Saturday, August 6, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप 6 - पाऊस

 रिपरिप, संततधार, एका लयीत, सतत असा पाऊस पडत राहतो. पावसाच्या शेजारी बसून माझं काम चालू असतं. हाताने काहीतरी घडवण्याचं. पावसाच्या लयीवर डोक्यात शब्द, आठवणी, घटना, वाक्यांचे पुंजके आणि नुसतंच काहीतरी वाटणं - याला हिंदीत एहसास म्हणतात. मराठीत इतका सुंदर शब्द का नाहीये? - असं सगळं घरंगळत असतं.

मेंदूचा एक भाग हातातल्या वस्तूच्या घडत राहण्यावर लक्ष ठेवून असतो. बाकी भाग लयदार पावसाबरोबर मोकाट सुटलेला.
मग तो जाऊन पोचतो माझ्या प्रिय गावाला. प्रिय शब्दात मावतच नाही खरं तर माझं आणि त्या गावाचं नातं. पण सध्या प्रियच म्हणूया.
त्या प्रिय गावात डोंगरमाथ्यावर असलेल्या ऑपेरा रांचच्या कॉश्च्युम शॉपच्या डेकच्या बाजूच्या दाराबाहेर एक शेड आहे. तिथे बसून मी काम करते. कधी फॉलस्टाफच्या गाऊन्सना मॅचिंग होतील असे शूज रंगवणे, कधी लुचिया डी लमारमूरच्या कोरसचे स्पोरॅन बनवणे, कधी व्हीनस अँड अडोनिस साठी युरोपातून आलेल्या मास्कवर काम करणे असे काहीही असू शकते.
रांचवर प्रत्यक्ष ऑपेरा हाऊसमध्ये येण्याचा रस्ता या बॅकडेकवरूनच आहे. पुढच्या बाजूने फक्त प्रेक्षक येतात. बाकी सगळी यंत्रणा इथूनच येते. कोण आले कोण गेले मला सगळे दिसतात. पायऱ्यांवर बसलेला हातशिलाईचा अड्डा दिसतो. आता मी त्याचा भाग नसते. यावर्षी मी कॉश्च्युम क्राफ्टच्या टीममध्ये आलेली असते. एक प्रमुख, एक फर्स्ट हॅन्ड, एक असिस्टंट, एक अप्रेंटीस आणि गरजेप्रमाणे व्हॉलंटियर्स असा आमचा छोटा परीवार आहे. पण आमच्याकडे बरीच जादू घडत असते. पायापासून चेहऱ्यापर्यंत ज्या ज्या बारीक सारीक accessories (याला चांगला मराठी शब्द सुचवल्यास... ) असतात त्या इथे बनतात, दुरुस्त होतात, सजवल्या जातात. खऱ्या आयुष्यात ती वस्तू जशी आणि ज्या गोष्टीपासून बनते तसे इथे असेलच असे नसते. सोन्याचा पत्रा लावलेले चिलखत कॅनव्हासचे, चांदीचे स्पोरॅन पॉलिमर क्लेचे अशी सगळी गंमतजंमत असते.
तर ही सगळी कामे त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे हवेशीर जागी बसून करावी लागतात. अश्या तऱ्हेने बॅकडेकला लागून असलेली शेड माझी कर्मभूमी बनते. आणि मी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांवर नजर ठेवून काम करत राहते. अंगावर शंभर डाग पडलेला एप्रन, नाकावर रेस्पिरेटर, डोळ्यांवर सेफ्टी गॉगल्स, हातात वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळी केमिकल्स अडवणारे ग्लोव्ह्ज अश्या सगळ्या किंवा काही वस्तू असतात. त्यात मी गायब होऊन जाते.
काही गायकनट, काही डिझायनर्स, विविध शॉपमधली काही माणसे येताजाताना दिसली की त्या वाळवंटात, उन्हाळ्यात, डोंगरमाथ्यावर मस्त गार वाटतं. कधीकधी अशी माणसे बघायला म्हणून लुचियाचा कॉश्च्युम डिझायनर चार्ली माझ्या शेडमधल्या टेबलाशी जास्त रेंगाळतो. मग आम्ही कामाच्या चर्चेबरोबर येताजाता दिसणारे चटके आणि त्यांनी डोळ्याला दिलेला गारवा यांची प्रतवारी करतो, क्रम लावतो.
पण एखादा दिवस वेगळा असतो. चटका माणसे आणि त्यांचा गारवा खिजगणतीतही राहात नाही. डेकवरून दिसणारा आकाशाचा स्वच्छ पण तापता निळा, डोंगररांगांचा लालसर पिवळा, मधूनच उगवलेल्या खुरट्या झुडुपांचा हिरवा काळा, बॅकडेकच्या फरशीचा पिवळट राखाडी, ऑपेरा हाऊसच्या भिंतींचा अडोबी लाल, दूरवर दिसणाऱ्या कोलोरॅडो हायवेचा मळकट ग्रे, सगळ्यावर पडलेला भगभगीत उजेड असे सगळे वाळवंटाचे रंग बदलायला लागतात. आकाशात जांभळे, लाल, काळे रंग दिसायला लागतात. भिंतींचा अडोबी लाल सोडून सगळे रंग आपला स्वत्व सोडून ग्रे स्केलवर वेगवेगळ्या जागी जायला लागतात. मग सगळं आभाळ गच्च काळंजांभळं होतं. आणि दोन मिनिटात पावसाचा खेळ सुरू होतो. सर्व जग ग्रे झालेलं असतं.
माझ्या भारतीय मनाला पावसात भिजायची तहान लागते. अमेरिकन येड्यांना ही गोष्टच समजत नाही. मी मात्र हाताने काम करता करता मेंदूने सह्याद्रीत भिजत भिजत फिरून आलेली असते.
जशी आत्ता वसईत बसून सँटा फे ला फिरून आले!!

Friday, July 29, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन

हे प्रत्यक्ष सँटा फे ऑपेराच्या इथले नाहीये पण कॉश्च्युम शॉपचीच गोष्ट आहे म्हणून याच सिरीजमध्ये घेतेय.

------

 मी आणि केविन एकमेकांच्या कटींग आणि पिनिंगवर हसायचो. कटींग म्हणजे कापड बेतणे आणि बेतलेले दोन कापडाचे तुकडे मशीनवर जोडताना आधी टाचण्या लावायच्या असतात ते पिनिंग. केविनला वेळ लागायचा. मी धडाधड करायचे. त्यामुळे मी माझे नाक खूप वर करायचे. मग यायची बाही. बाही गोल जोडताना - म्हणजे आधी बाही बनवून मग ती धडाला जोडणे - हे करताना बाहीची शिवण नेमक्या गोलाव्यात कधी कधी उसवायला लागायची मला. पण केविनला कधीही तसे करायला लागायचे नाही.

कापडाचे चार थर ठेवायचे. वरच्या थरावर पॅटर्न काढायचा. सगळ्या बाजूने शिलाईसाठी ठराविक माया सोडायची आणि एकदम चार थर कापायचे. नंतर कडेला कड जोडून जितकी माया सोडली असेल त्या हिशोबाने मशीन मारायची. हवं तर शिलाईच्या रेषेला काटकोनात टाचून घेऊन मशीन मारायची. किती सोप्पंय ना? मला असंच शिकवलं गेलं होतं इथे.
केविन म्हणजे माझ्यासारखाच असिस्टंटशिपवर एम एफ ए करणारा आणि असिस्टंटशिपचा भाग म्हणून कॉश्च्युम शॉपमधे काम करणारा माझ्यापेक्षा दोन वर्ष जुना विद्यार्थी आणि टिना आमची शॉप मॆनेजर. दोघेही माझी कापड बेतायची, कापायची, टाचायची पद्धत बघून अवाकच असायचे. इतकं ढोबळपणे कपडे शिवणे त्यांच्या पचनी पडत नव्हते.
एक दिवस मला माहिती असलेल्या पद्धतीप्रमाणे म्हणजे जिथे शिवण मारायची त्या रेषेला काटकोनात येतील अश्या प्रकारे पिना टाचून मशीन मारत असताना सुई नेमकी आपटली पिनेवर आणि सुईचा तुकडा पडला आणि उडाला. नशिबाने चेहऱ्यावर न येता कुठेतरी पडला. आणि केविन हसला किंवा मला तसे वाटले.
मग मी केविनची पद्धत समजून घेतली. एकावर एक चार थर बसवून कापड कापताना एखाद्या थरातले कापड थोडेसे मागेपुढे सरकू शकते. सर्व थरांवर पॅटर्न आखलेला नसतो. अश्या वेळेला ठराविक माया गृहित धरून तेवढे आतमधे असे समजून शिलाई मारली गेली तर पॅटर्नमधे गोंधळ झालाच म्हणून समजायचा. गळे, कॉलर्स, बाही वगैरे अश्या ठिकाणी असा एक मिलीमीटरचा फरक पण त्रासदायक ठरतो.
यासाठी जेवढे लेयर्स त्या प्रत्येकावर पॅटर्न आखला जायला हवा. आणि माया गृहित धरून शिवण न मारता. जिथे पॅटर्न आखलाय त्या रेषा म्हणजे शिलाईच्या रेषा जोडून कापड टाचले गेले पाहिजे. खरंतर कापड कापतानाही एकदम अनेक लेयर्स कापायचेच नसतात पण सर्व थरांवर पॅटर्न आखला की मग कापड एकत्र कापताना एखादा लेयर सरकला बिरकला तरी गोंधळ होत नाही.
मग येतं पिनिंग. तुमचं कापड घट्ट आहे, शिवणी सरळ आहेत तर दोन्ही बाजूच्या शिलाईच्या रेषा एकावर एक ठेवून त्या रेषांच्या काटकोनात टाचण्या लावल्या अंतरावर तर चालू शकते. मात्र मशीनच्या पायाखाली जायच्या आधी ती पिन काढून बाजूला करायला हवे नाहीतर मशीनची सुई टाचणीवर आपटून तुटणे, तो तुकडा उडून कुठेही लागणे, टाचणी वाकणे वगैरे गोंधळ होतात.
पण तुमचं कापड सुळसुळीत आहे, शिवणींच्यात गोलवा आहे तर मात्र दोन्ही बाजूंच्या शिलाईच्या रेषा एकावर एक ठेवून त्या रेषेवरच आणि अगदी कमी अंतरावर पिना टाचायला हव्यात. म्हणजे साधारण संपूर्ण शिलाई पिनांनीच केल्यासारखे कापड जोडले जाईल. कुठेही नको तशी चूण किंवा कापड ओढले जाणे होणार नाही. मशीनखाली ज्या दिशेला कापड जाणार त्या दिशेला पिनांचे टोचरे टोक ठेवायचे आणि कापड मशीनच्या पायात पुढे पुढे जाताना एकेक पिन मागे काढून टाकायची.
याला वेळ लागतो. पण प्रेसिजन हवे तर हे हवेच. या प्रेसिजनची सवय लागली, ही पद्धत हातात-डोक्यात बसली आणि मी पण केविनबरोबर पुरेसा वेळ घेऊन, दहा वेळा न उसवता कपडे शिवू लागले. अमेरीका देशी, जॉर्जिया प्रांती असलेल्या एका युनिव्हर्सिटीतल्या नाटकांच्या कॉश्च्युमसाठीही इतपत प्रेसिजन तर असायलाच हवे. किंवा कुठेही प्रेसिजन असायलाच हवे हा धडा मिळाला. असे विविध धडे वर्षभर गिरवत मी सँटा फे ऑपेराच्या कॉश्च्युम शॉपमधे काम करण्यासाठी, अजून पुढच्या पातळीचे प्रेसिजन शिकण्यासाठी सज्ज होत गेले.
बारीकसारीक गोष्टीत प्रेसिजन राखायला शिकलं की आपोआपच ते सगळ्या कामात, जगण्यात उतरायला लागतं. मग तुम्ही आयुष्यभरासाठी बरबाद होता. त्याची सुरूवात इथे झालेली होती.

