

पलाझोबद्दल बोलायचे तर जरा सलवार कुडता चालू शकतो तर पलाझो कुडता का चालू शकत नाही हे अनाकलनीय आहेबारा कौन्सिलने नियम केले तेव्हा पलाझो अस्तित्वात नसतील पण आता आहेतपलाझो - कुर्ता हे पुरेसे व्यावसायिकसभ्य  प्रतिष्ठित दिसू शकतेचतर मग ते चालणार नाही असे का? थोडक्यात हे नियम आता कालबाह्य झालेत आणि आजच्या काळाप्रमाणे ते बदलायला हवेत. 

म्हणजे पेहरावाच्या बाबतीत सभ्यव्यावसायिकप्रतिष्ठित हे कालानुरूप बदलू शकतंआज जे असभ्य मानलं जातं ते उद्या सभ्य होउ शकतंचतर मग सभ्यव्यावसायिक आणि प्रतिष्ठित या संकल्पनाच गडबडलेल्या आहेत काकी पूर्णपणे तारतम्यावरच अवलंबून आहेतआणि त्यावर अवलंबून असतील तर ड्रेस कोड हवा कशाला? 

सभ्यप्रतिष्ठित वगैरे विशेषणे मुळातच माणसांची प्रतवारी ठरवणारी आहेतजिथे जिथे व्यावसायिक ड्रेस कोड असतो आणि त्या ड्रेस कोडचा मूळ उद्देश सभ्यप्रतिष्ठितव्यावसायिक वगैरे दिसावे असा असतोतिथे तिथे माणसांची प्रतवारी एवढीच माणसाची ओळख बनतेहे योग्य आहे की अयोग्यव्यावसायिक स्तरावर जिथे वैयक्तिक तपशिलांना दूर सारून काम केले जाण्याची गरज आहे तिथे म्हणजे कोर्टातसरकारी ऑफिसातकंपनीत कदाचित हे योग्य असावे. 

पण ही ड्रेस कोडची चौकट अतिशय संकुचित आहेयापलीकडे सभ्यताप्रतिष्ठितपणा अस्तित्वात नाही असे नाहीया ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही वापरले गेले तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणेत्या व्यक्तीची व्यावसायिक क्षमता पुरेशी नाही असे अंदाज बांधणे हेबालिश आणि अमानुष आहेपरत या चौकटी नुसत्याच काळाबरोबर नाही तर व्यवसायानुसारही बदलत जातातपण या नियमांच्या चौकटीमुळेमाणसे एकमेकांवर शिक्के मारायला मोकळी होतात. 

मग ड्रेस कोड असूच नयेत काकुणीही कसेही घालावेत कपडेकारण कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधू नये म्हणताततर नाही असे होऊ शकत नाहीशेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहेकपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहेआजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असतेहोतच राहणारनियमांचे तपशील बदलतील पण अलिखित का होईना नियम असणारचमाणूस आणि माणुसकी या नियमांच्यापेक्षा मोठी आहे ही जाणीव ठेवण्यात आपले माणूसपण आहेनाही का? 

- नीरजा पटवर्धन

Wednesday, February 28, 2018

कापडाचोपडाच्या गोष्टी


बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं. तर तेच सगळं तुमच्या पर्यंत पोचावं म्हणून जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये हा विषय घेऊन सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येईल. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे.
संपूर्ण लेख ब्लॉगवर टाकणार नाहीये. पण इथे लोकमतच्या लेखांच्या लिंका देते आहे.
 • माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो.    हे सर्व कुठून येते? २९ जानेवारी २०१८
 • आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो.  
  नेसूचे आख्यान 
  - २७ फेब्रुवारी 
 • अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते. 
  'साडी नेसणं...' 
  - २७ मार्च 
 • उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार-उकार स्पष्ट करणारी वस्रं ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं..
  'झाकपाक' 
  २४ एप्रिल
 • माणसं प्रवास करतात, स्थलांतर करतात, नवीन प्रदेश पादाक्रांत करतात. आपल्या जगण्याच्या पद्धती या नवीन ठिकाणी घेऊन जातात आणि नवीन ठिकाणच्या पद्धती आत्मसात करतात. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो आणि संस्कृतीची कथा नवं वळण घेते..आपलं काय काय म्हणायचं? - २९ मे 
 • ब्रिटिश भारतात आले तोपर्यंत भारताच्या वस्त्नकलेनं खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापड विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधनं आणि प्रक्रि या या सर्व गोष्टींचं प्रचंड वैविध्य होतं. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापार्‍यांना भुरळ पडली.
  भारतीय वारसा - २६ जून
 • एखाद्या संस्कृतीशी जोडलेली प्रतीकं, चिन्हं यांची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच,काही प्रमाणात!ते स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य आणि अयोग्य याविषयी मात्र अजून संभ्रम आहेत.
  थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै
 • रोमानिया देशाचं फॅशनला वाहिलेलं एक मासिक.बिहोरच्या लोकांबरोबर त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेसाठी उभं राहिलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला. आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून, पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत ऑनलाइन विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला. 
  बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट
 • युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्याद्वारे नियंत्नण ठेवण्याची चौदाव्या लुईची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ,शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचं केंद्र फ्रान्स असलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडं,कपडे, आभूषणं आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्यानं घडवून आणलं.
  कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर 

 • ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाहिलीस का तिची? कॉटनबिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाइन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात?’ ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रिणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूजकाकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता.  साधेपणाच्या नोंदी ३० क्टोबर 
 • माणसानं कापड, रंग यांच्या साहाय्यानं शरीर झाकायला आणि सजवायला सुरू केलं तेव्हापासून कातडीवरचं आवरण हे त्या माणसाबद्दल बरंच काही सांगणारी दृश्यभाषा आहे. आणि ती वाचायला शिकणं ही मजेची गोष्ट आहे.
  शब्देविण संवादु! - २७ नोव्हेंबर
 • जानेवारीपासून 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे सदर लिहिले. आजच्या 'अजून थोडी इतिहासाची पानं!' या लेखाने सदराचा समारोप करते आहे.  अजून थोडी इतिहासाची पानं - २५ डिसेंबर 


वाचा आणि प्रतिक्रिया कळवत राहा.

- नी 

Search This Blog