Sunday, June 12, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ४ - रिश्ता आया है!

 हातशिलाईच्या अड्ड्यात अप्रेंटीस असायचे आणि व्हॉलंटीयर्स. अप्रेंटीस क्वचितच सँटा फे मधले स्थानिक असायचे. तर कॉश्च्युम शॉपच्या व्हॉलंटीयर्स या सँटा फे आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रिटायर्ड बायका असायच्या. शिकत असलेले, शिक्षण संपून खऱ्या जगात उतरू पाहणारे अप्रेंटीस आणि रिटायर झालेल्या, वेळ घालवायला काम करणाऱ्या व्हॉलंटीयर्स असे फार गमतीशीर मिश्रण असायचे हातशिलाईच्या अड्ड्याचे.

वयातला आणि अनुभवातला फरक असला तरी लगेच अप्रेंटीस लोकांनी व्हॉलंटीयर्सना काकू-मावशी-आजी म्हणत लीन व्हावे, त्यांचे ऐकावे वगैरे बावळटपणा तिथे चालत नसे. त्यामुळे गप्पा तश्या म्हणायच्या तर एका पातळीवर चालत.
या सगळ्या सत्तरीच्या आगेमागे असलेल्या बायका एकट्या किंवा फारतर दुकट्या राहात, आनंदी असत आणि मूळ शहरापासून 10-15 किमी दूर असलेल्या ऑपेरा रांचवर रोज आपले आपण ड्राइव्ह करून किंवा कारपूल करून येत असत. यातल्या काहींच्या घरातल्या जास्तीच्या रूम्स त्या ऑपेरा कंपनीला सीझनपुरत्या भाड्याने दिलेल्या असत. कंपनी मग तिथे अप्रेंटिस गायकनटांची राहायची व्यवस्था करे.
कॉश्च्युम शॉपच्या आणि इतर क्रूच्या त्या सगळ्या पसाऱ्यात मी एकटीच देसी असल्याने अनेकजण कुतूहलापोटी भोचक होत असायचेच त्यामुळे थोडा भोचकपणा मी स्वीकारून टाकला होता. यातल्या काही टिपिकल अमेरिकन म्हणजे अमेरिकेच्या पलिकडे जग असतं आणि माणसं राहतात आणि आनंदात असतात याची जाणीव नसलेल्या गोऱ्या काकवा, आज्या असायच्या तर काही हिस्पॅनिक.
एका गोऱ्या काकूंना अमेरिकन असणे (आणि बहुतेक गोरे असणे) खूप मिरवायचे असे. "आम्ही अमेरिकन असल्याने माझ्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते त्यामुळे त्यांनी आम्हा सर्व बहिणींना, मुली असलो तरी, व्यवस्थित शिक्षण मिळेल इकडे लक्ष दिले. शिक्षण पूर्ण होऊ दिले." असे मला त्यांनी बरेच वेळा सांगितले होते. त्यामुळे या काकू आणि त्यांच्या बहिणी प्रचंड उच्चविद्याविभूषित आहेत असा माझा समज होता. मग एकदा गप्पा मारताना लक्षात आले काकू आणि बहिणी केवळ हायस्कूल पूर्ण केलेल्या होत्या. आणि मी तिथे माझी दुसरी मास्टर्स करायला गेले होते.
आमच्या टेबलची व्हॉलंटियर होती रोझ. हिस्पॅनिक होती. हिस्पॅनिक लोक बहुतांशी कॅथलिक आहेत. रोझ पण अर्थातच. तिच्या बोलण्यात धार्मिक उल्लेख खूप असायचे. 'गॉडच्या नजरेत तू पण ख्रिश्चनच आहेस' वगैरे म्हणायची. पण ते हसून उडवून लावले तर लगेच संगीत मानापमानाचा प्रयोग घडत नसे हे महत्वाचे. रोझच्या घरात दोन अप्रेंटीस गायकनट राहात होते. एक शिकागोहून आलेला गोरा मुलगा होता आणि दुसरा मात्र रेअर केस म्हणजे चक्क एबीसीडी* होता. आताचे माहीत नाही पण 90च्या दशकातले एबीसीडी तरुण कलाबिला, गाणेबिणे असल्या नादाला लागणे हे खूप दुर्मिळ होते.
ती आम्हाला त्यांच्या कथा सांगायची आणि अर्थातच त्यांना आमच्या सांगत असणार. आधी ब्राऊन रंगामुळे मी तिला तिच्यासारखीच वाटले होते. पण तिने माझ्याशी स्पॅनिश बोलायच्या आधीच मी इंडियन आहे ती ही खरी खरी इंडियन, कोलंबसाने डेली वाटल्यामुळे इंडियन शिक्का बसलेल्या टाईपची इंडियन नाही हे तिला कळले होते.
तिला माझ्याबद्दल विशेष माया आहे असे वाटायचे. मला आणि टेबलावरच्या बाकी लोकांनाही. बाकीच्यांसारखे indifferent वगैरे मी वागायचे नाही, वयाचा मान कितीही नाही ठरवला तरी दिला जायचा यामुळे तिला आपलेपणा वाटत असावा असे मी गृहीत धरले होते. ती मला खूप प्रश्न विचारे. माझ्या घराबद्दल फॅमिलीबद्दल वगैरे. तिने एका रविवारी आम्हाला घरीही बोलावले होते. नांबे फॉल्सला जाताना वाटेत तिचे घर होते म्हणून आम्ही तिच्याकडे गेलो होतो. ब्रेकफास्ट खाताखाता आम्ही आलो आणि ते दोघे गायकनट नेमके बाहेर गेलेत याबद्दल चार वेळा तरी चुकचुकली होती.
तिच्याकडे राहणारे दोघे गायकनट जाता येता बघून माहीत होतेच. आम्ही गप्पाटप्पा करायचो त्या गायकनटांपैकी एकाशी त्यातल्या गोऱ्याची मैत्री होती. त्यामुळे काऊगर्लसमध्ये क्वचित हाय हॅलो झालेही होते.
पण अर्थातच एबीसीडी - त्याचे नाव आलोक - आणि मी एकमेकांशी कधी बोलणे तर सोडा हॅलो वगैरेही केले नव्हते. साहजिक आहे तेव्हा तरी युनिव्हर्सिटीज वगैरे मध्ये एबीसीडी आणि एफोबी• लोक एकमेकांना व्यवस्थित पाण्यात बघत. त्यामुळे बाकी सगळ्यांशी बोलले तरी एबीसीडीशी/ एफोबीशी कोण बोलणार वगैरे नकचढेपणा होताच.
आणि एक दिवस तिने मला सुचवले की मी आणि आलोकने डेटवर जावे. तिने हेच आलोकलाही सुचवलेय हे ही सांगितले. तुमचे लग्न व्हायला हवे हे ही. मी थक्क, चकित आणि बंद पडलेली. यासाठी म्हणजे मॅचमेकर बनण्यासाठी तिला माझ्यात इतका इंटरेस्ट होता तर!
मला माझा माझा एक बॉयफ्रेंड आहे भारतात आणि मी परत जाऊन त्याच्याशी लग्न करणार आहे हे शक्य तितक्या स्पष्टपणे सांगितले. आणि नसता तरी मी आलोकच्या मागे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे हे असलं माझ्या वतीने कुणाला सुचवणे हे माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. उगाचच गैरसमज निर्माण करणारे आहे त्यामुळे तिने परत असले काही करायला जाऊ नये आणि आलोकलाही मला असला काही इंटरेस्ट नाही हे स्पष्ट करावे असे खडसावले.
यावर एखादी भारतीय काकू 'ह: ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं!' असं ऐकवून राग घेऊन बसली असती. रोझ मात्र ओशाळली, सॉरी म्हणाली, आपण जरा जास्तच भोचकपणा केला हे ही तिला मान्य झाले वगैरे.
नंतर एकाच टेबलवर असलो तरी मी तिच्याशी बोलणे कमी केले. पूर्ण सीझनमध्ये आलोकशी कधीच ओळख, मैत्री झाली नाही/केली नाही. शक्यतोवर आम्ही एकमेकांना टाळत राह्यलो.
*एबीसीडी = ABCD = American born confused desis म्हणजे तिथेच जन्मलेली भारतीयांची धड ना देसी, धड ना अमेरिकन मुले(असे माझे म्हणणे नाही. भांडायला येऊ नका.)
•एफोबी = FOB = Fresh off the boat म्हणजे इथल्या संदर्भात भारतातून आलेले गावठी पब्लिक.
ताक: अजूनही अश्याच प्रकारे हे वापरले जाते की नाही याची कल्पना नाही. आणि अजूनही ABCD विरुद्ध FOB अशी टशन असते की नाही याचीही कल्पना नाही.

Wednesday, June 1, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ३ - जूनची लगीनघाई

 जून महिना लग्नघाईचा असतो तिकडे. त्या सीझनसाठी घेतलेले गायकनट ते क्रू मधले सर्व विभागांचे लोक रांचवर असतात. रांच म्हणजे ऑपेरा रांच.

मुख्य गावाकडून उत्तरेला जायला जुना ताओस हायवे किंवा हायवे 285 पकडायचा. जात राहायचं, जात राहायचं मग एका ठिकाणी डावीकडे ऑपेरा ड्राइव्हवर शिरायचं. थोडा चढ आणि काही वळणे झाली की आपण डोंगरमाथ्यावर पोचतो. तिकडे उजव्या बाजूला आकाशात घुसलेली ऑपेरा हाऊसच्या छताची टोके आणि अडोब बांधकाम दिसते. मग गेट दिसते. पार्किंग लॉट दिसतो. हा सगळा ऑपेरा रांच.
तर या रांचवर जून महिना लग्नघाईचा असतो. जून अखेरीला शनिवारी रात्री सीझनचा पहिला ऑपेरा लोकांसाठी ओपन होणार असतो.
हातशिलाईचा अड्डा आता तोंड कमी आणि हात वेगात चालवताना दिसायला लागतो. गायकनट हाऊसच्या गेटमधून येताना दिसला की हातातल्या हेमिंगचा वेग वाढवून ते पूर्ण करायचे आणि मग तो ताजा ताजा गारमेंट पळत पळत ट्रायल रूममध्ये ठेवून यायचा. अश्याही गमती घडतात.
ऑपेराच्या स्टेजवर तालमी चालूच असतात. उत्कृष्ट गायकांचा कोरस, त्याहून उत्कृष्ट आणि अनुभवी गायक प्रिन्सिपल (प्रमुख भूमिका) गायला आणि त्याच तोडीचे उत्कृष्ट वादक. व्हायोलीन्स, व्हायोलाज, चेलो, कॉन्ट्राबास, बेसून, ओबो, trumpet आणि बासऱ्या अशी एकूण 20-25 वाद्ये. हे सगळे मिळून विविध प्रवेशांच्या तालमी होत. स्वर्गीय सूर आसमंतात भरून गेलेले असतात.
हे असं ऐकत ऐकत हातातले काम करायचे. आपल्याला शिवणकाम करायला सुकून मिळावा म्हणून हे सगळे प्रत्यक्ष गातायत अश्या रम्य कल्पना केल्या जायच्या. पण शेवटी कितीही सुंदर असलं तरी सवयीचं, परिचयाचं, शब्द कळतील असं, मस्त ठेका असलेलं असं संगीत नाहीच ते. हरवल्यासारखं व्हायचं. मग वॉकमन( 😃 ) बाहेर काढायचा. हेडफोन कानावर लावायचे. बरोबरच्या कॅसेटसपैकी एक आत ढकलायची. ओळखीच्या गाण्यांचा माहौल तयार करायचा आणि परत थिंबल चढवून हातशिलाईला भिडायचे.

Wednesday, May 4, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २अ - मॅगीची आयडिया

 गेल्या पोस्टमध्ये मॅगीबायच्या आयडियेबद्दल (हे लिहिल्यावर मजेशीर वाटतेय) सांगितले. अनेकांना नक्की काय गुंडी ते लक्षात आले नाही. साहजिक आहे. अश्या प्रकारचे कपडे आपल्याला पूर्ण अनोळखी असल्याने पटकन लक्षात येणे अवघड आहे. म्हणून ही छोटीशी चित्र-पोस्ट.



फोटोमध्ये दिसतंय ते नेहमीचं लेसिंग. कापडाचे य लेयर्स एकत्र असतात आणि जिथे दोन कडा मिळतात तिथे रिव्हेट्स(आपल्या भाषेत रिबीट!) करून लेसिंग केले जाते. हा बुटांच्या नाडीचाच फंडा आहे. बुटांची नाडी आठवली की तुम्हाला या लेसिंगसाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज येईल.
दुसऱ्या आकृतीत दिसेल की कोर्सेटच्या एका कडेला रिव्हेट्सऐवजी नाडीचे लूप्स शिवलेले आहेत. आणि त्या लूप्समधून एक बोनिंग - कोर्सेट शिवताना कापडांच्या य लेयर्समध्ये ठराविक अंतरावर धातूची पट्टी घालतात. जेणेकरून कोर्सेटचा आकार घट्ट होईल. पूर्वी यात व्हेल माश्यांची हाडे किंवा लाकडी पट्ट्याही घालत. या प्रकाराला बोनिंग म्हणतात - असे बोनिंग घातलेले दिसेल. चित्रात लाल रंगाने हे बोनिंग दाखवलेय. रिव्हेट्स ऐवजी कोर्सेटची कड, लूप्स आणि बोनिंग यांच्या मधली रिकामी जागा लेसिंगसाठी वापरलेली आहे. यातला एक फॅक्टर वजा झाला की लेसिंगसाठीची होल्स नाहीशी होणार. ती नाहीशी झाली लेसिंगही टिकणार नाही. तो एक वजा करायचा फॅक्टर म्हणजे बोनिंग. तेच खेचून काढायचे. लेसिंग सुर्र्कन मोकळे.
अर्थात हे तितके सोपे नाही. याच्या मागे पॅटर्निंगची बरीच आकडेमोड, शरीर-कपडा-गुरुत्वाकर्षण-वेळ यांचे गणित वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. उगाच नाही मॅगीला ग्रेट म्हणत मी!

Sunday, May 1, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २ - मॅगी रेवूड

 'वरच्या मजल्यावर कोण कोण जाणार? मला टेबल बदलायला आवडेल किंवा मला नाही आवडणार. काय बघून ठरवतील वरच्या मजल्यावरच्या टेबलाची टीम? '

रोज सकाळी वेगवेगळ्या टेबलावरच्या अप्रेंटिस लोकांचा स्टेजच्या मागच्या पायऱ्यांवर हातशिलाईचा अड्डा जमायचा. सगळेजण आपापले हातशिलाईचे काम आणि आयुधे म्हणजे उजव्या बाजूला छातीच्या वरती अंगातल्या कपड्यावर टाचून ठेवलेल्या सुया, खिशात रीळ, हातात थिंबल, गळ्यात स्निप्सचे नेकलेस आणि गरज असल्यास चष्मे. असा युनिफॉर्म घातलेला घोळका त्या लांबरुंद पायऱ्यांवर बसलेला असायचा. प्रत्येकाच्या हातातले हातशिलाई करायचे गारमेंट्सही तिथे रुळत असायचे. लांबून बघितले तर एकाच लांबरुंद, घोळदार गाऊनमध्ये सगळे बसलेत असं वाटावं. तर हा घोळका वरच्या मजल्यावरच्या टेबलाविषयी गप्पा मारू लागला होता. सीझनचे काम सुरू झाले तेव्हा शेवटच्या - म्हणजे त्या सीझनमध्ये सर्वात शेवटी ओपनिंग होणाऱ्या - ऑपेरासाठी दोन तीन आठवड्यांसाठी नवीन टेबल वाढवले जाणार असे कळले होते. बहुचर्चित मॅगी रेवूड तिथली ड्रेपर असणार होती. ती माझ्या मेजर अडव्हायजर सिल्व्हियाची मैत्रीण, ती NYU च्या कॉश्च्युम शॉपमध्ये शिकवायची. भरपूर कहाण्या ऐकल्या होत्या तिच्या ग्रेट असण्याबद्दल. तिच्या हाताखाली शिकायला मिळायला हवं अशी खूप इच्छा होती. तिच्यासाठी काही नवे लोक घेऊन आणि टेबलांची फेरफार करून नवी टीम तयार करून दिली जाणार होती. आमच्या टेबलच्या कुणालाच हलवले नाही. मॅगीकडे काम करायची माझी संधी हुकली. त्यात नेहमीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये जास्तीच्या टेबलला जागा नसल्याने तिचे टेबल वरच्या मजल्यावर होते. त्यामुळे तिच्या टेबलवर काय काम चाललंय याबद्दल जाम उत्सुकता होती. मग शेवटच्या ऑपेराचे काम पूर्ण होत आले. रंगीत तालमींची तयारी सुरू झाली. मी त्यावर्षी स्टिचिंग आणि ड्रेसिंग अप्रेंटीस होते. ड्रेसिंग अप्रेंटीस म्हणजे आपल्याकडे ज्यांना ड्रेसमन म्हणतात तो प्रकार. पण इंडस्ट्रीतून कणभर जास्त डिग्निटी असलेला. इथे प्रत्येक प्रिन्सिपल सिंगरला एकेक ड्रेसर दिलेला असे आणि मग एकेक ग्रुपला - म्हणजे स्त्रियांचा कोरस, पुरुषांचा कोरस, असतील तर नर्तक वगैरे - मिळून गरजेप्रमाणे दोन चार ड्रेसर्स दिले जात. प्रत्येक ऑपेराला एकूण 25-30 ड्रेसर्सचा क्रू काम करत असे. तर शेवटच्या ऑपेराच्या रंगीत तालमींच्या आधी आम्हाला आमच्या आमच्या ड्यूटीज सांगण्यात आल्या. मला स्त्रियांच्या कोरसबरोबर ड्यूटी होती आणि एका क्विक चेंजमध्ये हात द्यायचा होता. नटांच्या स्टेजवरच्या एक्झिट नंतर पुढच्या एंट्रीच्यासाठी अगदी कमी वेळात कॉश्च्युम्स बदलायचे असतील तर त्याला क्विक चेंज म्हणतात.
शेवटचा ऑपेरा होता 'डायलॉग्ज ऑफ द कार्मेलाईट्स'. फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवरचा हा ऑपेरा. फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान अमीरउमरावांना पकडून खून करण्याचे सत्र चालू असते तेव्हाचा हा प्रकार. एका सीनमध्ये ऑपेराची नायिका ब्लँच तिच्या घरावर लोक चालून आलेले असताना पळून जाते आणि लगेचच पुढच्या सीनमध्ये एका कॉन्व्हेंटमध्ये आश्रय घेते. आधीच्या सीनमध्ये तिच्या अंगावर भरपूर लेयर्स असलेला रोकोको पद्धतीचा सुंदर गाऊन, डोक्यावर विग वगैरे असतो. आणि पुढच्या सीनला ती विम्पल(टोपडे सदृश) आणि हॅबिट(ननचा झगा) घालून नन बनलेली आपल्याला दिसते. हे कपडे बदल करायला तिच्या एक्झिटनंतर परत एंट्रीसाठी केवळ 38 सेकंद. रोकोको प्रकारचा गाऊन, त्याच्या आत घालायचे लेयर्स हे सगळे चढवून मग वरती बॉडीसचे लेसिंग करणे वगैरेसाठी नॉर्मली 38 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. अश्या वेळेला घालायचे कपडे वरून दिसताना ऑथेंटिक आणि डिझाईनबरहुकूम दिसावे लागतात पण वेगळ्या पद्धतीने शिवावे लागतात. हे वेगळे तंत्र आहे. कुटुर आणि कॉश्च्युममध्ये असा इथे फरक असतो.
तर वरच्या मजल्यावरच्या म्हणजे मॅगी रेवूडच्या टेबलवर हे सर्व कपडे बनवायची ड्यूटी होती. नायिकेचा गाऊन बनवताना सर्व लेयर्स कमरेशी, खांद्याशी वगैरे जोडले जाऊन अनेक लेयर्सचा मिळून वन पिस ड्रेस बनवणे अर्थात त्यातला रोकोको गाऊनचा आभास कुठेही हरवू न देता. ही युक्ती तर सोपी होती. प्रश्न होता लेसिंगचा. ते कायमचे आणि खोटे करून आत वेलक्रो वगैरे दुसरीतले उपाय दुसरीच्या गॅदरिंगपुरते ठीक असतात. पण सँटा फे ऑपेराच्या आन बान शान के खिलाफच दिसलं असतं ते प्रकरण. खरंच लेसिंग केल्याचा ताण दिसला नाही कपड्यात तर तो गाऊन कसला. इथे मॅगीबायचा अनुभव आणि ब्रिलीयन्स कामाला आला. एका बाजूला नेहमीसारखी रिव्हेट्स केलेली (रिबीट मारलेली) पट्टी आणि दुसऱ्या बाजूला रिव्हेट्सच्या जागी लूप्स आणि कोर्सेटमध्ये घालायच्या बोनिंगमधून तयार झालेल्या लेसिंगचा जागा असा प्रकार केला. मागचे लेसिंग गाऊन घालताना यातून नेहमीसारखेच ओढून, खेचून बांधायचे पण काढताना मात्र ते एक बोनिंग खेचून काढले की लेसिंग सुर्र्कन निघून येत असे. आणि मग गाऊन काढण्याचा वेळ 2 सेकंदावर आला.
नायिका आधीचा सीन संपवून स्टेज लेफ्टने एक्झिट घ्यायची. 38 सेकंदाचे घड्याळ टिकटिकायला लागायचे. ती खोलीत यायची. विग, बोनिंग खेचणे, गाऊनच्या बाह्या, शूज ननचा झगा, विम्पल, खाली पसरलेल्या गाऊनमधून पाय बाहेर टाकून दुसरे शूज, अर्धा सेकंद चेक करणे आणि परत एंट्री. झाली 38 सेकंद. रंगीत तालमींना सुरुवात व्हायच्या आधी गायकनायिका आणि सर्व क्रू यांच्यासकट, वेळ लावून या बॅकस्टेज कोरीओग्राफीची तालीम झाली.
पहिल्या प्रयोगाआधी डिझायनरची प्रेझेंटेशन्स असायची आमच्यासाठी. तेव्हा डिझायनरने मॅगीच्या भरवश्यावर क्विक चेंज असूनही इतके एकमेकांच्या विरुद्ध प्रकारचे कॉश्च्युम्स डिझाईन केले हे सांगितले तेव्हा मॅगीबरोबर काम करायला मिळालंच पाहिजे याची अजून तहान लागली. त्याबद्दल परत मूड आला की बोलू!

Monday, April 25, 2022

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप - १. थिंबल

 लिसा कधीही हात चेक करायची. एका हातात गारमेंट आणि दुसऱ्या हातात सुईदोरा असेच असायचे बहुतेकदा. पण लिसा सुईदोऱ्याच्या हाताचे मधले बोट चेक करायची. त्या बोटात थिंबल घातलेले नसेल तर हातातला गारमेंट काढून घ्यायची आणि जाऊन थिंबल बसवेपर्यंत द्यायचीच नाही.

भरगच्च आणि अनेक स्तरवाले गाऊन्स, बरीच अस्तरे असलेले लांबलचक कोटस, खूप स्तर एकवटल्या कोपऱ्यात शिवायची बटणे असे काहीही हाती शिवताना लिसाचा थिंबलचा आग्रह किती योग्य होता हे कळायचेच.
लिसा आमच्या टेबलची ड्रेपर होती. म्हणजे इथल्या संकल्पनेत समजवायचे तर मास्टर टेलरच्या पेक्षाही जास्त स्किल अपेक्षित असलेली जबाबदारीची जागा. संपूर्ण टेबलची प्रमुख. एकूण 7-8 टेबले म्हणजे टिम्स असायच्या. या सगळ्या टिम्स मिळून त्या त्या वर्षीच्या 4 ऑपेरांच्या कपड्यांच्या शिवणकामाची जबाबदारी उचलायच्या. लिसा ड्रेपर होती त्यावर्षी मी तिच्या टेबलच्या अप्रेंटीसपैकी एक होते. अप्रेंटीस हे केवळ हातशिलाई करण्यासाठी असत. गाऊन्स आणि इतर सर्व कपड्यांच्या हेमलाईन्स (तळाचा काठ), नेकलाईन्स, लेपलच्या आतले फिनिशिंग, कोटांच्या अस्तराचे फिनिशिंग, बटणे, वरून शिवून जोडल्या जाणाऱ्या accessories असे सर्व काही जे जे हाताने शिवायचे असते ते आमच्या अंगावर असे.
पॅटर्न तयार करणे, त्याबरहुकूम खोटे कापड कापणे, खोट्या ड्रेसच्या ट्रायल्स, त्यानंतर पॅटर्नमध्ये फेरफार करून खरे कापड कापणे, मशीनवर शिवणे वगैरे यातले काहीही अप्रेंटीसच्या हातात दिले जात नसे. हे काम अतिशय प्रेसिजनने चाले (थिंबलशिवाय हातशिलाई करायची नाही म्हणजे बघा!). आणि नवशिक्यांना अश्या गोष्टी देऊन काम बिघडवणे परवडत नसे. निदान पहिले दोन ऑपेरा तरी. मग हळूहळू अंदाज आल्यावर पिनिंग करून देऊन मग मशीनची शिवण घालायला दिले जाई वगैरे.
माझ्या तिथल्या पहिल्या वर्षी स्टीचिंग अप्रेंतीस म्हणून काम करताना तीन महिन्यात मी इतके हेमींग, बटणं लावणे वगैरे केलंय की नंतर परत युनिव्हर्सिटीत कॉश्च्युम शॉपमध्ये माझे विद्युतवेगाने हेमिंग करणे हा चर्चेचा विषय झाला होता. आणि थिंबलशिवाय हातशिलाई करता न येणे, लायनिंगमध्येही, कुठेही दिसत नसला तरी मॅचिंग धागाच वापरणे हे ही.
हल्ली हातशिलाईची सवय सुटली त्यामुळे त्यात आता सुबकताही राह्यलेली नाही आणि विद्युतवेगही. तारकामामुळे सुईदोऱ्याच्या ग्रिपचा घोळ होतो काहीतरी. पण आजही मला थिंबलशिवाय काम करता येत नाही.
पण माझ्याकडे सँटा फे ऑपेराच्या कॉश्च्युम शॉपच्या कहाण्या मात्र बऱ्याच आहेत. पुढची परत कधीतरी.

Saturday, July 3, 2021

पुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड


त्या दिवशी पास्त्याचा मूड होता. काहीतरी Summery लाईट पास्ता हवा होता. बेसिल खूप आवडते पण फ्रेश बेसिल गेल्यावर्षी लॉकडाऊनमधे मिळालं तेवढंच त्यानंतर अजून फ्रेश बेसिलचे दर्शन झाले नाहीये. (निर्जाबै, घरात बेसिल लावा!)
नेटवर शोधल्यावर ही एक सोप्पी पाकृ मिळाली त्यात मला आदल्याच दिवशी गृहकृत्यदक्षतेचा अटॅक येऊन गेल्याने घरात पुदिना चटणी तयार होती. मग काय हाच तो दिवस, हीच ती वेळ... हा पास्ता करायचाच असे ठरले. अर्थात नेटवर सापडलेल्या रेसिपीमध्ये थोडी भर घालून.
चटणी म्हणजे पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आले, लसूण, लिंबू, मीठ हे सगळे घालून घुर्र करून घेतले इतकेच.
घरात fusili आणून ठेवलेला होता. तो पाण्यात मीठ घालून ते उकळून शिजायला घातला.
घरात एका टोमॅटोने एका बाजूला तोंड वाकडे केले होते. हल्ली पटापट खराब होतात टो. असो.. तर त्या वाकड्या बाजूला सदगती देऊन बाकी टो चिरून घेतला.
घरात एक काकडी होती ती सोलून त्याचे पातळ काप करून घेतले. चटणीत लसूण होतीच त्यामुळे लसणीच्या तीनच छोट्या पाकळ्या सोलून तुकडून घेतल्या.
लाईट ऑलिव्ह ऑइल वर लसूण परतली, त्यात वाळका भुगा रुपातले ओरेगानो आणि बेसिल भुरभुरले. सगळ्याच मिळून एक टिपिकल अरोमा असतो. तो आल्यावर पुदिन्याची चटणी ओतली पास्त्याच्या प्रमाणात. मग टोमॅटो घातला. पुदिन्याचा करकरीत कच्चा वास जाईपर्यंत हे परतलं. मग ड्रेन करून ठेवलेला पास्ता त्यात ओतला. एकेक फुसलीला सगळं मिश्रण लागेतो ढवळला. ड्रेन केलेले पाणी घातले दोन डाव सगळे मिळून येण्यासाठी. मग वरून काकडीचे काप घातले. त्यावर मिरपूड आणि मीठ घातले. एक ढवळा मारून मग नावाला थोडेसे (बोटभर. किंवा अमूलचा छोटा ब्लॉक असतो त्यातला पाव ब्लॉक) चीज किसून घातले. ते मिक्स होईतो एकदा ढवळा मारला आणि गॅस बंद केला. आणि पास्ता उतरून झाकून ठेवला.
भाकरीच्या लोखंडी तव्यात बटर गरम केले, बारीक क्रश केलेली लसूण परतली, ओरेगानो भुरभुर, आणि ब्रेडचे अर्धे अर्धे तुकडे करून या बटरवर भाजून घेतले. लोखंडी तव्यावर केल्याने बहुतेक मस्त खमंग झाले. गार्लिक ब्रेड तय्यार.
मग प्लेटिंग. प्लेटमध्ये घेतल्यावर वरून चमचाभर एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल गार्निश म्हणून घातले. ब्रेडवर जे चमकतय ते तेच आहे.
टेस्ट मस्त आलीये. बरोबर सॅलड मस्त वाटले असते पण वसई गावात लेटयूस मिळत नाहीये मला. त्यामुळे ते राह्यले. यात अजूनही काही summery गोष्टी घालता येतील.
चीज नको असेल तर नाही घातले तरी चालेल. पन नंतरचे EV ऑलिव्ह ऑइलचे गार्निश टाळू नका.
वि सू: काकडी चुकूनही टोमॅटोबरोबर घालू नका. शेवटीच घाला. Crunch नाही गेला पाहिजे.

Tuesday, March 30, 2021

कपडे, माणूसपण इत्यादी

"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?"  कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे. 

ह्याच प्रश्नाला संस्कृतीची फोडणी घालून नुकतेच उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनी असेच एक विधान केले. फाडलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे गुडघे आणि त्यामुळे कातरून गेलेली आपली थोर संस्कृती अश्या एकमेकांशी संबंध नसलेले मुद्दे त्या विधानात होते. गुडघे उघडे ठेवणे हे  पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि अंग झाकण्याची आपली संस्कृती असेही त्यांचे म्हणणे होते. मुळात अंग झाकण्याचा अवास्तव सोस हे प्रकरणच आपल्या अनुकरणप्रियतेचे निदर्शक आहे. दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडातला हा पाश्चिमात्यांचा सोस सरळ सरळ उचलून आपली संस्कृती म्हणून खपवतो आहोत हे मुख्यमंत्री महोदय सोयीस्कररीत्या विसरून गेलेले आहेत. 

‘फाडलेल्या जीन्स मधून संस्कृती कातरून पडते’ हे एकच विधान नाही. या वाटेवरची विधाने सतत चालू आहेत. आणि ती सभ्यता किंवा सभ्यतेचे मापक  म्हणून खपून जातायत. माणसांची प्रतवारी केली जातेय त्यावरून. अमुक प्रकारचे कपडे ही आपली संस्कृती नाही असे कुणी ना कुणीतरी रोज अतिशय अपमानास्पदरित्या सांगत राहतेच.  कुणाला राहीबाई पोफळेंच्या कार्यापेक्षा त्यांनी पुरस्कार स्वीकारताना डोक्यावर पदर घेणे याचेच फक्त कौतुक वाटते. कुणाला मंगलयानाच्या बातमीतल्या फोटोत सर्व वैज्ञानिक स्त्रिया त्या वैज्ञानिक आहेत याच्यापेक्षा त्या साडी, मंगळसूत्र, कुंकू वगैरे पेहरावात आहेत हे बघून भरून येते. 

पण हे बरेचसे स्त्रियांसाठी असते. केवळ स्त्रियांच्यावर असलेली धार्मिक वा सामाजिक ड्रेसकोडची सक्ती ही वरकरणी स्त्रियांची सुरक्षितता वगैरेसाठी असते असे म्हणले जाते. आणि स्त्रीच्या  शरीराच्या झाकलेल्या क्षेत्रफळानुसार स्त्रीचे वर्गीकरण केले जाते. याच्या मुळाशी स्त्रीचे वस्तूकरण किंवा मालमत्ताकरण हे पितृसत्ताक मूल्यच आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही जामानिम्यात असेल तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणे हे बालिश आणि अमानुष आहे. हे ही विसरून चालणार नाही. 

हे का आणि कसे झाले? शरीरावर ल्यायच्या गोष्टी या निव्वळ उपयुक्तता किंवा शरीर सजवणे या उद्देशांच्या पलीकडे जाऊन माणूसपणापेक्षा मोठ्या कधी झाल्या? अंगावर  परिधान करायच्या वस्तूंमध्ये वैविध्य येत गेले तसे माणसांचेही कप्पे पडत गेले. कपडे ही दृश्य संवादाची भाषा होत गेली. परिधान केलेली प्रत्येक गोष्ट एखादे चिन्हस्वरूप वापरली वा बघितली जाऊ लागली. सगळ्या जाम्यानिम्यावरून व्यक्तीबद्दल मत तयार केले जाऊ लागले. 

आणि मग हीच प्रक्रिया वळवून ठराविक ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल काय मत व्हायला हवे हे ठरवत म्हणजेच "हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" या प्रश्नाच्या भोवती फेऱ्या मारत मारतच कपडे व इतर परिधानाच्या गोष्टींचे संकेत बनवले गेले. या प्रश्नाला समाजाच्या वेगवेगळ्या उतरंडीचे असंख्य कंगोरे, पैलू, पापुद्रे सुटून मग हळूहळू त्या संकेतांचे नियम बनले. 

वेगवेगळे मुद्दे धरून हे नियम घडवलेले असतात, घडत असतात. बदलतही असतात. नियम आहेत म्हणजे ते पाळलेच पाहिजेत अशी अपेक्षा असते. पाळले न गेल्यास त्याचे परिणामही भोगावे लागणारच अशी धारणा होणे साहजिक आहे.  पण हे इतकं साधं, सोपं, सरळ, एकरेषीय नसतं. 

ड्रेसकोडमध्ये कपडे कसे असावेत याचे नुसते सूचन केलेले असते. ते सभ्य असावेत किंवा तत्सम असे नुसते संकेत असतात. अश्यावेळी अनेक अर्थ संभवतात आणि संघर्ष होतो. अशीच एक घटना याच आठवड्यात घडली. गुजरात विधानसभेत जीन्स व टीशर्ट घालून आल्याबद्दल आमदार विमल चुडासामा यांना बाहेर काढले गेले. वास्तविक पाहता विधानसभेचा काहीही लिखित ड्रेसकोड नाही. ‘मला याच कपड्यात बघून मतदारांनी निवडून दिले त्यामुळे मी त्याच कपड्यात असणे योग्य आहे.’ असा युक्तिवाद चुडासामा यांनी केला. तो मान्य  झाला नाही. 

जगभरात विविध देशांच्या संसदेत गेल्या काही वर्षांमध्ये एक राजकीय विधान म्हणून किंवा निषेध म्हणून पाश्चिमात्य किंवा मूळ युरोपियन असलेल्या ड्रेसकोडला आव्हान दिले जाते आहे. भारतीय राजकीय पोशाखांच्या संदर्भात बघायचे तर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १९३१ साली इंग्लंडच्या राजाला भेटायला जाताना सभ्यतेच्या सर्व कल्पनांना धुडकावून लावून गांधीजी खादीचे धोतर आणि शाल लेवून गेले होते. सभ्यतेच्या कल्पना आणि वावर याबाबत काटेकोर असणाऱ्या इंग्रजांच्या जगात यावरून गदारोळ उठला नसता तरच नवल. गांधीजींनी अतिशय हुशारीने केलेले हे राजकीय विधान होते. जाडेभरडे, अर्धे कपडे घालणाऱ्या जनतेने तश्याच प्रकारचे कपडे घालून इंग्लंडच्या राजाला भेटायला गेलेल्या माणसाला आपला, आपल्यातला आणि म्हणून आपला नेता मानणे हे साहजिकच. खादीच्या चळवळीच्या परिणामस्वरूप स्वातंत्र्यानंतर कैक वर्षे भारतीय राजकीय पोशाख खादीचे भारतीय वळणाचे कपडे असाच राह्यला. हे भारतीयत्व मानलं गेलं होतं. विविधतेत एकता या तत्त्वाचे हे थोडे भाबडे स्वरूप म्हणता येईल.  उदारीकरणानंतर आणि मग नवीन शतकात राजकारणात आलेल्यांना खादीचे ऐतिहासिक महत्व माहिती असले तरी ते स्वतःच्या जगण्याचा भाग म्हणून बघता येणे अशक्य होते. ते ज्यांचे नेते म्हणून आले त्यांनाही त्यांच्यासारखाच वाटणारा जीन्स टीशर्टवाला नेता आपला वाटणे हे ओघानेच आले. 

जगभरात कुठेही जीन्स व टीशर्ट या गोष्टींना फॉर्मल म्हणून मान्यता नाही हे खरे असले तरी फॉर्मल या गोष्टीच्या व्याख्या धूसर नक्की होतायत. त्यामुळे अश्या मान्यतांचा बाऊ आपण न करणे हेच योग्य ठरेल. 

पण यामुळे  कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधणे थांबणार नाही. शेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहे. कपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. आजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असते. होतच राहणार. पण या सगळ्यापेक्षा माणूस आणि माणूसपण मोठं आहे, असायला हवं ही जाणीव मात्र पक्की ठेवायला हवी.

- नी

---------

हा लेख दैनिक लोकमतमध्ये २३ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता. ही त्याची लिंक

कोणी, कसे कपडे घालावे, हे कोण ठरवणार?

Monday, March 1, 2021

प्रवास

मराठी शाळेत असल्यामुळे आमच्या शाळेच्या सहली असत. एका दिवसाच्या सहली. कुठेतरी जाऊन काहीतरी बघायचं. दिलेले सगळे डबे संपवायचे हा मुख्य कार्यक्रम असे. डब्याचा मेन्यू दरवर्षी ठरलेला होता. सकाळी खायला (नाश्ता आणि ब्रेकफास्ट हे शब्द तेव्हा रुळले नव्हते आमच्या जगात) चटणी आणि जाम सँडविचेस असायची. अश्विनी आणि माझी एकत्र असायची सँडविचेस. तिच्याकडे सगळी जॅमची आणि माझी सगळी चटणीची किंवा उलट. खायच्या वेळेला अर्ध्यांची अदलाबदल करायची असे दोघींच्या आयांनी मिळून ठरवलेले असायचे. त्यामुळे बिचारी स्कॉलर ग्रुपमधली अश्विनी बसमध्ये माझ्याबरोबर  बसायची. दुपारच्या जेवणाच्या डब्याचे मुख्य आकर्षण होते रसाच्या पोळ्या. त्या केवळ प्रवासासाठीच करायच्या असा कुणीतरी नियम घातला होता बहुतेक. त्या लुसलुशीत आणि गोडसर अश्या रसाच्या पोळ्या सहली संपल्या तश्या आयुष्यातूनही संपल्या. त्या रसाच्या पोळ्यांबरोबर जर चमचमीत अशी कांदाबटाटा काचऱ्याभाजी आणि केळं, बेदाणे घातलेला गोडच शिरा असा भरभक्कम डबा असायचा. संध्याकाळचे स्नॅक म्हणून चिवडा-लाडू-गोळ्या वगैरे दिलेले असेच. 
या खादाडीच्या दरम्यान अधेमधे खेळायचं, घसा फाटेस्तो गाणी म्हणायची. हुजूरपागेचा जयजयकार वगैरे आरोळ्या ठोकायच्या आणि संध्याकाळी घरी  यायचं. हा शाळेच्या सहलीचा कार्यक्रम. मोठे होत गेलो तसे यात खरेदी नावाच्या कार्यक्रमाची भर पडली. तिसरीतल्या लोणावळा खंडाळा सहलीला आयुष्यात पहिल्यांदाच दोनपाच रुपये हातात मिळालेले होते त्यामुळे आम्ही चिक्कीच्या दुकानात घसघशीत खरेदी केली होती लोणावळ्यात.   
चौथीत असताना मुंबईला राहायची सहल होती शाळेची. पहाटे सिंहगड पकडायला मला आणि अश्विनीला बाबांनी स्कूटरवरून सोडले होते. अश्विनीची की माझी चप्पल गाडीत चढताना रुळावर पडली आणि ती बाबांनी बाहेर काढली होती. आम्ही किंग जॉर्ज शाळेत राह्यलो होतो. तिथे त्या दिवशी एक लग्नही होते. तारापोरवाला मध्ये मासे बघितले होते. दुसऱ्यादिवशी सिंहगडनेच परत आलो होतो. घरी येताना अश्विनीच्या बाबांबरोबर आम्ही टांग्यातून घरी आलो होतो. इतकेच आठवते.  आईचा सगळाच गोतावळा मुंबईत असल्याने लहानपणापासून पुणे-मुंबई कितीतरी वेळेला केले पण टक्क लक्षात राह्यलेल्या थोडक्या वेळांपैकी हीच एक. 
रँ. र. पु. परांजपे प्राथमिक मधून हि. हा. चिं. प. हायस्कुलात आल्यावर या सहली अश्याच चालू होत्या पण त्या लक्षात नाहीत फारश्या. मग अजून मोठे झाल्यावर शाळेच्या सहली दोन किंवा तीन दिवसांच्या व्हायला लागल्या. तेव्हा मात्र त्यांचे नाव शाळेची ट्रिप असे झाले. एक दिवसाची सहल, अनेक दिवसांची ट्रिप. त्या पक्क्या लक्षात आहेत.
काळे ट्रॅव्हलसकडे त्या ट्रिप्सची व्यवस्था असायची. ट्रिपच्या आधीच शाळेत येऊन काळे काका आपल्या गडगडाटी हास्यासहित सगळ्या सूचना देऊन गेलेले असायचे.  तुकड्यांप्रमाणे बसेस आणि राहायची व्यवस्था असायची. तेव्हा तुकड्या तुकड्यांच्यातली खुन्नस; विशेषतः अ आणि ब तुकडीतली; जबरदस्त असायची. केवळ मुलींची शाळा असल्याने त्याचे पर्यावसान गंभीर मारामारीत वगैरे व्हायचे नाही. पण उगाचच नाक उडवून दाखवणे असायचे. ते ट्रिपमध्येही असायचे. 
शाळेच्या गणवेषाला 2/3/4 दिवस सुट्टी आणि दिवसभर फिरून आल्यावर रात्री सिनेमे बघून झोपी जाणे हे हायलाईटस असायचे या ट्रिप्सचे. व्हीसीआर-टीव्ही वगैरे मागवून सगळ्या मुलींना विचारून सिनेमे ठरवले जायचे. नगिना बघितला होता एका ट्रिपमध्ये. आणि घरी येऊन आईला साभिनय(स-नृत्य to be precise) स्टोरी सांगितली होती.  हैदराबादच्या ट्रिपमध्ये इतर काही तुकड्यातल्या मुलींच्या हट्टामुळे हिम्मत और मेहनत नावाचा सुपरडुपर टुकार सिनेमा पाह्यला होता. आणि खूप खिदळलो होतो. त्या खिडळण्यात आमच्या आवडत्या शिक्षिका म्हणजे संगम बाईही सामील होत्या त्यामुळे आम्हाला भारीच कूल वाटले होते.  
कॉलेजमध्ये अश्या ट्रिपा नव्हत्या पण मग एनसीसी कॅम्प, जनता राजाचे दौरे वगैरे निमित्ताने भटकंती चालूच राह्यली.
आणि मग बॉटनीच्या कलेक्शन टूर्स. वरंधा घाटातली भर पावसातली एक दिवसाची आणि बंगलोर-म्हैसूर-उटी अशी 8-10 दिवसांची कलेक्शन टूर.  कलेक्शनचे दिवसातले काही थोडे तास सोडले तर ट्रिप असल्यासारखाच भरपूर दंगा करून घेतला होता.
यानंतर मात्र आयुष्यातला मजा म्हणून प्रवास संपल्यात जमा झाला. नाटकासाठी, शिक्षणासाठी, कामासाठी प्रवास भरपूर केले.  कामासाठी जात असल्याने एकाच जागी वारंवार जात राहणे, वेगवेगळ्या पैलूतून  ती ती जागा अनुभवणे, आत उतरवणे हेही झाले. 
सध्या थांबलेय सगळेच आणि ही प्रवासाची तहान अस्वस्थ करतेय.
- नी

मराठी भाषा दिन

भ्रमणध्वनीवरून चेहरेपुस्तकावर मराठीत टपाल लिहून आजचा मराठी भाषा दिनाचा सोहळा करायचा आहे. त्यानिमित्ताने काही मराठी वाक्ये.  अश्या स्वरूपाच्या वाक्यांचा आपल्या वाचेत विनियोग केला की मराठीचे सुवर्णयुग साकारलेच म्हणून समजा. 
१. स्वयंचलित दुचाकी लत्ताप्रहाराने कार्यान्वित करण्याऐवजी हातदंडावर असलेली कळ दाबून कार्यान्वित करण्याचे नवीन तंत्रज्ञान आताशा उपयोजिले जाते.
२. पद्धत जामानिम्यात अलंकारांबरोबरच शिरोवस्त्रे व शिरोभूषणे, पट्टे, कालगणक डबी,  चक्षुसुख भिंगे, झोळ्या, बटवे आणि पादत्राणे यांचा समावेश असतो. 
3. कलाकुसरसामान विकणाऱ्या दुकानात  विनाआम्ल कागद, पाणीरंग, कृत्रिमरंग, तेलरंग, कडककापडफलक, कुंचले, झरलेखण्या, शिसलेखण्या, चिकटघोळ, चिकटपट्ट्या, चिकट्याची बंदूक, मणी, दोरे, सुया, लोकर,  उष्णतावरोधक सफेद व रंगीत पुठ्ठे आणि इतर अनेक वस्तू मिळतात. 

तसेच वस्तूंना व कृतींना मराठी प्रतिशब्द मिळेपर्यंत त्यांना विचारात अथवा विनियोगात घ्यायचे नाही अशी आज या मराठी भाषा दिनी आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. 

- नी

#प्रतिशब्द_आतंकवाद #मराठीभाषादिन_नव्हे_दीन #प्रतिशब्दसंस्कृतप्रचुरचहवा

 गरजूंसाठी(असे लोक आहेत) सूचना: प्रत्येक शब्दाला ओढूनताणून मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या वा तयार करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या मराठीवाचव्या जनांच्या फुकाच्या अट्टाहासासंदर्भाने उपहासात्मक विनोद म्हणून ही पोस्ट लिहिलेली आहे. 
मराठीच्या आग्रहाबद्दल माझे तारतम्य शाबूत आहे. त्याबद्दल शंका घेऊ नये आणि मला लेक्चर मारू नये. धन्यवाद!

वास

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला निमशहरी किंवा ग्रामीण भागात रस्त्यांवर  एक विशिष्ट वास असतो. बटाट्याचा खीस घालावा त्या जातकुळीचा वास असतो तो. कशाचा नक्की ते माहीत नाही पण असतो. 
एवढे वर्षांच्या सगळ्या फिरफिरीत तो वास, आजूबाजूचे मावळत जाणारे वातावरण, दिवसाचे काम संपवून राहण्याच्या ठिकाणी परत जायचा प्रवास, लोक घरी जातायत आणि आपण हॉटेलवर जातोय - आपण इथले नाही हे अधोरेखित होणे,  हा वास येतो तिथे आपलं काही असण्याची ओढ असं सगळं आणि अजून बरंच त्या वासाशी जोडलेलं आहे. 
एक काळ असा होता की ही फिराफीरी इतकी सततची होती की त्या वासाची सवय झाली होती. इतकी की तेच घर वाटे. उबदार वाटे. मग ते फिरणं थांबलं. तो वास आठवणीत राह्यला.  आणि सगळंच तुटल्यासारखं झालं. 
हल्लीच इकडे आसपासच भटकत असताना एका संध्याकाळी हवेला त्या वासाची नोट होती. मी थांबले. वासाची दिशा शोधायचा प्रयत्न केला. हरवली ती नोट. 
फिरायला हवं, मला सतत फिरायला हवं.
- नी

Saturday, February 13, 2021

माझं काम माझा अभिमान

#माझं_काम_माझा_अभिमान अश्या हॅशटॅगने आपल्या कामाबद्दल, आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल लिहायचे असे फेसबुकवर सुरू होते. 
त्यात माझ्या  not so प्रेरणादायी वगैरे प्रवासाबद्दल.. प्रवास कसला.. इकडून तिकडे उडयांच्याबद्दल लिहून काढले. ती ही पोस्ट. 
सुरुवात करण्यापूर्वी हा वैधानिक इशारा.
हा माझा प्रवास असल्याने त्यात मी मी मी मी खूप आहेच. त्याला पर्याय नाही.  दुसरं म्हणजे ही काही परिस्थितीशी दोन हात प्रकारच्या संघर्षाची गोष्ट नाही. जो काय थोडाफार संघर्ष असेल तो 'आपुला आपणासी' प्रकारचाच आहे. स्टोरी बडी और बडी बोरिंग है. 
----------------

'मोठेपणी कोण होणार?' याची उत्तरं लहानपणी सतत बदलत असतात. माझीही होती.  फरक इतकाच की वयाने वाढल्यावरही ती बदलतीच राह्यली. 
मेडिकल वा इंजिनिअरिंगच्या वाटेला जाणार नाही हे शाळेतच पक्के करून टाकल्यावर मग दहावीनंतर 'कोठे जावे, काय करावे, काही कळेना' अशी अवस्था होती. मग बरे मार्क होते म्हणून सायन्सची वाट धरली. 
कॉलेजात असताना नाटकाचा किडा चावला. काही वर्कशॉप्स केली. तिथून काही चांगले ग्रुप्स मिळाले. चांगली माणसे भेटली.  हे आवडतंय असं झालं. पण माझ्याकडे कॉन्फिडन्सची बोंब. कोण काम देणार होतं मला? मला थोडीच जमणार होतं?  इथेच माझी गाडी अडकलेली. अपवाद वगळता बहुतेक मित्रमंडळी अवसानघातकीच होती. त्यामुळे आपण काहीतरी करायचं ठरवायचं आणि मित्रमंडळींनी आपल्याला हसायचं हे ठरलेलंच. 
याच दरम्यान विक्रम गायकवाडकडे मेकप शिकले.  मग हे बरंय असं वाटलं. हाताने काहीतरी रंगवणे, घडवणे हे आयुष्यात असायलाच हवे. नाही जमणार त्याशिवाय हे यावेळेला थोडंसं स्पष्ट व्हायला लागलं. 
बीएस्सी उरकल्यावर आता सायन्स पुरे हे पक्के ठरवले. एम ए नाटक शिकायला पुणे विद्यापीठात गेले.  मित्रमंडळी हसायचीच. मला सवय झाली होती त्याची. त्यामुळे दुनिया फाट्यावर वगैरे मी आपोआप शिकले. विद्यापिठात  शिकत असताना इतिहास पहिल्यांदा मनापासून आवडायला लागला.  एम ए करत असतानाच ग्रीप्सची काही नाटके, वामन केंद्रे यांनी डिरेक्ट केलेलं एक नाटक वगैरे केले. 
याच काळात कॉश्च्युमच्या जगाशी तोंडओळख झाली. आणि मी हेच करायचं ठरवलं. करायचं तर शिकायला हवे. ते कुठे शिकावं हे शोधू गेले तर देशात कॉश्च्युम डिझायनिंगचा कोर्सच नाही हे लक्षात आले. त्याच वेळेला युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाचे तेव्हाचे नाट्यविभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंड आमच्या ललित कला केंद्रात(पुणे विद्यापीठ) आले होते  ते जॉsज्याला कॉश्च्युम शिकायला चल म्हणाले.  मग मी गेलेच तिकडे कॉश्च्युम मध्ये (नाटकाच्याच विभागात) तीन वर्षांचे एमएफए करायला. मित्रमंडळी खदखदून हसली.  
ती तीन वर्षे माझ्या आयुष्यातली सगळ्यात भन्नाट वर्षे होती. शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य, क्षणाक्षणाला येणारे नवीन अनुभव, समोर येत जाणाऱ्या नवीन संकल्पना, हळूहळू तुटून गेलेली झापडं हे सगळं होतं. तेव्हा नाटक शिकणे यावर हसायची मराठी किंवा थोडीफार भारतीय परंपरा असल्याने आमच्या डिपार्टमेंटला मी सोडून एकही भारतीय व्यक्ती नव्हती. त्यामुळे देशी कोंडाळ्यापासून वाचले. जगभरातले लोक मिळाले. सगळे नाटकवाले त्यामुळे देशी लोकांपेक्षा 'माझिया जातीचे'. तिथे असताना तीन उन्हाळी सेमिस्टर्समध्ये सॅण्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये काम केले. पहिल्या वर्षी शिवणविभागात तर पुढची दोन वर्षे कॉश्च्युम क्राफ्ट विभागात. कॉश्च्युम क्राफ्ट मध्ये चपलाबूट, बेल्टस, दागिने, मुखवटे वगैरे सर्व गोष्टी येतात. त्या त्या सीझनमधल्या ऑपेरांच्यासाठी डिझाईनबरहुकूम या सर्व वस्तू बनवणे हे या विभागाचे काम. इथे तारकाम व इतर दागिने बनवणे, लेदरचे बेसिक काम, विविध प्रकारची रंगवारंगवी, विविध प्रकारचे मटेरियल हाताळणे हे शिकले.  शिकले असं वाटलंच नाही इतकी मजा यायची हे करताना. सॅण्टा फे हे गावही जादुई आहे. नेटिव्ह अमेरिकन आणि हिस्पॅनिक संस्कृतीच्या खुणा जागोजागी आहेत. तिथली चित्रसंस्कृती, डिझाईन-संस्कृती आपल्याला माहिती असणाऱ्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे आणि तितकीच सुंदरही. माझ्या डोक्यातल्या चौकटी मोडायला इथे सुरुवात झाली. 
मग परत आल्यावर  कॉश्च्युममधे काम सुरू केले आणि पुण्याला विद्यापिठात,  ललित कला केंद्रात नाटकाच्या एम ए च्या मुलांना  कॉश्च्युम आणि मेकप शिकवायला सुरूवात केली.  मला शिकवायला आवडतंय हे लक्षात यायला लागले. 
मुंबईत कामाची सुरूवात केली तेव्हाच तीनचार वर्ष ठरवून ठेवलेल्या नवऱ्याशी लग्नही करून टाकले.  एकत्र काम करत होतो. ती मजा होतीच. आमची दोघांची एकत्र म्हणजे तो दिग्दर्शक आणि मी  कॉश्च्युम डिझायनर म्हणून केलेली पहिली फिल्म झाली. तिला प्रचंड यश मिळाले.  हे काम करायची संधी मला माझ्या डिग्रीच्या बळावरच मिळाली होती पण माझ्या कामाला  दिग्दर्शकाची बायको असे लेबल लागले. एकदा बायकोपणामुळे सगळं मिळतंय असं जगाने ठरवलं तुमच्याबद्दल की मग तुमचे शिक्षण, तुमचे काम, तुमची गुणवत्ता हे भारतीय डोळ्यांना चुकूनही दिसत नाही.  ती मजा माझ्याबाबतीतही झाली. अजूनही होते. 
२००५ मधे दिल्लीच्या रिता कपूर यांनी त्यांच्या मोठ्या प्रकल्पातल्या एका भागाबद्दल मदत करण्यासाठी विचारले. तेव्हा मला रिता कपूर कोण ते काहीही माहिती नव्हते पण नऊवारी साडीचा विषय होता. नाही म्हणणे शक्यच नव्हते. नऊवारी साड्यांची नेसण या संदर्भाने त्यांना माहिती द्यायची होती. एकेकाळी जाणता राजामधे काम केलेले असल्याने नऊवारी नेसण्याचे काही बेसिक प्रकार येत होतेच. ते सांगितले आणि त्यांच्या फोटोग्राफरबरोबर वाड्यावस्त्यांवर जाऊन कातकरी, ठाकरी, कोळी, आग्री वगैरे साड्यांची नेसणही शिकून घेतली. नंतर वर्षभरात दिल्लीवारी झाली तेव्हा रिता कपूर यांच्या स्टुडिओ/  ऑफिसमधले दृश्य बघितले तेव्हा त्यांचा हा प्रकल्प किती मोठा आणि किती महत्वाचा आहे हे लक्षात आले. माझे त्या प्रकल्पातले काम झाले होते पण माझ्या डोक्यात किडा पडला होता. पुढे नदी वाहतेच्या रिसर्चसाठी फिरताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातल्या वेगवेगळ्या जातींजमातींच्या साडी नेसण्याच्या पद्धती गोळा करायला, फोटो/ व्हिडिओ काढून ठेवायला सुरूवात केली होती. त्या त्या लोकांचे जगणे आणि त्यांच्या साड्या नेसण्याच्या पद्धती यांची सांगड घालणे, या सगळ्यात एक सूत्र काही मिळतेय का ते बघणे हे माझ्याही नकळत माझ्या डोक्यात चालू झालेले होते. एकही पुस्तक मात्र मला नेसण्याच्या पद्धतींविषयी, त्या इतिहासाविषयी फार काही सांगत नव्हते.  अखेर २०१०-२०११ दरम्यान कधीतरी रिता कपूरचा 'Sarees: Tradition and Beyond' नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. भारतभरातील साड्यांचा इतका मोठा पसारा आणि तरीही योग्य माहिती असलेला हा एकमेव ग्रंथ आहे. या विषयात अभ्यास असलेल्यांना या ग्रंथाचे महत्व नक्कीच कळेल. मराठी साड्यांच्या नेसण पद्धतींबद्दल रिता कपूरने त्या ग्रंथात मला क्रेडिट दिलेले आहे. हे काहीतरी भन्नाट होते. कामापुरता रिसर्च पासून रिसर्च हेच काम हा एक मार्ग मला खुणावू लागला. त्या मार्गावरच्या एका प्रकल्पाला हात घालण्याचा प्रयत्न आता चालू आहे. 
नाटकाचा किडा स्वस्थ बसवेना म्हणून एक कवितांचा रंगमंचीय आविष्कार धर्तीवरचं प्रकरण उभं केलं. संकल्पना, कवितांची निवड, त्यातून संहिता तयार करणे, दिग्दर्शन वगैरे माझे. खूप शिकले मी हे करताना. अकरा प्रयोग झाले आणि एवढ्या लोकांची मोट बांधत सगळी मॅनेजमेंट खेचणे मला झेपेनासे झाले. मग बंद केले ते.  
एक दिवस सतीश मनवरने त्याच्या नाटकासाठी विचारले. मनस्विनीने लिहिलेले नाटक सतीश दिग्दर्शित करत होता. खूप वर्षांनी रंगमंचावर उभे राहायचे हे फार मस्त वाटले. मजा आली होती. अभिनय ही बाब आपल्याला कधीही जमणारी नाही असे जे मी ठरवले होते कधीच्याकाळी त्याला सुरुंग लागला. बरं जमलं होतं तेही. अर्थात त्यात यापुढे जाऊन काही प्रयत्न करावे इतपत बळ माझ्याच्याने एकवटले नाही. जे शिकलेय त्यातच काम करायला हवे हा विचार सगळीकडून पक्का घट्ट बसवलेला होता. तो खिळखिळा व्हायला अजून वेळ होता.
याच दरम्यान लिहायची ऊर्जा छळू लागली. पेनाने कागदावर लिहायची गरज आता उरलेली नव्हती. युनिकोड देवनागरी जगात आलेले होते. वाईट अक्षरापायी आता काही अडणार नव्हते.  मग ब्लॉगिंग सुरू केले. मी लिहिलेलं आवडतंय लोकांना असे वाटल्याने नियमित ब्लॉगिंग करत राह्यले. कथा लिहिणे सुरू केले. काही कथांना साप्ताहिक सकाळ, मिळून साऱ्याजणी वगैरेंची बक्षिसे मिळाली. मी लिहायला सुरू केले हे बघून सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला झाला. पहिल्या कथेला बक्षीस मिळाल्याचे बघितले तिने आणि महिन्याभरात ती गेली. माझं सगळं बळ संपलं. पण मी लिहीत राह्यले. कथा, कविता आणि ब्लॉग्ज वगैरे. 
मग पेणमधल्या एका एनजीओसाठी एक डॉक्युही करून दिली. तेही आवडले काम. 
दरम्यानच्या काळात कॉश्च्युम्सचे काम करत होतेच छोटेमोठे. करत राह्यले पण हळूहळू त्यात मजा यायची बंद झाली.  या इंडस्ट्रीची मागणी आणि मी जे शिकून आले होते ते याचा मेळ बसेना. 
एकदा तुम्ही एखाद्या विषयात स्पेशलाईज्ड शिक्षण घेतलेत की त्या तेवढ्याच गोष्टीपलिकडच्या इतर कशातलेही तुमचे काम, मत, विचार हे पूर्ण इनव्हॅलीड होतात. 'कॉश्च्युम करताय ना तर तेवढे नीट पुरवा, उगाच सीनच्या  व्हिज्युअल ट्रीटमेंटमध्ये आणि बाकी फ्रेमच्या रंगसंगतीमध्ये नाक खुपसू नका.' असा साधारण खाक्या असतो. आणि मला या गोष्टी समजून न घेता कॉश्च्युम्स करणे मेंदूला थकवणारे व्हायला लागले होते. व्यक्तिरेखा कपड्यातून घडवताना जी क्रिएटिव्ह गंमत असते ती मिळेना. कपडे पुरवठादार म्हणून काम करताना कंटाळा येऊ लागला.  त्यातच नाटक, लिखाण, डॉक्युमेकिंग वगैरे करताना जी तरतरी यायची मेंदूला ती सोसाने शिक्षण घेतलेल्या या विषयात काम करताना मिळत नव्हती. मग चालढकलही व्हायचीच अर्थात. 
यातच नदी वाहते स्वतः प्रोड्युस करायचा निर्णय आम्ही घेतला. त्याचे सर्व ताण, वेळेची मागणी, हजारो नव्या गोष्टी शिकणे हे सगळे संदीपपेक्षा कणभर कमी पण माझ्याही वाट्याला होतेच. अशी मी अनेक गोष्टीत विखुरलेली होते. 
'आपण या गोष्टीत स्पेशलाईज्ड शिक्षण घेतलंय. त्यामुळे यातच काम करणे, यातच पुढे जाणे, यातच एक्सेल करणे हे आणि हेच अनिवार्य आहे. मुख्य आहे. बाकी सगळे दुय्यम.'  हे भूत मानेवर घट्ट जखडून बसले होते. आणि कॉश्च्युमच्या पलिकडच्या शक्यता माझ्या मलाच दिसत होत्या.  या दोन्हीत झगडा चालू होता माझ्या आत. परिणामी बाहेरच्या बाजूला मी अजूनच डल पडत चालले होते. असे व्हायला लागले की तुमच्यावर फुल्या मारणाऱ्यांची कमतरता नसतेच. 
हा झगडा निपटण्यासाठी म्हणा किंवा हात शिवशिवत होते म्हणून म्हणा किंवा अजून काही कारणाने  म्हणा, मी काहीतरी कलाकुसर सुरू करायला हवी हे ठरवले. सॅण्टा फे ऑपेरामध्ये काम करताना तारेच्या कामाची अगदी तोंडओळख झाली होती.  आता  तार आणि कापड असे काहीतरी सुचत होते. ज्याची सुरुवात कमी जागेत, थोडक्या खर्चात करणे शक्य होते. मग एक दिवस सम्राट (तुळशीबाग) मधून तारेचे एक पाकीट आणले. ती भयानक तार आणि कापडांचे मणी बनवून त्यातून एक नेकलेस सारखे करून पाह्यले. मजा आली. जे झाले होते ते काही खास नव्हते पण. ती तार अगदीच टुकार होती. ही 2011 मधली गोष्ट. फेसबुकवर वायर रॅप ज्वेलरी नेटवर्क नावाच्या ग्रुपमध्ये बरंच शिकायला मिळत होतं. तार कामातल्या कलाकुसरीबद्दलही आणि तारकलाकार म्हणून एथिक्सबद्दलही.  ते सगळे पल्याडच्या देशांच्यातले लोक. एकही वस्तू कुठे मिळेल कुणीच सांगू शकत नव्हते. मग एक दिवस भुलेश्वर गाठले. या दुकानातून त्या दुकानात शोधत शोधत तांब्याच्या तारांची दोन भेंडोळी आणि अगदी बेसिक हत्यारे घेऊन आले. आणि सुरू केले तारा वळणे.  चुकत,माकत, शिकत प्रवास सुरु झाला. २०१३ मधे मी पहिला संपूर्ण नेकलेस बनवला एका मैत्रिणीला गिफ्ट द्यायला. पण अजून तरी माझी स्टाइल किंवा असे काहीच सापडलेले नव्हते. 
एक दिवस असेच सराव म्हणून घरात असलेला एक दगड तारेने बांधून बघितला. पॉलिश न केलेली तार आणि दगडाचे रांगडेपण या दोघांची एकमेकांशी कुंडली चांगलीच जुळली आणि मला माझी शैली मिळाली. तेव्हा आमचे नदी वाहतेचे शूटींग सुरू व्हायच्या बेतात होते. प्रॉडक्शन डिझायनर म्हणून माझे काम सुरू झालेले होते. एका सीनमधे नदीतल्या साती आसरांशी नाते सांगणाऱ्या सात मुली असणार होत्या. नदी, माती, दगड, झाडे, पाने, आकाश, निसर्ग या सगळ्याचा भाग असल्याप्रमाणे त्या दिसणे अपेक्षित होते. त्या सातही जणींना काही थोडके असे दगडाचे तारेत बांधलेले दागिने घालायचे ठरवले. त्याप्रमाणे प्रत्येकीला एकेक नेकलेस आणि एकेक केसात माळायचा दागिना बनवला. नदी, निसर्ग आणि रस्टिक असे काहीतरी अस्तित्व या गोष्टींनी डिफाइन केले. 
नदी वाहतेच्या भरपूर जबाबदाऱ्यांच्यात मला ठिकाणावर राहायला तारांनी मदत केली हे नक्की. त्यात माझे काहीतरी सापडत होते. नदी वाहतेचे शूटिंग संपेस्तोवर माझा आतला झगडा संपत आला होता.  माझी कॉश्च्युम डिझायनर म्हणून ओळख रेटत राहायचे भूत फेकून द्यायचे मी ठरवले होते. तारकामाचे रूपांतर व्यवसायात करता येईल कदाचित ह्या विचाराने उचल खाल्ली होती. तारकामात हळूहळू प्रगती होत होती. एका मैत्रिणीने माझ्याकडून दगडाचे तारेत बांधलेले पेंडंट आणि तारेची चेन असे नेकलेस करून घेतले. ती माझी या कामातली बोहनी. तिला द्यायचे म्हणून मग माझ्या ब्रॅण्डचे नाव नी नक्की केले. पण प्रत्यक्ष दागिन्यांचे कलेक्शन वगैरे असे काही तेव्हा करण्याइतकी माझी तयारी झालेली नव्हती.
याच दरम्यान एका नाटकाच्या कॉश्च्युम डिझायनिंगचे काम आले.  बाई(विजया मेहता) डिरेक्ट करत होत्या. काम करायला मजा आलीच पण बाकी त्यांच्या हातात नसलेले अनेक फॅक्टर्स होते. काम चांगले झाले तरी इथे मी स्वतःला लांबून तपासत राह्यले आणि अखेर माझ्या आवडत्या कामापासून तात्पुरती किंवा कायमची फारकत घेण्याचे  ठरवले.  स्वत:शीच ठरवले पण ती हिंमत गोळा करायला बरंच बळ लागलं होतं.  हे नाटकाचे प्रोजेक्ट मधेच थांबले एकदोन महिन्यांसाठी. आणि मी ठरवले आता खेळ फार झाले. आता निर्णय झालाय तर पुढच्या वाटेची काहीतरी ठोस सुरूवात व्हायला हवी. आणि नाव ठरल्यावर तब्बल 6-7 महिन्यांनी 10 एप्रिल 2015 ला माझे पहिले कलेक्शन मी फेसबुक पेजवर लॉन्च केले. छान रिस्पॊन्स होता लोकांचा.  मी ही शिकत होते. तेव्हापासून आतापर्यंत 5 छोटी छोटी कलेक्शन्स, कलेक्शन शिवायच असेच एकेकटे दागिने,  अगणित कस्टम डिझाइण्ड दागिने बनवले आहेत.  माझे तारेतले क्राफ्ट, मटेरियलची समज यांचा आलेख चढता ठेवायचा प्रयत्न आहे.  काही गोष्टी मी पहिल्यापासून ठरवल्या होत्या त्या आजही पाळतेय. एक म्हणजे बाजारात ज्या प्रकारचे, ज्या पोताचे दागिने मिळत होते ते बघून मला कंटाळा आला होता म्हणून मला काहीतरी वेगळे हवे होते. ही दिशा, हा हेतू सोडायचा नाही. आणि दुसरे म्हणजे कुठलेही ठराविक ट्युटोरियल बघून त्याबरहुकूम वस्तू बनवणार नाही. ट्युटोरियल हे टेक्निक शिकण्यापुरतेच असेल, तयार झालेली वस्तू पूर्णपणे माझ्या शैलीची, माझ्या डोक्यातून आलेली असेल. 
आता कुठे तारेची नस समजायला लागलीय.  आता तारांच्यातून ब्रह्मांड उभं होताना दिसतंय डोक्यात.  व्यवसाय म्हणूनही या मार्गावरचे दिवे हळूहळू उजळतायत अशी शक्यता वाटायला लागलीये. 
नी च्या पहिल्या पाच वर्षात माझ्या बाकी आयुष्यातही प्रचंड उलथापालथ झाली. त्यातून आम्ही तावून सुलाखून जातो आहोत अजूनही. अनेक पातळ्यांवरची ओढाताण चाालोो आहे.  यात टिकून राहायला मला माझ्या तारकामाचा सर्वच पातळ्यांवर  खूप उपयोग झाला हे नक्की.  पार्ल्यातून वसईला राहायला जाणे हे ही घडले या काळात. वसईने शांतता आणि होप्स दिल्या आहेत. 
याच पाच वर्षात अजून एक महत्वाची गोष्ट घडली. एम ए करत असताना इतिहास आवडू लागला हे मी आधी सांगितले आहेच. एम एफ ए करत असताना वेशभूषेचा इतिहास असा विषय होता. इतिहास ही कशी आपल्या सगळ्या सगळ्याला कारणीभूत गोष्ट असते याचा प्रत्यय ठायी ठायी येऊ लागला. त्याबद्दल थोडे थोडे लिहायला सुरू केले होते. 2018 मधे कपड्याच्या इतिहासातल्या गमतीजमतींबद्दल, प्रवाहांबद्दल, समजुतींबद्दल मी एक सदर लिहिले. तसे त्रोटक स्वरुपाचेच होते पण ते लिहिले जाणे मला गरजेचे वाटत होते. त्यावर पुढे करायचे काम माझी वाट बघते आहे. 
कोविडने जग थांबले तेव्हा ड्रामा स्कूल, मुंबई या संस्थेत कॉश्च्युम आणि सेट डिझाइन शिकवत होते तसेच तिथल्या डिझाइन विभागाची प्रमुख म्हणूनही काम बघत होते. अर्थात व्हिजिटिंग. हे वर्ष शिकवण्याचे काम सगळे थांबलेच आहे. पण जग जाग्यावर येईल, संस्था, विद्यापिठेही जाग्यावर येतील आणि नाट्यविभाग सुरू होतीलच. तेव्हा मी शिकवत असेनच. 

याच काळात कधीतरी मी माझे असे कैक गोष्टीत विखुरलेले असणे स्वत:शीच स्वीकारले. करीअर उपदेश वगैरे असतात त्यात सांगितले जाते की तुम्हाला अखेरीस एक काहीतरी काम करायला हवे. एक काहीतरी तुमचे शीर्षक असायला हवे अन्यथा तुम्हाला व्यावसायिक म्हणून पुरेश्या गांभिर्याने स्वीकारले जाणार नाही. हे सूत्रही तसे ओव्हररेटेड आहे. मुळात फ्रीलान्सर असायचे तेच एका खुंटाला बांधले न जाण्यासाठी तर मग तुम्हाला दहा गोष्टी खुणावत असतील आणि त्यातल्या चार गोष्टी तुम्ही उत्तम करू शकत असाल तर एकच एक ओळख हवी याचा सोस फार छळतो तुम्हाला. त्यापेक्षा असू द्यावी विखुरलेली ओळख. 
अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जग वयाचा फार मोठा बागुलबुवा करून बसतं. अमुक एका वयानंतर नवी सुरूवात असूच शकत नाही अशी समजूत करून ठेवलेली असते जगाची. त्या अमुक वयाच्या टप्प्यानंतरही माणूस म्हणून मनात, शरीरात आख्खा डाव परत नव्याने खेळता येण्याची ताकद असते. हे मी मानते, अनुभवते आहे त्यामुळे दहा वर्षांनी कदाचित या माझ्या उड्यांमधे काहीतरी वेगळ्यात गोष्टीची भर पडलेली असूच शकते कुणी सांगावं! 
   
हा माझा प्रवास कुणाला फार प्रेरणादायी वगैरे असणार नाहीये पण कुणा माझ्याइतकेच विखुरले असलेलीला किंवा चाळीशीनंतर नवीन नवीन स्वप्ने पडत असलेल्या कुणाला  'आहे कुणीतरी सोबतीला!' इतके वाटले तरी पुरे आहे. 

सध्यासाठी समाप्त!

-नी

Search This Blog